हमारी नाव वहाँ डूबी

हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहाँ दम था

मेरी किश्ती थी डूबी वहाँ जहाँ पानी कम था

आपण जितके संवेदनशील असतो, तितका आपल्याला रागही लवकर येतो. पण त्यातला दोष असा आहे, की आपला राग तितक्याच लवकर शांतही होतो. कालपरवा आपण कशामुळे संतप्त वा प्रक्षुब्ध झालो होतो? त्याचे चार दिवसानंतर आपल्याला पूर्ण विस्मरण झालेले असते आणि तीच खरे तर आपल्यासारख्या संवेदनशील समाजाच्या शत्रूंची मोठी ताकद असते. ते आपल्या विस्मरणशक्तीच्या बळावरच त्यांचे डावपेच खेळत असतात आणि सातत्याने आपल्याला आपल्याच क्षेत्रात पराभूत करीत असतात. कालपरवा पुलवामा येथे 40 हून अधिक भारतीय जवानांची भर ताफ्यावर चढाई करून हत्या झाली, तेव्हा अवघा देश प्रक्षुब्ध होऊन उठला होता. पण ती तशी पहिली घटना अजिबात नव्हती. दहा वर्षांपूर्वी अशीच घटना मुंबईच्या भर रस्त्यात घडलेली होती आणि सैनिकांचा नव्हेतर पावणेदोनशे सामान्य नागरिकांचा हकनाक बळी गेलेला होता. दोनतीन वर्षांपूर्वी असाच हल्ला पठाणकोट व उरी येथील लष्करी तळावरही झालेला होता आणि आपण इतकेच संतप्त होऊन रस्त्यावर आपला संताप व्यक्त करण्यासाठी उतरलो होतो. पण त्यामागची कारणमीमांसा वा त्यातली रोगबाधा शोधून त्यावर कायमचा उपाय योजण्यासाठी आपल्याकडून कितीसे प्रयत्न झाले? ज्या जवानांच्या हौतात्म्यामुळे आपल्या मनाचा प्रक्षोभ झाला, त्यापैकीच काही जणांना अधूनमधून काश्मिरात सुरक्षा कारवाई करताना मागून दगडफेकीचे हल्ले सोसावे लागतात. तेव्हा आपण इतकेच रागावतो काय? नसेल तर एखाद्या मोठ्या घटनेनंतर असा प्रक्षोभ किती कामाचा आहे? कारण तशा किरकोळ वाटणार्‍या व भासणार्‍या घटनांमधून मोठ्या हल्ल्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असते. सज्जता केली जात असते. त्या किरकोळ वाटणार्‍या प्रसंगातून आपल्या संवेदना शिथिल वा गाफिल केल्या जात असतात. परिणामी मोठ्या घटनेसाठी पुरेसे निर्धास्त वातावरण घातपात्यांसाठी तयार व्हायला हातभार लागत असतो. कारण अशा घटना रोखण्याचेच काम प्राण पणाला लावून लढणार्‍यांकडे आपण पाठ फिरवलेली असते. आपल्याला पुलवामानंतर कर्नल श्रीकांत पुरोहित आठवला काय? आपल्याला टीएसडी हे शब्द वा अक्षरे आठवली काय? सगळे रहस्य तिथेच तर दडलेले आहे ना?

 

श्रीकांत पुरोहित नऊ वर्षे तुरुंगात सडत पडलेला होता आणि त्याच्यावर हिंदू दहशतवादाचा चेहरा म्हणून सगळीकडून शिक्कामोर्तब केले गेले होते. कुठलाही सज्जड वा कोर्टात टिकणारा पुरावा विरोधात नसताना, पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांना दीर्घकाळ जामीन कुठल्या कारणास्तव नाकारला जात होता? आपण त्यासाठी कुणाला जाब विचारायला पुढे सरसावलेले होतो काय? त्या नुसत्या आरोप व जामीनाचे निमित्त करून सतत हिंदू दहशतवादाचे आरोप करणार्‍यांना जाब विचारण्यासाठी आपल्यातले कितीजण पुढे आलेले होते? नऊ वर्षांनंतर श्रीकांत पुरोहितला जामीन मिळाला आणि मध्यंतरीच्या काळात पोलिसांकडून त्याचा अनन्वित छळ झाला. तेव्हा आपण मस्त झोपा काढत नव्हतो काय? श्रीकांत पुरोहित हा लष्करी गुप्तचर सेवेतला मोक्याचा अधिकारी होता आणि समाजात मिसळून तिथे गुपचूप चाललेल्या काही हालचालींची माहिती मिळवत होता. त्याच माहितीच्या आधारे भविष्यात होऊ शकणार्‍या डझनावारी घातपातांना रोखणे शक्य झालेले होते. कुठल्या वर्तमानपत्राने किंवा माध्यमाने कधी पुरोहित लष्करी सेवेत कुठले काम करीत होता, त्याची कधीच माहिती दिली नाही किंवा लपवली. आपण सामान्य वाचक वा नागरिक म्हणून अशा माध्यमे किंवा पत्रकारांचा कान पकडून सत्य माहिती मिळवण्याचा आग्रह धरला होता काय? मुंबईत कसाब टोळीचा हल्ला होऊन दीडदोनशे लोकांचा बळी पडल्यावर आपण खडबडून जागे झालो आणि शहीदांसाठी मेणबत्या लावायला पुढे सरसावलो. तेव्हाही कर्नल पुरोहित कार्यरत असता किंवा गजाआड खितपत पडलेला नसता, तर मुंबई हल्ला होऊ शकला असता काय? आपल्या मनाला हा प्रश्नही शिवला नाही. ज्यांनी पुरोहितला गजाआड टाकले त्यांनीच वास्तवात कसाब टोळीचा समुद्रमार्गे मुंबईत आरामात पोहोचण्याचा मार्ग खुला करून ठेवलेला होता. नेमके तसेच काही आता लष्करी ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवण्यासाठी निघालेल्या आदिल दार याला कोणीतरी मदत केलेली आहे. ती मदत पाकिस्तानी गुप्तहेरसंस्था देत नसते, तर पुलवामातील काही गद्दार तशी मदत दारला देत असतात आणि भारतीय लष्कराच्या 40 सैनिकांना ठार मारण्यासाठी पाकिस्तानला मदत करत असतात. आपल्या मनाला हा विषय कधी शिवला आहे काय? तो किंवा तसे हल्ले पुरोहित किंवा टीएसडी अशा सेवांमुळे शक्य होत नव्हते. पुरोहित वा टीएसडी नेमके काय काम करतात?

 

टीएसडी म्हणजे भारतीय सेनादलाच्या कुठल्याही कागदपत्रात नोंद नसलेली एक लष्करी तुकडी होती. तिला गुप्तचरही म्हणता येणार नाही. गुप्तचर विभागाच्या कामकाजाची निदान कुठेतरी कागदोपत्री नोंद केलेली असते. पण टीएसडी वा टेक्निकल सपोर्ट डिव्हिजन ही तुकडी वा तिचे कामकाज कुठल्याही कागदोपत्री नोंदीत सापडणार नाही. कारण दफ्तरी नोंदीत अशी कुठली तुकडी नसते आणि अस्तित्वात असल्याचे भारत सरकार वा संरक्षण खातेही मान्य करणार नाही. आपण ज्याला लष्कर-ए-तोयबा वा जैश-ए-महंमद वगैरे म्हणतो, तसेच काहीसे टीएसडीचे स्वरूप असते. त्या तुकडीचे काम बेकायदा व नियमबाह्य असल्याने कुठल्याही सरकारी दफ्तरात त्यांची नोंद होणार नसते किंवा केलेल्या कारवाईचे कसलेही श्रेय घ्यायला हे लोक पुढे येणार नाहीत. कारण ते असल्याची नोंद कुठेच नसते, तर त्यांचा पराक्रम वा कार्य याविषयी जाहीर चर्चा होणारच कशी? पण अशा तुकड्या सावलीत राहून काम करतात आणि त्यांच्यावर कधी प्रकाशझोत टाकला जात नसल्याने, त्यांची सावलीही कोणाला कुठे आढळत नाही. हे लोक देशासाठी आपले भवितव्य आणि प्राणही पणाला लावत असतात. दीर्घकाळ पाकिस्तानी माध्यमात भारताविरोधी दिलेल्या बातम्यात या टीएसडीचा उल्लेख आपल्याला बघायला मिळू शकतो. पण तसा उल्लेख एका भारतीय माध्यमात आला आणि खुद्द भारत सरकारलाच त्यांच्या विरोधात कारवाई करायची वेळ आणली गेली. म्हणजेच भारताविरुद्ध चाललेल्या घातपाती पाकिस्तानी युद्धाच्या विरोधात चाललेल्या तशाच प्रतिकाराला कमकुवत व नेस्तनाबूत करण्याचे काम इथे बसलेल्या काही पत्रकार, राजकारणी व अधिकार्‍यांनी पार पाडलेले आहे. मात्र आपल्याला त्या अधिकारी वा लष्करी तुकडीचे नामोनिशाणही ठाऊक नसते. त्यांच्यविषयी आस्था कौतुकही नसते. तुमच्या-माझ्यासाठी जे आपला जीव ओवाळून टाकतात, त्यांच्याविषयी आपल्याला किंचित आपुलकी वा त्यांची ओळखही नसावी, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना? पण ती वस्तुस्थिती आहे आणि स्वत:च्या कौतुकासाठी हे खरेखुरे देशभक्त कधी लाचार ओशाळवाणेही नसतात. उलट आपण सामान्य लोक इतके बेछूट वा बेजबाबदार असतो, की आपल्याच नाकर्तेपणाने वा बेफिकीरीने त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतो आणि पाकिस्तानचे काम सोपे करीत असतो.

 

कर्नल पुरोहित यांच्यावर मालेगाव स्फोटातला संशयित म्हणून सप्टेंबर 2008 मध्ये आरोप ठेवला गेला आणि त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत कसाब टोळी मुंबईत राजरोस येऊ शकली. कुलाब्यासारख्या वर्दळीच्या जागी कोळीवाड्याच्या वस्तीतून हे दहा मारेकरी आरामात हमरस्त्यापर्यंत चालत आले. त्यांच्याकडे असलेली हत्यारे वा स्फोटके कोणाच्या नजरेत आली नाहीत? त्या वर्दळीच्या संध्याकाळी त्यांना तिथून सहजगत्या टॅक्सी मिळू शकली? इतकी मुंबई सोपी आहे? कुणीतरी आधीपासून त्यांचे स्वागत करायला व लागेल ती मदत करायला तिथे सज्ज असल्यानेच पहिल्या मुंबई भेटीत या दहा घातपात्यांना ईप्सित स्थळी पोहोचता आले. पण अजूनपर्यंत अशा सहाय्य देणार्‍यांचा शोध लागला आहे काय? पुलवामा येथेही स्थानिक मदतीशिवाय इतकी मोठी हायवेवर घटना घडवणे शक्य नव्हते. कुलाब्याची स्थितीही वेगळी नाही. मुद्दा असा, की त्या सहाय्य देणार्‍या स्थानिकांचा माग काढून त्यांना आधीच नामोहरम करावे लागते आणि पर्यायाने असे घातपाती मोठी घटना घडवू शकणे रोखले जाणार असते. पुरोहित व त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी अशा शंकास्पद गट व लोकांमध्ये घुसून काढलेली गुप्त माहितीच तशा घटना मोठ्या प्रमाणात रोखू शकलेली होती. तर त्यांच्याच मुसक्या बांधणार्‍या तथाकथित मालेगाव स्फोट तपासाने कुणाला मदत केली? त्या धरपकडीने कुलाब्यात कसाबला मदत करणार्‍यांना मोकळीक दिली आणि त्यापेक्षा वेगळे काहीही पुलवामा येथे घडलेले नाही. उरी वा पठाणकोटलाही वेगळे काहीही घडलेले नव्हते. कसाब वा पुलवामा येथील हल्लेखोरांची स्फोटके तेव्हा़च भेदक होतात, जेव्हा ती योग्य जागी वा घटनास्थळी पोहोचू शकतात. पुरोहित वा टीएसडी अशा लोकांकडून तोच मार्ग रोखला जात असतो व होता. तर त्यांच्याच मुसक्या ज्यांनी बांधल्या, ते प्रत्यक्षात तोयबा वा जैशचे इथले एजंट वा हस्तक असू शकतात. कारण त्यांच्याशिवाय अशा हल्ले व घातपाताचा मार्ग प्रशस्त होऊ शकत नाही. करकरे यांच्या तपास पथकाने वा त्यांच्या राजकीय म्होरक्यांनी कसाबसाठी ते काम पार पाडले होते. पुलवामा उरीसाठी तेच काम, टीएसडीला निकामी करणार्‍यांत माध्यमे व पत्रकारांनी पाकिस्तानसाठी पार पाडलेले आहे. म्हणूनच नुसते रागावून चालणार नाही की पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या डरकाळ्या फोडूनही भागणार नाही. आपल्याला वास्तविक शत्रू ओळखता आला पाहिजे. तो शत्रू पाकिस्तान नाही किंवा कसाबसारखे घातपातीही आपले खरे शत्रू नाहीत. आपले शत्रू आजही आपल्यात उजळमाथ्याने वावरत असतात आणि युक्तिवादाच्या आडोशाने त्या हल्ल्याला समर्थनही देत असतात. त्याकडे आपण डोळसपणे बघणार आहोत काय?

 

2011च्या सुमारास अकस्मात एक बातमी भारतीय माध्यमातून झळकली आणि राजकारणात एकच खळबळ उडालेली होती. संरक्षणमंत्र्यांच्या फोनवरील संभाषणही चोरून ऐकले जात असल्याची ती बातमी होती. तो आक्षेप भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागावर ठेवण्यात आलेला होता. त्याखेरीज आणखी एक अशीच अफवा वर्तमानपत्रातून सोडली गेलेली होती. प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने सेनादलाच्या अनेक तुकड्या राजधानी दिल्लीत संचलनाचा सराव करीत होत्या. त्याचवेळी उत्तरप्रदेशाच्या मेरठ येथून काही सेनादलाच्या तुकड्या इतरत्र कूच करीत होत्या. त्यातून भारतीय लोकशाही उलथून टाकत सेनादल सत्ता काबीज करायच्या प्रयत्नात असल्याची ती अफवा होती. तिला कुठलाही आधार नव्हता आणि गोंधळ उडवून देण्याचाच त्यामागचा हेतू होता. तो मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाला. कारण तितके निमित्त साधून दिल्लीची नोकरशाही, राजकारणी व तथाकथित बुद्धिमंतांनी मोठा हलकल्लोळ माजवला आणि तेव्हाचे लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. उपरोक्त दोन बातम्या भारतीय सुरक्षा दलाच्या विविध दक्षता यंत्रणांना उद्ध्वस्त करण्याचा व्यापक कट होता. कारण तेव्हा सिंग व संरक्षणमंत्री अँथनी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते आणि त्याचाच आधार घेऊन गलिच्छ राजकारण खेळले जात होते. माध्यमातून मग सिंग यांना सरसकट लक्ष्य करण्याची मोहीमच हाती घेण्यात आली. काश्मिरातील पाकवादी प्रवृतीच्या राजकारण्यांनी तोफा डागल्या. सिंग लष्करी अधिकारी आणि संरक्षण खात्याचा पैसा वापरून काश्मिरी राजकारणात ढवळाढवळ करीत असल्याचाही एक आरोप त्यात समाविष्ट होता. त्यासाठी मग टीएसडी हा शब्द पुढे आला, ही टीएसडी म्हणजे टेक्निकल सपोर्ट डिव्हिजन गुप्तचर म्हणून काम करीत नसून काश्मिरातील लोकांनी निवडलेले सरकार पाडण्यासाठी उचापती करीत असल्याचा आरोप पुढे आला. लष्करी पैसे देऊन एक अपक्ष आमदाराला खरेदी करण्यात आल्याचा बिनबुडाचा आरोप ठळकपणे पुढे आला आणि त्याचा कुठलाही पुरावा कधीच कोणी दिलेला नव्हता. पर्यायाने टीएसडी ही गोपनीय बाब चव्हाट्यावर आली आणि तिचा गाशा सेनादलाला गुंडाळावा लागला. त्यात कार्यरत असलेल्या अधिकारी व हस्तकांचे चेहरे उघडे पडले आणि अनेक अधिकारी कोर्टमार्शलचे बळी झाले. पण ती बाब महत्वाची नाही. त्यातून काश्मिरात गुपचूप जी कारस्थाने शिजवली जात होती, त्यांची इत्थंभूत माहिती सेनादलाला मिळण्याचा मार्गच बंद होऊन गेला. तसे नसते तर उरी, पठाणकोट वा पुलवामाचा रक्तपात होऊच शकला नसता.

 

इथे टीएसडी म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल. अशा लष्करी वा गुप्तचरांच्या तुकड्या अधिकृतपणे कधीच कुठल्या संस्था संघटनेशी संबंधित असत नाहीत. किंवा त्यांचे धागेदोरे कुठल्या शासकीय व्यवस्थेशी जोडले जाऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेतली जात असते. ही माणसे म्हणजे त्या तुकडीतले हस्तक, सैनिक वा कोणीही शासन मान्यतेने आपली कृती करीत होता, असे सिद्ध होऊ शकणार नाही. इतकी अलिप्तता राखली जात असते. कारण त्यांच्या सर्व कृती व कामे प्रस्थापित कायदे व नियमांच्या चौकटीत बसणार्‍या नसतात. अनेकदा तर अशा कारवाया कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरू शकणार्‍याही असतात. साहजिकच त्यात कुठेही लहानसहान चूक राहून गेली, तर अशा तुकडीतले सहभागी कोणीही स्थानिक पोलिस यंत्रणेच्या तावडीत सापडतात आणि त्यांना होणार्‍या कारवाईचे दुष्परिणामही भोगाव लागत असतात. पण त्यातला कोणीही आपण सेनदलाचा सैनिक वा हस्तक असल्याचे सहजासहजी मान्य करीत नसतो, की करणारही नाही. सेनादल किंवा सरकारमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ वा ज्येष्ठ मंत्री वा अधिकार्‍यांनाही अशा हस्तक वा व्यक्तींची ओळख नसते. थोडक्यात पाकिस्तान जसा अजहर महमूद वा सईद हाफीज़ या लोकांविषयी हात झटकून मोकळे होतो, तशीच आपल्याही टीएसडीमध्ये काम करणार्‍यांची अवस्था होती. पण तशी वेळ निदान मायदेशी येऊ दिली जात नसते. तिकडे पाकिस्तान कितीही दडपण आले म्हणून सईद वा अजहर यांच्याशी आपला संबंध मान्य करीत नाही. पण त्याचवेळी तेच जिहादी कायद्याच्या कचाट्यात सापडले तर त्यांना उघडे पडू देत नाही. त्यांची स्थानिक कायदा यंत्रणा वा शासकीय यंत्रणेकडे पाकिस्तान पाठराखण करीत असते. म्हणूनच कितीही पुरावे देऊनही सईदला पाकिस्तानी कोर्टात दोषी ठरवणे शक्य झालेले नाही. उलट आपल्या देशात मात्र आपणच कर्नल पुरोहितला हिंदू दहशतवादी म्हणून डंका पिटला जात असताना अलिप्त राहिलो होतो. ना भारत सरकारने त्याची पाठराखण केली, ना भारतीय सेनादलाला आपल्याच एका धाडसी अधिकार्‍याचा बचाव करता आला. कारण दुर्दैवाने तेव्हाच्या भारतीय राजकीय नेतृत्वाला देशहितापेक्षा पक्षहिताची चिंता अधिक होती आणि त्यामुळे पाकिस्तानी घातपाताला प्रोत्साहन वा मदत होत असल्याची फिकीर नव्हती. आपल्या राजकीय स्वार्थ वा मतलबासाठी इथले पुरोगामीही पाकिस्तानला पूरक असलेल्या भूमिका घेऊन हिंदू दहशतवादाचा डंका पिटत राहिल्रे. पुरोहित वा टीएसडी यांनी उभारलेली दहशतवाद प्रतिकारक सज्जताच उद्ध्वस्त करण्याला प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हातभार लावला. अन्यथा आज आपल्याला पुलवामा येथे 40 जवान हकनाक शहीद होताना बघावे लागले नसते. त्यांचा जीव घेणार्‍या आदिल दार किंवा पाकिस्तानचा आपल्याला खूप राग येतो. पण त्यांचेच हात मजबूत करणार्‍या समकालीन पुरोगामी दिवाळखोरीचा कान पकडण्याचा विचारही आपल्या मनात येत नाही. ही आपल्या सुरक्षेसाठी मोठी समस्या झाली आहे.

 

उरीचा हल्ला आणि नंतरचा सर्जिकल स्ट्राईक या घटनाक्रमावर आधारित ‘उरी’  नामक चित्रपट सध्या गाजतो आहे. त्यातला एक संवाद खूप लोकप्रिय झालेला आहे. ‘हाऊ इज द जोश’ ? पुलवामा येथील ह्या हत्याकांडानंतर एका पुरोगामी विदुषीने सोशल माध्यमातून त्याच भावनेची खिल्ली उडवताना व्यक्त केलेला उपरोध पाकच्या घातपाती प्रवृत्तीचा इथला हातभार स्पष्ट करणारा आहे. उरीच्या त्या संवादातील अस्सल उपजत राष्ट्रभावनेची खिल्ली उडवीत ही महिला म्हणते, ‘हाऊ इज द जैश मोदीजी?’  तिची भाषा वा उपरोध कुठल्या कायद्यात बसतो, ते ठाऊक नाही. पण अशी भावना व धारणाच मायदेशाच्या विरोधात घातपात करणार्‍याची खरी प्रेरणाच असते. आदिल दार अशाच उपरोधामुळे आत्मघाती पवित्रा घेऊन आपल्याच राखणदार सैनिकांच्या जीवावर उठत असतो. आपण आदिलसहित पाकिस्तानचा कडकडीत निषेध करतो. पण त्याला खरी चालना देणार्‍या अशा विदुषीच्या विरोधात साधा आवाजही उठवीत नाही. ही पाकिस्तानच्या अणुबॉम्बपेक्षाही भारत विरोधातली मोठी भेदक अस्त्रे असतात. कधी ती घातपात्यांच्या बंदोबस्त करणार्‍यांवर दगडफेक होण्यातून आपल्याला दिसू शकतात. पण त्या दगडफेक्यांचे बौद्धिक वा तात्त्विक समर्थन करणारे आपल्याला खरे घातक असल्याचे बघायला आपले डोळे राजी नसतात. तिथे आपण गाफिल होऊन जातो. इशरतसारख्या तोयबाच्या हस्तकाला आपली मुलगी म्हणून मिरवणारे खरे घातपाती आपल्याला ओळखता येत नाहीत. तिला निर्दोष ठरवायला भारतीय पोलिसांनाच मारेकरी ठरवून तुरुंगात डांबण्यासाठी आपली कायदेशीर अक्कल पणाला लावणारे जिहादी अतिरेकी आपल्याला ओळखता येत नाहीत. हा खरा धोका आहे. समोरून येणार्‍या शत्रूला वा संकटाला सामोरे जाण्याची शक्ती व बुद्धी जरूर आपल्यापाशी आहे. पण आपल्या सोबत चाललेला व आपल्याच आसपास वावरणारा प्रतिष्ठित कोणी तोयबाचे वा जिहादचे समर्थन करताना, त्याचा खरा चेहरा बघण्याला महत्त्व आहे. मग दुष्परिणामांना पर्याय नसतो. जेव्हा आपणच आपल्या गाफीलपणातून किंवा अतिरेकी सभ्यतेच्या आहारी जाऊन सुरक्षेला लाथाडू लागतो, तेव्हा आपण आपले सुरक्षाकवच भेदत असतो. पाकिस्तानी कसाब किंवा आदिलचे काम आपणच सोपे करून ठेवत असतो. मग पुलवामा किंवा उरीसारख्या घटना रोखणार कोण? त्या रोखण्यासाठी ज्यांना प्रशिक्षण देऊन सज्ज ठेवलेले आहे, त्यांच्याच मुसक्या बांधणार्‍यांना रोखण्याची जबाबदारी सामान्य नागरिकाची असते. सैनिक वा सेना शत्रूला रोखू शकत असते. पण आपल्यात उजळमाथ्याने मिरवणार्‍या घातपात्यांना शोधून हुडकून संपवण्याची जबाबदारी गुप्तचरांची असते आणि त्यांचे कान वा डोळे आपण सामान्य नागरिक असतो. बहिष्काराचे मोठे हत्यार आपल्या हाती असते आणि अशा उजळमाथ्याने वावरणार्‍यांची मुस्कटदाबी कायदा नव्हेतर समाजच करू शकत असतो. जेव्हा तोच समाज अलिप्त वा नाकर्ता होतो, तेव्हा कितीही सज्ज सेना त्याचे वा देशाचे संरक्षण करू शकत नाही. तेव्हा मग त्या शायराच्या ओळी आठवतात. तो म्हणतो, शत्रू व परक्यांमध्ये कुठे दम होता? आम्हाला लुटले वा मारले आमच्याच जवळच्यांनी. आमच्या देशाची वा समाजाची नौका तिथे बुडाली, जिथे पाणी कमी होते.

 

मित्रांनो, जेव्हा असे हल्ले लष्करावर, त्यांच्या ताफ्यावर छावण्यांवर होतात, तेव्हा तिथे सर्वात कमी धोका असतो ना? कमी पाणी असते तिथे नौका बुडण्याची बिलकूल शक्यता नाही, हीच वस्तुस्थिती आहे ना? पण आपल्याच सोबत बसलेला कोणी नौका उलटून पाडण्याचे उद्योग करीत असेल, तर त्याला आपण रोखले पाहिजे. तो असले उद्योग राजरोस करत असताना आपण निमूट बघत बसणार असू; तर वादळवारा किंवा महापुराचे संकट येण्याची गरज नसते. आपणच बुडायच्या प्रतीक्षेत असतो आणि आपला सोबतीच आपल्याल हसत हसत बुडवतो. त्या बुडण्याचे खापर पाण्याच्या माथी मारून काय उपयोग असेल? आपल्याच देशात नवज्योत सिद्धू, प्रशांत भूषण असतील, याकूब, अफज़ल गुरूसाठी आक्रोश करणारे असतील, तर पाकिस्तानच्या नावाने शिमगा करून काय फायदा? कधीतरी आपल्यातच मस्त बोकाळलेल्या गद्दारांना जाब विचारण्याची हिंमत आपण करणार आहोत काय?

 

लेखकभाऊ तोरसेकर
संपर्कswatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *