सौदी राजपुत्राचा पाकिस्तान आणि भारत दौरा

मंगळवार 19 फेब्रुवारी रोजी सौदी अरेबियाचे राजपुत्र आणि भविष्यातील राजे माननीय मोहम्मद बीन सलमान भारताच्या दौर्‍यावर आले आहेत. भारतात येण्याअगोदर ते पाकिस्तानला जाऊन आले. त्यांचे पाकिस्तानात भव्य स्वागत करण्यात आले. एवढे की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः त्यांच्या कारचे सारथ्य केले होते. यातून पाकिस्तान आणि सौदी अरेबिया किती जवळचे मित्र आहेत हे अधोरेखित होते. राजपुत्र सलमान यांचे नाव भविष्यातील राजे म्हणून जाहीर झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा. याची सुरुवात त्यांनी किस्तानपासून करावी हा संकेत तसा साधा नाही. यातून या दोन सुन्नीबहुल मुस्लिम देशांची घट्ट मैत्री समोर येते.

 

पाकिस्तानातील जैशएमहंमदच्या अतिरेक्यांनी अलीकडेच पुलवामा येथील भारताच्या एका लष्करी तळावत घातपाती हल्ला केला. या हल्ल्याबद्दल देशात तीव्र रागाची भावना असताना राजपुत्र सलमान यांचा भारत दौरा संपन्न झाला. राजपुत्र सलमान आधी पाकिस्तानला गेले होते व तेथून थेट भारतात येणार होते. राजनैतिक संकेतांचा विचार करता यात भारताचा एक प्रकारचा अपमान होता. म्हणुन मोदी सरकारने विनंती केली. त्यानुसार राजपुत्र सलमान एका दिवसासाठी सौदी अरेबियाला परत गेले व तेथून भारतात आले. यानंतर ते चीनचा दौरा करणार आहेत. थोडक्यात म्हणजे गेल्या पंधरा दिवसांत राजपुत्र सलमान पाकिस्तान, भारत व चीन या दक्षिण आशिया व आशियातील देशांचा दौरा संपन्न होत आहे. ही घटना अनेक कारणांनी महत्त्वपूर्ण आहे. राजपुत्र सलमान यांच्या भारत दौर्‍याच्या फलनिष्पतीची चर्चा करण्याअगोदर हा मुद्दा समजून घेतला पाहिजे.

 

सौदी अरेबियाचे राजघराणे फार मोठे आहे व राजेपदासाठी तेथे अनेक इच्छुक असणे स्वाभाविक आहे. राजपुत्र महंमद बिन सलमान यांचे नाव जाहीर झाल्यापासून इतर इच्छुक नाराज असणे स्वाभाविक आहे. याचा दुसरा अर्थ असा की, राजपुत्र सलमान यांचे जीवित धोक्यात आहे म्हणूनच त्यांच्या रक्षणाची जबाबदारी पाकिस्तानच्या सैन्याकडे आहे. ही वस्तुस्थिती पाकसौदी संबंधांची चर्चा करता लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

 

गेले काही महिने राजपुत्र सलमान यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर बदनामी सुरू आहे. त्यांच्या इशार्‍यावर एका ज्येष्ठ पत्रकाराचा खून करण्यात आल्याची उघड चर्चा सुरू आहे. पत्रकार खाशोगी हे सलमान यांच्या कारभारावर व राजकारणावर जबरदस्त टीका करत होते. खाशोगी तुर्कस्तानात असतांना त्यांच्या व्हिसाच्या कामासंदर्भात तेथील सौदी सरकारच्या वकिलातीत गेले असतांना त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय पातळीवर राजपुत्र सलमान यांची खूप बदनामी होत आहे. अनेक पाश्चात्त्य देशांनी त्यांचे स्वागत करण्यास नकार दिला. पाश्चात्त्य देश स्वार्थी असल्यामुळे ते सौदीकडून पेट्रोल विकत घेतात व त्यांच्या राजपुत्राचा सन्मान करण्यास  नकार देतात. या एका प्रकारच्या अनौपचारिक बहिष्कारातून बाहेर पडण्यासाठी राजपुत्र सलमान यांनी धडाक्यात जवळच्या देशांचे दौरे करण्यास सुरुवात केली आहे.

 

आता सलमान यांच्या दौर्‍याची फलनिष्पती. आपला देश एकूण तेल आयातीपैकी सुमारे 17 टक्के तेल सौदी अरेबियाकडून घेतो. आता संपन्न झालेल्या दौर्‍यानंतर ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, माहितीतंत्रज्ञान वगैरे क्षेत्रातही भारताची मदत व्हावी वगैरे दृष्टीने करारमदार झालेले आहेत. सुमारे तीस लाख भारतीय कामगार सौदीत नोकरी करत आहेत. युवराज सलमान यांनी भारतात सुमारे 100 अब्ज डॉलर्स एवढी गुंतवणूक करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. असे असले तरी भारतसौदी अरेबिया यांच्यातील संबंध किती चांगले होतील, होऊ शकतील याला स्वाभाविक मर्यादा आहेत. यात खूप गुंता आहे. याचे ताणेबाणे एकूणच मध्य आशिया आणि पश्चिम आशियाच्या राजकारणाच्या इतिहासात जसे आहेत तसे एकविसाव्या शतकात बदललेले संदर्भही आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या भागात पेट्रोलचे मुबलक साठे सापडले. पाश्चात्त्य देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी या भागातील पेट्रोल म्हणजे आधुनिक काळातील प्राणवायू झाला. तेव्हापासून अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चात्त्य देश या भागातील राजकारणात थेट हस्तक्षेप करू लागले. हा हस्तक्षेप आजही सुरू आहे.

 

एकविसाव्या शतकातील वास्तव म्हणजे इस्लामी दहशतवादाचा उगम याच भागात झाला व त्याचे आश्रयदातेसुद्धा याच भागात आहेत. नंतर अतिशय बदनाम झालेला ओसामा बीन लादेनला सौदी  अरेबियाकडून भरपूर मदत येत असे. या भागातील इतर मुस्लिम देशांच्या तुलनेत पाकिस्तान पुढारलेला देश आहे. म्हणूनच पाकिस्तान बनवत असलेल्या ‘इस्लामी बॉम्ब’ ला सौदीने सढळ हाताने आर्थिक मदत केली होती. याचा अर्थ असा की, सौदीपाकिस्तान मैत्री चांगली घट्ट आहे.

 

याचा अर्थ सौदीभारत मैत्री वाढू शकणार नाही, असा नाही. 2016 साली मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. तेव्हापासून या दोन देशांत चांगली मैत्री झाली आहे. आतासुद्धा सौदी राजपुत्रांनी पाकिस्तानच्या दौर्‍यावर असतांना भारत  पाकिस्तान यांच्यातील ताण कमी व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे काही भारतीय अभ्यासक हुरळून गेलेले आहेत. याचा अर्थ असा आहे, सौदीला काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी एखाद्या तिसर्‍या राष्ट्राने पुढाकार घ्यावा, असे अपेक्षित आहे. भारताने यापासून सावध असावे. भारताने ‘काश्मीरची समस्या दोन देशांतील आहे व त्यात तिसर्‍या शक्तीला/राष्ट्राला यात स्थान नाही’ ही भूमिका सतत मांडली आहे.

 

सौदीपाकिस्तान मैत्रीला आज अफगाणिस्तानातील नव्या परिस्थितीचासुद्धा संदर्भ आहेच. 1980 च्या दशकात सौदीने पाकिस्तानच्या माध्यमातून रशियन फौजांशी लढत असलेल्या मुजाहीद्दीनांना सर्व प्रकारची मदत पोहोचवली. आता पुन्हा अफगाणिस्तानच्या संदर्भात सौदी व पाकिस्तानचे हितसंबंध एक होत आहेत. सुन्नी सौदी अरेबियाला सुन्नी पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानात वाढत असलेल्या शिया इराणचा प्रभाव रोखायचा आहे. सौदीला पश्चिम आशियाच्या राजकारणावर वर्चस्व गाजवायचे आहे. यात अडथळा आहे तो फक्त इराणचा. सौदीइराण यांच्यातील सत्तास्पर्धा सीरियापासून येमेनपर्यंत सुरू असलेल्या युद्धांत दिसून येते. नवाझ शरीफ पंतप्रधानपदी होते तेव्हा त्यांनी येमेनमधील युद्धासाठी सौदीच्या मदतीला पाकिस्तानी सैन्य पाठवण्यास साफ नकार दिला होता. आता तेथे पंतप्रधानपदी इम्रान खान आहेत तर लष्करप्रमुख जनरल बाजेवा आहेत. पाकिस्तानला सौदीच्या मदतीने अमेरिकेची मैत्री पुन्हा मिळवायची आहे. ट्रम्प यांच्या कारकीर्दीत अमेरिकेने काही प्रमाणात पाकिस्तानला वार्‍यावर सोडले आहे. पाकिस्तानला पुन्हा जुने दिवस हवेत जेव्हा त्यांना अमेरिका भरपूर मदत करत असे. शिवाय इराणपाकिस्तान यांच्या मैत्रीतही बाधा निर्माण झाली आहे. अलीकडेच बलुचिस्तानात झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यात 27 इराणी मारले गेले. इराणने याबद्दल पाकिस्तान सरकारला दोष दिला आहे. अशा कारणांसाठी आज इराण व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झालेले आहेत.

 

हे सर्व तपशील समोर ठेवले म्हणजे सौदी अरेबियाच्या दृष्टीने पाकिस्तान किती महत्त्वाचा देश आहे हे लक्षात येईल. त्या तुलनेत भारताचा सौदीला तसा काही उपयोग नाही. म्हणूनच सौदी राजपुत्र सलमान यांच्या भारत दौर्‍याची फलनिष्पत्तीची चर्चा करतांना हे लक्षात ठेवले पाहिजे. सौदी अरेबिया भारताशी अनेक प्रकारचे आर्थिक करार करेल. भारतात आर्थिक गुंतवणूकही करेल. भारतीय कंपन्यांना मोठमोठी कंत्राटेसुद्धा दिली जातील पण राजकीय क्षेत्रात सौदी अरेबियाचा या भागातील खरा व उपयुक्त मित्र म्हणजे पाकिस्तान याचे भान ठेवलेले बरे. आज ज्याप्रमाणे सौदी अरेबियाला पाकिस्तानची गरज आहे तसेच पाकिस्तानला सौदीकडून मिळत असलेल्या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. आजचा पाकिस्तान आर्थिक अरिष्टाच्या दारात उभा आहे. पाकिस्तानला मदत करण्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्पष्ट नकार दिला आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला सौदी अरेबियाचा भक्कम आधार आहे. म्हणूनच भारतसौदी मैत्री एका टप्प्याच्या पुढे विकसित होणार नाही याचा अंदाज असलेला बरा.

 

लेखकअविनाश कोल्हे
संपर्कswatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *