सीएच्-47 चिनुक

सप्टेंबर 2015 मध्ये भारत सरकारने अमेरिकेकडून 22 अपाचे हेलिकॉप्टर्स व 15 ‘चिनुक’ हेलिकॉप्टर घेण्याचा करार केला. 10 फेब्रुवारी रोजी ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्सची पहिली खेप भारतात दाखल झाली. बोइंग सीएच-47 चिनुक असे या हेलिकॉप्टरचे नाव आहे. बोइंग सीएच-47 चिनुक हे अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू  हेलिकॉप्टर आहे. गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर ही पहिली बॅच पोहोचली. लवकरच ‘चिनुक’ हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. सियाचीन आणि लडाख सारख्या दुर्गम ठिकाणी अवजड माल, शस्त्रे, सैनिकांचे ट्रूप्स वाहून नेण्यासाठी ‘चिनुक’ हेलिकॉप्टर वायुसेनेसाठी फायदेशीर ठरणार आहे. या वर्षी सर्व 15 हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील अशी शक्यता वायुसेनेकडून वर्तवण्यात येत आहे. चिनुक हे अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर नसून, आर्मड हेलिकॉप्टर आहे. तर अपाचे एएच 64 हे अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर आहे .

 

सीएच-47 चिनुक :

बोइंग सीएच-47 चिनुक हे अवजड मालवाहू हेलिकॉप्टर 1950 मध्ये व्हर्टोल या कंपनीने अमेरिकी वायुदलासाठी तयार केले. 1960 साली व्हर्टोल कंपनी बोइंगने खरेदी केली. या हेलिकॉप्टरचे पहिले उड्डाण 21 सप्टेंबर 1961 रोजी झाले. त्यानंतर या हेलिकॉप्टरचे नाव बोइंग सीएच-47 चिनुक असे ठेवले गेले. ऑगस्ट 1962 मध्ये हे हेलिकॉप्टर अमेरिकी सैन्य दलात दाखल करण्यात आले. त्यानंतर आत्तापर्यंत 17 देशांच्या हवाई दलात चिनुक हेलिकॉप्टर प्रभावीपणे कार्यरत आहे. टॅण्डम रोटर हे बोइंग सीएच-47 चिनुकचे मुख्य वैशिष्ट्य. त्यावर दोन टोकांना दोन मोठे पंखे आहेत. जे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. त्यामुळे एका रोटरने तयार होणारा टॉर्क दुसर्‍या रोटरने नाहीसा होतो. म्हणजेच पंख एका दिशेने फिरू लागला की हेलिकॉप्टर दुसर्‍या दिशेने गोलाकार फिरू लागते. त्यामुळे चिनुकला उड्डाणादरम्यान अधिक स्थैर्य प्राप्त होते. म्हणून प्रतिकूल वातावरणामध्ये जिथे अन्य हेलिकॉप्टर निकामी ठरतात तिथे चिनुक अवघड कामे करण्यास सक्षम आहे.

 

चिनुक 9.6 टन वजन वाहू शकते, ज्यामध्ये 80 सैनिक, अवजड शस्त्र, वाहने इत्यादी वाहून नेता येतील. तसेच विस्तृत रॅम्पमुळे अवजड लष्करी वाहनेही भरून वाहून नेता येतात. चिनुकच्या तळाला तीन हूक असून त्याला टांगून तोफा, चिलखती वाहने, जीप आदी वाहून नेता येतात. 315 किमी/तास असा या हेलिकॉप्टरचा वेग आहे. व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक आदी लष्करी कारवायांमध्ये अमेरिकेला चिनुक हेलिकॉप्टर उपयोगी ठरले. अमेरिकेसह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इराण, ग्रीस, इटली, जपान, स्पेन, कॅनडा, नेदरलँड, ब्रिटन आदी देशांच्या वायुदलामध्ये चिनुक हेलिकॉप्टर आहेत.

 

भारतीय वायुसेनेमध्ये यापूर्वी रशियाच्या एमआय  26 चॉपरद्वारे अवजड गोष्टींची वाहतूक केली जात असे. गेल्या दशकात अमेरिकेला भारताकडून जवळपास 10 अब्ज डालर्सची संरक्षणविषयक कंत्राटे मिळाली आहेत. हेलिकॉप्टर , शस्त्रे, रडार यंत्रणा आणि इलेक्ट्रॉनिक युद्धसामुग्रीसाठी भारत अमेरिकेवर अवलंबून आहे. भारताच्या संरक्षणविषयक बाजारपेठेत रशिया नंतर अमेरिकेचे स्थान अधिक दृढ होत जात आहे .

 

भारतीय वायुसेनेतील इतर विमाने :

  1. जग्वार : हे कमी उंचीवरून हल्ला करणारे लढाऊ विमान आहे. वजनाने हलके, चपळ, तांत्रिकदृष्ट्या कमी गुंतागुंतीचे आहे. जागतिक पातळीवर हे विमान फक्त भारतामध्येच वापरले जाते.
  2. बोइंग सी-17 ग्लोबलमास्टर III : हे मालवाहू विमान छोट्याश्या जमिनीवरही उतरवता येते.
  3. एचएएल ध्रुव : हिंदुस्तान अरोनॉटिक्स लिमिटेडद्वारा विकसित ध्रुव हे लढाऊ विमान आहे.
  4. एचएएल चेतक : हिंदुस्तान अरोनॉटिक्स लिमिटेडद्वारा विकसित चेतक लाइट यूटिलिटी हेलिकॉप्टर आहे ज्याचा उपयोग प्रशिक्षण, बचाव कार्य, सैन्यातील मालवाहतुकीसाठी केला जातो.

5. एचएएल चिता : हे एक लाइट यूटिलिटी हेलिकॉप्टर आहे. समुद्रसपाटीपासून अतिउंच ठिकाणी काम करण्यासाठी या हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातो. दुर्गम ठिकाणच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सैन्य एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी पोहोचवणे, शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे, सैन्याला रसद पोहोचवणे मेडिकल आणि तशाच काही महत्त्वपूर्ण सेवा पुरवणे असा विविध गोष्टींसाठी चिनुक व इतर विमानांचा वापर केला जातो. फक्त युद्धजन्य परिस्थितीच नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये, आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये सामान्य जनतेच्या बचाव कार्यासाठीही चिनुकचा उपयोग करता येऊ शकतो. अत्यंत वेगवान तितकेच चपळ असलेले हे हेलिकॉप्टर जगातले सर्वात ताकदवान हेलिकॉप्टर मानले जाते.

 

लेखकराजश्री काळुंके
संपर्कswatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *