युद्धस्य कथा रम्या।

संस्कृतमध्ये असे एक वचन आहे. त्याचा अर्थ असा, की युद्धाच्या कथा ऐकायला वाचायला खूप मनोरंजक व थरारक असतात. कारण त्या आपल्या आयुष्यातल्या नसतात. ते कथाकथन असते. त्यातले नाट्य कोणालाही भावते. प्रामुख्याने त्या परिस्थितीचा अनुभव ज्यांच्या वाट्याला आलेला नसतो, त्यांच्यासाठी त्या कथा आकर्षक असतात. पण प्रत्यक्षात ज्यांनी युद्ध भोगलेले आहे, अशा लोकांसाठी त्या कथा रम्य किंवा मनोरंजक नसतात. तर अंगावर शहारे आणणार्‍या असतात. राजकीय पुढार्‍यांना किंवा समाजाला चिथावण्या देणार्‍यांना त्यात कितीही मर्दुमकी दाखवता येत असली, तरी व्यवहारात असे लोक अतिशय सुरक्षित बंदोबस्तामध्ये बसलेले असतात. सामान्य सैनिक वा राखणदार त्यात आपला जीव किंवा सर्वस्व पणाला लावत असतो. म्हणूनच मागल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातून जी युद्धाची भाषा राजरोस बोलली जात होती, तिला अकस्मात लगाम लावला गेला आहे. मंगळवारी पहाटे भारताने पाक भूमीत घुसून जो हवाई हल्ला केला, त्यानंतर पाकिस्ताननेही भारतीय हद्दीत विमाने पाठवून नाट्य रंगवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तीन विमानांना भारतीय हद्दीतून तत्काळ पळवून लावले गेले. त्यातले एक विमान भारतीय प्रतिहल्ल्याचे शिकार झाले आणि एक भारतीय विमानही पाठलाग करताना पाकिस्तानी प्रदेशात पाडले गेले. एक भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात सापडला आहे. इतके झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची नरमलेली भाषा अनेकांना चकित करणारी आहे.

 

मंगळवारच्या भारतीय हल्ल्यानंतर तावातावाने बदल्याची भाषा करणारे पाकिस्तानी नेते व सेनाधिकारी; किरकोळ हुलकावणी देणारा हल्ला केल्यावर अधिक जोशात येतील अशी अपेक्षा होती. उलट इम्रानखान यांनी पुलवामा येथील घातपाती हल्ल्याची चर्चा व तपास करण्याची भाषा बुधवारी वापरली, ती तर्काला धक्का देणारी आहे. आम्हीही प्रतिहल्ला केला. असाच भारताला चोख धडा शिकवू; असे बोलणे त्यांच्याकडून अपेक्षित होते. कारण भारताचा निदान एक पायलट त्यांच्या ताब्यात गेलेला आहे. पण तसे झालेले नाही आणि युद्ध नको असली शरणागतीची भाषा इम्रान यांनी वापरलेली आहे. त्याची मीमांसा म्हणूनच अगत्याची आहे. जगभरातून भारतीय हल्ल्याचे अनेकांनी समर्थन केले आणि पाकचा मित्र चीननेही पाकिस्तानला सबुरीचा सल्ला दिलेला आहे. आजवरचा पाठीराखा अमेरिकाही भारताच्या बाजूने बोलत आहे. त्यामुळेच पाक एकाकी पडला आहे आणि स्वत:ची लढण्याची कुवतही पाकिस्तान ओळखून आहे. मुशर्रफ यांनी पुलवामानंतर त्याचीच ग्वाही दिलेली होती, उठसूट अण्वस्त्रांच्या धमक्या देणारा पाक असा बदलून गेला, त्यामागे वस्तुस्थितीची जाणीव आहे. भारताच्या मुकाबल्यात आपला दोन आठवडे टिकाव लागणार नाही आणि बघता बघता पाकचे तुकडे होऊन जातील, हे त्यामागचे भय आहे. पाकिस्तान नावाचे अराजक आपल्याच अंधाधुंदीच्या ओझ्याखाली चिरडू लागले आहे. भारतापासून पाकिस्तानला धोका आहे आणि लष्करच पाकिस्तानला एकसंघ राखू शकते; ही समजूत घालून देण्यात आल्यामुळे गरीबी व दरिद्री अवस्थेतही पाकिस्तानी जनता लष्कराच्या पाठीशी राहिली आहे. त्याच बळावर पाक सेनाधिकारी सतत राजकीय सत्ता आपल्या मुठीत राखू शकले आहेत. राजकारण्यांना आपल्या बोटावर खेळवू शकले आहेत.

 

पाकसेनेला भारतीय हवाई हल्ला रोखता आला नाही आणि भारताला उत्तरही देता आले नाही, असे पाक जनतेच्या मनात रुजले तर पाकच्या लष्करी सत्तेचा तो अस्त असेल. म्हणूनच तात्काळ कुठलाही विचार न करता वा आखणी केल्याशिवाय पाक हवाई दलाने भारतीय हद्दीत तीन लढावू विमाने पाठवली. आपणही भारतीय हवाई हद्दीचा भंग केल्याचा देखावा उभा केला. त्यात कुणाचा बळी गेला नाही, की कुठले नुकसान झालेले नाही. तशी आखणी व रणनीतीचनसेल तर दुसरे काय व्हायचे? आपणही प्रतिहल्ला केला, इतकेच त्यांना दाखवायचे होते आणि त्यात पाकिस्तान यशस्वी झाला. आपल्याच जनतेची दिशाभूल करायचा त्यातला हेतू लक्षात घेतला, तर इम्रानखान युद्ध नको म्हणून गयावया कशाला करीत आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. युद्ध झालेच तर आठवडाभरही पाकिस्तानचा टिकाव लागणार नाही. कारण युद्ध खर्चिक असते आणि पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट आहे. अमेरिकेने भीक घालणे थांबवले आहे आणि चीनच्या कर्जाखाली पाकिस्तान चिरडलेला आहे. चिनी गुंतवणुकीला युद्ध झाल्यास मोठी हानी सोसावी लागेल आणि त्यात चिनी पैसा बुडित जाण्याचा धोका कळलेला चीनही पाकला सबुरीचा सल्ला देतो आहे.

 

पाकिस्तान एक अराजक आहे आणि त्याचे चारपाच तुकडे पडले, तर भारताला हवे आहेत. पण तशा स्थितीत चीनचे कित्येक अब्ज डॉलर्स कुणाकडून वसूल करायचे; अशी भ्रांत चीनलाही सतावते आहे. साहजिकच पाकने भारताला हैराण करावे अशी चीनची तीव्र इच्छा असली, तरी आपल्या पदराला खार नको असाही सावधपणा आहे. त्यानेच कान पकडलेला असल्याने इम्रान खान यांनाही युद्ध नको आहे. कारण युद्धात पराभव होतानाही लढायची खुमखुमी मिळणार असली, तरी त्याचा खर्च उचलणारा कोणी सावकार शिल्लक उरलेला नाही. शिवाय अशा युद्धात पाकचा टिकाव लागला नाही, तर पाकसेनेचा तिथे असलेला दबदबाही संपणार आहे. त्यामुळेच लष्करालाच युद्ध नको आहे आणि त्यांची कठपुतळी असलेल्या इम्रानलाही युद्ध नको आहे. पण त्याचवेळी आजवर पोसलेले जिहादी व अन्य उचापतखोरही आवाक्यात राहिलेले नाहीत. म्हणून दहशतवादही थांबवता आलेला नाही. आधी हल्ला आणि नंतर लगेच युद्ध नकोच्या गयावया, यामागची अशी चमत्कारिक मीमांसा आहे. आजवर विणलेल्या जाळ्यात पाकिस्तान आता स्वत:च फसलेला असून, त्यातून सुटायचा मार्गही त्यांना मिळेनासा झाला आहे. म्हणून पुढले काही दिवस पाकिस्तान किती माकडचेष्टा करतो, हे युद्धापेक्षाही मनोरंजक असेल.

 

लेखकभाऊ तोरसेकर
संपर्कswatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *