गेम-चेंजर

भारताच्या बारा ‘मिराज-2000’ लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून जैश-ए-महंमदच्या अड्ड्यांवर तब्बल हजार किलोचा बॉम्बवर्षाव केला. केलेली कारवाई पाकव्याप्त काश्मीरमधील नव्हती तर तो पाकिस्तानच्या भूमीवर केलेला थेट हल्ला होता. खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या बालाकोट या ठिकाणी भारतीय लष्करानं ही कारवाई केली. पाकिस्तानी रडारला संभ्रमात टाकण्याची नियोजनबद्ध योजना आपल्या लष्करानं आखली होती. पाकिस्ताननं भारतीय लष्कराच्या त्या विमानांविरुद्ध प्रत्यक्ष प्रतिहल्ला करण्याचं टाळलं. तो प्रतिहल्ला झाला असता तर दोन देशांदरम्यान युद्ध सुरू झालं असतं आणि पाकिस्तानला त्याची मोठी किंमत चुकवावी लागली असती. भारताच्या या कारवाईत ‘जैश’ चे 350 ते 400 दहशतवादी मारले गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतानं केलेली ही कारवाई अत्यंत आक्रमक आहे.

 

मागील आठवड्याच्या लेखात, पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं कोणती पावलं उचलावीत याचे काही प्रस्ताव आपण पुढं ठेवले. मधल्या काळात सिंधू पाणीवाटप करारानुसार, भारताला मिळणारा पाण्याचा वाटा, पाकिस्तानला न देण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारतानं सिंधू पाणीवाटप करार रद्द केलेला नाही. मात्र पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांना चिरडणं, ही सिंधू पाणीवाटपाचा करार रद्द होण्याइतकी गंभीर बाब आहे.

 

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताला असा हल्ला करण्याचा पूर्ण अधिकार आहे. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्याची जबाबदारी ‘जैश’ नं स्वीकारली. या हल्ल्यानंतर काश्मीर फुटीरतावाद्यांना देण्यात येणारी सुरक्षा काढून घेण्यात आली. यासिन मलिकसहित अनेकांना अटक करण्यात आली. 100 अतिरिक्त सीआरपीएफ तुकड्या काश्मीर घाटीत तैनात करण्यात आल्या. काश्मीर खोर्‍यातील बातम्या छापण्यास प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली. या सर्व कृतींमधून पुलवामानंतर देशांतर्गत करण्यात येणार्‍या कठोर कारवाईची झलक सरकारनं दाखवली. पुलवामानंतरच्या 12 दिवसांत, भारतानं देशाबाहेरीलही विविध पातळ्यांवर ‘दहशतवादाला आश्रय देणारं राष्ट्र’ म्हणून पाकिस्तानला एकटं पाडण्याची मोहीम यशस्वीरीत्या सुरू केली आहे. कोणत्या दिशेनं, कोणत्या प्रकारचा हल्ला होईल, यावरून शत्रूला संभ्रमात टाकण्याचं कौशल्य भारताला जमलं आहे. पाकिस्तानच्या भूमीवर थेट हल्ला हे त्याचंच एक उदाहरण. केवळ 21 मिनिटांत ही मोहीम फत्ते करून भारतानं फक्त पाकिस्तानलाच नाही, तर चीनलाही गंभीर इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसहित अनेक देशांनी या हल्ल्यानंतर भारताला पाठिंबा दिला आहे. एवढंच काय, ओआयसी(ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन)नंही प्रथमच भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना या परिषदेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं आहे. (हे लक्षात घ्यायला हवं की इतिहासात एका वेळी केवळ पाकिस्ताननं आक्षेप घेतल्यामुळं भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री फक्रुद्दीन अली अहमद यांना या परिषदेला उपस्थित राहता आलं नव्हतं. इस्लाम हा भारताचा अधिकृत धर्म नाही असा आक्षेप पाकिस्ताननं त्यावेळी घेतला होता.)भारताच्या कारवाईनंतर चीननेही पाकिस्तानची बाजू घेण्याचं टाळलं आहे. या कारवाईनंतर परराष्ट्रमंत्री विजय गोखले यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि स्पष्ट असा खुलासाही केला. ही कारवाई non-military (बिगर लष्करी)असल्याचं ते म्हणतात. पुलवामा हल्ल्याचा त्यात तसूभरही उल्लेख नव्हता(त्यामुळं तो ‘पुलवामा’ चा बदला होता, असंही कुणाला म्हणता येणार नाही). दहशतवादी भारतात इतर ठिकाणी हल्ल्याच्या तयारीत, असल्याने भारताने आधीच ही कारवाई केली(preemptive)अशी अधिकृत भूमिका भारतानं घेतली आहे. सगळंच ‘गेम चेंजर’  आहे. 26 फेब्रुवारी हा दिवस इतिहासात ‘गेम- चेंजर’ दिवस म्हणून नोंदवला जाईल.

 

1971 च्या बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामानंतर भारताशी थेट युद्धात आपण जिंकू शकत नाही, हे पाकिस्तानला कळलं होतं. एक पाकिस्तानी सैनिक दहा भारतीय सैनिकांना मारू शकतो, हा पाकिस्तानचा गैरसमज तेव्हा कायमचा दूर झाला. आधुनिक जगात युद्ध म्हणजे समोरासमोर येऊन थेट लढणं, इतपत मर्यादित नाही. एखादा देश ते युद्ध जिंकण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो यावरून त्या युद्धातला विजय कुणाचा, हे ठरतं. पाकिस्तानला हे कळून चुकलं आहे की याबाबतीत त्याची भारताशी तुलना होऊच शकत नाही. थेट युद्धात तो भारतासमोर उभंसुद्धा राहू शकत नाही.

 

1971 नंतरच्या काळात पाकिस्तानी अर्थव्यवस्था कोलमडतच राहिली. अशा परिस्थितीत, पाकिस्तानला टिकून राहण्यासाठी त्या-त्या वेळच्या महासत्तांपुढं हात पसरावे लागले आहेत. शीतयुद्धाच्या काळात पाकिस्तानला अमेरिकेची मदत मिळाली. आजच्या बदललेल्या जागतिक परिस्थितीत पाकिस्तान मदतीसाठी चीनकडे हात पसरतो. अशा परिस्थितीत पाकिस्ताननं जर आता युद्ध सुरू केलं, तर त्याची अर्थव्यवस्था खड्ड्यातच जाईल. तज्ज्ञांच्या मते सहा दिवसांपेक्षा जास्त काळ युद्धात टिकण्याची क्षमता पाकिस्तानकडं नाही; भारत मात्र ‘किमान’ दहा दिवस लढू शकतो. थेट युद्धात पाकिस्तान जिंकू शकत नाही हे कारगिलच्या वेळीही दिसून आलं. त्यामुळं अण्वस्त्रांचा धाक दाखवत proxy war – छुपं युद्ध सुरू ठेवायचं ही पाकिस्तानची तेव्हापासूनची युद्धनीती राहिली आहे. bleeding india with thousand cuts या नावानं पाकिस्तानच्या युद्धनीतीला ओळखलं जातं. भारतात ‘स्लीपर सेल’ चं जाळं तयार करणं, हिंदू- मुस्लिम फूट तयार करणं, नागरिकांना देशाविरोधात भडकावणं या मार्गांनी पाकिस्तान भारताशी युद्ध करत आहे. भारताला या प्रकारच्या युद्धाचं उत्तरच देता येणार नाही हा त्या नीतीचा एक भाग आहे. भारत चिडून जर युद्धच सुरू करायचं म्हटलं तर मग अण्वस्त्र बाहेर काढण्याची धमकी द्यायची. असं असूनही दरवेळी आपल्यालाच शांत राहायला सांगितलं जातं. 2001 च्या डिसेंबर महिन्यात भारतीय संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरु – आज आपल्या देशात त्याची बाजू घेणारे अनेकजण आहेत. पुढारलेल्या आधुनिक विचाराचं ते एक लक्षण मानलं जातं. या हल्ल्यानंतर भारतानं पाक सीमेजवळ आपलं लष्कर तैनात केलं होतं. पुढचे सात महिने हे लष्कर पाकिस्तानसोबत युद्ध करण्यास सुसज्ज होतं. आपण मात्र त्यावेळी एक गोळीदेखील चालवली नाही. 9/11 हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात अमेरिकी लष्कराला पाकिस्तानची गरज असेल हे ओळखूनच पाकिस्ताननं भारतीय संसदेवरील हल्ल्याची आखणी केली होती. डिसेंबर 1999 मध्ये घडलेली IC-814 विमान अपहरणाची घटनाही तशीच. या कृत्यामागं पाकिस्तान आहे हे माहिती असूनसुद्धा आपण त्याचं उत्तर दिलं नाही. उलट पुढची सगळी दहशतवादी कृत्यं घडवून आणणार्‍या मौलवी मसूद अझरला आपण तेव्हा पाकिस्तानच्या हवाली केलं. 26/11 घडलं तेव्हाही आपण काहीच केलं नाही. पण आज हे समीकरण बदललं आहे.

 

बदललेल्या समीकरणाची एक झलक भारतानं ‘सर्जिकल स्ट्राईक’ च्या माध्यमातून दाखवून दिली. 26 फेब्रुवारीच्या कारवाईनंतर ‘नया भारत’ वर शिक्कामोर्तबच झालं. भारतानं प्रत्युत्तर दिलं तर युद्ध सुरू होईल, ते झालं तर ते अणुयुद्ध असेल, म्हणून भारतानं संयम राखावा – इतकी वर्षं मांडल्या जाणार्‍या या युक्तिवादाला गेली सर्व वर्षे माझा एक साधा प्रश्न होता – संयम राखायला दरवेळी भारतालाच का सांगितलं जातं? पाकिस्ताननं दहशतवादाला पाठिंबा दिला तर भारत युद्ध सुरू करेल, ते युद्ध अणुयुद्ध असेल, ते झालं तर पाकिस्तान या पृथ्वीवरून कायमचा नष्ट होईल – असं कुणीच का नाही म्हटलं? आज ते समीकरण बदललं आहे. माझा हा विश्वास आहे की आजच्या घडीला परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जगभरातून इम्रान खानला अनेक फोन जात असतील.

 

अगदी परवाच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात माझं ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. त्यांनी माझं मत विचारल्यानंतर गेली अनेक वर्षे मी जे म्हणत आलोय तेच त्यांनाही सांगितलं – ‘we should call Pakistan’ s bluff! पाकिस्तानच्या धमकीला आपण आव्हान द्यायला हवं. दरवेळी अण्वस्त्र वापरू, ही पाकिस्तान आपल्याला देत असलेली धमकी आहे. युद्धाचे सतत होत असलेले वार सहन करणं आपण थांबवायला हवं. आज ते होताना दिसत आहे. त्यामुळं 1971 पासून पाकिस्तान ज्या युद्धनीतीवर विसंबून होता, तिलाच आता सुरुंग लागला आहे.

 

अर्थात कठोर प्रत्युत्तर देत असताना त्यात जबाबदारपणा हवा. कोणत्याही प्रकारचा ऊरबडवेपणा नको. भारताला ते जमल्याचं दिसतं. जागतिक दबाव असताना चीन पाकिस्तानची कितपत पाठराखण करतो हेही भारतानं एका अर्थी चाचपून पाहिलं आहे. या सगळ्याचा शेवट अर्थात तूर्त तरी होणार नाही. NSCN दहशतवाद्यांविरोधात भारतानं म्यानमारमध्ये केलेली कारवाई हा पाकिस्तानसाठी संदेश होता. पाकिस्ताननं मात्र त्यातून कोणता धडा घेतल्याचं दिसून आलं नाही. याउलट उरी हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देण्याची भाषा करतो आहे आणि देतोही आहे. पाकिस्ताननं 1998 ते 2008 या काळात किमान तीन वेळा अण्वस्त्र हल्ल्याची तयारी केली होती. म्हणून आपण सावधही असायला हवं. पण सावधपणा आणि बुजरेपणा यात फरक आहे. प्रत्युत्तराची भाषा असली तरी त्यात युद्धाची खुमखुमी नको. शेवटी एका वाक्यात लेखाचं तात्पर्य मांडता येईल – हा देश बदलला आहे, हे जगानं जाणलं आहे. पाकिस्तानच्या आजवर यशस्वी ठरत आलेल्या युद्धनीतीची राखरांगोळी झाली आहे. अशा या बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकानं तयार असायला हवं. 130 कोटी नागरिकांनी एका सुरात आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन जगाला घडवून द्यायला हवं.

 

संपर्कswatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *