GSAT-11

‘भारताने आजवर निर्माण केलेल्या उपग्रहांपैकी सर्वांत ताकदवान उपग्रह’ असे इस्रो प्रमुखांनी वर्णन केलेल्या GSAT-11 उपग्रह दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गयाना येथून अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला. जवळपास 6 टन वजन असलेला हा उपग्रह यशस्वीरीत्या कार्यरत झाल्यास भारताच्या दूरसंचार क्षेत्रात फार मोठा बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरेल. सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले, दुर्गम भागात आंतरजाल कार्यान्वित करण्याचे काम तो करेल. इस्रोच्या या ‘अवजड’ तसेच अधिक प्रगत उपग्रहाबाबत थोडे जाणून घेऊया.

 

GSAT-11 काय आहे? त्याची वैशिष्ट्ये काय?

5854 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह फ्रेंच गयानामधील कुरू येथून आर्यन-5 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाचे आयुर्मान 15 वर्षे एवढे आहे. हाय थ्रोपुट प्रकारचा हा उपग्रह असून याआधीचे अशा प्रकारचे GSAT-19 आणि GSAT-29 हे उपग्रह अवकाशात आहेत. सध्या उपग्रह ‘जिओस्टेशनरी ट्रान्स्फर’ कक्षेत सोडण्यात आला आहे. यापुढची या उपग्रहाची यात्रा भारतातून ‘हसन’ द्वारे होईल आणि उपग्रहाला भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात येईल. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जेव्हा उपग्रह त्याच्या नियोजित कार्याला लागेल तेव्हा हे प्रक्षेपण आणि योजना यशस्वी झाली असे म्हणता येईल.

 

GSAT-11 मध्ये वैशिष्ठ्य असे की, या उपग्रहात प्रथमच Ka बँड वापरण्यात आला आहे. आंतरजालाद्वारे अथवा इतर कुठल्याही प्रकारे संपर्क  करण्यासाठी वारंवारितेची (फ्रीक्वेन्सी) आवश्यकता असते.  यामध्ये वारंवारितेचे विविध पट्टे असतात.

 

GSAT-11 मध्ये यापैकी Ku आणि Ka हे दोन पट्टे (बँड) वापरले आहेत. Ka बँड हा प्रथमच एखाद्या  कुठल्यातरी भारतीय उपग्रहात वापरला जात आहे. हा बँड साधारणतः ‘संपर्क आणि लष्करी हवाई रडार’ उपग्रहांमध्ये वापरला जातो. यात वापरण्यात आलेल्या ‘मल्टीस्पॉट बीम अँटेना सर्व्हिस’ द्वारे भारतीय भूखंड तसेच भारताच्या बेटांवर देखील आता आंतरजाल सुविधा पुरवता येणार आहे.

 

GSAT-11 चे उपयोग काय?

उपग्रह यशस्वीरीत्या कार्यरत झाल्यास नरेंद्र मोदी सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’उपग्रहाला गती मिळणार आहे. GSAT-11 द्वारे शहरी आणि ग्रमीण भागातील दरी ब्रॉडबँड आंतरजालामुळे कमी होणार आहे. डिजिटल इंडियाअंतर्गत असलेल्या ‘भारतनेट’ प्रकल्पासाठी याचा उपयोग होणार आहे. ट्राय (टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ने या वर्षाच्या सुरुवातीस विमानामध्ये आंतरजाल सुविधा वापरता यावी यासाठी  लवकरच तसे नियम बनविणार असल्याचे सांगितले होते. GSAT-11द्वारे ‘इन्फ्लाइट कनेक्टिव्हिटी’ म्हणजेच हवाई यात्रेदरम्यान आंतरजाल वापरणे शक्य होईल. GSAT-11हा हाय थ्रोपुट प्रणालीतील तिसरा उपग्रह असून यानंतर या प्रणालीतील GSAT-20 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येईल. हे चारही उपग्रह भारत सरकाचे 100 गिगाबाईट्स् प्रति सेकंद या गतीने आंतरजाल पुरविण्याचे स्वप्न साकार करतील. शहरात आपण जे आंतरजाल वापरतो ते ऑप्टिकल फायबरमार्फत आपल्याला प्राप्त होते. परंतु हे ऑप्टिकल फायबरचे जाळे भारतातील दुर्गम भागात अद्यापही पोहोचलेले नाही. त्यामुळे उपग्रहाद्वारे आंतरजाल पुरविणे हा अशा दुर्गम भागांसाठी सध्या सर्वोत्तम पर्याय आहे. हाय थ्रोपुट तंत्रज्ञानामुळे  इतर उपग्रहांपेक्षा GSAT-11 अधिक कार्यक्षम झालेला आहे.

 

भारतनेट म्हणजे काय?

भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड ही टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधा पुरविणारी संस्था आहे. भारत सरकारच्या टेलिकॉम मंत्रालयांतर्गत तिची स्थापना करण्यात आले आहे. राष्ट्रीय ऑप्टिकल फायबरच्या जाळ्याचे व्यवस्थापन व नियोजन याद्वारे होते. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत 6,25,000 गावे आणि 2,50,000 ग्रामपंचायती यांमध्ये कमीत कमी 100 गिगाबाईट्स प्रति सेकंद गतीने आंतरजाल पुरविण्यासाठी भारतनेट काम करते. GSAT-11 च्या नवीन तंत्रज्ञानाचा या उपक्रमात नक्कीच वापर होईल.

 

GSAT-11उपग्रह हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात आधुनिक उपग्रह आहे. यातील बहुतेक भाग भारतातच भारतीय तंत्रज्ञानांनी बनविले आहेत. भारताजवळील GSLV मार्क-3 या प्रदोपकाद्वारे केवळ 4 टन वजनापर्यंतच उपग्रह प्रदोपित करता येतात. त्यामुळे 6 टन वजनाचा GSAT-11 आर्यन-5 या प्रक्षेपकाद्वारे फ्रेंच गयानामधून प्रक्षेपित करावा लागलो. भारतातील दळणवळण व संपर्क क्षेत्रात पुढे होऊ घातलेल्या क्रांतीत GSAT-11 चे असामान्य स्थान असेल हे निश्चित.

 

लेखक: वैभवी घरोटे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *