बालगंधर्व रंगमंदिर काळाबरोबर बदलणार का?

1960 च्या दशकात नाट्यगृह बांधणीतील एक स्वतंत्र पॅटर्न निर्माण करणार बालगंधर्व रंगमंदिराची 50 वर्षे जुनी वास्तू पाडण्यावरून सध्या पुण्यात वादंग सुरू आहेत. त्यामध्ये आता सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तीबरोबर आता  राजकीय पक्षही सहभागी झाले आहेत. बालगंधर्व रंगमंदिराने नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केला असून 1968 मध्ये बांधून पूर्ण झालेला सुंदर रंगमंदिराची वास्तू तत्कालीन पुणे महापालिका आयुक्त भुजंगराव कुलकर्णी यांच्या पुढाकारातून तसेच नाटककार पु. ल. देशपांडे यांच्या कल्पनेतून तसेच पुणेकर बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के यांच्या कौशल्यातून साकार झाली.

 

मुळात लोकांचा वावर जास्त असणार्‍या नाट्यगृहासारख्या वास्तूचे आयुष्यही पाच दशकांनंतर बदलते, तिथे नवीन गरजा निर्माण होतात. म्हणूनच ही वास्तू पाडून तिथे सर्व सुविधांनी मुक्त असे बहुमजली रंगमंदिर संकुल उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रकिया पुणे महापालिकेकडून यापूर्वीच सुरू करण्यात आली. रंगमंदिराच्या पुनर्विकासाचे आराखडे महापालिकेने वास्तूविशारदांकडून मागवले आहेत. तर दुसरीकडे बालगंधर्व रंगमंदिराची मूळ वास्तू न पाडता त्या परिसराचा पुनर्विकास केला जाणार आहे.पुनर्विकासात आधीची वास्तू पाडून तिथे नवी वास्तू  उभारली जाते.

 

बालगंधर्व रंगमंदिराची वास्तू पाडण्याच्या  मुद्द्यावरून भिन्न मतप्रवाह असले तरी ते पाडून त्याजागी बहुमजली रंगमंदिर उभारण्याच्या प्रकियेला सुरूवात झाली आहे. त्यासाठी या रंगमंदिराच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच त्यासंबंधीची कार्यवाही पुढील काही दिवसात पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. पुनर्बांधणीला सांस्कृतिक क्षेत्रासह काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. या निर्णयासंदर्भात कलाकार, रंगकर्मी,   तज्ज्ञ आणि प्रेक्षकांची एक समिती नेमली आहे. या समितीच्या सूचनांचा आदर करून निर्णय घेण्यात येईल. महापालिकेत हीच भूमिका जाहीर करण्यात आली आहे. यातून आता रंगमंदिराची वास्तू पाडून तिथे आधुनिक व अत्याधुनिक सेवांनी मुक्त असणारी नवीन इमारत बांधली जाणार आहे.

 

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणतात की, बालगंधर्व रंगमंदीर हे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचे भूषण आणि सांस्कृतिक चळवळीचे मुख्य केंद्र आहे. 1968 सालापासून पुणमध्ये बालगंधर्व रंगमंदीर हे नाट्यकलेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचीच वैचारिक देवाण-घेवाणीचे केंद्र समजले जाते. मात्र बालगंधर्व रंगमंदिर परिसराच्या आजूबाजूस बरेच बदल घडून आले आहेत. तो परिसर, विशेषत: जंगली महाराज रस्ता हा पुण्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्या ठिकाणची वर्दळ, संभाजी उद्यानाच्या जवळ असलेले नियोजित पुणे मेट्रोचे स्थानकामुळे या परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे दळणवळण वृद्धिंगत होणार आहे. या परिसरातील बदल करण्यासाठी वास्तुकला परिषद, नवी दिल्लीमध्ये नोंदणीकृत झालेल्या वास्तुविशारदांना या प्रकल्पाचे प्रस्ताव देण्यास आमंत्रित केले आहे. त्या मध्ये सांस्कृतिक संवर्धन घडवून आणणे हा मुख्य हेतू आहे. त्यामध्ये वास्तूविशारदांनी त्यांचे डिझाईन सादर करणे आवश्यक आहे. येत्या 19 जानेवारी 2019 पर्यंत ती डिझाईन्स मागवण्यात आली आहेत. त्यानंतरच पुणे महापालिकेस पुणेकरांचा कल लक्षात घेऊन मगच त्यावर निर्णय घेण्यात येईल. आमच्या उद्देशाशी विसंगत माहिती प्रसिद्ध होऊ नये म्हणून हा खुलासा करत आहोत.

 

एकीकडे सांस्कृतिक क्षेत्रातून महापालिकेच्या भूमिकेला विरोध होत असला तरीही आपल जाहीर प्रकटनातून हीच भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. रंगमंदिर पाडले जाणार असून पुनर्बांधणीसाठी वास्तुविशारदांनी नोंदणी करून प्रकिया पूर्ण करावी, असे महापालिकेच्या भवन रचना विभागातर्फे आवाहन करणत आले आहे. वास्तविक,  महापालिकेच्या स्थायी समितीने यापूर्वीच हा निर्णय घेतला होता. समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी नेमलेल्या समितीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, या समितीच्या सूचनांचा विचार होऊन मगच पुढची कारवाई केली जाईल.

 

राजकीय नेत्यांचा विरोध : गंमतीचा भाग महापालिकेतील काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे यांनी बांलगंधर्व रंगमंदिराला आता सिहगड किल्ला, शनिवार वाडा, लाल महाल आणि पर्वती या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतच नेऊन ठेवले  आहे! ते म्हणतात की, बालगंधर्वची वास्तू पाडणे म्हणजे पुण्याच्या इतिहासाशीच खेळणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनीही महापालिकेच्या या निर्णयास विरोध केला आहे. ते म्हणाले की, डेक्कन जिमखाना  परिसरातील मोक्याच्या जागी उभी असणार्‍या या वास्तूकडे पाहून सत्ताधारी भाजपच्या डोक्यात अर्थकारणाची चक्रे फिरत आहेत. त्यामुळेच पुनर्विकासाच्या नावाखाली बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास आमचा विरोध आहे. तसे घडले   नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल. शहर विकासाच दृष्टीने भाजपला आपला प्राधान्यक्रम ठरवता येत नाही, असे सांगत माजी नगरसेवक गोपाळ तिवारी म्हणाले की पुलंचे जन्मशताब्दी वर्षात बालगंधर्व पाडण्यालाच भाजपने प्राधान्य दिले आहे. टीका करण्यात आता शिवसेनाही मागे राहिलेली नाही. शहराच्या सांस्कृतिक आणि कला  जगतामध्ये बालगंधर्व रंगमंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रस्ता रुंदीकरण, हिरवळ आणि वाहनतळाची व्यवस्था लक्षात घेऊनच या रंगमंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मोक्याची जागा असलेली ही वास्तू पाडण्याचा प्रकार म्हणजे शहराच्या सांस्कृतिक ठेवीवरील केलेला हल्लाच आहे! ज्यांच्या नजरेतून बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी झाली त्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षातच ते पाडून हे नक्की कोणाला आदरांजली वाहात आहेत असा प्रश्न शिवसेनेचे शहर सहसंपर्क प्रमुख व माजी नगरसेवक श्याम देशपांडे यांनी केला आहे.

 

पाच दशके उलटून गेलेल्या अशा वास्तूला महापालिका हात लावू लावूच कशी शकते, असा खडा सवाल करत अनेकांनी आपल्या अस्तन सरसावल्या  आहेत. जर का शहराच्या सांस्कृतिक ठेव्याला धक्का पोचला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा सज्जड इशाराही महापलिकेला देण्यात आला आहे. यात सध्या विरोधी पक्षात बसलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष आघाडीवर आहेत. बालगंधर्व पाडण्याच्या विरोधात जनआंदोलन छेडले जाईल असेही या पक्षाचे नेते आता म्हणू लागले आहेत!

 

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने या प्रकियेला विरोध केला आहे. असे असले तरी महाराष्ट्राचे माजी  मुख्यमंत्री व रसिक काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांनी महापालिकेच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा दिला आहे! सध्याची इमारत पाडून बहुउद्देश असणारी नवीन इमारत बांधली तर त्याला पुणेकरही पाठिंबा देतील, असे शिंदे यांनी सांगितले आहे.

 

काही रंगकर्मींची खंत: ज्यांच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदीर साकारले गेले, त्या पुलंची  जन्मशताब्दी साजरी होत असतानाच पुलंचे स्वप्न जमीनदोस्त होत आहे अशी खंत वात्रटिकाकार व राजकीय नेते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केली आहे. जर इंग्लंडमध्ये शेसपिअरचे राहते घर तसेच ठेवून तिथे स्मारक साकारण्यात आले आहे, त्याच धर्तीवर बालगंधर्व रंगमंदिराच्या मूळ वास्तूला धक्का न लावता विकास करण्यास हरकत नाही, असा   सावध पवित्रा फुटाणे यांनी घेतला आहे. ते पुढे म्हणाले की, पुरातन वास्तूंचे संरक्षण करणे सर्वांचे काम आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे जर पुरातन वास्तूत येत असेल तर पुरातन वास्तूची व्याख्याच आता बदलाला हवी!

 

26 जून 2018 रोजी वाची पन्नाशी पूर्ण केलेल्या बालगंधर्व रंगमंदिराने गेल्या पाच दशकांमधील रंगभूमीवरील अनेक स्थित्यंतरे बतली आहेत.या मंदिरातील नाटकांचा आतापर्यंत कोट्यवधी नाट्यरसिकांनी आनंद लुटला असून अनेक मोठ्या कलाकारांची कारकीर्द येथील मंचावर बहरली आहे. रंगभूमीवरील अनेकांनी मूळ वास्तूला धक्का न लावता पुनर्विकास व्हावा अशी भूमिका मांडली आहे. हा पुनर्विकास करताना रंगभूमी क्षेत्रातील तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात यावा, अशी अपेक्षाहीबोलून दाखवली आहे. पुनर्विकास करण्याची संकल्पना सुंदर असून त्याला कोणाचा विरोध नाही. पण पुनर्विकास या संकल्पनेमध्ये नाट्यकलेचे भवितव्य काय असेल त्याबद्दल ही मंडळी काळजी व्यक्त  करत आहेत. जुलूस, मुखवटे यांच्यासारखी नाटके बालगंधर्वमध्ये सादर केलेले आणि आता पुणेकर बनलेले अमोल पालेकर यांनी ही भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिराचा पुनर्विकास होत असताना सार्‍या गोष्टींचा असाच बट्ट्याबोळ झाला होता. आता तिथे नाटक वगळता प्रदर्शने, स्वागतसमारंभ असे सर्व कार्यक्रम होतात. रंगमंदिरावर असलेले गोपाळराव देऊस्कर यांनी रंगवलेले एक पेंटिंग यात नष्ट झाले आहे. ती वेळ बालगंधर्वच्या पुनर्विकासात होणार नाही कशावरून, असा पालेकरांचा प्रश्न आहे. रवींद्र नाट्य मंदिराच्या वैभवाचे आम्ही जीवापाड जतन करू असे सांगूनही जे व्हायचे ते झालेच! त्यामुळे पुनर्विकास या शब्दाचीच भीती वाटते.

 

तरुण पिढीचे रंगकर्मी अतुल पेठे यांनीही अशीच री ओढली आहे. ते म्हणाले की, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास असे म्हणताना तेथे नवीन काम केले जाणार आहे आणि नव्याने उभ्या केलेली वास्तूमध्ये नाट्यचळवळ पुढे जाणार आहे की नाही हे पाहाणेही तितकेच महत्वाचे ठरणार आहे. पालेकर आणि पेठे यांच्या बोलण्यात जे रवींद्र नाट्य मंदिराचे झाले, तेच आता बालगंधर्व रंगमंदिराचेही होणार असा पवित्रा घेतला आहे. तर आजचे दुसरे तरुण रक्ताचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनीही हीच भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, शहरात विकासकामे करणे अपरिहार्य असताना त्याच वेळी आपल्या काही जुन्या गोष्टी जपण्याकडेही लक्ष द्यायला हवे. पण त्यापलिकडे राघवन अधिक स्पष्टपणे आपला मुद्दा मांडू शकले नाहीत. त्यांनी उदाहरण दिले  की, तुळशीबागेचे मंदिर इतके सुंदर आहे की शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही तिथे खूप शांत वातावरण  अनुभवायला मिळते. माझे बालपण पुण्याशी जोडले गेल्यामुळे पुण्याशी एक वेगळे भावनिक नाते जोडले गेले आहे. पुण्यासंबंधीच्या खूप काही आठवणी आहेत. आता पुण्यात होत असणारू बदल पाहून वेदना होतात.

 

वरील सारेच रंगकर्मी तार्किक मुद्यापेक्षा भावनिक आवाहन करताना दिसतात. बालगंधर्व रंगमंदिराशी असणार्‍या आपल्या जुन्या आठवणी चांगल्या आहेत, पुनर्विकासात सार्‍याच आठवणी भंगतील अशी भीती त्या सार्‍याच नव्या व जुन्या रंगकर्मींंच्या बोलण्यातून व्यक्त होताना दिसते. त्याऐवजी नवे रंगमंदिर व वास्तू कशी असायला हवी त्याबद्दल मात्र कुणीच काही बोलत नाहीत, याचे आश्चर्य वाटते.

 

विशेष म्हणजे जेव्हा बालगंधर्व उभारण्याची योजना महापालिकेने जाहीर केली, तेव्हा ही पैशाची उधळपट्टी आहे, अशी ओरड 1960च्या दशकातील पुणेकरांनी केली होती. काहीशी त्याच गोष्टीची पुनरुक्ती आजचे ढुढ्ढाचार्य करत आहेत हे पाहून छान करमणूक होते! एकीकडे रंगमंचाच्या नवनवीन शक्यता व अभिव्यक्तीबद्दल बोलायचे आणि दुसरीकडे नवे बदल दिसले की त्यातला विरोध करायचा हा दुटप्पीपणा मराठी रंगभूमीच्या विकासाच्या दृष्टीनेही योग्य नाही.

 

पुनर्विकास म्हणजे नेमके काय?

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचे महापालिकेने जाहीर केले असले तरी हा पुनर्विकास म्हणजे नेमके काय असणार आहे, असा सवाल आता काही रंगकर्मी करू लागले आहेत. रंगकर्मींच्या भाषेत बोलायचे तर त्यामध्ये रंगभूमीच्या नव्या संवेदनांचे प्रतिबिंब उमटणार आहे का नाही, अशी जाहीर अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. तसेच बालगंधर्व जर पाडले तर त्याला शहरात नाटक सादर करण्यासाठी अन्य कोणते व्यवहार्य पर्याय उपलब्ध असतील याचा व्वस्थित तपशील महापालिकेने सादर करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. बालगंधर्व जर नसेल तर शहरातील इतर नाट्यगृहांची परिस्थिती कशी आहे. तिथे नाटकाचे प्रयोग होतात का, होत नसतील ते का होत नाहीत हेही सांगावे असे रंगकर्मींचे म्हणणे आहे. वास्तविक यानिमित्ताने शहरातील पुणे महापालिकेची अन्य नाट्यगृहे जर नाटकांसाठी फारशी वापरात नसतील तर ती आवर्जून वापरली जातील. कदाचित, अशा रंगमंदिरांची डागडुजी महापालिकेकडून होईल. तसेच तिथे नाटक पाहण्याची सवय प्रेक्षकांना लागेल. एरव्ही प्रत्येकालाच बालगंधर्व रंगमंदिर हवे असल्यामुळे त्याचा फारसा विचार झाला नव्हता.

 

ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर त्याबाबतीत अधिक सजग दिसतात. ते म्हणाले की, केवळ पुलंच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिर साकारले आहे, म्हणून ते पाडू नये अशा भावनिक गुंत्यात अडकण्यात अर्थ नाही. उलट या नाट्यगृहाचे प्रयोजन संपले असेल आणि नव्या रंगकर्मींच्या अभिव्यक्तीसाठी नव्या पद्धतीच्या संकुलाची गरज असेल तर ते आवश्यक झाले पाहिजे. त्याचे आर्किटेक्चरल डिझाइन करताना जागतिक रंगभूमी पाहिलेल्या अभ्यासकांची मते महापालिकेने विचारात घेऊन मगच त्याची उभारणी करायला हवी. पुनर्विकास कशासाठी आणि कुणासाठी याबद्दल राज्यकर्त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट व्हायला हव्यात. शहरातील इतर नाट्यगृहाच्या देखभालीबद्दल काय परिस्थिती आहे, हेही रंगकर्मींना सांगितले गेले पाहिजे.

 

काळाबरोबर बदलले पाहिजे हे खरे असले तरी नवीन वास्तू बांधताना नेमके काय करता येईल हे या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणे आवश्क आहे. ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांनीही याबाबतीत भावनिक न होता व्यवहार्य गोष्टी काय आहेत हे आधी पाहिले पाहिजे असे सांगितले. वझे यांनी पन्नास वर्षांपूर्वी पुलंबरोबर बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. रंगमंदिराचे नियोजन कसे करायला हवे याबाबत त्यांचा स्वत:चाही अभ्यास आहे. त्यांनी विविध रंगभूमी व रंगमंदिरे पाहिली असून त्यांच्या मनातही पुनर्विकासानंतर उभे राहाणारे बालगंधर्व रंगमंदीर कसे असेल याबाबत विचार केला आहे. आपल्याला योग्य वाटतात त्या सार्‍या सूचना आपण पुणे महापालिकेस अवश्य करू असेही त्यांनी सांगितले.

 

बालगंधर्व ही ऐतिहासिक वास्तू नसली तरीही तिचा पुनर्विकास म्हणजे नेमके काय हेही महापालिकेने आधी स्पष्ट करायला हवे. अन्यथा तो केवळ एक टोकाचा निर्णय होईल, असे दुसरे ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांचे म्हणणे आहे. उद्देश संपला असेल तर बालगंधर्व रंगमंदीर पाडून नवे बांधणस काही हरकत नाही, असेही त्यांनी सांगितले. तर रंगकर्मींच्या अपेक्षा आणि पुणेकरांच्या भावना या दोन्हीची दखल पुणे महापालिका घेईल, अशी सावध प्रतिक्रिया दिग्दर्शक अभिनेते डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. त्यांनाही बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास म्हणजे नेमके काय करणार असा अंदाज आलेला नाही.

 

पेशाने आर्किक्टेट असणारे नाटककार मकरंद साठे यांनी सरकारी पद्धतीने उभारण्यात येणारी रंगमंदिरे यात अनेक गोष्टींची हेळसांड होत असते असे सांगितले. आजच बालगंधर्व रंगमंदिरासाठीही आर्किक्टेट तज्ज्ञांनी केलेल्या सूचना महापालिकेने अमलात आणल्या नाहीत. त्यामुळे पुनर्विकासातून निर्माण होणारी नवीन  वास्तूतही हा विचार केला जाईल का, असा प्रश्न पडतो. बालगंधर्व रंगमंदिरही 100 टक्के परिपूर्ण होते असे नाही. नाट्यमंदिरातील ध्वनियंत्रणा सदोष होती. काही रांगा सध्या स्टेजवरील नाटक नीट ऐकू येत नसे, ही उणीव खरी आहे. उद्या बालगंधर्व पाडून तिथे नव्या पद्धतीची व तांत्रिक दृष्ठ्या निर्दोष रंगमंदिराची वास्तू उभी राहाणार असेल तर त्याचेही स्वागत व्हायला हवे, असेही साठे यांनी सांगितले.

 

व्यवहार्य तोडगा:

पुणेकर वास्तुरचनाकार माधव हुंडेकर यांनी अकरा वर्षांपूर्वी ठाणे येथे डॉ. काशिनाथ घाणेकर हे मल्टिप्लेस नाट्यगृह उभारून नाट्यमंदिरासाठी लागणार नवनवीन तंत्रज्ञानाच्या प्रांगणाचा प्रत्यक्ष आरंभ करून दिला. ही गोष्ट अनेकांना माहितही नसेल. आपण मात्र आज बालगंधर्व ही पुलंची वास्तू आहे असे सांगत एकप्रकारे पुलंच्या त्यामागील भूमिकेचा विचार न करता केवळ अंधानुकरण करतो आहोत, असे हुंडेकर यांचे मत आहे. ते म्हणतात की पुलंमधील दूरदृष्टी तसेच पन्नास वर्षांपूर्वी बांधत असताना त्यांनी पुढच दोन दशकांमधील नाटकांचा केलेला विचार केला होता. ते पुढे म्हणाले की, काळाचा विचार करूनच डॉ. घाणेकर नाट्यगृहात 1200 आणि 200 आसनी दोन स्वतंत्र रंगमंदिरे व्यावसायिक व प्रायोगिक नाटकांच्या गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आली होती. त्याशिवाय तेथे रिहर्सल करणसाठीही स्वतंत्र मोठा कक्ष आहे. त्याशिवाय आणखी उत्पन्नाची साधनेही या बहुउपयोगी वास्तूंत अंतर्भूत करण्यात आली आहेत.

 

 

नाट्यगृह ही दिवसातील केवळ 3-4 तासांच्या करमणुकीची गोष्ट नाही. त्यासाठी अशा वास्तूची सातत्याने देखभाल दुरुस्ती करण्यासाठी तसे व्यवस्थापन लागते. त्याचा खर्च भागवण्याची व्यवस्थाही अशा वास्तूमधील इतर पूरक उपकरणांमधून उभारावी लागते. त्यासाठी उपयोगी ठरतील अशा इतर अनेक गोष्टींचा समावेश करावा लागतो. अन्यथा, केवळ नाट्यगृह असणार वास्तूची गणना पांढर्‍या हत्तीमध्ये होते! महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हेच झालेले दिसते. असे टाळण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या नवीन प्रस्तावित वास्तूतही त्यासाठी प्रदर्शनाच्या जागा, मोठ्या शोरूम्स, ट्रेनिंग आणि कॉन्फरन्स कक्ष, बसण्यासाठी हॉटेल्स अशा पूरक सुविधा करायला हव्यात. त्यातून नव्याने उभारण्यात आलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उत्पन्न वाढू शकेल व रंगभूमीविषयक अनेक गोष्टींना पूरक वातावरण निर्माण करता येईल, असे हुंडेकर यांनी स्पष्ट केले.

 

सुदैवाने बालगंधर्व रंगमंदिर आज शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे त्यला या सार्‍या सुविधांच्या व्यावसायिक उत्पन्नासाठी उपयोग करून घेता येईल. पुणे महापालिकेने बालगंधर्वच्या नवीन वास्तूसाठी याचा जरूर विचार करायला हवा, असे त्यांनी सांगितले. त्यासंबंधीचे ताजे उदाहरण देताना हुंडेकर म्हणाले की, नागपूरात कवीवर्य सुरेश भटांच्या नावाने बांधण्यात आलेल नवीन रंगमंदिरात थिएटर चांगले असले तरी बाकीच्या सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. ती उणीव बालगंधर्व रंगमंदिराच्या नवीन वास्तूत भरून काढणे शक्य होईल. बालगंधर्व पुलंच पुढाकारातून बांधली गेली म्हणून ती पाडूच नये हा विचार योग्य नाही, असे सांगून हुंडेकर म्हणाले की, हेरिटेज म्हणून बालगंधर्व रंगमंदिर ही वास्तू तितकी जुनी नाही. तसेच तिथे बालगंधर्वांची स्त्री व पुरुष पोषाखातील तैलचित्रे, तसेच त्यांच्या वापरातील वाद्ये वगळता बाकी काहीच नाही. ते बालगंधर्वच्या नवीन वास्तूतही ठेवता येणे शक्य आहे.

 

हुंडेकर याच्या मते पुलंची व्यापक दूरदृष्टी आजच पिढीतील रंगकर्मी आणि रसिक या दोघांनी जोपासली पाहिजे. ते म्हणाले की, पुलंना तेव्हाही जगभरातील नाट्यगृहांच्या रचनेत का बदल होताहेत याचे भान होते, तर आपल्यात आज ती दूरदृष्टी का नाही? पाच दशकांपूर्वी बांधलेल्या बालगंधर्व रंगभूमीच्या गरजा लक्षात घेऊन पुलंनी पुढच वीस वर्षे डोळ्यापुढे ठेवून त्या नवे बदलही अंतर्भूत केले होते. पुलंचा हा आदर्शही आपण आज ठेवू शकतो. आजच नाटकांसाठी लागणारे रंगमंचाचे डिझाईन त्याच उभारणीतले नवे बदलही आपण बालगंधर्व रंगमंदिराच्या नवीन वास्तूत आणू शकतो. जगभरात रंगमंदिर व रंगमंचांचे स्वरूप सातत्याने बदलत चालले आहे. त्यामुळे आपणही या गोष्टींचे स्वागत करायला हवे. छोटे वाद व मतभेद मिटवायला हवेत.

 

सुदैवाने मध्यवर्ती भागात वसलेल्या बालगंधर्व रंगमंदिरामध्येच नाटके पाहायला येणार्‍या प्रेक्षकांसाठी जर मोठा वाहनतळ लागत असेल तर तो नवीन वास्तूमध्ये प्रत्यक्षात आणता येईल. हुंडेकर पुढे म्हणाले की, यासाठी नवीन वास्तूत दोन ते तीन मजले केवळ वाहनांच्या पार्किंगसाठी उभारणे सहज शक्य आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असणार मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यासारख्या वास्तूमध्ये येणार्‍या रसिकांना पार्किंग करायला जागाच नाही. पुणे शहर जिथे कात टाकते आहे तिथे बालगंधर्व रंगमंदिराने जर नवे स्वरूप धारण केले तर त्यात काहीच वावगे असणार नाही.

 

एकेकाळी रंगमंचावर नवीन तंत्रज्ञान येऊ पाहाणार्‍या फिरत्या रंगमंचासारखे नवे तंत्रज्ञान भविष्यात येऊ शकते. सध्या सर्वच क्षेत्रात डिजिटल क्रांती होताना दिसते, असे सांगून हुंडेकर म्हणाले की, यात मराठी रंगभूमीही आहे, हे विसरून चालणार नाही. पन्नास वर्षांपूर्वीचे प्रायोगिक नाटकही आज बदलत असताना त्यांच्या गरजा लक्षात घेऊन थिएटरमधील नवनवीन संकल्पनांना बालगंधर्वच्या वास्तूत प्रतिबिंबित करायला हव्यात. सध्या काही नाटके ही रंगमंचावर सादर होत नाहीत, तर गोल करून बसलेल्या प्रेक्षकाच्या मधेही नाटक सादर केले जाते. या व अशा प्रकारच्या शक्यतांचा विचारही बालगंधर्व रंगमंदिराच्या नवीन वास्तूत करणे आवश्यक आहे.

 

ही सारी चर्चा केल्यावर एक जाणवते, की यापुढील रंगमंच व नाट्यगृहे अधिक नव्या तंत्रज्ञानाने, तसेच नवीन गरजा लक्षात घेऊन उभारावी लागणार आहेत. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराच्या आज चालू असणार्‍या वादातून आपण जेवढे लवकरात लवकर बाहेर पडू, तेवढे चागले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *