बांगलादेश मुक्ती दिनाच्या निमित्ताने…

ब्रिटिश भारताचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश अस्तित्वात आले. धर्माच्या आधारावर मुहम्मद अली जिना यांनी वेगळे राष्ट्र मिळवले. फाळणीपूर्व प्रदेशाची भौगोलिक रचना 15 ऑगस्ट 1947 नंतर बदलली. तत्कालीन पाकिस्तान हे राष्ट्र दोन भागांत विभागले होते. एक म्हणजे पश्चिम पाकिस्तान(सध्याचा पाकिस्तान) आणि दुसरा पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश). हे दोन भाग एकमेकांपासून सुमारे 2200 पेक्षा जास्त किलोमीटर्सच्या प्रदेशाने विभागले गेले होते. या भागाचे प्रशासकीय कामकाज चालवणे देखील सोपे नव्हते.

 

अगदी स्वातंत्र्यापासूनच पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तानची गळचेपी करत होता. 1948 ला पाकिस्तान सरकारने ‘उर्दू’ ही पाकिस्तानची अधिकृत भाषा असेल असे जाहीर केले. पाकिस्तानच्या प्रशासनातदेखील पूर्व पाकिस्तानला समाधानकारक वागणूक मिळत नसे. दोन्ही भागांतील लोकसंख्या जवळपास सारखी असूनही राजकारण, प्रशासन, लष्कर, शिक्षण इ. क्षेत्रात पश्चिम भागातील लोकांना प्राधान्य दिले जायचे. पाकमध्ये संसदीय लोकशाही मूळ धरू शकली नाही. परंतु जेव्हा जेव्हा कमी कालावधीचे का असेना, लोकनियुक्त सरकार असेल, तेव्हा देखील पश्चिम भागातील लोकच सत्ता उपभोगत.

 

पूर्व पाकिस्तानवर सातत्याने होणारा अन्याय आणि त्याविरुद्ध आवाजाला न मिळणारा प्रतिसाद यामुळे या   गातील जनतेची नाराजी 1971 साली प्रकर्षाने दिसली. 1970 साली झालेल्या निवडणुकीत पूर्व पाकिस्तानचे शेख मुजीबुर रेहमान यांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या. संसदेत पूर्व पाकिस्तान भागासाठी तेव्हा 169 जागा होत्या. यापैकी  167 जागा मुजीबुर रेहमान यांच्या पक्षाने जिंकल्या. संसदेत एकूण जागा होत्या 313. म्हणजे मुजीबुर रहमान सत्ता स्थापन करू शकत होते. पंतप्रधान बनू शकत होते. पश्चिम पाकिस्तानचे नेते झुल्फिकार अली भुट्टो यांनी शेख मुजीबुर रेहमान यांना विरोध केला. संसदेत आतापर्यंत पश्चिम पाकिस्तानचेच वर्चस्व होते. आता सत्तेचे हस्तांतरण होऊन अवामी लीगचे अध्यक्ष शेख मुजीबुर रेहमान यांच्याकडे जबाबदारी येणे साहजिक होते. पण पाकच्या तत्कालीन नेत्यांना हे मान्य नव्हते. सत्ताधार्‍यांनी निवडणूक निकालांकडे एक प्रकारे दुर्लक्षच केले होते. आधीच सापत्न वागणूक  मिळत असल्याने पश्चिम पाकिस्तानबद्दलचा पूर्व पाकिस्तानच्या जनतेचा रोष वाढतच गेला. 25 मार्च 1971 पासून पाकिस्तान सरकारने पूर्व पाकिस्तान भागातील विचारवंत, अभ्यासक, राजकीय नेते यांची धरपकड सुरू केली, त्यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर 26 मार्चला शेख मुजीबुर रेहमान यांनी पूर्व पाकिस्तान आता पाकिस्तानचा भाग नसून आपण बांगलादेश म्हणून स्वतंत्र आहोत अशी घोषणा केली. यामुळे जनतेला पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी आंदोलने करण्यास चालना मिळाली. पाकिस्तानचे तत्कालीन प्रमुख जनरल याह्या खान यांनी पूर्व भागात आपल्याच जनतेविरोधात लष्कराला पाचारण केले आणि परिस्थितीवर ताबा मिळवण्याचा आदेश दिला. या दरम्यान प्रभावशाली विचारवंत, लेखक, अभ्यासक, शास्त्रज्ञ, संशोधन, राजकीय नेते यांना अटक केली. यालाच ऑपरेशन सर्चलाईट असे संबोधले जाते.

 

पाकिस्तानने लादलेले हे अंतर्गत यादवी युद्ध पूर्व भागात डिसेंबर 1971 पर्यंत सुरू होते. या काळात लाखो लोकांच्या कत्तली झाल्या. करोडो स्त्रियांना लैंगिक गुलाम बनवण्यात आले. पश्चिम पाकिस्तानचे अनन्वित अत्याचार चालूच होते. हे अत्याचार विशेषतः धार्मिक अल्पसंख्याक समुदायावर झाले. हिंदू पुरुषांच्या कत्तली करून स्त्रियांवर बलात्कार करण्याचा धडाका सुरू झाला. पाक लष्कर आणि त्यांना साथ देणारे काही इस्लामिक गट यामुळे अल्पसंख्याक समुदायाचे जगणे मुश्किल झाले. दरम्यानच्या काळात शेख मुजीबुर रहमान यांनी भारतातील कोलकात्यात आश्रय घेतला होता. या यादवीच्या काळात मृत्यू पावलेल्या लोकांचे खरे आकडे कोणालाही माहिती नाहीत. पण अंदाजे 2 ते 30 लाख लोकांना या काळात प्राण गमवावे लागले अशा नोंदी काही ठिकाणी केल्या आहेत. लाखो बांगलादेशी नागरिक यादरम्यान भारतात आले होते, बांगलादेशमध्येही विस्थापित झालेले भरपूर नागरिक होते. या भागात सांस्कृतिक-भाषिक-धार्मिक दडपशाही चालली होती.

 

भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींना या प्रदेशातील पाकच्या सैन्याकडून होणार्‍या अत्याचाराची माहिती मिळतच होती. प्रचंड प्रमाणात चाललेला नरसंहार थांबवण्यासाठी भारताने पूर्व पाकिस्तानात बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्‍या ‘मुक्तीवाहिनी’ या संघटनेला सहकार्य करण्याचे ठरवले. भारताला प्रत्यक्ष पाकच्या सैनिकांविरोधात लढता येणे शक्य नव्हते. डिसेंबर 1971 च्या सुरुवातीला पाकिस्तानी हवाई दलाच्या विमांनानी भारताच्या तळावर हल्ले केले. भारताने मुक्तिवहिनीला मदत करू नये असा हेतू त्यामागे होता. पाकच्या या हल्ल्याला आक्रमण म्हणून संबोधून भारतीय सैन्य बांगलादेशमध्ये युद्धाच्या उद्देशाने पाठवले. 3 डिसेंबर 1971 रोजी भारताने बांगलादेशवर चढाई केली. आधीच लढत असलेल्या मुक्तिवाहिनीने भारतीय जवानांना मदत केली. नौदल भूदल आणि वायुदल अशा तिन्ही दलांनी चढाया करून 16 डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याला शरण यायला भाग पाडले. बांगलादेश मुक्त झाला. धार्मिक वर्चस्वाला कसलाही थारा न देता शेख मुजीबुर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून बांगलादेशने वाटचाल करण्याचे ठरवले होते.

 

पुढची वाटचाल

25 मार्च ते 16 डिसेंबर 1971 या सुमारे 10 महिन्यांच्या काळात बांगलादेशात पाक सैन्याचा फक्त आणि फक्त उन्माद चालू होता. या सर्व लढ्याची सुरुवात 25 मार्चला झाल्याने बांगलादेश अजूनही हाच दिवस आपला स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. आता स्वातंत्र्याच्या पन्नाशीजवळ येताना बांगलादेशसमोर अजूनही काही आव्हाने आहेत. तर काही जुनी दुखणी परत समोर येत आहेत. या वर्षात बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. स्वातंत्र्यापासून देशात शेख हसीना यांचा अवामी लीग आणि बेगम खालीदा झिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी या दोन पक्षांची आलटून पालटून सत्ता असते. 1971 च्या युद्धात झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत असणार्‍या आरोपींचे खटले अजून चालू आहेत. सध्याच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 2008 पासून युद्धगुन्हेगारांचे खटले लवकर घेऊन शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शेख हसीना या शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या. त्यांचा अवामी लीग हा पक्ष धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करतो. तर बेगम खालीदा झिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी इस्लाम हा राष्ट्राचा धर्म मानते. सध्या निवडणुकीच्या काळातच बेगम झिया आणि त्यांच्या मुलाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांगलादेशच्या निवडणूक आयोगाने बेगम खालीदा झिया यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे. परिणामी, इथे प्रभावी विरोधी पक्ष दिसत नव्हता. मात्र आता कमाल होसेन नावाचे वकील आणि ज्येष्ठ नेते यांचे नाव शेख हसीना यांच्या विरोधात पुढे येत आहे. ते जवळपास 20 लहान मोठ्या पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करत आहेत. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत अर्थव्यवस्था सुधारली आहे, पण बेरोजगारी देखील वाढली आहे. बांगलादेशाच्या संविधानाप्रमाणे निवडणूक होताना सत्ताधारी पक्षाने सत्तेचे विसर्जन करून देशात सर्वपक्षीय अंतरिम सरकारकडे कारभार सोपवावा असे नमूद केले आहे. शेख हसीना यांनी 2013 ला असे केले नव्हते आणि आताही त्यांनी तसे केलेले नाही. सार्वत्रिक निवडणुकीत हे प्रमुख मुद्दे असून देशात 30 डिसेंबर 2018 ला मतदान होणार आहे.

 

बांगलादेशातील शांतता भारताला गरजेची आहे.

बांगलादेश भारतासाठी, विशेषतः मुख्य भारत आणि ईशान्य भारत यांना जोडणारा दुवा म्हणून खूप महत्त्वाचा आहे. भारताला मुख्य भूमीवरून ईशान्येकडे जाताना सध्या सिलिगुडी कॉरिडॉर हा एकमेव मार्ग आहे. हा मार्ग वेळखाऊ आणि खर्चिक आहे. त्यामुळे अरुणाचल, नागालँड, मणिपुर, त्रिपुरा या राज्यांना मुख्य भागाशी जोडण्यासाठी  बांगलादेशच्या भूमीचा आणि बांगलादेशच्या बंदरांचा वापर करणे अनिवार्य ठरते.

 

भारत बांगलादेश संबंधही सकारात्मक आहेत. 2015 ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सीमा प्रश्न सोडवला आहे. सध्या तिस्ता नदी पाणी वाटप करार पूर्ण होतोय. आसाममध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही तयार करण्यात आली. यानुसार आसामचे स्थानिक रहिवासी ठरवण्यात येणार आहेत. सध्या भारत-बांगलादेश दरम्यान हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. बांगलादेशमधून काही नागरिक ईशान्य भारतात येतात आणि तिथेच स्थायिक होतात. यामुळे स्थानिक आणि बाहेरचे असा संघर्ष होतो. या मुद्द्यावर दोन देश कसे उत्तर काढतात ते बघणे गरजेचे आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला घुसखोरी करणार्‍या नागरिकांचा धोका नेहमीच असतो. त्यामुळे घुसखोरांना परत पाठवले जाईल अशी भूमिका आसाम राज्य सरकारने घेतलेली आहे. तर हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे असा मुद्दा बांगलादेश पुढे करत आहे.

 

भारत आणि बांगलादेश दोन्ही देश ‘सार्क’ आणि ‘बिम्स्टेक’ या दोन प्रादेशिक संघटनेचे सदस्य आहेत. यांद्वारे प्रादेशिक विकास साधण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतात. या प्रदेशात भारताच्या स्थैर्यासाठी-सुरक्षेसाठी-शांततेसाठी शांत-समृद्ध बांगलादेश गरजेचा आहे, हे नक्की.

 

लेखक: रविराज घोगरे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *