निवडणुकीच्या निमित्ताने

जसजसं निवडणुकांचे निकाल लागताहेत  तसं मन थोडं मागं जातं. आता कोण म्हणेल निवडणुकांचा आणि वाचनाचा काय संबंध? राजकीय, सामाजिक क्षेत्रातले वाचन हे अगदी शाळा, कॉलेजपासून आपल्याला अपरिहार्य असते. मला आठवतंय ज्या बी.पी.एम. हायस्कूलमध्ये मी शिकत होतो, त्यात य. दि. फडके यांचं ‘शोध बाळ- गोपाळांचा’ नावाचं एक पुस्तक नेहमीच कव्हर दिसेल अशा पद्धतीनं काचेत लावलं होतं. फडके यांचं साहित्य जड आहे, या समजुतीनं मी ते बराच काळ वाचलं नव्हतं.

 

तशी शाळेत राजकारणावरची संयुक्त महाराष्ट्रावरची पुस्तकं वाचली. उदा. ‘कर्‍हेचे पाणी’ किंवा अत्रेंच्या भाषणामध्ये संयुक्त महाराष्ट्राबद्दलचा लेख आणि भाषणे होतीच. याप्रकारचे वाचन नंतर करायचे नाही असे मी ठरवले. असे  ठरवण्यामागे काही कारणे होती. एकतर जेव्हा कळू लागले तेव्हा लक्षात आले की, जगात इतके ग्रंथ आहेत की, त्यांची नावेही वाचून होणार नाहीत. तेव्हा आपला प्राधान्यक्रम आपण काय वाचायचे, काय नाही, याची फार शिस्त लावता येत नसली तरी राजकारणावर शक्यतो वाचायचे नाही. हे मी 9-10 वीत असताना ठरवून टाकले.

 

पण त्याअगोदर जवळपास रोजच तळवळकरांचा अग्रलेख, खाडीलकरांचा ‘नवा काळ’चा लेख आणि विद्याधर गोखले यांचे लोकसत्तामधील अग्रलेख हे मी नियमित वाचत होतो. परिणाम असा झाला की, लहान वयातच नको ती राजकारणाची गोडी लागली.

 

 

एकतर आम्ही शाळेत असतानाच शिक्षकांनी आणीबाणीवरचे भलावण करणारे भाषण करून दिले होते. सुदैवाने ते करण्याची माझ्यावर पाळी आली नाही. पण याप्रकारे जवळपास दहाव्या वर्षीच राजकारणाचा प्रभाव काय असतो ते जाणवले. मग पुढे तळवळकरांचे राजकारणावर घनाघात करणारे अग्रलेख किंवा अशोक जैन यांचे विलक्षण वाचनीय ‘राजधानीतून’ ये सदर, ‘बहुतांची अंतरे’ असं करत वाचत गेलो. तेव्हाची वर्तमानपत्रे किती राजकारणमय होती याची  आज कल्पना येणार नाही. खेळ आणि त्यातही क्रिकेट सोडले, सिनेमा सोडला तर सारे वर्तमानपत्र राजकारणाने भरलेले असायचे. आज ही स्थिती थोडी बदललेली आहे.

 

निवडणुकांचे निकाल लागताच दोन गोष्टी घडते. एक म्हणजे क्रिकेटची मॅच ऐकावी तशी माणसे रेडिओला खिळलेली असत आणि दुसरे म्हणजे दुसर्‍या दिवशीचे वर्तमानपत्र काय म्हणतात याचे कुतूहल असायचे. किंबहुना कुठलाही मोठा प्रसंग घडला की, दुसर्‍या दिवशीचे वर्तमानपत्र काय म्हणतंय याचंही कुतूहल असायचंच. ही त्या काळात वृत्तपत्रांची ताकद होती. मग हळुहळू टीव्ही येऊ लागला. आमच्या ‘खार’च्या वस्तीत अगदी 3-4 जणांकडेच टीव्ही होता. पण तो पैसे देऊन बघायला मिळायचा.

 

 

निवडणुकीच्या काळात आम्ही टीव्ही बघायचो. म्हणजे त्या वेळेत राजकारणात खूप रस होता असे नाही, पण जेव्हा लोकसभेचे निकाल लागत त्याच्या मधल्या काळात पूर्ण सिनेमा दाखवला जायचा. त्यामुळे आम्ही दिवसभर टीव्ही समोर खिळलेले असायचो. ‘द किड’ हा चार्ली चॅप्लिनचा सिनेमा पूर्णपणे तेव्हाच टीव्हीवर पाहिला. या सिनेमाच्या मध्ये य. दि. फडके येत आणि निवडणुकांचा विश्लेषण करत. नंतरच्या काळात राजदीपपासून, बरखा दत्तपासून, केतकरांपासून, वीर संघवीपर्यंत अनेक विश्लेषक आले. पण यदिंना तोड नव्हती. कारण ते एकहाती देशाच्या राजकारणाने कसे वळण घेतले आहे किंवा कायम आहे याचे विश्लेषण करत.

 

मला आठवतंय ते नेहमी चौकटीचा खादीचा शर्ट घालत आणि हातातले कागद शांतपणे वाचून दाखवत. ते बघताना मी सांगायचो, हे माझ्या मित्राचे वडील आहेत. त्या काळात टीव्हीवर दिसणे म्हणजे सेलिब्रेटी होणे. पण का कुणास ठाऊक य. दि. हे त्या प्रकारचे सेलिब्रेटी झालेच नाहीत. यदिंचा मुलगा अनिरुद्ध माझ्या वर्गात होता आणि वासंतीबाई     म्हणजे य. दि. च्या पत्नी आम्हाला संस्कृत शिकवायला होत्या. नंतर अर्थात त्यांचा परिचयही झाला. त्यांनी जवळपास साठेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील महाराष्ट्रातील    इतिहासवरची बर्‍यापैकी पुस्तके वाचली. विशेषतः ‘संयुक्त महाराष्ट्र काळा’तील खंड सहावा, सातवा आणि ‘शोध बाळ गोपाळां’चा वाचलं.

 

 

पत्रकारिता करायला लागल्यावर दैनंदिन वर्तमानपत्रातून काम बंद केल्यावर मी फ्री लान्सिंग सुरु केलं आणि यदीच्या आगरकर पुस्तकाची परीक्षण करायची वेळ आली आणि मी असे लिहिले की, ‘यदिंनी आगरकरांचे चरित्र कादंबरी रूपात लिहिले आहे पण जिथे-जिथे भावनिक प्रसंग येतात तिथे-तिथे कादंबरीचे स्वरूप वाचनीय होते. पण गंभीर आणि राजकीय प्रसंगात या कादंबरीचा फॉर्म काही योग्य वाटत नाही. पण य. दिं. नी सुरुवातच कादंबरी लेखनापासून केली. ते राहत होते सोलापूरला. (अर्थात मला हे सगळं नंतर बाईंनी सांगितलं.) त्या काळात त्यांनी ‘गुलाबाचं रहस्य’ अशी काहीतरी कादंबरी लिहिली. ती कादंबरी घडते मुंबईत. त्यासाठी त्यांनी काय केले असेल तर त्यांनी मुंबईचे नकाशे वगैरे जमवले आणि मग दादर लालबागपासून किती दूर आहे, व्हिक्टोरिया टर्मिनस कुठे आहे, असं करत त्यांनी ती अंतरं किती असतील, मग गाडीनं जायला किती वेळ लागेल असं करत ती कादंबरी लिहिली. आश्चर्य म्हणजे याच पद्धतीने जेम्स हॅडली चेसने ब्रिटनमध्ये राहून अमेरिकन गुन्हेगारी जगतावरच्या कादंबर्‍या लिहिल्या, त्या याच पद्धतीनं. नकाशा आणि एन्सायक्लोपीडिया जमवून!

 

तर विषय चालला होता राजकारणाच्या वाचनाचा. य. दि. आणि कुमार केतकर या दोघांनीही त्यांचे संग्रह मला दिले, ज्यात राजकीय पुस्तकांचा मोठा भरणा होता. शिवाय काही ना काही कारणामुळं राजकीय, सामाजिक अवस्था दाखवणारी पुस्तकं मी घेतोच. उदा. अलिकडे गोर्बाचेव – व्यक्तिचरित्र घेतले. मार्गारेट थॅचर यांचे चरित्र घेतले. किसिंजर यांचे चरित्र घेतले. जे ‘दा विन्ची’ यांचे चरित्र लिहिणारे अंडरसन यांनी लिहिलेले होते.

 

आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दलचे कुतूहल कायम आहे आणि त्यामुळेच एकेकाळी मी त्याचे विश्लेषण वाचण्यासाठी   इकॉनॉमिस्टचे अंक जमवले होते. त्यांची संख्या इतकी झाली की, एक दिवस आई घरी राहायला आल्यावर ते रद्दीत द्यायची वेळ आली. काळजीपूर्वक दर 4-5 आठवड्याने येणारा, दर महिन्याला येणारा इकॉनोमिक्स सर्व्हे काढून ठेवला होता. आजही ते सर्व माझ्याकडे आहेत. इस्लाम वरचा असो, टीव्हीवरचा असो, भारतावरचा असो माझ्याकडे सर्व्हे कायम आहेत. मात्र अंक रद्दीत दिले आणि चक्क 70-80 किलो रद्दी निघाली. जवळपास 8-10 वर्षे मी इकॉनॉमिस्ट जमवले होते. त्यातल्या राजकारण, वैज्ञानिक लेख, कथा कादंबर्‍यांचे परीक्षण, सिनेमावरचे लेख आणि सर्वात ग्रेट त्यांचे मृत्युलेख यांच्या वाचनामुळे मला वाटतयं की, माझा इंग्रजीशी चांगला परिचय तर झालाच आणि त्याचबरोबर लिहावे कसे हेही कळले.

 

आज मी निवडणुकांचे निकाल म्हणून वर्तमानपत्र घ्यायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की आता वर्तमानपत्र घेण्यासाठी झुंबड नाही. याचे कारण टीव्ही घराघरात पोहोचलाय. शिवाय मोबाईल आहेच आणि मग कालच सर्वांना निकाल माहीत झाले तरीही गिरीश कुबेर काय म्हणतात, खाडिलकर काय म्हणतात, पानवलकर काय म्हणतात,  याचे कुतूहल लोकांना आहेच. ही वर्तमानपत्राची जमेची बाजू आहे.

 

आज स्वत:हून राजकारणात काय चाललंय याची मी फार दखल घेत नाही. पण माझे सगळेच मित्र राजकारणात आहेत. आशिष शेलार असो की विनय सहस्रबुद्धे. यांच्यातून एक माहिती कळतच असते. पण कुठेतरी असं वाटतंय की, राजकारणी मंडळींचा मोठा तोटा म्हणजे त्यांना आपले सर्व आयुष्य त्याच्यात वेचावे लागते. परिणामी वाचन, सिनेमा, संगीत अशा अनेक गोष्टींना मुकावे लागते.

 

नंदू धनेश्वर यांनी मधू लिमये यांच्याबद्दल लिहिले होते की लिमये    यांना शास्त्रीय संगीतात खूप रस होता. ते एकदा नंदूला म्हणाले की, ‘बघ दोन गोष्टी माझ्या समोर आहेत पॉलिटिक्स     आणि एस्थेटिक्स. मी जर एस्थेटिक्सचा मार्ग धरला तर पॉलिटिक्स करता येणार नाही.’ परिणामी लिमयेंसारख्या माणसांनी राजकारण स्वीकारले आणि महाराष्ट्र आणि देश एका मोठ्या कलासमीक्षकाला मुकला. पण अर्थात लिमये यांनी राजकारणाच्यात लोकसभा गाजवली, हे विसरता येणार नाही.

 

आजच्या राजकारणातले लिमये कोण हे शोधावे लागेल. असं असलं तरी राजकारणावरची लोकांची पकड कायम आहे आणि लोकांना टीव्हीसमोर बसून अनेक राजकारणाची चव चाखायला आवडते, हे नक्की.

 

लेखक: शशिकांत सावंत
संपर्क: swatantranagrik@gmail.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *