दोन्ही मार्गांनी कैलास-मानस

वैशिष्ठ्यपूर्ण कैलास शिखर : कैलास शिखर हे हिमालयातल्या अन्य सर्व शिखरांपेक्षा संपूर्ण वेगळ्या रचनेचं आहे हे तर डोळ्यांना दिसतं. कैलास शिखर उपड्या ठेवलेल्या गंजासारखं उभट आणि वरून काहीसा गोलवा असलेलं आहे. शिवाय त्या पर्वताचा आकार आपण पुजतो त्या शंकराच्या पिंडीसारखा आहे. त्याच्या भोवती सर्व बाजूंनी मोकळी दरी आहे आणि त्या मोकळ्या दरीच्या बाहेरच्या बाजूला तटबंदी असल्यासारखी पुन्हा हिमालयीन पर्वतांची गोल रांग आहे. तटबंदी आणि शिखर यांच्या मधल्या दरीतून आपण परिक्रमा करतो. तटबंदीच्या रांगेतल्या कुठल्याही शिखराचा आकार वरून गोलाकार नाही. उलट हिमालयाच्या सर्वच शिखरांप्रमाणे सुईच्या टोकासारखी निमुळती होत जाणारी ती शिखरं आहेत. हे आपल्या पूर्वजांनी बरोबर हेरलं आणि मगच हे श्रद्धास्थान बनलं. माउंट एव्हरेस्टचं मूळ तिबेटी नाव आहे ‘चोमोलुंगमा’. याचा तिबेटी भाषेतला अर्थ होतो ‘जगाची देवता’. हे जगातलं सर्वांत उंच शिखर असल्याचा शोध म्हणे जर ब्रिटिश सर्व्हेयर जनरलनी लावला तर त्याच्या कैक शतकं आधीपासून हे नाव कसं पडलं? या गोष्टींचा विचार नक्कीच करावा लागेल.

 

तीन ठिकाणचं पवित्र पाणी आणलं : कैलास परिक्रमेत दोन्ही वर्षी विशेषत: डोलमा खिंड ओलांडताना संपूर्ण वेळ ढगाळ वातावरणच आम्ही अनुभवलं. गेल्या वर्षी डोलमा ओलांडताना बर्फवृष्टीतूनच चाललो होतो. यंदा मात्र  तिथे कणभरही बर्फ नव्हतं. या खिंडीच्या वाटेवर आम्हाला दोन्ही वर्षी कैलास शिखराचं दर्शन अजिबातच झालं नाही. डोलमा ओलांडल्याबरोबर खाली दिसतं गौरी कुंड. सुंदर अशा हिरवट निळ्या रंगाचं ते पाणी – ‘अ‍ॅक्वा मरीन’ असं ज्याच्या छटेला म्हणता येईल – ते लक्ष वेधून घेतं. बरंच खोलवर उतरत तिथे जावं लागणार असल्यानं यात्रेकरू तिथपर्यंत जात नाहीत. त्यांच्या घोडेवाल्यांना किंवा भारवाहकांना काही पैसे देऊ करून ते गौरी कुंडाचं पाणी आणवून घेतात. गेल्या वर्षीच्या यात्रेत मी असं तीन ठिकाणचं वेगवेगळं पाणी घेऊन आले होते. पहिलं होतं थेट कैलासवरून वाहत आलेलं ‘कैलासजीवन’, दुसरं होतं गौरी कुंडाचं पाणी आणि तिसरं होतं मानसरोवराचं पाणी. यंदा मात्र केवळ मानसरोवराचंच पाणी दोन बाटल्या भरून आणलं. काही यात्रेकरूंनी दहा- धरा लिटर सुद्धा पाणी भरून घेतलं होतं. नंतर ते आमच्या सामानाच्या ट्रकमध्ये ठेवलं असताना आमच्यातल्या एका बाईचं ते पाणी कोणीतरी चोरलं होतं. एका यात्रेकरूनी अशाच 2 लिटर पाण्याची एक बाटली विमानातल्या ‘केबिन  बॅगेज’मध्ये नेण्याचा प्रयत्न केला, तर बागडोगरा विमानतळावरच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी ते अडवलं. ते म्हणाले, थोडं  नेऊ देऊ, पण इतकं नेऊ देणार नाही. मग यांनी त्या अधिकार्‍यांना काकुळतीला येऊन विनंती केली की नेऊ देणार  नसलात तर तुम्ही तरी प्या, ते पाणी फेकून देऊ नका. पुढे त्यांनी त्याचं काय केलं कोणजाणे.गेल्या वर्षी आम्ही आधी कैलास परिक्रमा केली होती आणि नंतर मानसची परिक्रमा केली होती. यंदा मात्र हा क्रम उलटा होता. पण आधी कैलास परिक्रमा करून नंतर मानस काठावर राहणं हाच क्रम असणं आम्हाला आवडलं होतं.

 

 

धारचेन गावातून कैलासचं दक्षिण दर्शन : धारचेन हा आहे कैलास परिक्रमेचा ‘बेस कॅम्प’. धारचेन हे चांगलं मोठं गाव  आहे. धारचेनला पोचायच्या आधीच तुम्ही मानसरोवर आणि राक्षसतालच्या मधल्या वाटेवरून पुढे गेलेला असता. या गावातून कैलास शिखर दिसत असतं. तो असतो कैलास शिखराचा दक्षिणेचा मुखडा. या बाजूनं त्या पर्वताची, त्याच्यावरच्या कडेकपार्‍यांची अशी काही रचना आहे की पर्वतावर पडणार्‍या बर्फातून काही कपारी रिकाम्या राहतात, म्हणजे त्या जागेवर बर्फ पडत नाही. या सगळ्या रचनेतून त्या बाजूला कैलास पर्वतावर एका भव्य चेहर्‍याचा आकार उमटलेला दिसतो. अर्थातच त्याला शंकराचा चेहरा मानलं जातं. पण या बाजूनं दिसणारा हा शंकर सदैव रागावलेला वाटतो. सबंध धारचेन गावातून घरबसल्या रोज कैलास दर्शन होतं ही बाब आमच्यासारख्यांना खूप विलक्षण वाटली. पण तिथल्यांची अवस्था कदाचित ‘मलये रंध्रपुरंध्री चंदनतरुं काष्ठमिंधनं कुरुते’ अशी होत असावी. हे गाव बरंचसं ‘सीझनल’ गाव आहे. ऐन बर्फाच्या दिवसांत कदाचित हे रिकामंच होत असावं. इथलं आमचं मुक्कामाचं हॉटेल बरंच बरं होतं.

धारचेनहून सुमारे 20 किमी वर यमद्वार आहे. तिथपर्यंत बसनं जाता येतं. कैलास परिक्रमेला सुरुवात होते  यमद्वारपासून. यमद्वार हा एक छोट्या देवळासारखा घुमट आहे. तिबेटी लोकांची या आकाराची छोटी छोटी देवळं असतात, त्यांना ‘चोरटेन’ म्हणतात. तसंच दिसतं हे यमद्वार. त्यात तुम्ही एका बाजूनं डोक्यावची घंटा वाजवून आत जायचं आणि दुसर्‍या बाजूनं घंटा वाजवत बाहेर पडायचं असतं. असं केलंत की म्हणे चित्रगुप्त तुमच्या पापपुण्याचा हिशोब घालतो. दोन वर्षी परिक्रमा केल्यामुळे चित्रगुप्ताच्या दरबारात असं माझं internal audit आता दोनदा झालंय. ऋळपरश्र र्रीवळीं एकदाच होत असतं. Final audit शोधण्यात मात्र तुम्ही आयुष्य घालवता!

 

 

कैलासचं सर्वांत जवळून दर्शन : यमद्वारपासून कैलास परिक्रमेला सुरुवात झाली की पहिला पडाव असतो ‘डेराफुक’ नावाच्या ठिकाणी. या डेराफुकमध्ये कैलास शिखराच्या आपण सर्वांत जवळ पोचतो.ही येते उत्तरेची बाजू. तुमच्या मोबाईलमध्ये जर ‘इंटरनॅशनल रोमिंग कार्ड’ असेल तर ते इथेही चालतं. गेल्या वर्षी ते इथे चालत नव्हतं. पण या सर्वच परिसराचं खूप वेगानं बाजारीकरण होत असल्यानं एका वर्षात या जागेत खूपच फरक पडलेला आम्ही पाहिला. एक म्हणजे इथे मोबाईल टॉवर्स उभे राहिले. नवनवी अधिक आरामदायी हॉटेलं उभी राहिलेली बघितली. तरीही तिथली स्वच्छतागृहं भयानकच असणार. कारण या भागात अशा सगळ्या सुविधा दिल्या जाताहेत, त्यामुळे लोकही जास्त संख्येनं यायला लागलेले आहेत, पण ड्रेनेज सिस्टिमचा आणि कचर्‍याच्या विल्हेवाटीचा कोणताही विचार मात्र केलेला दिसत नाही. येणारे लोक भयानक कचरा निर्माण करतात, तो सर्वत्र विखुरलेला असतो. नवीनवी बांधकामं चालू असल्यानं कामगार तंबूंच्या वस्त्याही जागोजागी होत्या. प्लॅस्टिकचं साम्राज्य सगळीकडे होतं. आमची इथली  निवास व्यवस्था मात्र खूपच सुमार दर्जाची होती. पत्र्याच्या गळक्या शेडमध्ये लाकडी खाटा टाकलेल्या होत्या.  जाडजूड रजया आणि गाद्या-उशा मात्र सर्व मुक्कामांत दिल्या जातात. निसर्गधर्मासाठी ‘होल वावर इज अवर’ करायचीच वेळ येत होती आणि आम्हीही कैलास परिसरातल्या घाणीत नाईलाजानं भर घालत होतो.

 

चरणस्पर्शाचं भाग्य : डेराफुकहून कैलास शिखराच्या दिशेला अजून 6 किमी पर्यंत जवळ जाता येतं. त्या जागेला ‘चरणस्पर्श’ म्हणतात. इथे जायला घोडे मिळत नाहीत त्यामुळे मी गेले नव्हते. म्हणजे जिथे कैलास शिखराची ग्रॅनाईट दगडाची काळीभोर शिळा खालच्या उताराला स्पर्श करते अगदी त्या बेचक्यातल्या ठिकाणापर्यंत जायला मिळतं. प्रत्यक्षात त्या शिळेला आपला स्पर्श होऊच शकत नाही कारण वरून घसरून आलेल्या बर्फाच्या एका मोठ्या डोंगरानी त्या शिळेभोवती तटबंदी उभारलेली असते. तो बर्फ सुद्धा त्या शिळेपासून अंतर राखून उभा असतो आणि मध्ये मोठी खोल घळ निर्माण झालेली असते. पण त्या बर्फाच्या तटबंदीला आपला हात लागतो आणि तिथून कैलास शिखराचं मनोहारी भव्य दर्शन आणखी जवळून घेता येतं. यमद्वारपासून 12 किमी चालूनही ज्यांना पुढे पुन्हा हा 6 किमी चा आणि मुख्यत: चढ चढण्याची ताकद शिल्लक असते असे काही धट्टेकट्टे मोजकेच यात्रेकरू चरणस्पर्श करून येतात.

 

लेखक: सौ. पूर्णा धर्माधिकारी
संपर्क: swatantranagrik@gmail.com

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *