सौदी सरकार आणि खाशोगींचा खून

सौदी अरेबियाने तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल येथील स्वतःच्या वकिलातीत एका ज्येष्ठ पत्रकार जमाल खाशोगी यांचा निर्दयपणे खून केला. तेव्हापासून या मुस्लिम देशांतील संबंध कमालीचे तणावपूर्ण झालेले आहेत. या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे हे दोन्ही देश अमेरिकेचे मित्र आहेत व या भागातील राजकारणात अमेरिकेचे हितसंबंध जोपासण्याचे कार्य इमानेइतबारे करत असतात. आता मात्र त्यांच्यात प्रचंड ताण आहे.

 

जमाल खाशोगी (जन्म : 1958) हे सौदी अरेबियातील जेष्ठ पत्रकार होते. त्यांचे तेथील राजघराण्याशी उत्तम संबंध होते. अलिकडे मात्र त्यांनी तेथील राजपुत्र मोहम्मद बीन सलमान यांच्या विरोधात भरपूर लेखन केले. खाशोगी 2 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले होते. त्याकाळी ते इस्तंबूल येथे होते. ते तेथील सौदी अरेबियाच्या वकिलातीत गेले आणि बाहेर आलेच नाहीत. हा खून तसा चटकन चव्हाट्यावर आला नसता पण तुर्कस्ताने संधी साधली व यातील माहिती पत्रकारांना पोहोचवली. तेव्हापासून सौदी अरेबियाचे सरकार अडचणीत आलेले आहे.

 

खाशोगी सरकारच्या विरोधात करत असलेली टिका असहिष्णू असलेल्या सौदी अरेबियाच्या सरकारला पचत नव्हती. त्यांनी सौदी सरकार येमेनमध्ये करत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल सतत टीका केली होती. शेवटी खाशोगींच्या जीवालाच धोका निर्माण झाल्यामुळे त्यांनी सप्टेंबर 2017 मध्ये सौदीतून पलायन केले व अज्ञातवासात गेले. ते तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलमधील सौदीच्या वकिलातीत दोन ऑक्टोबरला गेल्यानंतर त्यांना कोणीही तेथून बाहेर पडताना पाहिले नाही. सुरुवातीला याबद्दल थोडी बोंबाबोंब झाली नंतर जेव्हा यातील गांभिर्य जाणवले तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढत गेला. सरतेशेवटी 15 ऑक्टोबर रोजी सौदीचे अधिकारी व तुर्की सरकारच्या अधिकार्‍यांनी दुतावासात तपास केला. अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला सौदी सरकारने या प्रकाराबद्दल कानावर हात ठेवले होते व खाशोगी वकिलातीतून जिवंत बाहेर पडले अशी भूमिका घेतली. नंतर मात्र 20 ऑक्टोबरला खाशोगीच्या वकिलातीत खून झाल्याचे मान्य केले. मात्र वकिलातीतील एका कर्मचार्‍याशी त्यांची वादावादी झाली व त्यात त्यांचा गळा दाबला गेला, असे जाहीर केले.

 

खाशोगींना वृत्तपत्र व्यवसायाचा गाढा अनुभव होता. ते 1985 सालापासून पत्रकारितेत होते. त्यांची राजकीय मते पुरोगामी विचारांच्या जवळ जाणारी होती. त्यांनी एप्रिल 2018 मध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटले होते की सौदी सरकारने 1979 सालापूर्वी जी धोरणे होती ती पुन्हा अंगीकारावी. 1979 सालच्या पूर्वीचा सौदी अरेबिया आजच्या इतका धार्मिक पातळीवर कर्मठ नव्हता. आजचा सौदी अरेबिया वहाबी इस्लामचा प्रचार होण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. आज सौदी अरेबिया येमेनसारख्या शियापंथीय देशावर अमानुष बॉम्बहल्ले करत आहे. असे हल्ले खाशोगींना मान्य नव्हते. त्यांच्या मते सौदी अरेबियाने तुर्कस्तानप्रमाणे इस्लाम व निधर्मी शासनव्यवस्था यांचा मेळ घालावा.

 

 

 

खाशोगींनी सौदी सरकारच्या कतारबद्दल धोरणांवरसुद्धा टीका केली होती. याप्रकारे आपल्या सरकारने दुसर्‍या देशाची नाकेबंदी करण्याची गरज नाही असे त्यांचे म्हणणे होते. याचा अर्थ ते सरकारच्या सर्व धोरणांवर आंधळेपणाने टीका करत नव्हते. राजपुत्र मोहम्मद बीन सलमान यांनी स्त्रियांना कार चालवण्याचा परवाना देणार्‍या धोरणाला पाठिंबा दिला होता. काही अभ्यासकांच्या मते खाशोगी एक पत्रकार म्हणून विकसित होत गेले. सुरुवातीला तरूणपणी ते धर्मांध शक्तींची भलावण करत असत. नंतर मात्र त्यांनी पुरोगामी विचारांची कास धरली व धर्म व राजकारण यांची फारकत असावी, अशी मांडणी करायला सुरुवात केली. याच भूमिकेतून त्यांनी सौदीच्या सरकारवरच नव्हे तर इजिप्तच्या सरकारवरसुद्धा टीका केली होती. इजिप्तच्या अल्सीसी सरकारने सुमारे 60 हजार लोकांना तुरुंगात टाकले. खाशोगींनी यावर कोरडे ओढले होते. याच भूमिकेतून त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनासुद्धा धारेवर धरले होते. सतत लोकशाही मूल्यांचा जप करणार्‍या ओबामांनी इजिप्तमधील लोकशाही शक्तींना मदत केली नाही की पाठिंबा दिला नाही. मोर्सी यांनी इजिप्तमधील सरकारच्या विरोधात जेव्हा लष्करी बंड केले तेव्हा ओबामांनी या घटनेचा निषेध करायला हवा होता, असे खाशोगींचे म्हणणे होते. असे असले तरी त्यांच्या भूमिकेत व लेखनात ‘राजकीय इस्लाम’ मान्य असणारा एक पत्रकार दडलेला होता हे नाकारता येनाही. खाशोगी त्याच्या तरुणपणी इजिप्तमधील धार्मिक व पुराणमतवादी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहूड’ च्या संपर्कात होता. नंतर जरी तो या संघटनेपासून दूर गेला तरी या संघटनेबद्दल त्याच्या मनात सहानुभूती होती. आज सांगितले तर जरा थोडा धक्का बसेल पण 1980 व 1990 च्या दशकात खाशोगी कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बीन लादेनच्या संपर्कात होता. तेव्हा लादेनसारखे अनेक मुजाहिद्दीन अफगाणिस्तानात घुसलेल्या सोव्हियत युनियनशी लढत होते. त्यांना खाशोगीची सहानुभूती होती. ‘9/11’ च्या घटनेनंतर खाशोगीने ओसामाशी मैत्री तोडली.

 

खाशोगी 2003 साली सौदी अरेबियातील वृत्तपत्र ‘अल वतन’ चा संपादक झाला पण संस्थापक इब्न तैमैय्या (1263-1328) वर टीका करणारा लेख छापला होता. एप्रिल 2007 मध्ये ते पुन्हा ‘अल वतन’ चे संपादक झाले आणि मे 2010 मध्ये त्यांची पुन्हा हकालपट्टी झाली. जून 2017 मध्ये तो अमेरिकेत गेला व तेथील प्रतिष्ठित वृत्तपत्रांत स्तंभलेखन करू लागला. त्याने 2018 साली ‘डेमोक्रॅसी फॉर द अरब वर्ल्ड नाऊ’ या नावाचा पक्ष स्थापन केला. आता त्याच्या खुनाने सौदी अरेबियातील राजघराणे हादरले आहे. राजपुत्र सलमान यांनी घोषणा केली आहे की ते कोणत्याही परिस्थितीत खुन्यांना पकडल्याशिवाय राहणार नाहीत. एवढेच नव्हे तर हा खून उघडकीस आल्यानंतर सौदी सरकारने पाच उच्चपदस्थ अधिकार्‍यांना बडतर्फ केले आहे.

 

खाशोगी सौदी अरेबियाचे नागरिक असून आजपर्यंत त्यांचे दोन विवाह व दोन घटस्फोट झालेले आहेत. आता ते एका तुर्की अभ्यासकाच्या प्रेमात होते व त्यांना तिच्याशी लग्न करावयाचे होते. त्या संदर्भातील काही कागदपत्रे घेण्यासाठी ते दोन ऑक्टोबर 2018 रोजी इस्तंबूलमधील सौदी वकिलातीत गेले होते. पण परत आले नाहीत. या घटनेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटत आहेत.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तर या खुनामागे राजपुत्र सलमान आहेत असा थेट आरोप केला आहे. अमेरिका व इंग्लंडने अनेक सौदी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. जर्मनीच्या चान्सेलर मर्केल यांनी तर भविष्यात आम्ही सौदी कोणताच व्यवहार करणार नाही असे घोषित केले आहे.या प्रकारे एका बाजूने सौदी अरेबियावर प्रतिकुल टीकेचा वर्षाव होत असतानाच इराणने या खूनात अमेरिकेचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी म्हणाले की आज कोणत्याही देशाची असे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही जर त्या देशाला अमेरिकेचा पाठिंबा नसेल तर.

 

ज्या खाशोगीचा खून झाला आहे त्याच्या खूनामुळे आजचे जागतिक राजकारण ढवळून निघाले आहे. अशा हीन कृत्यांबद्दल सौदी अरेबियाचे राजपुत्र सलमान यांना दोषी ठरवण्यात येत आहे. यातून त्यांची ‘राजपुत्र’ या पदावरून उचलबांगडी झाली तर आश्चर्य वाटायला नको. तुर्कस्तान तर या प्रकरणाचा वापर करून जमेल तेवढी सौदीची बदनामी करत आहे. याद्वारे तुर्कस्तानला जगाला दाखवून द्यायचे आहे की या भागातला सुन्नीबहुल देश म्हणजे तुर्कस्तान होय.

 

अभ्यासक असे दाखवून देतात की सौदी अरेबियाची राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्याची ही जुनी पद्धत आहे. याप्रकारे विरोधकांना इतर देशांत असलेल्या आपल्या वकिलातीत बोलावून घ्यायचे व मग त्यांना जिवंत बाहेर पडू द्यायचे नाही. असे प्रकार या आधीसुद्धा झालेले आहेत. मात्र जेवढी प्रसिद्धी खाशोगी प्रकरणाला मिळाली आहे व अजूनही मिळत आहे तेवढी प्रसिद्धी इतर विरोधकांना मिळाली नव्हती.

 

या प्रकारे राजकीय विरोधकांना कायमचे संपवणे म्हणजे जंगलीपणाचा कळस आहे. लोकशाही नसलेल्या देशांत असे प्रकार सर्रास घडत असतात. लोकशाही शासनव्यवस्थेत असे प्रकार अगदी तुरळक असतात. केवळ आपल्यावर, आपल्या धोरणांवर टीका केली म्हणून एखाद्या पत्रकाराचा अनन्वित छळ करून नंतर त्याला मारून टाकायचे असे प्रकार आधुनिक जगतात घडत नाहीत. पण सौदी अरेबियासारखे देश असे प्रकार घडवून आणतात. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.

 

लेखक: अविनाश कोल्हे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

One thought on “सौदी सरकार आणि खाशोगींचा खून

  • November 19, 2018 at 8:03 pm
    Permalink

    Sir, varil lekhatil mahiti uttam ahe. Parantu likhanat Khashoggi yanchyabaddal kadhi ekeri tar kadhi adararthi ullekh ahe. Tyamule Khashogginbaddal adar balagaycha ki ek tirhait mhanun ekeri blayche he samjat nahi. Krupaya yachi dakhal ghyavi.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *