सीआय्ए, ट्रम्प आणि एमबीएस्

2 ऑक्टोबर : जमाल खाशोगी यांनी त्यांच्या होणाऱ्या पत्नीला बाहेर वाट बघत उभे राहायला सांगून इस्तंबूलमधील सौदी दूतावासात प्रवेश केला. दहा तास झाले तरी ते बाहेर आले नाहीत. म्हणून त्यांचा शोध सुरू झाला. दोन आठवडे सलग सौदी अरेबियाने खाशोगी यांच्याबाबत काहीही माहीत असल्याचा इन्कार केला. आणि अचानक 20 ऑक्टोबर रोजी अधिकृत सौदी वृत्तवाहिनीने दूतावासात झालेल्या भांडणात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून सुरू असलेल्या खाशोगी यांच्या हत्येच्या तपासात अनेक गोष्टी आतापर्यंत घडल्या आहेत. अनेक बाह्य पात्रांचा यात संबंध आहे आणि या गोंधळाचा फायदा उचलायलाही काही घटक टपून बसले आहेत. ही एकूण परिस्थिती समजून घेऊया या लेखात.

 

यासंबंधी नुकत्या घडलेल्या काही घडामोडी

अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआय्एने सौदी राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी खाशोगी यांना मारण्याचे आदेश दिले होते, असा शोध लावल्याची माहिती संस्थेच्या खात्रीशीर सूत्रांकडून अमेरिकी वाहिन्यांना मिळाली आहे. सौदी अरेबियाने हे आरोप नाकारत, खाशोगी यांची हत्या सौदी गुप्तहेर खात्यातील काही अधिकाऱ्यांनी आखलेल्या ‘दुष्ट योजनेअंतर्गत’ झाली असल्याचे सांगितले. सौदी अरेबियाने यासंबंधित 18 व्यक्तींना अटक केली आहे. डेप्युटी इंटेलिजन्स चीफ अहमद अल असिरी आणि राजपुत्र एम्बीएस् (मोहम्मद बिन सलमान) यांचे वरिष्ठ सल्लागार सौद अल कहतानी यांना पदावरून काढून टाकले. तुर्कस्तानने या दरम्यान त्यांच्या शोधातून निष्पन्न झालेली 2 ऑक्टोबर रोजी दूतावासात घडलेल्या हत्येची ‘ऑडिओ टेप’ अमेरिका, सौदी अरेबिया, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी यांना सुपूर्द केली. ट्रम्प यांनी मात्र सौदी अरेबिया आणि एम्बीएस् यांना अमेरिकेचा पाठिंबा कायम राहील असे आश्वासन दिले आहे. सीआय्एचे निष्कर्ष पूर्णतः बरोबर नाहीत असे त्यांनी सांगितले आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा असलेले आवाजाचे रेकॉर्डिंग ऐकण्यास त्यांनी नकार दिला.

 

जमाल खाशोगी कोण होते?

वरिष्ठ पत्रकार असलेले जमाल खाशोगी हे पूर्वी सौदी अरेबियाचे पत्रकार होते. रशियाचे अफगाणिस्तानातील अतिक्रमण, ओसामा बिन लादेन अशा महत्त्वाच्या घडामोडींसंबंधी त्यांनी पत्रकारिता केली होती. त्यांचे राजघराण्याशी जवळचे संबंध होते आणि ते राजाचे सल्लागार म्हणून देखील काम करत. 2017 मध्ये एम्बीएस् यांना राजपुत्र म्हणून नेमल्यानंतर त्यांनी सौदी अरेबिया सोडून अमेरिकेत आश्रय घेतला. त्यांच्या मते राजपुत्र सलमान यांना ते आणि इतर स्वतंत्ररीत्या काम करणार्‍या व्यक्ती पटत नव्हत्या. नंतर त्यांनी वॉशिंग्टन पोस्टसाठी पत्रकारिता सुरू केली. इस्तंबूलमधील दूतावासात वैयक्तिक कागदपत्रांच्या कामासाठी गेले असता त्यांची हत्या करण्यात आली.

 

सौदी अरेबियाने याबाबत आतापर्यंत काय कारवाई केली?

आतापर्यंत हत्येसंबंधित 21 लोकांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकाऱ्याकडून हत्येचे आदेश आल्याचा निष्कर्ष सौदी तपासात पुढे आल्याने मंत्रिमंडळाच्या पातळीची समिती इंटेलिजन्स सर्व्हिसेसची पाहणी आणि पुनर्रचना करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री अदेल अल जुबेइर यांनी खाशोगी यांच्या मृत्यूला ‘हत्या’ असे संबोधून ही खूप मोठी चूक होती असे फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीला सांगितले. 15 नोव्हेंबर रोजी सरकारी वकिलाने (पब्लिक प्रॉसिक्यूटर) खाशोगी यांना सुरुवातीला झालेल्या झटापटीनंतर जीवघेणी लस देण्यात आली आणि त्यांच्या शरीराची गुप्तपणे विल्हेवाट लावण्यात आली अशी माहिती दिली. या सर्व प्रकारात राजपुत्र एम्बीएस् यांचा काहीही संबंध नसल्याचे मात्र सौदी अरेबियाने पुन्हा स्पष्ट केले. सौदी राजा सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांनी खाशोगी हत्येचे नाव न घेता सौदी अरेबियाच्या न्यायव्यवस्थेचे कौतुक केले. खाशोगी यांच्या हत्येनंतर सौदी राजाचे हे पहिलेच सार्वजनिक संबोधन होते. त्यांनी मोहम्मद बिन सलमान यांना पूर्णतः पाठिंबा दिला आहे.

 

तुर्कस्तानचे आरोप काय आहेत?

ही हत्या पूर्वनियोजित असल्याचे आरोप तुर्कस्तानने सौदी अरेबियावर लावले आहेत. हत्येच्या काही दिवसांपूर्वी या कटात सहभागी असलेले 15 सदस्य तुर्कस्तानमध्ये आले. इस्तंबूलमधील दूतावासातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काढून घेण्यात आले होते. हत्येच्या वेळी गुप्तपणे रेकॉर्ड करण्यात आलेला ऑडिओ देखील तुर्कस्तानने अमेरिका, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन यांना पाठवला आहे.

 

ट्रम्प यांचे सौदी प्रेम

खाशोगी बेपत्ता झाल्यावर आंतरराष्ट्रीय दबावामुळे अमेरिकेने सौदी अरेबियाला याबाबत तपास करण्यास सांगितले होते. परंतु आता या सर्व प्रकरणात राजपुत्र एम्बीएस् यांच्यावर दोष येत असताना ट्रम्प मात्र त्यास गंभीरतेने घेत नाहीत. राजपुत्र एम्बीएस् यांनी खशोगी यांना मारण्याचे आदेश दिले होते काय असे विचारले असता खांदे उडवीत, दिले असतील किंवा दिले नसतीलही.. असे उत्तर ट्रम्प यांनी दिले. तुर्कस्तानने दिलेल्या ऑडिओ टेप अत्यंत क्रूर असल्याने त्यांनी ऐकण्यास नकार दिला. त्यात काय घडले आहे ते मला माहीत आहे असे ते म्हणाले. याउपर  ‘‘अमेरिका सौदी अरेबियाचा व्यापारातील महत्त्वाचा भागीदार म्हणून कायम राहिल. यात अमेरिका, इस्रायल आणि इतर भागीदार देशांचे हित आहे’’ असे ते म्हणाले.

 

ट्रम्प सौदी अरेबियाला पाठीशी का घालत आहेत?

सौदी अरेबिया आणि इस्रायल हे दोन देश अमेरिकेच्या मध्य आशिया धोरणातील महत्त्वाचे भागीदार आहेत. तसेच अमेरिका आणि सौदी अरेबियामधील व्यापार अमेरिकेला फायदेशीर आहे. 2017 साली अमेरिका- सौदी अरेबियामधील व्यापार 46 अब्ज डॉलर्स एवढा होता. त्यात अमेरिकेला 5 अब्ज डॉलर्सचा अधिशेष प्राप्त झाला. अमेरिकेच्या वित्त विभागानुसार 2015 साली सौदी अरेबियासोबत केलेल्या व्यापारामुळे अमेरिकेत 1,65,000 नोकरीच्या संधी उत्पन्न झाल्या. मध्य आशियात इराणला एकटे पाडण्यातला अमेरिकेचा महत्त्वाचा साथीदार सौदी अरेबिया आहे. सीरियातील असद सरकारला सौदी अरेबियाचा विरोध आहे तर इराण आणि रशिया यांचा पाठिंबा. त्यामुळे या प्रदेशात इराणला टक्कर देण्यासाठी सौदी अरेबिया अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे. सौदी अरेबियाचे सैन्याचे बजेट जगात तिसर्‍या क्रमांकाचे आहे. अमेरिकेसोबत सौदी अरेबियाच्या सर्वात जास्त सरंक्षण करार आहेत. 110 अब्ज डॉलर्सचे करार सौदी अरेबिया आणि अमेरिके दरम्यान झालेले आहेत. ते पुढील दहा वर्षांत 350 अब्ज डॉलर्स पार करतील असा अंदाज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तेल. इराणच्या तेलावर निर्बंध आणल्यामुळे आधीपासून तेलसंपन्न  असलेल्या या देशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ओपेक या संस्थेच्या अनुसार सौदी अरेबिया जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. पृथ्वीवरील तेल साठ्यांपैकी 18% तेलसाठे सौदी अरेबियात आहेत. त्यामुळे सौदी अरेबियाने तेलाच्या किंमती वाढविल्या किंवा अमेरिकेने जरी निर्बंध आणायचा विचार केला तर जगाच्या अर्थव्यवस्थेला हादरे बसतील.

 

अहमद बिन अब्दुल अझीझ – एमबीएस  पर्याय?

पदावर आल्यापासून मोहम्मद बिन सलमान यांनी अनेक सुधारणावादी निर्णय घेतले असले, तरी ते विरोधकांना अजिबात सहन करत नाहीत, असा त्यांच्यावर आरोप आहे. अल सौद परिवारातील अनेक ताकदवर परिवारांना आणि अनेक राजपुत्रांना एम्बीएस् राजपुत्र म्हणून नको आहे असे रॉयटर्स वृत्तसंस्थेला शाही दरबाराशी जवळीक असलेल्या तीन सूत्रांकडून समजले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यानुसार अनेकांना एम्बीएस्च्या ऐवजी त्यांचे सख्खे भाऊ असलेले अहमद बिन अब्दुल अझीझ यांनी राजा व्हावे असे वाटते. 82 वर्षीय राजा सलमान जिवंत असेपर्यंत ते याबाबत काही कृती करू शकत नाहीत, असे या सूत्रांनी सांगितले.

2017 साली मोहम्मद बिन सलमान यांना राजपुत्र म्हणून घोषित करण्याला अब्दुलअझीझ यांनी विरोध केला होता. सौदी अरेबियामध्ये राजानंतर मोठ्या मुलाकडे राज्य येत नाही तर, राजा त्याच्या मुलांमधून राज्यकारभार चालवण्यास सर्वात समर्थ असलेल्या व्यक्तीस राजा म्हणून निवडतो. अमेरिकेतील काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी देखील ते अहमद बिन अब्दुल अझीझ यांना पाठिंबा देतील असे संकेत दिले आहेत. त्यामुळे एकूणच या खाशोगी प्रकरणामुळे सौदी राजपरिवारात देखील मोठी खळबळ माजू शकते अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.

 

लेखक: वैभवी घरोटे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *