सिंधू संस्कृतीचे पतन

सिंधू आणि सरस्वती नदीच्या काठावर मानवाला ज्ञात असलेल्या भारतातील सर्वात प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. सिंधू संस्कृती साधारणतः इ.पू. 3500 ते इ.पू. 1300 ह्या काळात अस्तित्वात होती. विकसित कृषिक्षेत्र, जागतिक व्यापार आणि उत्तम प्रशासित, व्यवस्थापित शहरे ही सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, बंद गटारे, स्वच्छतागृहे यांच्यात हायड्रॉलिक इंजिनिअरिंगचा वापर सुद्धा सिंधू संस्कृतीत आढळतो.

 

ह्या अतिप्राचीन संस्कृतीचे पतन कसे झाले याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. वूड्स् होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूटने नुकत्याच केलेल्या नवीन अभ्यासानुसार सिंधू संस्कृतीचे पतन कसे व का झाले? ह्या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. सिंधू संस्कृतीची मुख्य वैशिष्ट्ये, तिच्या पतनाचे विविध सिद्धांत, त्या सिद्धांताचे आपल्या आजच्या जीवनावर परिणाम आणि हा संशोधनांती नव्याने मांडण्यात आलेला अभ्यास याची माहिती आपण ह्या लेखात करून घेणार आहोत.

 

सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये :

प्राचीन काळात देखील सिंधू संस्कृतीतील व्यापारी इजिप्त, मेसोपोटेमिया संस्कृतीतील लोकांशी व्यापार करत असत. राखीगढी, मोहनजोदारो, हडप्पा  यांच्यासारखी मोठी शहरे ह्या लोकांनी उभी केली होती. गुजरातमधील लोथल हे तर सिंधू संस्कृतीतील बंदराचे आणि स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. सिंधू संस्कृतीतील शहरांच्या कारभारासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा ही होती. दुमजली-तीनमजली घरे ह्या लोकांनी त्या काळात उभी केल्याचे पुरावे आढळतात. सिंधू संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या शहर आणि गावांमध्ये आढळणारी कडक शिस्त. शहराचा विस्तार, त्यातील किल्ला/मुख्य वास्तू (Citadel), निवासस्थाने, बाजार, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था याचे अत्यंत सूक्ष्म नियोजन सिंधू संस्कृतीत आढळून येते. सिंधूतील लोकांना लिखाणाची कला ही अवगत होती. आत्तापर्यंत जगात प्रा. एस्. आर्. राव सोडून कोणीही सिंधू संस्कृतीच्या भाषेची लिपी समजल्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे सिंधू संस्कृती बद्दल अजून बर्‍याच गोष्टी रहस्यच आहेत.

 

सिंधू संस्कृतीच्या पतनाचे सिद्धांत :

सिंधू संस्कृतीच्या पतनाचा भारतीयांना ब्रिटिश आणि त्यानंतर बर्‍याच भारतीयांकडूनच सांगण्यात आलेला सिद्धांत म्हणजे आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. मॅक्स म्यूलर आणि मॉर्टिमन व्हीलर यांनी हा सिद्धांत मांडला. यात ते म्हणतात, इ. पू. 1500 मध्ये भारतावर तुर्कस्तान, बाल्कनमधील आर्यांनी आक्रमण केले आणि मूळच्या सिंधूच्या रहिवाश्यांना तिथून हाकलून लावले. भारताचे हे मूळ रहिवासी म्हणजे सध्याचे दक्षिण भारतीय लोक. अर्थातच हा सिद्धांत ब्रिटिशांच्या  ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीचा भाग होता. हा सिद्धांत संपूर्णपणे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनावर व पुराव्यांपेक्षा जास्त अंदाजांवर आधारित होता. तरीही भारतीय डाव्या इतिहासकारांनी हा सिद्धांत राष्ट्रीयत्वाला दुर्बल करणारा आणि त्यांच्या विचारसरणीला पोषक असणारा असल्यामुळे देशाच्या माथी मारला. पण जसजशी विज्ञानात प्रगती होत गेली तसतसे या सिद्धांतामधल्या त्रुटी लक्षात येऊ लागल्या आणि भारतातील काही डाव्यांनी देखील आर्यांनी आक्रमण केले नव्हते तर स्थलांतर केले होते! अशी ‘गिरे तो भी टांग उपर’ भूमिका घेतली. सिंधू संस्कृतीच्या पतनाला सिंधू नदीचा बदलेला प्रवाह, वातावरणातील मूलभूत बदल, त्याकाळी वाढलेली लोकसंख्या आणि त्यामुळे नैसर्गिक साधनांवर पडलेला ताण इत्यादी पर्यावरणीय कारणे विज्ञान सुचवते. अशाच एका कारणाचा अभ्यास अमेरिकेतील वूड्स् होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशनचे सदस्य लिव्हिऊ जिउसन आणि त्यांच्या वैज्ञानिकांच्या तुकडीने नुकताच पूर्ण केला आहे.

 

लिव्हिऊ जिउसन यांनी मांडलेला सिद्धांत :

सिंधू संस्कृतीचे पतन मुख्यतः पर्यावरणीय कारणांमुळे झाले आहे, असे हा सिद्धांत सांगतो. वातावरणातील बदलांमुळे आणि अनियमित पावसाळ्यामुळे सिंधूच्या खोऱ्यातील खरीप आणि रब्बी पिकांवर परिणाम झाला. त्यामुळे कृषिक्षेत्रावर हानीकारक परिणाम झाला आणि लोकांनी स्थलांतर सुरू केले, असे हा सिद्धांत सुचवतो. समुद्राच्या खाली खोलवर असलेल्या अवशेषांचा आणि मातीचा अभ्यास करून वैज्ञानिकांनी हा सिद्धांत मांडला आहे.

 

समुद्रात खोलवर ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते म्हणून ह्या अवशेषांवर आणि मातीवर कमीतकमी प्रक्रिया होते. अशा निसर्गानेच संवर्धन करून ठेवलेल्या अवशेषांचा अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांनी हा सिद्धांत मांडला आहे. ह्याच वैज्ञानिकांच्या तुकडीने 2012 मध्ये हेही सिद्ध करून दाखवले होते की सिंधू नदीला येणारे पूर इ. पू. 3200 पासून अनियमित झाले होते. ह्याच वेळेला सरस्वती नदीतील पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे सिंधू संस्कृतीचा पाया असलेले कृषिक्षेत्रच खचले. ह्या वातावरणातील बदलाला Early Neological Anomalies असे संबोधले जाते. ह्या बदललेल्या वातावरणामुळे लोकांनी पूर्वेकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केल्याचे हा सिद्धांत म्हणतो.

 

ह्या विषयाची अधिक माहिती करून घेण्यासाठी पुढील पुस्तके मार्गदर्शक ठरतील.

 

Books Author
The Aryan Invasion : Reappraisal Shrikant G. Talageri
The Rigveda : A Historical Analysis   
The Saraswati Flows on B. B. Lal
The Rigvedic People  

 

 

लेखक: सौरभ तोरवणे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *