महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती वाढवणारे त्रिदल

नुकतीच दिवाळी साजरी झाली. दिवाळी म्हणजे मांगल्याचा, पावित्र्याचा, आनंदाचा, समृद्धीच्या मार्गानं जाण्यासाठी परस्परांना शुभेच्छा देण्याचा, एकमेकांसाठी काही केले पाहिजे असा संदेश कृतीत आणणारा आपला भारतीय सण. अशा सणांच्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला आपल्या पूर्वजांनी जोपासलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधायची संधी मिळते, इच्छा होते. त्यातलं कालानुरूप जे सुसंगत आहे ते स्वीकारावं, अंगिकारावं, उणेपणासह जे पुढं आलं आहे ते विचारांची कानस लावून घासून घ्यावं आणि हे सारं पाखडताना जे दोषयुक्त दिसत असेल ते बाजूला ठेवावं हा समंजसपणाही आपल्यातल्या ‘माणूस’पणाची खूण पटवून देणारा.

 

तरीही माणदेशातल्या एका कुमारवयातील गजाननाला प्रश्‍न पडतो,

दगडाच्या देवा, दह्याच्या घागरी

अस्पृश्याच्या घरी, पाणी नाही

पाळीव पोपट, गोड फळे त्याला

आणि अस्पृश्याला कदान्न का?

 

हा प्रश्‍न तो समाजाला करतो. उत्तरं शोधण्याच्या आणि पुढच्या आयुष्यातील वनवास सोसण्याच्या या मुलाच्या अंगभूत सहनशीलतेुळं मराठी साहित्यसृष्टीत एक वेगळंच ‘‘रामायण’’ घडलं. गीतरामायण साकारणार्‍या अण्णा तथा ग. दि. माडगूळकर यांच्या आयुष्याचं रामायणही असंच आपल्या सर्वांना अचंबित करणारं, ललामभूत ठरणारं!

 

माडगूळकरांच्या या कर्तृत्वासंबंधी अत्यंत कौतुकभरल्या शब्दांत त्यांचे स्नेही पु. ल. देशपांडे लिहितात, ‘‘माडगूळकरांनी गेल्या दोन-अडीच तपात महाराष्ट्राला पसापसा भरून साहित्यधन दिले. साहित्याच्या सर्व क्षेत्रांत यशस्वी रीतीने संचार केला. आजही चालू आहे. अगदी काल लिहिलेल्या गीताला नव्हाळीचा तजेला आहे. व्यक्तीचित्रे लिहिली. कथा लिहिल्या. कादंबर्‍या लिहिल्या. नाटके लिहिली. शेकडो पटकथा लिहिल्या आणि अक्षरशः हजारो गाणी लिहिली. अभिनय केला. नकला केल्या. कथाकथन केले. भाषणे केली. महाराष्ट्र शारदेचा मंडप भान हरपून नाचून गाऊन जागता ठेवला. यशाचे अनेक तुरे मंदिलात खोचून हा शाहीर सभारंगणी तसाच रंगून उभा आहे. त्यांच्या फडातला फडकरी होण्याचे भाग्य मला लाभले. कुठे माडगुळे आणि कुठे मुंबई. माडगूळकरांच्या मैफिलीत सांजेचे तांबडे मावळण्यापासून ते सकाळचे तांबडे फुटण्यापर्यंत मीही गोंधळ घातला.’’’’

 

गदिमांचं सारं आयुष्यच तसं खडतर. निदान सुरुवातीची अनेक वर्षं तरी अत्यंत दारिद्र्यात काढावी लागली. त्यांनी प्रचंड हाल सोसले. ‘गदिमां’’च्या या सोशिकतेलाच साजेशी अशी सोशिकता लाभलेला, दु:ख, दैन्य-दारिद्र्याशीच प्रपंच मांडणारा त्यांचा साथीदार म्हणजे बाबूजी तथा सुधीर फडके! आयुष्यातल्या रोजच्या नव्या दिवशी नवा संघर्ष सोसणार्‍या या माणसानं मात्र स्वत:च्या कंठातून सूर आळवले ते राष्ट्रहिताचे, समाजहिताचेच. गदिमांच्या रामायणी शब्दांना आपल्या कलाश्रीमंत सुरांनी अजरामर करणार्‍या बाबूजींनी गोड गळ्याच्या गायक-वादक संगीतकार या भूमिकेसह आपल्या आयुष्यातल्या अनेक विसंगत ‘‘रागां’’शी गट्टी जमवली. देशवासियांचे दु:ख-दैन्य दूर करण्यासाठी, आपल्याच काही समाजबांधवांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर भारतातल्या प्रत्येक मांगल्यपूर्ण क्षणांसाठी सर्वस्व अर्पण करणारे गदिमा आणि बाबूजी हे दोन अनोखे देशभक्त.

 

त्यांच्याच देशभक्तीची जातकुळी लाभलेला आणि सृष्टीतत्त्वाचा शोध घेतानाच, ‘‘जीवनाला तसा अर्थ नसतो, तो द्यायचा असतो. तो कसा? दुसर्‍यासाठी जगून त्यांना सुख द्यायचे असते, मानवी जीवनाचे खरे श्रेय त्यात आहे.’’’’ असं म्हणत आयुष्यभर आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांच्या चेहर्‍यावर हसू फुलवणारं याच दोघांच्या मालिकेत शोभून दिसणारं अनोखं व्यक्तिमत्त्व म्हणजे भाई तथा पु. ल. देशपांडे!

 

खरं तर गदिमा, बाबूजी आणि पुल हे तिघेही भिन्न राजकीय विचारसरणीशी बांधिलकी असलेले. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनची गदिमांची तत्कालीन काँग्रेसच्या विचारांशी असलेली बांधिलकी आणि मराठी साहित्य-चित्रपटसृष्टीतील त्यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेचं सन्माननीय सदस्यत्व दिलं. त्या अर्थानं गदिमा काँग्रेसचे. पण त्यांनी लिहिलेल्या गीतरामायणाला सर्वच थरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गदिमांचं गीतरामायण जसं काँग्रेसेतर रामभक्तांना खुपलं नाही तसंच काँग्रेसलाही त्याचं काही वावडं वाटलं नाही. राजकीय पक्षांमध्ये ‘‘रामा’’ची वाटणी होण्यापूर्वीचा तो काळ होता, म्हणून असावं कदाचित.

 

गदिमांचा आणि यशवंतरावांचा स्नेह उभ्या महाराष्ट्राला ठाऊक होता. मा. विनायकांना पत्र देऊन गदिमांना खर्‍या अर्थाने चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी सहाय्य करणार्‍या आचार्य अत्रे यांनाही या दोघांचा स्नेह ठाऊक होताच की! पण पुढं त्याबाबत एक गंमत झाली. एकदा यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई आणि गदिमा यांचे एकत्रित छायाचित्र एका छायाचित्रकाराने काढले आणि हे तिघे एकत्र बसलेले असताना त्यांना नजर केले. ते पाहून बाळासाहेब देसाई उद्गारले,  ‘‘तीन राजकारणी!’’’’

‘‘छेऽऽ !’’’’ यशवंतराव नकारार्थी मान हलवून म्हणाले, ‘‘दोन राजकारणी आणि एक सज्जन माणूस!’’’’

 

गदिमांची आणि यशवंतरावांची ही दोस्ती महाराष्ट्रात सगळ्यांना चांगलीच माहिती झाली होती. असंच एका निवडणुकीच्या वेळी गदिमांनी एक प्रचाराचं गीत लिहिलं,

आता काही समिती वाचत नाही,

डांग्या खोकला झाला गं बाई

 

त्या वेळी साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे नुकतेच संपूर्ण महाराष्ट्र समितीला येऊन मिळाले होते आणि समितीच्या वतीनं प्रचाराची तोफ डागण्याचं काम करीत होते साक्षात आचार्य अत्रे. ते मग थोडेच गप्प बसणार? एक दिवस गदिमांच्या कवनाला मराठ्यात एक सणसणीत उत्तर छापून आलं,

कर्‍हाडी दादल्यानं कान फुंकलं

अन्

माडगुळी रंगूचं पोट दुखलं

बाबूजी-सुधीर फडके हे तर कट्टर हिंदुत्ववादी. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी. त्यांच्या गदिमांशी असलेल्या अतूट स्नेहबंधांमध्ये कधीही ही विचारसरणीची कवाडं आड आली नाहीत. उलट सावरकरांनी आपलं कौतुक केल्याचं ऐकून गदिमांनी कृतज्ञताच व्यक्त केली होती. प्रचंड दारिद्र्यामध्ये बालपण घालवलेल्या बाबूजींनी पूर्व भारतातल्या राज्यांधील मुलांना आपल्या घरी ठेवून घेऊन त्यांचं स्वतःच्या मुलाप्रमाणं पालनपोषण केलं आणि राष्ट्रविचारांशी असलेली आपली सक्रिय निष्ठा अभंग ठेवली.

 

दैवतासमान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चित्रपट तयार करण्याचे ठरवले. अक्षरशः हे शिवधनुष्यच पेलण्यासारखे होते. त्यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले, अफाट हालअपेष्टा सोसल्या. क्वचितप्रसंगी अपमानही. पण अखेर त्यांनी तो चित्रपट साकारलाच. यामागील आपली भूमिका मांडताना बाबूजी लिहितात, सावरकर-सावरकर-सावरकर या एकाक्षरी मंत्रामागं केवढी शक्ती आहे याची कल्पना कुणाला येऊ नये, त्यांचा प्रभाव कुणावर पडू नये त्या प्रभावामुळं आजच्या आणि आजवर होऊ पहाणार्‍या सत्ताधार्‍यांच्या सत्तेला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सत्ताधार्‍यांनी आणि सत्तेसाठी धडपड करणार्‍या बहुतेक सार्‍या पक्षांनी, पुरोगामी निधर्मी म्हणवून घेणार्‍या व्यक्तींनी हा मंत्र कुणाला समजूच नये आणि सावरकर हे नाव समजायचं असेल तर ते प्रतिगामी, जातीय, माथेफिरू, देशद्रोही अशाच स्वरूपात समजावं असा प्रयत्न केला. पण आता परिस्थिती हळुहळू पालटत आहे. सत्य हळुहळू का होईना उजेडात यायचा प्रयत्न करीत आहे. या सत्याचा साक्षात्कार लवकरात लवकर सार्‍या समाजाला व्हावा म्हणून हा सारा प्रपंच.

 

आपल्या ध्येयासाठीच काम करीन अशा निश्‍चयानं समोर आलेली प्रचंड मानसन्मानाची संधी, देशाचं सर्वश्रेष्ठ धुरीणत्व मिळण्याची शक्यता हे सारं बाजूला सारून, प्रसंगी स्वतःची अमाप लोकप्रियता पणाला लावूनही समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठीच आयुष्य वेचणारे आणि त्यासाठी दारिद्र्य, अपमान, अपकीर्ती पत्करणारे, हिंदुराष्ट्राचं, हिंदुत्वाचं अमर तत्त्वज्ञान निग्रहानं शेवटच्या श्‍वासापर्यंत सांगत राहणारे आणि त्यासाठी आपल्या आयुष्याचा हो केलेले सावरकर आपल्यासमोर उभे करण्याचं आवश्यक कार्य या चित्रपटानं साधणार आहे.

 

कुणीतरी हे केलं पाहिजे ही भावना आपल्यापैकी अनेकांच्या मनात असेल. या कुणीतरीच्या रूपानं सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे आम्ही सात विश्‍वस्त कर्तव्य भावनेनं उभे राहिलो आहोत. यात आमचा कुणाचाही, कसलाही वैयक्तिक स्वार्थ नाही. स्वार्थ आहे तो आपल्या मातृभूमीच्या सेवेचा, आपल्या राष्ट्राच्या पुनरुत्थानाच्या प्रचंड यज्ञात अर्पण होणारी महत्त्वपूर्ण समिधा होण्याचा!

 

या एका चित्रपटामुळं एकदम सारं चित्र बदलून जाईल अशी वेडी कल्पना आमच्या मनात नाही. पण आपल्या समाजबांधवांच्या मनात अवश्य ती खळबळ उडवून देईल आणि ज्यांचे विचार अजून पक्के व्हायचे आहेत त्या उमलत्या पिढीला समानतेवर आधारलेला एकसंध हिंदू समाज आणि सामर्थ्यवान हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची प्रेरणा देईल एवढं काम हा चित्रपट निश्‍चित करेल.’’

 

पु. ल. देशपांडे हे तर राष्ट्र सेवा दलातले. समाजवादी विचारसरणीचे. देव वगैरे फारसं न मानणारे. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यावर प्रत्यक्ष अटलजींच्या समोर भाषण करताना किंवा अंदमानमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासंबंधी बोलताना त्यांनी कृतज्ञता तर व्यक्त केलीच, पण या महाकवीने, राष्ट्रभक्ताने, या त्यागमूर्तीने मांडलेल्या विज्ञाननिष्ठ भूमिकेचा आणि अस्पृश्यतानिर्मूलनाच्या कामगिरीचा तपशीलाने गौरव केला.

 

तसेच आणीबाणीला कडाडून विरोध करण्याची भूमिका पुलंनी जाहीर सभांधून निर्धाराने मांडली, पण त्यानंतरच्या गौरव समारंभात ते अजिबात सामील झाले नाहीत. विशेष म्हणजे वैचारिकदृष्ट्या त्या-त्या वेळची परिस्थिती कशीही असली तरी स्वतःचे निषेधाचे सूर आवश्यक तिथे ठामपणे आळवतानाच सन्मानचिन्हांपुरते सरकारी पुरस्कार परत करण्याची या दिग्गज कलावंतांना त्यावेळी गरज भासली नाही. म्हणूनच या तिघांचं कलावंत म्हणून आपापल्या क्षेत्रात असलेलं योगदान समजावून घेतानाच माणूस म्हणून, देशभक्त नागरिक म्हणून, आपापल्या विचारांशी बांधील राहूनही सद्भावनांचे पूल बांधण्याची, ते जपण्याची कामगिरी त्यांनी अखंडपणे पार पाडली. वर्तनात म्हणूनच या तिघांच्या योगदानाचं मोल अधिक ठळकपणे जाणवतं.

 

या संदर्भात 1974 मध्ये इचलकरंजी येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून पुलंनी मांडलेले अनेक मुद्दे आजही लागू होण्याजोगे आहेत. वर्तानातील साहित्यिक, त्यांचे लेखन, समाजामधील जातीभेदांच्या भिंती आणि या सार्‍याचे उमटणारे साद-प्रतिसाद याबाबत पुल फार स्पष्टपणे बोलतात, ते म्हणाले होते,  ‘‘मला लेखकाची जात पाहण्यापेक्षा लेखनाची जात पाहावी असं वाटतं.’’ खेड्यात राहणार्‍या बाजीराव पाटलाच्या विनोदावर फुटणारं हसं आणि शहरात राहणार्‍या बाळ गाडगीळांच्या किंवा ठणठणपाळच्या विनोदावर फुटणारं हसं निराळं नाही. आज जी. ए. कुलकर्णी हा कथालेखक ज्या लोकविलक्षण अनुभूती आपल्या कथांतून मांडतो, त्याला कुठल्या जातीत टाकायचं? हमीद दलवाईची ‘इंधन’ कादंबरी काय मुसलमान साहित्य? आमच्या रणजित देसाईंनी ‘स्वामी’ कादंबरीतून रमा-माधवांचं चरित्र गायलं आहे. आता रमा-माधव ब्राह्मण म्हणून ते ब्राह्मण साहित्य म्हणायचं की देसाई ब्राह्मण नाहीत म्हणून ते ब्राह्मणेतर साहित्य मानायचं? इथल्या थोरवीशी जातीचा, धर्माचा, स्त्री किंवा पुरुष असण्याचा संबंध नाही. उगाचच हा राजकारणातला स्वार्थी गोंधळ साहित्यकलेत आणायचं कारण नाही. शेवटी साहित्य उभं राहतं ते स्वातंत्र्यासारखं ‘आत्मतेजोबले’च उभं राहतं! असलं जातिमहात्म्य, प्रांतमहात्म्य कलेत चालणार नाही. राजकारणात स्वतंत्र मतदारसंघ वगैरे ठीक असेल.

 

इथे मतदारसंघ एकच आणि तो म्हणजे साहित्यकलेचा आस्वाद ही एक साधना आहे असं मानून ग्रंथ हातात घेणारा वाचक. सामान्य वाचक वगैरे लाडिवाळपणा मला मान्य नाही. साहित्यात जसे असामान्य लेखक असतात तसे असामान्य वाचक हवेत. विश्‍वविद्यालयात मराठी शिकविणारे प्राध्यापक हे आपोआपच असामान्य वाचक मानले जाऊ नयेत. नव्या साहित्याच्या बाबतीत त्यांच्यापैकी काही लोकांनी दाखवलेली दिवाभीताची वृत्ती पाहून त्यांच्या विद्यार्थ्यांविषयी मला आधीच वाटणारी काळजी आणखी वाढली आहे. साहित्याचा आनंद कसा घ्यावा – दृष्टी अधिकाधिक निर्मळ कशी करावी हे वर्गात शिकवायचं सोडून आमच्या मराठीच्या अध्यापनात पंधरा मार्कांचा ज्ञानेश्‍वर आणि आठ मार्कांचा तुकाराम यांची मापटी भरून पदरात टाकण्याचे जे प्रयत्न चालतात त्याला आम्ही साहित्याचे शिक्षण मानतो. विश्‍वविद्यालयातील मराठीच्या अध्यापनाविषयी विचार करताना, साहित्याचे अध्यापन म्हणजे रेडिमेड मतांचं वाटप नव्हे हे धोरण ध्यानात घ्यायला हवं’’.

 

उभ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती वाढवणारं हे ‘त्रिदल’. यंदा गदिमा, बाबूजी आणि पुल यांचं जन्म शताब्दी वर्ष सुरू आहे.

 

स्वत:च्या आयुष्यातील दु:खं, वेदना बाजूला ठेवून दुसर्‍यांच्या सुखदु: खांना शब्द आणि सूर देणारी ही महाराष्ट्राची लाडकी व्यक्तिमत्त्वं. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा, या तिघांच्याही श्रीमंत आठवणींचा ठेवा मराठी साहित्यप्रेी रसिकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने महाराष्ट्र शासन आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. गदिमा, बाबूजी आणि पुलंना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन.

 

लेखक: डॉ. सागर देशपांडे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *