मराठीवर प्रेम करणाऱ्या एका शिक्षिकेचे मनोगत

माझा जन्म पुण्यातल्या एका सुशिक्षित घरात झाला. आमचे घर कॅन्टोन्मेन्ट भागापासून अगदी जवळ होते आणि अर्थातच पुण्याच्या मध्यवस्तीपासून दूर. त्या भागातली, परिचयाच्या कुटुंबातली सर्व, अगदी सर्व मुलेमुली कॅन्टोन्मेन्टमधल्या कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये जात असत. पण फ्रेंच आणि इंग्लिशची पदवीधर असलेली माझी आई आणि डॉक्टर वडील यांनी विचारपूर्वक मला आणि माझ्या धाकट्या भावाला मराठी शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. शनिवार पेठेतल्या उत्तम, नामवंत मराठी शाळांमध्ये आमचे शिक्षण झाले. साठचे दशक सुरू होताना माझे शिक्षण सुरू झाले आणि बहात्तर साली (अकरावी) एसएससी होऊन मी फर्ग्युसन कॉलेजच्या प्री डिग्री आर्टस्च्या वर्गात दाखल झाले. तोवर आम्हा भावंडांना उत्तम मराठी वाचण्याचे संस्कार मिळाले होतेच; पण इंग्लिश वाचण्याची आणि बोलण्याची गरजही घरातून समजावून देण्यात आली होती. खर्‍या अर्थाने ‘सु’शिक्षित आईवडिलांचा हा किती सुयोग्य, समतोल निर्णय होता, ते मला आयुष्यभर सतत जाणवत आले आहे. घरात कटाक्षाने मराठी बोलणे आणि घरी पारसी, ख्रिश्चन, मुस्लिम पाहुणे आल्यानंतर त्यांच्याशी इंग्लिशमधून बोलणे. त्यांच्यासमोर ते असेतोवर आपसातही शक्यतो मराठीत न बोलणे. तो गेल्यानंतर आमच्या इंग्लिश बोलण्यात काही चुका झाल्या असल्या तर सौम्यपणे समजावून देणे, असे वळण आईवडिलांनी ठेवले होते. त्यामुळे वडिलांनी आर्टस्ला इंग्लिश माध्यम घेण्याची सूचना केली, तेव्हा मला ताण आला नाही, आणि सगळ्या कॉन्व्हेन्टी, सीनिअर केंब्रिजवाल्या मुलामुलींशी बोलायला त्रासही झाला नाही. (त्यावेळी ‘इंग्लिश मीडिअम’च्या, बिगर कॉन्व्हेन्टी शाळा असा काही प्रकारच अस्तित्वात नव्हता.) नाही म्हणायला, थाय, मॉरिशियन आणि आफ्रिकन मंडळींशी बोलायला जरा त्रास व्हायचा. मुख्य भाषा मात्र मी मराठीच ठेवली. बी. ए. ला संपूर्ण मराठीच घेतले आणि पुणे विद्यापीठातून एम. ए. मराठी पूर्ण करून लगेचच माझ्याच लाडक्या फर्ग्युसनमध्ये पहिली नोकरी सुरू केली. त्यानंतर पस्तीस वर्षे मी शिवाजीनगरच्या मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवले. दरम्यान, 2007 ते 2012 ही पाच वर्षे राज्य मंडळात नववी ते बारावीच्या अभ्यास मंडळाची समन्वयक (को-ऑर्डिनेटर) म्हणून काम केले. 2014 साली निवृत्तीनंतर ‘चाणक्य मंडल परिवार’मध्ये एमपीएससी-यूपीएससीच्या वर्गांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. संस्थेच्या साप्ताहिक आणि मासिकाच्या मुद्रितशोधनाचे (प्रूफ करेक्शन) कामही स्वीकारले. 2018 साली माझ्या अध्यापनाच्या अनुभवाला एक्केचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत.

 

एवढ्या वर्षांत विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या मी पाहिल्या. शिक्षकांच्या पिढ्या पाहिल्या. अस्सल मराठी पुण्याचे बहुभाषक, बहुसांस्कृतिक (कॉस्मॉपॉलिटन) महानगरात झालेले रूपांतर अनुभवले. चार दशके मी सोळा ते तेवीस वर्षे वयोगटाच्या मुलामुलींमध्ये सतत वावरते आहे. त्यांच्याशी बोलते आहे. त्यांचे पेपर्स तपासते आहे.

 

 काय दिसते आहे मला?

गेल्या चाळीस वर्षांत पुलाखालून प्रचंड पाणी वाहून गेले आहे. सत्त्याहत्तर साली मी ट्यूटर झाले, त्याच्या पुढच्या वर्षी अध्यापक. त्या वेळी जे विद्यार्थी समोर येत होते, त्यांची दहावीची टक्केवारी चाळीसपासून ते साठपर्यंत असे बहुधा. दीडशेमधले दहावीसजण साठ ते पंचाऐंशीच्या दरम्यान असायचे. तीन चतुर्थांश वर्ग मराठी शाळांमध्ये शिकलेला असे.  एक चतुर्थांश मुलेमुली कॉन्व्हेन्टस्मधली. मराठी शाळांतून आलेल्या मुलांचे मराठी बरे असे. बोलणे बरे, लेखनही बरे. एकंदर सगळेच विषय आजच्या पंचाण्णव टक्क्यांपेक्षा खूपच बरे. बर्‍याच जणांचे वाचनही बरे. विनोद समजावून न देता समजे. भाषेचे बारकावे सांगितले की लवकर समजत. म्हणी -वाक्प्रचारांचे अर्थ विचारले तर मुलींकडून तरी बहुधा समाधानकारक उत्तरे येत. एक चतुर्थांशांचीही स्थिती ‘भीषण’ म्हणावी अशी नव्हती. मग हे सगळे हळूहळू बदलत गेले. इंग्लिश मीडियम शाळा प्रचंड प्रमाणात वाढल्या. बरोबरच्या शिक्षकांनाही भाषेचे महत्त्व वाटत नाही, मुख्य म्हणजे ‘समजत’ नाही, त्यांच्या बोलण्यातून विद्यार्थ्यांवरही भाषेला बिनमहत्त्वाचा विषय समजण्याचे संस्कार होताहेत, हे जाणवू लागले. मराठीच्या शिक्षकांचाही दर्जा, खेड्यातल्याच नव्हे, तर साक्षात पुण्यासारख्या शहरातल्याही, भयावह रीतीने घसरत गेला. (राज्य मंडळातल्या पाच वर्षांत हे भयाण वास्तव मी फार जवळून अनुभवले आहे.) हुशार विद्यार्थी सायन्सला, मध्यम कॉमर्सला आणि आर्टस्ला बराचसा ‘कसाबसा काठावर पास’ वर्ग, आणि या सगळ्यांदरम्यान पक्क्या भिंती, असे चित्र तयार होत गेले. नाही म्हणायला, हुशार विद्यार्थी सायन्स, कॉमर्सला असले तरी बर्‍याचजणांना भाषेत, त्यातही मराठीत रस असे. नाइलाज म्हणून हे अभ्यासक्रम ती मुले निवडत. माझ्याकडे तसे बोलून दाखवत. वाचनासाठी सल्ले मागत. आपले लेखन दाखवून अभिप्राय मागत. याचे प्रमाण थोडे घटत गेले खरे, पण नाहीसे झाले नाही. दरम्यान, इंग्लिशव्यतिरिक्त भाषा आणि भूगोलादी विषय यांना पर्याय म्हणून दोनशे गुणांचे इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स इ. विषय सायन्सच्या मुलांना उपलब्ध झाले. ‘स्कोअर वाढतो,’ ‘इंजिनिअरिंगची अ‍ॅडमिशन सोपी होते,’ म्हणून त्यावर उड्या पडू लागल्या. जर्मन, फ्रेंच इ. परकीय भाषांचे अकरावीला मुळाक्षरापासून सुरू होणारे अभ्यासक्रमही ‘स्कोअर वाढतो’ या आमिषापायी झुंबड खेचू लागले. आणि या सगळ्यामुळे गिरगाव, ठाकूरद्वार, दादरची मराठी माणसे डोंबिवली, उल्हासनगर, विरार, दहिसरलालो टली जावी तसे ‘मराठी’ विषयाचे झाले.

 

लहान गावांमधून, मध्यम शहरांमधून पुण्याला शिकायला येणार्‍या मुलांचे प्रमाण वाढत गेले ती मुले आपापल्या बोली आणि भाषेचा विशिष्ट लहेजा घेऊन येऊ लागली. बहुजनसमाजातले शिक्षणाचे प्रमाण वाढत गेले. साहित्यातले ग्रामीण, दलित प्रवाह सशक्त होत गेले. त्यांचा समावेश अभ्यासक्रमात होऊ लागला. मात्र, इतर विषयांच्या पाठ्यपुस्तकातले प्रमाण मराठीचे वळण बदलले नाही. वाचणार्‍या, शिकणार्‍या सर्वांना शिक्षणासाठी ती शिकावीच लागली, अजूनही लागते. मात्र, तोंडचे बोलींचे लहेजे त्यामुळे फार बदलले नाहीत.  मुलामुलींचे आपसातले बोलणे मात्र (ते मी लक्षपूर्वक ऐकत आले, लक्ष नाही असे दाखवून!) प्रचंड प्रमाणात बदलले. मुलींचे आणि बायकांचे जगणे पुरुषांपासून थोडेसे तरी अलिप्त असे पूर्वी, ते तसे राहिले नाही. वावराची ठिकाणे आणि जीवनपद्धतीची अधिकाधिक सरमिसळ होत गेली. आणि बुद्धीला एकमेव खाद्य म्हणजे भाषावैभवात भर घालणे, ही बायकांची स्थिती बदलून ‘अवघा रंग एकचि झाला’! हे होणारच होते. व्हायला हवेच होते. पण प्रत्येकच गोष्टीचे काही फायदे आणि काही तोटे असतातच; तसा स्त्रीजीवनातल्या या बदलाचा मला न आवडणारा एक परिणाम झाला – बायकांचे ‘खास’ भाषावैभव लुप्त होत गेले! अधिकाधिक अमराठी लोकांशी संपर्क येऊ लागल्यावर मराठीत हिंदी शब्द घुसडून बोलण्याचे आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊ लागल्यावर इंग्रजी शब्द घुसडण्याचे प्रकार वाढत गेले. यथावकाश मुलींच्या बोलण्यात पूर्वी नसणारे ग्राम्य शब्द सर्रास स्त्रीस्वरात कानी पडू लागले आणि अमुक इंग्लिश-हिंदी शब्दाला साधा-सोपा मराठी शब्द असल्याचेच विस्मरण होऊ लागले! (साधे उदाहरण, शहरी भाषेतले ‘मेहुणे’, ग्रामीण भाषेतले ‘दाजी’- हा मला खूप आवडणारा शब्द – ‘जिजू’ होऊन गेले! ‘जिजाजी’ या मूळ शब्दाला निदान मेहुणे, दाजी या शब्दांची अदब तरी होती. नात्यात प्रेम नसायचे असे नाही. पण ‘जिजू’ने त्यातला सगळा गोडवाच हिरावून घेतला!)

 

हे झाले मराठी या अभ्यासविषयाचे आणि मराठी संभाषणाचे. दुसर्‍या बाजूला, मनोरंजन आणि जाहिरात क्षेत्रे कमालीची वाढत गेली. त्याच्या कारणाची इथे चर्चा करण्याचे प्रयोजन नाही. त्यात वापरल्या जाणार्‍या मराठीविषयी बोलण्याचे प्रयोजन मात्र आहे. मनोरंजन ‘इंडस्ट्री’ विस्तारत गेली तसा तिचा शुद्ध, चक्क ‘धंदा’ होत गेला. (कठोर वाटेल, पण ‘धंदा’ शब्दाचे सगळे बरेवाईट अर्थ मला इथे अभिप्रेत आहेत.) कसलाच विधिनिषेध नसलेल्या, असंस्कृत धंदेवाइकांच्या हाती हा उद्योग आतापावेतो गेलेला आहे. चित्रपटांत, काही प्रमाणात नाटकांत देखील वापरली जाणारी मराठी दिवसेंदिवस विकृत होत चालली आहे. टीव्हीच्या सरकारी आणि खासगी वाहिन्यांवरच्या मराठीच्या वापराबद्दल तर बोलणे म्हणजे तोंड विटाळून घेणे. भयाण, तेच तेच विषय चघळणार्‍या, कल्पकताशून्य मालिकांच्या निर्मात्यांना मराठीत उत्तम साहित्य आहे आणि त्यावर आधारित किती तरी उत्तम कथानके उपलब्ध होऊ शकतात, याचा गंधही नाही. मराठी ‘विनोदी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कार्यक्रमांचा दर्जा पाहता (त्यातली ती स्त्री वेषातली धटिंगण शरीरे आणि बीभत्स अंगविक्षेपांच्या नाना तर्‍हा, गलिच्छ भाषा!) तमाम मराठी भाषकांची आणि स्वतः चीही कीव यावी, अशी एकंदर परिस्थिती. मराठीत सादर होणारे ‘रिअ‍ॅलिटी शोज’ म्हणजे तर निव्वळ दुःस्वप्ने! टीव्हीवरच्या आणि छापील माध्यमांतल्या मराठी जाहिराती. वेचून काढून आणल्यासारख्या, बर्‍या मराठीचा गंधही नसलेल्या किंवा चक्क अमराठी भाषक लोकांकडून खुशाल लिहून घेतलेल्या. ‘एक असा आटा जो तुमच्या स्वादाला उत्तम रीतीने समजतो’- हा एक अस्सल मासला. एक सरकारी जाहिरात पहा – ‘घराघरात पोषण उत्सव. आजची कि छोरी आहे उद्या ची सशक्त नारी. निरैंगी शरीर आणि शिक्षाने होणार पूर्ण तैयारी. सही पोषणदेश रोशन’. यावर काही भाष्य करायची गरज आहे? (आणि महाराष्ट्र सरकारचेही भाषा संचालनालय आहे असे ऐकते!) हीच किळसवाणी आणि संतापजनक भाषा रेडिओ आणि टीव्हीवरच्या जाहिरातीतून कानावर पडते. कानही, नजर मरते, तसे मेले आहेत आता. कॉलेजमध्ये शिकवण्याच्या काळात सरकारी हुकूमनामे (फतवे!) पण खूप वाचले. साधी-सरळ मराठी लिहायचीच नाही, असा चंग बांधलेल्यांच्या लेखण्यांतून उतरलेले. एकदा वाचून अर्थ कळला तर आपल्या गेल्या सात पिढ्या नरकात जातील, अशी खात्री असलेल्यांनी लिहिलेले!

 

सगळेच चित्र शंभर टक्के काळेकुट्टच आहे, असे नाही. वर उल्लेखिलेल्या प्रत्येक संदर्भात काळ्या ढगांना रुपेरी कडा असल्याची उदाहरणेही आढळतातच. मात्र त्यांचे प्रमाण कमी. आणि ते वाढेल अशी आशा दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे.

 

वर मराठीच्या बोलींचा संदर्भ आला आहे. त्याबद्दल थोडे बोलू. कोकणी (स्थानपरत्वे बदलणारी तिची विविध रूपे), अहिराणी, वर्‍हाडी, नागपुरी, मराठवाडी या मराठीच्या ठळक बोली. याशिवाय झाडी बोली आहे. कोरकू, गोंडी, वारली इ. आदिवासी बोली आहेत. कोल्हापुरी, सातारी, सांगली-मिरजेची, सोलापुरी, नगरी, मुस्लिम बागवानी बोली या पण आहेत. या सगळ्या प्रमाण मराठीच्या मैत्रिणी, बहिणी, लेकी, सुना आहेत. गंगेची उगमाशी असलेली लहानशी धार जशी असंख्य ओढे, नाले, उपनद्या येऊन मिळाल्याने भव्य रूप धारण करत जाते, तसे या सगळ्या बोलींनी मराठीत यथाशक्ती स्वतःचे रंग आता मिसळले आहेत. या सर्वच बोली अत्यंत गोड आहेत. सशक्त आणि समर्थ आहेत. त्या माणसांचे सगळे व्यवहार चालवायला कुठेही तोकड्या पडत नाहीत आहेत. ती ती बोली बोलणार्‍यांनी प्रमाण मराठी आपलीशी करताना मूळची घरातली बोली सोडून द्यावी, किंवा तिचा न्यूनगंड बाळगावा, हे संपूर्ण चुकीचे आहे. आपली बोली बोलत रहावी, तिचा अभिमानही बाळगावा. मात्र, त्याचा ‘दुराभिमान’ होत नाही ना, याचे भानही ठेवणे आवश्यक आहे. ‘सुशिक्षित बोलणे’ असे नाव देऊन प्रमाण मराठीची हेटाळणी करण्याचे, अट्टाहासाने ती टाळण्याचे प्रकार आढळत आहेत. त्याचे राजकारण होऊ लागले आहे. ‘काय म्हणून पुणेरी मराठी प्रमाण?’ असा सवाल आक्रमकपणे विचारला जाऊ लागला आहे. तिला विशिष्ट जातीची भाषा म्हणूनही हेटाळण्याची प्रवृत्ती आढळते आहे. याला उत्तर आहे. पुणे हे कायमच महाराष्ट्रातले शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले गेले आहे. महाराष्ट्रातले पहिले विद्यापीठ उभे राहिले मुंबईत, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर, हे खरे.

 

पण त्यापूर्वी अनेक शतकांपासून पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. इथली मराठी ही अभ्यासक्रमांची भाषा आहे, हा इतिहास आहे आणि तो बदलता येत नाही. याशिवाय, पाठ्यपुस्तके इतक्या सर्व बोलींमधून तयार करणे शक्य वा व्यवहार्य आहे काय? साहित्यनिर्मिती बोलींमधून अवश्य व्हावी. त्यामुळे मराठीच्या वैभवात भरच पडत जाईल. पण मुख्य ग्रंथव्यवहारासाठी प्रमाण मराठीची आवश्यकता कधीही नष्ट होणार नाही. तसा अट्टाहास करण्याने भाषेचे नुकसान मात्र होत जाईल. मराठीची पीछेहाट आणि र्‍हास मग कोणीही रोखू शकणार नाही!

 

ओघाने येणारा एक मुद्दा थोडा सुटा करून मांडते, व्याकरणशुद्ध लेखनाबद्दलचा. अक्षरे, बाराखडी, र्‍हस्व/दीर्घ लिहिण्यातून शब्दांचे अर्थ ठरत जातात. त्यात बदल केला तर ते बदलत जातात. त्या र्‍हस्व-दीर्घ (हेही अवघड वाटत असेल तर पहिल्या-दुसर्‍या!) वेलांट्या किंवा उकारांमुळे लेखन नियमांनुसार करणे शक्य होते. हे लेखननियम पाळणे वाटते तितके कठीण खरोखरच नाही. इंग्लिश शब्दांची स्पेलिंग्ज नाही का आपण पाठ करत आणि लक्षात ठेवत? त्यात उलट सायलेन्ट अक्षरांचा प्रकार पण असतो. तसे तर मराठीत नाही? वाचताना डोळे व मेंदू जागा असला पाहिजे, एवढीच अट असते. उच्चार करतानाही कान व मेंदू सजग असावे लागतात. ‘मी’ आणि ‘तू’ हे शब्द ‘मि’ आणि ‘तु’ असेही लिहिणारे महाभाग असतात. त्यांनी सांगावे की, हे शब्द छापील स्वरूपात त्यांनी असे र्‍हस्व लिहिलेले कधी वाचले का? समजा वाचले असल्यास किती वेळा वाचले, आणि दीर्घ लिहिलेले किती वेळा वाचले? सतत समोर येणारे हे शब्द. डोळ्यांना त्यांच्या वेलांटी-उकाराची सवय होत नाही? कानांना ‘मि’आणि ‘तु’ हे र्‍हस्व उच्चार खटकत नाहीत? रस्त्यावर हिरव्या-तांबड्या दिव्यांचा घोटाळा बरा होत नाही मग? शुद्धलेखनाचे नियम आहेत ना, ते अमुक उच्चार असा का, याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आहेत. ते घोकून कोणी व्याकरणनियमांनुसार लिहायला शिकणार नाही. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही,’ सारखे डोळे आणि कान ग्वाही कराल, तर खरोखरच व्याकरणशुद्ध लिहिणे णि बोलणे जड नाही. चांगले लिहिलेले मराठी जर सावधपणे वाचले तर वाक्यरचनाही चुकणार नाही. कोणीही कितीही तळतळाट केला आणि व्याकरणाचा धिक्कार केला, तरी दीन-दिन, शिला-शीला, सुत-सूत यांतल्या र्‍हस्वदीर्घामुळे व्हायचा तो अर्थातला फरक होणारच आहे आणि संवाद साधण्याच्या भाषेच्या मूलभूत उद्देशालाच हरताळ फासला जाणारच आहे! दोन आणि दोन यांची चार ही बेरीज कशी मुकाट मान्य करता? दोन आणि दोनची बेरीज कोणी साडेतीन, पावणेचार तर कोणी सव्वाचार धरली तर काय अनर्थ ओढवेल ते कळते ना? मग ‘व्याकरणाचे नियम जाचक आहेत आणि नाहीच पाळणार’ हा अट्टाहास का? साधा डोळ्यांना आणि कानांना वळण लावण्याचा तर मुद्दा आहे!

 

आतापर्यंत या लेखात मराठीची सद्यस्थिती आणि ती तशी होण्यामागची कारणे यांची चर्चा केली आहे. आता जरा भविष्याचा विचार करू. घसरण होते आहे हे स्पष्टच आहे. काही मराठीप्रेमी मंडळी या संदर्भात आग्रहाने संपूर्ण शिक्षण मातृभाषेतच देण्याची भूमिका मांडतात. जर्मन लोक, जपानी लोक आपापल्या देशात सगळे शिक्षण स्वभाषेत देतात. तरी ते देश इतके पुढे, प्रगतिपथावर गेले, म्हणजे इंग्लिशवाचून काही अडत नाही हे सिद्ध होते, असे सांगतात. हा युक्तिवाद तसा योग्यच आहे. पण यात काही कळीचे मुद्दे आहेत ते असे की, हे देश इंग्रजांचे गुलाम कधीच नव्हते. त्यामुळे जेत्यांची भाषा श्रेष्ठ आणि आपली कमी दर्जाची, हा गंड त्यांच्यात निर्माण होण्याचे कारणच नव्हते. आपल्याला तो आहे. शिवाय, आपल्याकडे मुळात आधुनिक शिक्षणप्रणालीने अवतार घेतला तोच इंग्रजीचे कपडे चढवून. या दोन कारणांमुळे इंग्रज गेले तरी इंग्रजी राहिली. ज्ञानभाषा तर ती होतीच, पण तिचे जागतिक संवादाची भाषा म्हणून असलेले महत्त्व सतत वाढतच राहिले आणि मग इंग्रजीचे प्रस्थ वाढण्याला काही धरबंधच राहिला नाही. पुन्हा आपल्या देशात प्रांतोप्रांतीच्या भाषा वेगळ्या. जास्तीत जास्त लोकांची म्हणून भारताने हिंदीचा व्यापक प्रमाणात स्वीकार केला खरा, पण दाक्षिणात्य मंडळींना तिचे प्रेम कधीच वाटले नाही. मग भारतातल्या विविध प्रांतांना सांधणारा दुवा इंग्रजी हाच राहिला. तिच्या श्रेष्ठत्वाविषयीची आणि ती अपरिहार्य असल्याची जाणीव दिवसेंदिवस बळकटच होत गेली. अभिजनांना बहुजनांवरचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तिचाच आधार वाटला आणि बहुजनांना नेहमीच असलेली उच्चवर्गीयांचे अनुकरण करण्याची, त्यांच्यात समाविष्ट होण्याची आस त्यांनाही इंग्रजीचा जास्त जास्त अवलंब करण्याच्या दिशेने रेटत राहिली. त्यामुळे प्रादेशिक भाषा अशक्त होत गेल्या आणि उच्चशिक्षणाचे माध्यम इंग्रजीच, ही काळ्या दगडावरची रेघ ठरली.

 

आता मात्र ‘भाषा मरता देशहि मरतो, संस्कृतिचाही दिवा विझे’ या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी कळवळून दिलेल्या इशार्‍याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. सर्वच पातळ्यांवर जोमाने प्रयत्न करून, मुख्य म्हणजे वाचनसंस्कृती जोपासून मातृभाषेला संजीवनी देण्याची घटिका समोर येऊन ठाकली आहे. त्यातला एक महत्त्वाचा भाग, सर्व विद्याशाखांचे सर्व पातळ्यांवरचे शिक्षण मराठी माध्यमात देणे,हा निश्चितच असेल. त्यात अशक्य असे काहीही नाही विविध विषयांच्या तज्ज्ञ मराठी भाषकांनी मनावर घेतले तर हे सहज होऊ शकते. ज्ञानेश्वरांना जेव्हा हिंदुधर्माचे तत्त्वज्ञान बहुजनांपर्यंत पोहोचवण्याची गरज भासली, तेव्हा त्यांनी कोपर्‍याकोपर्‍यावर संस्कृतचे ‘क्लास’ (फाडफाड संस्कृत!) उघडले का? त्यांनी संस्कृतच्या कुलपात बंदिस्त असलेले ज्ञान मराठीच्या किल्लीने खुले करून दाखवले. शेजारच्या गुजरातम ध्ये संपूर्ण वैद्यकीय शिक्षण जर गुजरातीत उपलब्ध होऊ शकते, तर ते महाराष्ट्रात का होऊ शकणार नाही? थोडा वेळ लागेल आणि भरपूर मेहनत करावी लागेल. मनातील मराठीविषयीची तुच्छता आधी उचकटून फेकावी लागेल. या भाषेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा लागेल. ‘माझी भाषा, आपली भाषा’ ही जिव्हाळ्याची जाणीव प्रत्येक अंतःकरणात जागी करावी लागेल. शेवटी, वेगवेगळे व्यवसाय बहुसंख्य लोक करणार आहेत कुठे? सगळ्यांना उठून इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, जर्मनीला जायचे आहे थोडेच? दहा टक्के फार तर देशाची सीमा ओलांडून जातील. परदेशात जगतील. बाकीच्यांना याच मातीत जगायचे आणि मरायचे आहे. आणि आपण मराठीत शिकलो म्हणून इंग्लिशला सोडचिठ्ठी देणार आहोत थोडेच? एक विषय म्हणून ती आणि चिनी-रशियन-जपानी-जर्मन-स्पॅनिशही अभ्यासल्या जातीलच. मात्र, मातृभाषेतल्या शिक्षणामुळे येणारा आत्मविश्वास सगळ्यांच्या मनात जागेल. सगळे विषय अधिक चांगले कळतील. पक्के होतील. मातृभाषा पक्की झाल्यामुळे परकीय भाषा शिकतानाही अधिक प्रगती साधेल!

 

माझे एकच म्हणणे आहे. मागणे आहे म्हणा, सार्‍या मराठी भाषकांकडे. ही माझी भाषा आहे. माझी आई आहे. ती जगली पाहिजे, वाढली पाहिजे. मला इतर भाषाभगिनींचा किंवा परकीय भाषांचा दुस्वास नाही. पण मावश्या, आत्या, काक्या, माम्या आपल्या जागी आणि माझी आई तिच्या जागी, तिच्या हक्काच्या जागी! जगातल्या सगळ्याच भाषा सुंदर आहेत. मला ‘भाषा’ या विषयाचेच आत्यंतिक प्रेम आहे. पण ‘माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट!’ जागतिकीकरणाच्या रेट्यात तिचा बळी जाता कामा नये. आजवर जगात हजारो भाषा निर्माण झाल्या. शेकडो-हजारो लयालाही गेल्या. एक भाषा मरणे म्हणजे त्या भाषेतले ज्ञान, अनुभव, शहाणपणाचा अंत होणे. माझ्या प्रिय मातृभाषेचे हे होऊ नये, अशी माझी आत्यंतिक इच्छा आहे!

 

लेखक: लीना पाटणकर
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *