बेडी

जाग आल्यावरही अर्ध्या उघड्या डोळ्यांनी अंथरुणात तसंच पडून राहिल्यासारखी पहाटेची अवस्था होती. रात्रीच्या अंधाराचा पहाटेच्या उजेडासोबत कलगीतुरा सुरू असताना रात्री खुराड्यातून बाहेर राहिलेलं कोंबडं उकिरड्यावर साक्ष द्यायला उभं होतं. झाडंही तशी अजून निद्रिस्तच होती. कुठंतरी कावळ्याच्या फडफडण्यानं सळसळलेली पानं क्षणभर जागी व्हायची आणि पुन्हा गप्प पडून राहायची. दारातलं ते कडुलिंबही पेंगुळलेलं आणि त्याखालचा लिंबोळ्यांचा सडाही गप गार पडलेला.
अशातच भामा कैकाडणीला जाग आली. दार नसलेल्या सोप्यात चुलीच्या विरुद्ध दिशेला एका कोपऱ्यात शंभर ठिगळं जोडलेल्या चादरीत ती कशीबशी झोपायची. कडाक्याची थंडी पडली तर पाय दुमडून, गुडघ पोटात घेऊन नुसती पडायची. दुसऱ्या दिवशी ताटकळलेल्या अंगानं कामं करायची. काही दिवस सलग असं झोपल्यानं अधूनमधून तिच्या पोटातही दुखायचं. पण ते कुणाला सांगायची सोय नव्हती.
अंथरुणात उठून बसत दुसऱ्या कोपऱ्यात गुरासारखं पाय पसरून जोरजोरात घोरणाऱ्या आपल्या नवऱ्याकडं, पांडू कैकाड्याकडं तिनं पाहिलं. गेली अनेक वर्षं गुडघ्याचं असह्य दुखणं घेऊन जगत असलेल्या भामानं दोन्ही हात गुडघ्यांवर टेकवले आणि कशीबशी उठली. आपल्या हालचालीची जाणीव होऊन नवऱ्याची झोप मोडू नये म्हणून त्याच्या हातभर लांबनंच ती बाहेर आली. अजून पुरतं उजाडलेलं नव्हतं. खुराड्यात कोंडलेल्या कोंबड्यांची बाहेर येण्यासाठी धडपड सुरू होती. डावीकडल्या गोठ्यात छोटी गाय अजूनही काल खाल्लेलं जिरवत होती. भामा बाहेर आलेली बघताच सोप्याच्या चौकटीला लागून निमूटपणे पडलेलं मरतुकडं कुत्रं उठलं, इकडून तिकडं तिच्या पायात घुटमळलं आणि दूर उकिरड्यावर जाऊन दिसेल त्याचा वास घ्यायला लागलं.
एक लहान जांभई देत भामानं डावीकडं पाहिलं. सोप्याच्या भिंतीला लागून हिरव्यागार फोकांचा ढीग तिथं पडलेला. लांबसडक हिरव्या फोका पांडूनं कालच आणलेल्या असल्यानं त्यांचा ताजा, सवयीचा वास क्षणभर तिच्या नाकात शिरला. नवऱ्यानं आणलेल्या फोका मिस्त्रीच्या चावरापलीकडच्या नदीजवळ जी पाणंद आहे तिथून आणल्या असल्याचं तिनं चटकन ओळखलं. ती पाणंद घरापासून दूर होती. इतक्या लांबून फोकांचा भार खांद्यावर टाकून आणणं सोपं नसायचं. घरी येईपर्यंत खांदा सुन्न झालेला असायचा.
निरगुड्यांपासून बनवलेला खराटा फोकांच्या पलीकडं, भिंतीला टेकवून ठेवला होता. भामानं तो हातात घेतला आणि सैल झालेली त्याची सुतळी पुन्हा आवळली. भिंतीच्या तिथल्याच एका कोपऱ्यात बसून तिनं अंगण झाडायला सुरुवात केली. अलीकडं गुडघेदुखी फारच वाढल्यानं तिला जास्त काळ उभं राहता येत नसे. सोप्यापासून अंगणातल्या तुळशीच्या रोपड्यापर्यंत झाडत गेलं की पायात कळ येई. मग पुढची झाडलोट ती खाली बसून, ढोपर पुढं सरकवत करायची.
भामाचा खराटा पहाटेच्या शांततेला कर्रर्रर्र कर्रर्रर्र कापत पुढं जात होता. भामाला झाडताना बघून गोठ्यातलं जनावरही पुढच्या पायांचा आधार घेत उभं राहिलं आणि तिच्याकडं आशेनं बघू लागलं.
“उटली काय रांड!”, झोपमोड झालेला पांडू भामावर खेकसला.
काही ऐकलंच नाही अशा आविर्भावात भामानं आपलं झाडणं सुरू ठेवलं. पांडूलाही तिच्याकडून कोणती प्रतिक्रिया अपेक्षित नसावी. अंथरुणात उठून बसत उशाला असलेली तंबाखू त्यानं मळायला घेतली. मळलेली तंबाखू तोंडात टाकत तो पुन्हा गरजला,
“भाम्ये! हजारदा तुला सांगतुय. सकाळी सकाळी तुझी आय निजवू नको. पुना गुडगं दुकायला लागलं तर काय तुझा बाप येणार हाय व्हय?”
भामाच्या एकुलत्या एका पोराला, भिकाला पोरं झाली तरी पांडू कैकाड्यानं भामाचे आईबाप काढणं काय सोडलं नव्हतं.
भामानं पुन्हा तिकडं कानाडोळा केला. तुळशीच्या पलीकडं डालगा करण्यासाठी पांडू बसायचा. तिथली माती भुसभुशीत असल्यानं डालगा करताना गोलाकार आकारात उभ्या रोवायच्या फोका पटकन मातीत घुसायच्या. आधीच्या छिद्रांमध्ये माती जाऊ नये म्हणून तिनं तिथं खराटा न नेता हातानंच तिथले फोकांचे तुकडे आणि वाळलेला पाला उचलला.
लग्न होऊन गावात आल्यापासून आयुष्यभर भामानं नवऱ्यासोबत फिरून फिरून फोका गोळा केल्या. भिका पोटात असताना महिनाभर मिळालेली सुट्टी ही तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची सुट्टी. चांगल्या फोकांसाठी दोघांना दूरवर चालत जावं लागे. काट्याकुट्यातून वाट शोधावी लागे. झिजलेल्या चपलीतून सापानं डंख मारल्याप्रमाणे काटे वर येऊन पायाला टोचत. दोन वर्षांपूर्वी असंच एकदा भर पावसात फोका घेऊन घरी परतत असताना एका अरुंद बांधावरून भामाचा पाय घसरला आणि ती आडवी झाली. बाजूला पडलेला फोकांचा भार पुन्हा डोक्यावर चढवत दुखऱ्या पायावर अधिक भर न देता तिनं कसंबसं घर गाठलं. डावा गुडघा तोवर बराच सुजला होता. दोन दिवस कधी फडक्यात गरम केलेली वीट घालून तर कधी गरम वाळू घालून गुडघ्यांना शेक दिला पण दुखणं थांबलं नाही. वैतागून, तिला चार शिव्या देत, नाही म्हणायला पांडू तिला एकदोनदा तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन गेला होता; मात्र तिथला खर्च बघून गुडघ्याचा प्रश्न म्हसोबाला नारळ देऊन मिटवण्याचं नवरा-बायकोनं एका अबोल समझोत्यानं ठरवलं होतं. तिथपासून आपलं दुखणं भामा निमूटपणे सोसत होती. मात्र गेल्या वर्षभरात गुडघ्याच्या दुखणं आणखी वाढल्यामुळं ती घरातून बाहेर पडायची बंद झाली. पांडूनंही तिला आग्रह करणं सोडून दिलं.
“मिस्त्रीकडं गेला हुता तर शेरभर बाजरी तरी आणायची. लय दिस झालं त्यास्नी डालगा दिवून.” पुन्हा सोप्यात येऊन दुखऱ्या पायाला बांधलेलं फडकं आवळत भामा नवऱ्याला म्हणाली.
“मिस्त्री घरी न्हवता.”
“त्येंच्या बायकोनं दिली आस्ती की”
“तूच घिऊन यी की”
“माझ्याच्यानं झालं आसतं तर मी गिली नस्ती व्हय वं?”
“आज जानाराय. आंतु.” भामाच्या गुडघ्याकडं तिरक्या नजरेनं बघत पांडूनं विषय मिटवला.
डालगा, पाट्या ज्याच्या त्याच्या घरी पोचवल्यानंतर पांडूला त्याबदल्यात पैसे मिळाले असं क्वचितच होई. मोबदला म्हणून त्याला शेरभर ज्वारी किंवा बाजरी मिळे. फोका गोळा करण्याच्या वाटेवर सांगणाऱ्याचं घर असेल तर पांडू एक डालगा खांद्यावर टाके आणि पुढं चालू लागे. भामा निमूटपणे एक काळवंडलेली कापडी पिशवी कमरेत कोंबून नवऱ्याच्या मागं चालू लागे. भामा त्या पिशवीत ज्वारी अगर बाजरी घेई. तरणाबांड पांडू साठीतला म्हातारा झाला तरी हे माप कधीच वाढलं नाही. पांडूनंही त्याबद्दल कधी तक्रार केली नाही.
हरी नानाच्या घरी पांडूचं मन रमे. दर महिन्याला एखादा डालगा, पाटीची हरी नानाकडून मागणी असे. घरापुढं टाकलेल्या बाजल्यावर हरी नाना लवंडलेला असे. खांद्यावरचा डालगा खाली ठेऊन पांडू तिथंच बाजल्याच्या एका कोपऱ्याला मांडी घालून बसे. भामाही तिथल्या स्वयंपाक खोलीच्या उंबऱ्याला टेकायची. दिवस मावळताना हरी नानाच्या घरी जाणं झालं तर तीन चार मोठमोठी लाकडं फोडण्याच्या बदल्यात पांडूला तिथं एका ताटलीत चहा मिळायचा. दूध टाकलेल्या घट्ट गुळाच्या चहाची चव जिभेवर निदान तासभर तरी तशीच राहायची. चहाची वेळ साधूनच आपला नवरा हरी नानाचं घर गाठतो हे भामानं कधीच ओळखलं होतं.
भामासाठी पांडूच्या तोंडात फक्त शिव्याच असल्या तरी तो तिचा तिरस्कार करायचा नाही. सुनेनं ताटात कधी सकाळची शिळी भाकरी वाढली तर आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी भामा हे त्याचं हक्काचं ठिकाण होतं. भामाच्या गुडघेदुखीवर त्यानं हातपाय हलवले नाहीत असं नाही. कधी जास्त आलेली ज्वारी, बाजरी भिकाला न सांगता महिनो न महिने परस्पर बाजारात विकून त्यानं आपल्या खात्यात चांगले सात हजार जमवलेले. भामाचा दवाखाना सुरू असताना लेकाकडे खर्च कमी दाखवण्यासाठी पांडूला हे पैसे कामी आले. चार हजार रुपयांवर पाणी सोडल्यानंतर ‘गुडगेदुखीचं काय? एकदा मागं लागली तर ती जन्माचीच!’ या लोकांकडून दिल्या जाणाऱ्या सल्ल्यावर त्याचा विश्वास बसू लागला. बायकोच्या दवाखान्यावर आपण करत असलेला खर्च ‘वाया’ जात असल्याची त्याला खंतही होती. वाटेल तेव्हा खिशाला परवडेल अशी चैन करण्यासाठीच पांडूनं हे पैसे जमवले होते. अजून खर्च करणं परवडणारं नाही हे त्यानं मनोमन ओळखलं. भामाची गुडघेदुखी आता त्याच्यासाठी नेहमीचीच झाली.
पांडू स्वभावानं तसा रंगेल. तरुणपणी पिळदार शरीर लाभलेलं. पारंपरिक व्यवसायासोबत कधी कुस्तीच्या फडातदेखील उतरे. अजूनही तालुक्याला गेल्यानंतर हॉटेलात गावाकडचं कुणी नाही याचा कानोसा घेऊन दुधाचा, कप बशीतून मिळणारा चहा घेत असे. कधी गरम गरम भज्यांवर ताव मारी. पोटाला चिमटा काढून क्वचित तमाशालाही जाई. सगळ्यांच्या नजरा चुकवत तिथं शेवटची रांग धरे. तमाशा संपला की लगेच बाहेर येऊन अंधारात गायब होई.
त्या दिवशी मात्र सकाळपासून भामाच्या अंगात हलका ताप होता. जागेवरून हलायची तिची इच्छा होत नव्हती. न्हाणीत तिचं लुगडं सकाळपासून तसंच पडलं होतं. पांडू डालगा करायला बसल्यानंतर फोकेच्या एका टोकावर विळा ठेऊन तो सर्र्र्र्कन खाली आणत फोकेचे दोन भाग करण्याचं काम भामा करायची. अंगातल्या तापामुळं भामाच्या कामाचा वेग आज मंदावला होता. पांडूनं हे ताडलं आणि तो पुन्हा खेकसला –
“मरायला टेकली तरी संसार करायचा चळ जात न्हाई न्हवं तुझ्या अंगातला? हजारदा सांगितलं तरी ऐकत न्हाईस. गप गुमान पडायला रोग येतु व्हय तुला? लेकाचं लगीन लावून दिलंय ते उगाच का?” भामाशी बोलताना कधीकधी तो सुनेला टोमणा मारे.
“आवं तसं न्हाई. मलाच एका जागी बसवत न्हाई. आणि ह्यो ताप काय? पाचवीला पुजलेला”, सुनेनं सासऱ्याला फणकाऱ्यात उत्तर द्यायच्या आधी भामा सगळं काही झाकून घ्यायची. भामाच्या उत्तरानं पांडूचं समाधान झालं नाही.
त्या रात्री भामाचा ताप मात्र फारच वाढला. रात्री ती जेवलीही नाही. तिच्या गुडघेदुखीसोबत अधूनमधून येणारा ताप पांडूला नवा नव्हता. त्यावर इलाज म्हणून भामा तासभर दडपून झोपे की ताप गायब होई. पण आजचं चित्र वेगळं आहे हे पांडूनं ओळखलं होतं. तो काळजीत होता.
“भाम्ये! वाईस खाऊन घे!”, रात्रीचं जेवण झाल्यानंतर ताटात पाणी ओतून त्याचा घुटका घेत पांडूनं भामाला हटकलं.
“नगं!”, तोंडावरचं पांघरुण बाजूला न करता भामा बारीक आवाजात म्हणाली.
“नगं काय नगं? वाईस खाल्लं म्हंजी बरं वाटल. सकाळपतुर ताप निवळला न्हाई तर उंद्या दाकवू डाक्टरला.”
यावर भामा काही बोलली नाही. पांडूनंही तिला आग्रह केला नाही.
भामा केव्हाची झोपी गेली तरी पांडूचा डोळा लागत नव्हता. अधूनमधून कूस बदलत तो भामाकडं बघे. फाटकं पांघरुण घेऊन भामा शांत झोपली होती. तिचे दोन्ही पाय पांघरुणातून बाहेर आले होते. सोप्यातला दिवा अजून विझला नव्हता. त्याच्या मंद प्रकाशात पांडूची नजर भामाच्या पायांकडं गेली. सापाची कात जशी निर्जीव दिसावी तशी तिच्या सुरकुतलेल्या पायांची अवस्था होती. अनवाणी चालून तिच्या पायांचे तळवे पांढरे फिकट पडले होते. तिच्या पायांना पडलेल्या भल्यामोठ्या भेगांमध्ये पांडूला आपलं भेसूर दारिद्र्य दिसत होतं.
आयुष्यात बायको म्हणून भामाला आपण काय दिलं? शांत तेवत असलेल्या दिव्याची काजळी छताच्या लाकडी खांडांवर जमा होत होती आणि पांडू एकटक तिकडं बघत होता. अख्ख्या वाड्यात न्हवती अशी बाई आपण बायको म्हणून घरी आणली. तेव्हा आपलं किती कौतुक झालं. मात्र संसार सुरू झाला अन भामाच्या सौंदर्याचं कौतुक कमी झालं. तिचे नाजूक पाय दिवसभर फोका गोळा करण्यासाठी उन्हानं तापलेल्या वाटा तुडवू लागले. नेसलेलं प्रत्येक लुगडं फोकांच्या चिकाचे डाग पडून काळं पडलं. कैकाडी वाड्यावर आपल्या सौंदर्यानं भुरळ पाडणारी भामा आज गुढघे पोटात घेऊन निपचित पडली होती. काळ कसा भर्रकन पुढं सरकला होता.
पांडूला जाग आली ती गोठ्यातल्या जनावराच्या हंबरण्यामुळं. दचकून उठला तर चांगलंच उजाडलं होतं. नेहमीप्रमाणे खुराड्यातून बाहेर येण्यासाठी कोंबड्यांचा खटाटोप सुरू होता. भामा मात्र अजून झोपलेली. तिचं हे इतका वेळ झोपणं पांडूसाठी नवं होतं. अंगावरचं पांघरुण बाजूला सारत तो अंथरुणात उठून बसला. पांडूच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. दबकत दबकत पांघरूणातून बाहेर आलेला भामाचा हात त्यानं हातात धरला. हातातल्या दोन लाल बांगड्यांचा क्षणभर आवाज झाला. भामाचं शरीर थंड पडलं होतं. पांडूही क्षणभर स्तब्ध राहिला. सकाळचं झाडलोट न करताच भामा जग सोडून गेली होती.
भामाचं दहावं उरकेपर्यंत पांडू घरातून बाहेर पडला नाही. फारसा कुणाशी बोलला नाही. कुणावर खेकसला नाही. फोका आणल्या नाहीत की बनवलेला डालगा कुणाच्या घरी पोचता केला नाही. भामा जिथं झोपायची ती जागा आता रिकामी होती. सोप्यात झोपायला आता तो फक्त एकटा होता.
दहाव्यानंतरचे तीन दिवस असेच गेले. चौथ्या दिवशी तो सकाळी लवकर उठला. दोन बादल्या गार पाण्यानं अंग चोळून चोळून अंघोळ केली. ओल्या अंगानं आतल्या खोलीत ठेवलेली कपड्यांची पेटी उघडली. कधी काळी त्या पेटीत ठेवलेल्या डांबरगोळीचा क्षीण होत गेलेला वास हवेत मिसळला. सुनेच्या साड्या, भामेचं एक नवं कोरं लुगडं, नातवाचे, भिकाचे कपडे सारं काही त्यानं बाहेर काढलं. सगळ्यात खाली सहा महिन्यांपूर्वी मुलाच्या लग्नात हरी नानानं पांडूला दिलेला भडक गुलाबी रंगाचा फेटा आणि एकदाच वापरलेलं नवं कोरं धोतर होतं. धोतर-सदरा घालून, फेट्याचा डौलदार तुरा वर काढत पांडू घरातून बाहेर पडला. त्याच्या चालण्यात एक आतुरता होती. घराकडं आपली वाट पाहणारं आता कुणी नाही हा विश्वास त्याच्या मनात होता. हे जाणून त्याचं मन आत सैल पडलेलं. घरातल्या कुणात आपला जीव अडकून पडावा अशी शक्यता त्याला वाटत नव्हती. आपण नसलो तर आता त्यांचं अडणार नाही याची त्याला खात्री होती. भामानं जाताना पांडूला सगळ्यातून मुक्त केलं होतं. पांडूच्या मनात आता कोणतीच असहायता नव्हती की अपराधीपणाची भावना नव्हती. पायातली ‘बायको’ नावाची बेडी गळून पडली होती. बँकेतल्या तीन हजारांमध्ये तीन लाखांची स्वप्नं विकत घेत त्याची पावलं तालुक्याच्या दिशेनं झपझप चालली होती.
लेखक – पंकज येलपले 

संपर्क – swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *