पाकिस्तानचे धर्मांध कायदे आणि वर्तणूक 

लाहोरपासून काही किलोमीटरवर असलेल्या एका खेडेगावातली आशिया बीबी ही पाकिस्तानी ख्रिश्चन स्त्री. सुमारे दहा वर्षांपूर्वी केव्हातरी एकदा तिचा एका मुस्लिम पाकिस्तानी स्त्रीसोबत कसला वाद झाला म्हणे! म्हणून त्या मुस्लिम स्त्रीनं पोलिसांकडं तक्रार केली – ख्रिश्चन असलेल्या आशिया बीबीनं ईश्वर, पवित्र कुराण आणि प्रेषिताचा अपमान केला आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार आशिया बीबीवर खटला भरण्यात आला. अर्थातच ‘गुन्हा’ सिद्ध झाला.

 

 

 

पाकिस्तानच्या राज्यघटनेत इस्लाम हा एकच अधिकृत, शासनमान्य धर्म आहे. घटनात्मक तरतुदीनुसार इतर धर्माचे लोक हे देशातले ‘दुय्यम नागरिक’ आहेत. या राज्यघटनेला अनुसरून केलेल्या ‘Blasphemy law’ – ‘ईश्वरनिंदाविषयक कायद्या’नुसार ‘ईश्वरनिंदा’ या गुन्ह्याला इस्लाममध्ये देहांताची शिक्षा आहे. म्हणून मुस्लिम व्यक्तीनं मुस्लिमेतर व्यक्तीविरुद्ध ईश्वरनिंदा केल्याचा खटला भरला तर आपण अशी ईश्वरनिंदा केलेली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या मुस्लिमेतर व्यक्तीची आहे. ज्याच्यावर आरोप केला तो निर्दोष असल्याचं सिद्ध होईपर्यंत तो गुन्हेगार आहे. Guilty till proved innocent. त्याला शिक्षा देहांताची. एवढंच नाही, तर पाकिस्तानी कायद्यानुसार मुस्लिम व्यक्तीनं मुस्लिमेतर व्यक्तीचा खून केला आणि हा खून त्या मुस्लिमेतर व्यक्तीला मुस्लिम करण्याच्या नादात झाला असेल तर संबंधित मुस्लिम व्यक्ती निर्दोष समजला जातो. याच कायद्यामुळं आशिया बीबी दोषी ठरली आणि तिला देहांताची शिक्षा फर्मावण्यात आली.

 

या शिक्षेविरोधात जगातले एकाहून एक पॉवरफुल देश आशिया बीबीच्या बाजूनं मैदानात उतरले. जेव्हा हा खटला पाकिस्तानी न्यायालयासमोर सुनावणीसाठी येणार होता त्याच्या काही दिवस आधी पाकिस्तान सरकारनं आशिया बीबीची निर्दोष मुक्तता होण्यासाठी पावलं उचलावीत असा अधिकृत ठराव आक्ख्या युरोपीय समुदायानं(ईयू) मांडला. अमेरिकेनंही अशीच भूमिका मांडली आहे. जगातले पॉवरफुल म्हणून ओळखले जाणारे चॅनेल्स – बीबीसी आणि सीएनएन, यांनीही आशिया बीबीची बाजू घेत ही बातमी मांडली. सर्वांच्या बोलण्यातला मुख्य मुद्दा आहे – आशिया बीबीचे मानवाधिकार!

 

आता सर्व कनिष्ठ न्यायालयांनी दिलेले निकाल बाजूला सारत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं आशिया बीबीला देण्यात आलेली शिक्षा रद्द केली. यावरून पाकिस्तानात रस्त्यारस्त्यावर धर्मांध मुस्लिमांची सर्वोच्च न्यायालयाविरोधात आंदोलनं चालू आहेत. आशिया बीबीला देण्यात आलेली देहांताची शिक्षा कायम ठेवावी अशी त्यांची मागणी आहे. एकेकाळचा पाकिस्तान पंजाबचा राज्यपाल सलमान तासीर यानं आशिया बीबीची बाजू घेऊन धर्मस्वातंत्र्याचा मुद्दा मांडला म्हणून त्यांच्या शरीररक्षकानेच त्यांची हत्या केली. हा शरीररक्षक ‘इस्लामचा धर्मयोद्धा’ असल्याच्या आविर्भावात लक्षावधी पाकिस्तानी लोकांनी त्याचा गौरव केला. अर्थातच त्यांच्यात हाफिज सईदचाही समावेश होता.

 

हे वाचताना मला लक्षात येणाऱ्या सर्व गोष्टींमधली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशाचप्रकारे पाकिस्तानी हिंदूंवरही गेली सत्तर वर्षं सतत अत्याचार होत आहेत; त्यांच्यावर दबाव आणून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारान्यास भाग पाडले जात आहे; हिंदू स्त्रियांना पळवून नेऊन, सक्तीनं धर्मांतरं करून मुस्लिमांशी त्यांची लग्नं लावून देण्यात आली आहेत; याविरोधात युरोप, अमेरिकेत, बीबीसी-सीएनएनवर जन्मात कधी अक्षरही येत नाही. जगात नाही आणि भारतातही नाही. सगळं चित्र जणू ती व्यक्ती हिंदू आहे म्हणून तिला मानवाधिकार नाहीत, ती व्यक्ती हिंदू स्त्री असेल तर तिचा धर्मस्वातंत्र्य, मानवाधिकार यांच्याशी काही संबंधच नाही.

 

पाकिस्तानातल्या हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविषयी बोलायचं असेल तर ते भारतानं बोलावं असं जगाला वाटतं. मात्र भारतातल्या सडक्या, विकृत सेक्युलरवादानं ठरवून टाकलं की पाकिस्तानातल्या हिंदूंवर होणारे अत्याचार हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहे. हे ठरवणंदेखील चूक होतं कारण स्वातंत्र्यानंतर लगेच झालेल्या नेहरू-लियाकत करारानुसार दोन्ही देशांनी आपापल्या देशातल्या अल्पसंख्याक नागरिकांचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं. भारतानं ते वाचन पाळलं. पाकिस्ताननं मात्र इतर सर्व वचनांप्रमाणं याही वचनाला हरताळ फासली. भयानक अन्याय, अत्याचार करून गेल्या सत्तर वर्षांत पाकिस्तानातले हिंदू आपल्या डोळ्यादेखत जवळजवळ खतम करण्यात आले. फाळणीनंतरच्या पाकिस्तानची लोकसंख्या चार कोटींहून काही अधिक होती. त्यापैकी हिंदू लोक एक कोटीपेक्षा काही जास्त म्हणजे सुमारे २३ टक्के. आज सत्तर वर्षांनंतर पाकिस्तानची लोकसंख्या साधारण सोळा कोटींच्या आसपास आहे. मात्र त्यातले हिंदू आता केवळ एक टक्क्याच्या आसपास आहेत. म्हणजे सुमारे सोळा लाख हिंदू! आता कुठं काही महिन्यांपूर्वी मुस्लिमेतर (हिंदू आणि शीख) लग्नांना देशात अधिकृत मान्यता देणारं विधेयक पाकिस्तानच्या सभागृहात मान्य झालं. सौ चुहे खाके बिल्ली चली हज! पाकिस्तानातल्या हिंदूंचं आधी धर्मांतर करून झालं; आता जगाला दाखवण्यासाठी हे विधेयक मंजूर करायचं.

 

पाकिस्तानचं काय घेऊन बसलोय? अशाच प्रकारे आधी पूर्व पाकिस्तान आणि १९७१ नंतर भारतामुळेच ज्याला स्वातंत्र्य मिळालं अशा बांग्लादेशातही हिंदूंवर अन्याय, अत्याचार सुरू आहेत. धर्मांतराची सक्ती सुरू आहे. या प्रक्रियेची निर्णायक सुरुवात २५ मार्च १९७१ पासून झाली. शेख मुजिबूर रहमान यांच्या अवामी लीग पक्षानं पाकिस्तानची निवडणूक जिंकली होती. ते स्वतः पाकिस्तानचे पंतप्रधान होणार होते. त्याला पश्चिम पाकिस्तानचा विरोध होता म्हणून रहमान यांनी स्वतंत्र बांगलादेशची घोषणा केली. ती तारीख २५ मार्च १९७१. त्यावेळी पाकिस्ताननं जनरल टिक्का खान याच्या नेतृत्वाखाली ढाक्यासहित बांग्लादेशात पाकिस्तानी सैन्य नेमलं होतं. या टिक्का खानला ‘बलुचिस्तानचा बुचर’ म्हणूनच ओळखलं जातं. त्याला आणि पाकिस्तानी सैन्याला लेखी आदेश होते की बांग्लादेशातल्या हिंदू पुरुषांची कत्तल करा, हिंदू स्त्रियांवर बलात्कार करा. असे लेखी आदेश होते हे मी पुन्हा सांगतोय! या सर्व साक्षी पुराव्यांवर अमेरिकन पत्रकार गॅरी बास यानं ‘ब्लड टेलिग्राम’ नावाचा सुमारे ७०० पानांचा ग्रंथ मांडलेला आहे. अमेरिकेच्या ‘फ्रिडम ऑफ इन्फॉर्मेशन’ कायद्यानुसार अगदी ‘क्लासिफाईड’ कागदपत्रंसुद्धा राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ संपल्यापासूनच्या तीस वर्षांनंतर नागरिकांसाठी खुली असतात. त्यावेळी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता रिचर्ड निक्सन. गॅरी बासनं या कागदपत्रांचा वापर करून हा ग्रंथ मांडला आहे. हिंदूंची कत्तल होत असताना आर्थर ब्लड अमेरिकेचा ढाक्यातला कौन्सल जनरल होता. बांग्लादेशात ‘जेनोसाईड’ चालू आहे, हिंदूंना निवडून त्यांची कत्तल केली जात आहे, स्त्रियांवर बलात्कार होत आहेत हे त्यानं सातत्यानं टेलिग्राम पाठवून राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि परराष्ट्र सचिव किसिंजर यांना कळवलं होतं. तिकडं या दोघांनी साफ कानाडोळा केला. पाकिस्तानच्या मध्यस्तीतून चीनशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून त्यावेळी सुरू होते. अमेरिकेच्या त्यावेळच्या व्यावहारिक राजकारणामुळं बांगलादेशातल्या लक्षावधी हिंदू पुरुषांचा बळी गेला; लक्षावधी हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले. भारतात त्यावेळी एक कोटी बांगलादेशी ‘निर्वासित’ म्हणून आले होते. त्यातले ९७ लाख निर्वासित हिंदू होते. याचीसुद्धा कधी ना दाद, ना फिर्याद. आपण बांगलादेश स्वतंत्र करून दिला. त्याबदल्यात इंदिराजींना डोक्यावर घेऊन नाचलो हे योग्यच. पण नंतरच्या शिमला करारावेळी बांगलादेशात झालेल्या या कत्तलींबद्दल इंदिराजी एका अक्षरानंही बोलल्या नाहीत. खरं म्हणजे तेव्हाच काय, आजही भारतानं पाकिस्तानवर ‘जेनोसाईड’चा खटला दाखल करायला हवा. अंतिमतः, आपल्या डोळ्यासमोर गेल्या सत्तर वर्षांत पाकिस्तान आणि बांगलादेशातला हिंदू खतम होत गेला पण त्यांच्या मानवाधिकाराबद्दल कुठं टिपूससुद्धा गाळलं गेलं नाही.

 

१९४७ मध्ये स्वतंत्र होताना पूर्व पाकिस्तानातल्या (बांगलादेशातल्या) हिंदूंची संख्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे एक तृतीयांश होती. आजच्या तारखेला ती ९ टक्के आहे. पाकिस्तानातल्या हिंदूंवर या प्रकारे अत्याचार झाले हे इम्रान खाननंही मान्य केलं आहे, बांग्लादेशात हिंदूंची कत्तल झाली हे आताच्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही मान्य केलं आहे. हे असलं तरी आजही बांग्लादेशात असे प्रकार सुरूच आहेत. राज्यघटनेनुसार बांग्लादेशही एक इस्लामिक राष्ट्र आहे. इस्लाम हा तिथला अधिकृत धर्म आहे आणि ‘बांगलादेशी हिंदू’ हे तिथले ‘दुय्यम नागरिक’ आहेत.

 

विकृत सेक्युलरवादाच्या नावाखाली मीडियानं गाळलेले अश्रू बघून मला आठवत राहतात काश्मीरमधले पंडित. म्हणजे हिंदू. १९ जानेवारी १९९० या तारखेला हिंदू पंडितांना काश्मीर खोऱ्यातून सांगून हाकलून लावण्यात आलं. जगायचं असेल तर मुसलमान व्हा, झालात तर तुमच्या आया-बहिणी आणि मालमत्ता सुरक्षित राहील अशी नोटीस ४८ तास आधी त्यांना देण्यात आली होती. हे या देशाच्या स्वातंत्र्याच्या ४३ व्या वर्षात आणि राज्यघटनेच्या ४० व्या वर्षात घडत होतं. याविरोधात मीडियासकट कुणी आवाज उठवल्याचं मला तरी आठवत नाही. आवाज उठवणं तर सोडाच, १९९० मध्ये ही घटना घडत असतानाची बरखा दत्त मला आठवते. श्रीनगरमधून ती म्हणतेय – संख्येनं मूठभर असूनसुद्धा इथली संपत्ती काश्मिरी पंडितांच्या हातात एकवटली असल्याच्या रागातून हे सगळं घडत आहे. हा यांचा तथाकथित डावा म्हणून पुरोगामी, विकृत, सेक्युलर-समाजवादी असा युक्तिवाद. आशिया बीबीनं या सगळ्याची आठवण करून दिली इतकंच!

 

लेखक: अविनाश धर्माधिकारी
संपर्क: swatantranagrik@gmail.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *