पहिल्या महायुद्धाची शताब्दी 

११ नोव्हेंबर १९१८. सकाळी अकरा वाजता फ्रान्स आणि जर्मनीच्या सीमारेषेत फ्रान्सच्या बाजूला, जंगलाच्या मध्यभागी असलेल्या कॉम्पीये नावाच्या एका गावात; एका पडक्या रेल्वेच्या डब्यात (तोही तात्पुरता कसाबसा तयार करून घेण्यात आला होता) युद्धबंदी करारावर सह्या झाल्या. जर्मनीनं शरणागती पत्करली आणि पहिल्या महायुद्धाची समाप्ती झाली. आत्ताच्या ११ नोव्हेंबरला उभ्या मानवतेनं त्या घटनेची शताब्दी पूर्ण केली.
पहिल्या महायुद्धात महाभयानक नरसंहार झाला होता तरी जगाची वाटचाल अटळपणे दुसऱ्या महायुद्धाकडं चालू राहिली. आधीचा फिका पडावा असा नरसंहार दुसऱ्या महायुद्धात झाला. त्यात दुसऱ्या महायुद्धाचा शेवट अणुबॉम्बने झाला! आता सुरू असलेल्या अण्वस्त्रस्पर्धेमुळे सर्व मानवी संस्कृतीच नष्ट करून टाकता येईल इकडे आपण यशस्वीरीत्या वाटचाल करून दाखवली. हा शंभर वर्षांचा इतिहास! म्हणून पहिल्या महायुद्धाच्या शेवटाची शताब्दी ‘साजरी केली’ असा शब्द वापरता येणं शक्यच नाही.

शस्त्रास्त्र स्पर्धा, त्यातल्या अण्वस्त्र स्पर्धेमुळं मानवतेनं स्वतः ओढवून घेतलेला सर्वनाश – आत्महत्येच्या किती उंबरठ्यावर आहे हे केवळ लक्षात आणून द्यायला शास्त्रज्ञांनी आता Doomsday clock (सर्वनाशाचं घड्याळ) घड्याळ तयार केलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरची सुपरपॉवर बनण्याची स्पर्धा – महासत्तांची सत्तास्पर्धा – त्यातही अण्वस्त्रस्पर्धा या सर्वांमुळं या घड्याळाची वेळ साधारणपणे ‘बाराला दहा कमी’ अशी असते. या घड्याळात बरोबर बारा वाजल्यास जगाचा सर्वनाश होईल!
शीतयुद्धाच्या काळात ‘क्युबन मिसाईल क्रायसिस’च्यावेळी (नेमकं सांगायचं तर १९ ऑक्टोबर १९६२ या तारखेला) थेट अमेरिका आणि सोव्हियत रशिया यांच्यात अणुयुद्ध होईल, तो आपल्याला समजणाऱ्या मानवी संस्कृतीचा शेवट असेल, या उंबरठ्यावर जग येऊन पोचलं होतं. शास्त्रज्ञांनी तेव्हा doomsday clock ‘बाराला अडीच कमी’वर नेऊन ठेवलं होतं.
आत्ताच्या काही महिन्यांपूर्वी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकण्याच्या धमक्या देत होता. असं काही केल्यास अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाला सांगत होता की पृथ्वीच्या पाठीवरून उत्तर कोरियाच नष्ट करू! धोका सर्व जगाला होता. त्यावेळी शास्त्रज्ञांनी हे doomsday clock ‘बाराला दोन मिनिटं कमी’वर आणून ठेवलं होतं. आजच्या तारखेला तरी ते टळल्यासारखं दिसतं. अणुयुद्ध असो किंवा पर्यावरणाचा नाश असो, मानवतेची वाटचाल आत्महत्येकडं चालू आहे की काय असा धस्स करणारा प्रश्न उरतो.
आता तर पर्यावरणाचा समतोल ‘ढासळलेला’ आहे. काही वर्षांपर्यंत हे चालू वर्तमान काळात बोललं जायचं. म्हणजे पर्यावरणाचा समतोल ‘ढासळतो आहे’. आता मात्र तो ‘ढासळलेला’ आहे. म्हणून रोज जगभर Extreme Weather Events पाहायला मिळत आहेत. महासत्तांची सत्तास्पर्धा, त्यातली अण्वस्त्रस्पर्धा आणि प्रत्येकालाच वाटणं की माझ्यासाठी ती अपरिहार्य आहे या नादात पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची वाटच पाहण्याची गरज नाही, अणुयुद्धापायी जग आत्महत्या करेल अशी काळजात धस्स करणारी शंका वावरताना कायम मनात येते. जगाचा नाश होण्यासाठी प्रत्यक्ष अणुयुद्धही होण्याची गरज नाही; त्याचा अपघातसुद्धा पुरेल. अमेरिकेचं १००० आयलँड्स, सोव्हियत रशियाचं चेर्नोबिल, ११ मार्च २०११ ला जपानमध्ये आलेल्या त्सुनामीत झालेलं फुकुशिमा या सर्व काळजात धस्स करणाऱ्याच गोष्टी आहेत.
पहिल्या महायुद्धाची शताब्दी ‘साजरी करताना’ मानवतेसहित प्रत्येकानं एवढं जरी लक्षात ठेवलं की हा मानवी जन्म आणि संस्कृती अनमोल आहे. मानवानेच महाकष्टानं आत्तापर्यंत इथवर वाटचाल केली आहे. मूर्खपणाच्या एका फटक्यासरशी ते जर उध्वस्त व्हायला नको असेल, आपल्याला एका नव्या भविष्यकाळाकडे वाटचाल करायची असेल तर निदान पहिलं महायुद्ध लक्षात तरी ठेवावं आणि अशी वेळ पुन्हा येणार नाही यासाठी प्रयत्न करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *