निमित्त पुलंच्या  ग्लोबल जन्मशताब्दीचं..

अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून गौरवल्या गेलेल्या पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीसाठी त्यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूस सज्ज झाला आहे. पुलंची मुख्य कर्मभूमी जरी मुंबई व अन्य ठिकाणे असली, तरीही त्यांचे उत्तर आयुष्य पुण्यातच गेले. त्यामुळे पुणेकरांना ते आपलेच आहेत, असे वाटू लागले. त्यातूनच पुण्यातील उत्साही मंडळी एकत्र आली आणि ग्लोबल पुलोत्सवची कल्पना आकाराला आली. यातून पुल हे केवळ महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आहे असे नाही, तर भारत व जगभरातील अनेक शहरांमध्ये राहणार्‍या मराठी माणसांचेही ते तितकेच जवळचे आहेत, असा सकारात्मक संदेश त्यातून पोहोचवला जातो आहे. पुलंसारख्या मराठी साहित्यिकाचा हा कौतुक सोहळा जगभरात साजरा केला जातोय ही नक्कीच आनंदाची व अभिमानाची गाष्ट आहे. यातून जगभरातील मराठी माणसाच्या मनात पुलंची अपूर्वाई अधिक खोलवर रुजायला मदत होईल!

 

येत्या 8 नोव्हेंबर 2018 ते 20 नोव्हेंबर 2019 या एक वर्षात पुलंच्या चित्रपट, नाटक, साहित्य आणि कलेचा जलसा जगभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्याचे मुख्य ठिकाण पुणे शहर आहे. ज्या बालगंधर्वांच्या नावाने पुण्यात रंगमंदिर उभारले व त्याची संकल्पना पुलंच्या मदतीने तत्कालीन पुणे महापालिका आयुक्त भुजंगराव कुलकर्णी यांनी राबवली, त्याच बालगंधर्व रंगमंदिरात ग्लोबल पुलोत्सवाची जंगी सुरुवात होतीय! एक प्रकारे ती पुलंना वाहिलेली आदरांजलीच ठरणार आहे.

 

आशय संस्कृतीकचे सतीश जकातदार आणि विरेंद्र चित्राव म्हणाले की, ग्लोबल पुलोत्सवात पुलंचा परिवार आणि आशय सांस्कृतिक यांच्या वतीने तसेच स्क्वेअर वन या संस्थेच्या सहयोगाने भारतातील सुमारे 20 शहरांमध्ये आणि भारताबाहेरील पाची खंडांतील 30 शहरांत पुण्यभूषण प्रतिष्ठानच्या सहयोगाने पुलोत्सव मोठ्या दिमाखात सादर केला जाणार आहे. (यासाठी पुलंप्रेमी असणारे काही राजकीय नेते आपले वजनही खर्च करणार आहेत.) दोन महिन्यांपूर्वी ग्लोबल पुलोत्सवाच्या लोगोचे किंवा चिन्हाचे प्रकाशन ज्येष्ठ विनोदी साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी करण्यात आले.

 

पुलोत्सवाची पार्श्वभूमी

पुलंची जन्मशताब्दी म्हणजे जगभरातील मराठी मनांचा केवळ आनंदसोहळा नसून साहित्यविश्वातील एक अभूतपूर्व योग आहे. हे विधान काहींना अतिशयोक्त वाटण्याची शक्यता आहे, कारण पुलंच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा सन्मान मिळाला वा त्यांना ज्ञानपीठसारख्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले? पण पुलंची लोकप्रियता ही कोणत्याही पुरस्कारापलिकडे जाणारी व लोकांच्या मनात हृदयात जाऊन भिडलेली होती, हा आयोजकांचा दावाही दुर्लक्षित करून चालणार नाही. ते असो. तर पुलंनी आपल्या अष्टपैलू गुणांनी स्वत: तर कलांचा आस्वाद घेतलाच, पण अनंत हस्तांनी तो आनंद द्विगुणित करत रसिकांवर त्याची उधळण केली. आयोजकांच्या म्हणण्यानुसार जे जे कलासौंदर्य पुलंना भावले त्याचा परिचय त्यांनी करून दिला. पुलं आणि त्यांच्या साहित्यिक पत्नी सुनिताबाई यांचा जी. ए. कुलकर्णीशी घनिष्ठ संबंध आला होता. जीएंच्या काही कथांचे अभिवाचनही पुलं आणि सुनिताबाईंनी पुण्यात जाहीर कार्यक्रमांमधून केले होते. तसेच सुनिताबाई आणि जी. ए. यांचा समृद्ध पत्रव्यवहारही खंड स्वरूपात यापूर्वीच प्रकाशित झाला आहे.

 

पुलोत्सवाचे आयोजक म्हणाले की, ज्यासाठी जगावे अशा अनेक गोष्टींवर पुलंनी स्वत: प्रेम केलेच, पण जगण्याचा आनंद घेण्यासाठी कलेशी मैत्री करणारा आणि संबंधित सर्व कलाप्रकारांना स्पर्श करणारा पुलोत्सव हा एकमेव महोत्सव आहे! ज्या आशय सांस्कृतिक या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या आशयचे पुलं आणि सुनिताबाई केवळ आजीव सदस्य नव्हते तर सक्रिय मार्गदर्शकाची भूमिकाही त्यांनी तेव्हा वेळोवेळी बजावली होती. पुलंच्या 80व्या वाढदिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 1999 रोजी पुण्यात बहुरुपी पुलं या विशेष महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. पुलंचा सदाबहार तरुण असणारा विनोद लक्षात घेऊन पुलंच्या 76व्या वाढदिवशी पुण्यात पुलंचे चौथ्या पंचविशीत पदार्पण! अशा ओळींचे मोठमोठे बोर्ड्स् व होर्डिंगही पुण्यात काही ठिकाणी लागले होते!

 

2001 मध्ये पुलंचे निधन झाल्यावर त्यांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर त्यांचे बहुरुपित्व परावर्तित करणारा पुलोत्सव सुरू करण्याची परवानगी आशयतर्फे सुनिताबाइर्ंंकडे करण्यात आली. पुढे सुनिताबाई हयात असेपर्यंत म्हणजे पुढचे संपूर्ण दशक त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुलोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सुनिताबाईंचा तत्त्वनिष्ठ स्वभाव लक्षात घेता त्या कोणत्या कार्यक्रमास स्वत: कधीच उपस्थित नव्हत्या. प्रसिद्धीपासून त्या कायमच शेवटपर्यंत लांब राहिल्या. त्यांनी स्वत:चे साहित्यिक अस्तित्व पुलंवरील आहे मनोहर तरी.. या आत्मचरित्रातून घडवून दिले! आता सुनिताबाईही नाहीत, पण चांगली गोष्ट म्हणजे ग्लोबल पुलोत्सवात पुलंचा परिवार सहभागी होत आहे.

 

ग्लोबल पुलोत्सवची पूर्वतयारी

गेले सहा माहिने ग्लोबल पुलोत्सवाची पूर्वतयारी चालली होती. यासाठी पुणे, महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्याचा घाट घालण्यात आला. तो दिवस आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे! आठ नोव्हेंबरला ऐन दिवाळीतच ग्लोबल पुलोत्सवाला मोठ्या आनंदाने व उत्साहाने सुरुवात होत आहे. यानिमित्त विविध पातळ्यांवर मान्यवरांची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच पुलंप्रेमी व्यक्ती आणि संस्थांची कार्यसमिती तयार करण्यात आली आहे. यामागे हेतू असा आहे की, विविधरंगी[ कार्यक्रमांमधून स्थानिक कलावंतांना त्यातून आपल्या कला सादर करण्याची संधी मिळावी. आयोजकांच्या अंदाजानुसार ग्लोबल पुलोत्सवात वर्षभरातील कार्यक्र0मांमध्ये मिळून सुमारे 500 कलावंत, साहित्यिक तसेच नामवंत व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून विविध ठिकाणी सहभागी होणार आहेत.

 

आयोजक म्हणाले की, परंपरेनुसार प्रत्येक शहरातील पुलोत्सवात पुलं स्मृती सन्मान, पुलं जीवनगौरव सन्मान, पुलं कृतज्ञता सन्मान आणि पुलं तरुणाई सन्मान प्रदान केले जातील. यानिमित्ताने पुलंवरील दर्जेदार पुस्तक व लघुपटाचीही निर्मिती केली जाणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, पुलं कला अकादमी, जगभरातील महाराष्ट्र मंडळे तसेच मराठी भाषेसाठी कार्यरत संस्थांचाही ग्लोबल पुलोत्सवात जास्तीत जास्त सहभाग असेल, असेच नियोजन केले जाणार आहे.

 

विशेष म्हणजे ग्लोबल पुलोत्सवात बहुरंगी, बहुढंगी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्यामध्ये चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य अशा विविध कलाविषयक कार्यक्रमांची मोठी यादीच सादर केली जाणार आहे. यामध्ये तरुण पिढीशी थेट जोडलेजाण्यासाठी त्यातील कलावंतांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. ग्लोबल पुलोत्सवात पुलंना भावलेल्या चित्रपटांचा एक स्वतंत्र महोत्सवच आयोजित केला जाणार आहे. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या अजरामर नाटकांचे सादरीकरण, त्यांच्या गाजलेल्या अनेक कथांचे सादरीकरण, याशिवाय पुलंनी सादर केलेल्या अभिजात कलाविष्काराचे पुनरुज्जीवन त्यामध्ये अंतर्भूत असेल. या कलाकृतींमध्ये बैठकीची लावणी, रवींद्रनाथ टागोरांची कवितांजली, तसेच बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर यांचे साहित्य व कविता यांचाही त्यात समावेश करण्यात आलेला असेल.

 

आयोजकांनी याशिवाय काही विशेष दृक्-श्राव्य कार्यक्रमांमध्ये गुण गाईन आवडी, बहुरुपी पुलं, पुलंची दैवतं, पुलंची भाषणे हा स्वतंत्र विभागच ठेवला आहे. याच्या जोडीलाच पुलंच्या पुस्तकांचे तसेच सीडींचे एक स्वतंत्र प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. आयोजकांनी पुण्यासह मुंबई, ठाणे, सांगली, मिरज, कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, पिंपरीचिंचवड, बेळगाव, इंदोर, बंगलोर, हैदराबाद आणि दिल्ली या शहरांमध्येही ग्लोबल पुलत्सवाचे आयोजन केले आहे.

 

ग्लोबल पुलत्सवाची सुरुवात पुलंच्या जन्मदिनी येत्या 8 नोव्हेंबर रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत असून त्या पाठोपाठ पाच खंडांमधील 30 शहरांमध्ये हा सोहळा साजरा केला जाणार असल्याचे, पुलं परिवारातील ज्योती ठाकूर, आशय सांस्कृतिकचे विरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. भांडारकर रस्त्याजवळील पुलंचे मालती निवास या त्यांच्या घरापासून सकाळी या कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात होत आहे. त्यामध्ये चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य आणि कला क्षेत्रांमधील गुणीजनांचा मेळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात मुख्य सोहळा संपन्न होत आहे. त्यामध्ये पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ग्लोबल पुलोत्सवाच्या बोधचिन्हाचे अधिकृत अनावरणही करण्यात येणार आहे.

 

पुलंच्या प्रेमातून या सोहळ्यासाठी पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कॉसमॉस बँकेचे संचालक कृष्णकुमार गोयल, पिनॅकल ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गजेंद्र पवार तसेच स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य यांनी मिळून हा सोहळा संपन्न करण्याचे ठरवले आहे. थोडक्यात विविध क्षेत्रातील नामवंत पुणेकरांनी पुलंच्या प्रेमातून या कार्यक्रमासाठी निधी तसेच आयोजनासाठी लागणारे प्रायोजकत्व अशा विविध पातळ्यांवरील जबाबदार्‍या खांद्यावर घेतल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्रात, देशात आणि देशाबाहेरील विविध महाराष्ट्र मंडळात सक्रिय असणारा पुलप्रेमी मराठी माणूसही यासाठी आता सज्ज झाला आहे. ही सर्व पुलंप्रेमी माणसे एकेकाळी पुण्यात, मुंबईत तसेच महाराष्ट्रातील अनेक शहरात जन्मली व वाढलेली आहेत. या सार्‍यांना जोडणारा दुवा म्हणजे ग्लोबल पुलोत्सव ठरणार आहे. यानिमित्त पुलं प्रेमी असणार्‍या तसेच देशभर व जगभरात विखुरलेल्या मराठी जनांचे एक जाळे किंवा नेटवर्किंग किती घनिष्ठ आहे याचा अंदाज येणार आहे.

 

ग्लोबल पुलोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त पुलं कुटुंबियांच्या वतीने वक्ता दशसहस्रेषु हा दुर्मिळ दृक्-श्राव्य ठेवा रसिकांसाठी खुला केला जाणार आहे. सुमारे 75 मिनिटांच्या या लघुपटाचा विशेष खेळ हेच या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या लघुपटातून पुलंची तीन अप्रकाशित भाषणे पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत!

 

चाळीस वर्षांपूर्वी पुलंच्या षष्ट्यब्दी वाढदिवसाचा घाट

 

 

पुलं असताना त्यांच्या साठाव्या वाढदिवशी काही जोरदार कार्यक्रम व्हावा अशी त्यांच्या चाहत्यांची,  मित्रमंडळींची व काही साहित्यिक-प्रकाशकांचीही इच्छा होती. पुलंचे स्नेही नंदा नारळकर, प्रकाशक केशवराव कोठावळे आणि ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांनी हा घाट घातला. 1942 पासून पुलंचे नाव ऐकून असलेले दळवी यांचा संबंध मात्र नंतर त्यांच्याशी आला. त्यांच्या साहित्याने दळवी पुलंच्या अधिक जवळ आले. आपल्याला पुलंचे काही साहित्य खूप आवडले असल्याची कबुलीही दळवी देतात. यातून दळवींना पुलंबद्दल विशेष कुतूहल निर्माण झाले. यातून दळवींनी पुलंचे सर्वच साहित्य वेळोवळी वाचून काढले. दळवी पुढे म्हणतात की, त्यांचे काही साहित्य बिलकुल आवडलेले नाही. त्यांचे काही वाद, शाब्दिक मारामार्‍या पाहून मला अनेकदा आश्चर्य वाटले आहे. परंतु ही सर्व बेरीज-वजाबाकी केल्यानंतरसुद्धा लेखक म्हणून, आणि त्यापेक्षाही माणूस म्हणून माझे त्यांच्याबद्दलचे आकर्षण केवळ वाढले असे नव्हे तर चार दशके टिकलेही!

 

दळवींनी आणि ज्येष्ठ चित्रपट-दिग्दर्शक राम गबाले यांनी पुलंची एक मुलाखत 1978 मध्ये म्हणजे 40 वर्षांपूर्वी दूरदर्शनसाठी घेतली ती या आकर्षणातूनच. पुलंचा तेव्हा वाढत असणारा दबदबा पाहता दळवींनी मुलाखतीसाठी बरीच तयारी केली. त्यांना विचारायचे प्रश्न तयार करताना समीक्षक वा. ल. कुलकर्णी, प्रकाशक श्री. पु. भागवत, लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, विजया राजाध्यक्ष आणि शंकर सारडा यांची मदत घेतली होती. यानिमित्ताने दळवींनी पुलंचे बरेचसे साहित्य पुन्हा एकदा वाचले. मला ते साहित्य पूर्वीइतकेच ताजे-टवटवीत वाटले. 8 नोव्हेंबर 1979 मध्ये पुलंनी वयाची साठ वर्षे पूर्ण केली होती, तेव्हाची ही दळवींची ठळक आठवण आहे! त्यातूनच पुलं एक साठवण या गौरव ग्रंथाची कल्पना पुढे आली.

 

मुलाखतीच्या निमित्ताने दळवींना पुलंची वेगवेगळी अंग काय आहेत हे तपशीलवार जाणून घ्यायचे होते. तेव्हाही पुलंच्या साठीनिमित्त त्यांच्यावर वरील पुस्तक काढावे असे पुणेकर असणारे मॅजिस्टिक प्रकाशनाचे केशवराव कोठावळे यांनी सुचवले. त्याला जोडून पुण्यातच संगीताचे एक दोन कार्यक्रम आयोजित करण्याचेही तेव्हा ठरवण्यात आले होते. त्या कार्यक्रमातून जमणारी रक्कम पु. ल. देशपांडे फाऊंडेशनला द्यायचे ठरले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी पुलंवरील पुस्तकात पुलंची विविध मुद्रांमधली व्यंगचित्रे काढून देण्याचे मान्य केले. दळवी पुढे म्हणतात की, पुलंवरील पुलं एक साठवण हे पुस्तक निघाले, पण संगीताच्या कार्यक्रमातून निधी गोळा करण्याची कल्पना खुद्द पुलंनीच निपटून टाकली! पुलंची तेव्हा भूमिका अशी होती की, असंख्य लोक साठी ओलांडतात, त्यातलाच मी एक. माझा वाढदिवस जाहीरपणे करण्याची गरज नाही. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुणी मोफत गायन करावे आणि लोकांनी तिकिटे काढावीत ही कल्पनाच पुलंना पसंत नव्हती.

 

साठीपर्यंतचे पुलं!

विशेष म्हणजे ‘पुलं एक साठवण’ हे पुस्तकही काढू नये. या पुस्तकाच्या निमित्ताने दळवींच्या लेखनाचा वेळ वाया जाईल, अशी त्यामागे पुलंची कळकळ होती. पण दळवी व कोठावळे यांनी याबाबतीत मात्र पुलंचं काहीही ऐकून घेतलं नाही. तरीही पुलंनी एक अट घातलीच. ते म्हणाले की, हे पुस्तक त्यांच्या वाढदिवसाशी निगडित करायचे नाही आणि त्या दिवशी ते प्रकाशितही करायचे नाही!  पुस्तकाच्या निमित्ताने दळवींच्या लक्षात आले की, पुलंनी तोपर्यंत वेगवेगळ्या तर्‍हांचे लेखन केले होते. ते केवळ विनोदी लेखक आहेत ही त्यांची सार्वत्रिक प्रतिमा बरीचशी एकांगी असल्याचे त्यांना आढळले.  दळवी म्हणतात की, पुलं जेवढे मोठे विनोदकार आहेत, तितकेच ते चिंतक, विचारवंत आणि समाजसुधारणेची आस असलेले मोठे लेखकही आहेत. त्यांच्या लेखक म्हणून असणार्‍या या विविधांगी व्यक्तिमत्त्वाचा आलेख या पुस्तकातून व्यक्त व्हायला हवा. हा आग्रह दळवींचा होता, तो त्यासाठीच.

 

आपल्याला हवे तसे पुलंचे हे सर्जनशील व्यक्तिमत्त्व पुस्तकातून प्रकट व्हावे यासाठी त्यांनी सत्तरच्या दशकातील मराठीतील टीकाकार, कथा- कादंबरीकार, विनोदकार, कवी, संपादक आणि पत्रकार या सार्‍यांच्या शिफारसी मागवल्या. त्यालाही दळवींना भरभरून प्रतिसाद मिळाला! यातून एक लेखक, कलावंत आणि विचारवंत म्हणून पुलंना समकालीन लेखक किती मानतात याचेही एक अदभूत दर्शन दळवींना झाले! बटाट्याची चाळ या एकपात्री निवेदनातले शेवटचे चिंतन अनेकांना भावले होते त्याची शिफारस अनेकांनी यासाठी केली. वास्तविक हे चिंतन काहींना बिलकूल आवडलेले नसून ते उगाचच उबवले आहे अशी टीकाही तेव्हा करण्यात आली होती. पुलंच्या साहित्यातील सर्वात जास्त तुम्हाला काय आवडते असा प्रश्न दळवींनी 40 वर्षांपूर्वी पुलंच्या 80 वर्षे वय असणार्‍या मातोश्री लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे यांना केला. त्यांनी उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रातील शेवटच्या चार ओळी दळवींनी उदघृत केल्या आहेत. लक्ष्मीबाई म्हणतात की, भाईचे लिखाण हा माझ्या जिवाचा विरंगुळा आहे. मन सैरभैर झाले की भाईचे एखादे पुस्तक घेऊन मी वाचत बसते. वाचता वाचता एका वेगळ्याच मुक्त साम्राज्यात गेल्याचा भास होतो व मनाला शांतात प्राप्त होते!

 

दळवी म्हणतात की, पुलं हे स्वत: भरपूर पत्रव्यवहार करणारे असूनही त्यातले एखादे- दुसरे पत्रही त्यांच्या समकालीन प्रसिद्ध लेखकाला लिहिलेले नाही. कारण म्हणे तसा कधी योगच आला नाही. पण गंमत म्हणजे पुलंचा जो पत्रव्यवहार झाला तो नवीन लेखकांशी, दलित लेखकांशी आणि सर्वसामान्य वाचकांशी! जिथे काही नवीन घडते आहे, जिथे सामाजिक जाणिवा दिसताहेत, तिथे दाद देण्यासाठी, समरस होण्यासाठी आणि आपले काही म्हणणे मांडण्यासाठी पुलं मोठ्या उत्साहाने पत्र लिहीत असत. पुलंच्या पत्रांमधून त्यांचा गप्पीष्ट स्वभाव प्रामुख्याने दिसतो.

 

पुलंची कौटुंबिक पार्श्वभूमीही तितकीच रंजक आहे. त्यांचे वडील सामान्य नोकरीत होते. पण हौशी होते. त्यांना गाण्याबजावण्याची व नाटकांची हौस होती. दर आठवड्याला ते सहकुटुंब सहपरिवार  नाटके बघायचे. त्यांना ज्योतिषाचे उत्तम ज्ञान होते.  त्यांनी पुलंचे 32व्या वर्षांपर्यंतचे भविष्य लिहून ठेवले होते. ते भविष्यज्योतिष प्रत्यक्ष हाती लागले तेव्हा पुलं आणि सुनिताबाईंची गाळण उडाली होती, कारण त्यांना वाटले की पुलंचे आयुष्य 32 वर्षांपर्यंतच आहे! वडिलांना पुलंचे 32व्या वर्षांपुढचे भविष्य लिहायला सवडच मिळाली नव्हती, हे त्यामागचे खरे कारण. पुलंच्या वडिलांनी मृत्यूसमयी पुलंच्या आईला जवळ बोलावले आणि सांगितले की, तू याचे मोठे मानसन्मान बघशील, मला मात्र काहीच दिसणार नाही.

 

वडिलांच्या निधनानंतर पुलंनी मुंबई सोडली व शिक्षण आणि नोकरीसाठी खूप धडपड केली. किरकोळ नोकर्‍या व नाटकात आणि चित्रपटात कामे केली. ते तेव्हाही चित्रपटासाठी लेखन करीत थोडीबहुत कमाई करत होते. 1950 मध्ये चिंतामणराव कोल्हटकरांकडे त्यांनी नाट्यकलेचे धडे घेतले तसेच कॉलेज शिक्षणही पूर्ण केले. सांगलीला ते कवी गिरीश यांच्याकडे राहून त्यांनी एम्. ए. पूर्ण केले. पुण्याला परत गेल्यावर सबकुछ पुलंचा असणारा गुळाचा गणपती हा सिनेमा तेव्हा खूप गाजला. पण त्या चित्रपटाच्या खेळासाठी पुलंना साधे निमंत्रणही देण्यात आले नव्हते. त्यांनी, सुनिताबाई व म. वि. राजाध्यक्ष यांनी तिकीट काढून तो थेटरात पाहिला. तोच त्यांचा शेवटचा सिनेमा! पुढे बेळगावच्या राणी पार्वतीदेवी कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कॉलेजात लोकप्रिय झाले होते.  पण त्यांचे कॉलेजच्या चालकांशी पटले नाही. मग  ते मुंबईत कीर्ती कॉलेजात शिकवू लागले.

 

नंतर आकाशवाणीवर पुणे, मुंबई आणि दिल्लीत. त्यांनी दूरदर्शन प्रक्षेपणावर अभ्यास करण्यासाठी लंडन येथे प्रशिक्षण घेतले. दिल्लीत परत आल्यावर देशातील पहिला दूरदर्शन कार्यक्रम सादर करण्याचा मान त्यांना मिळाला. पण नोकरीच्या बाबतीत पुलं कोठेही स्थिर राहिले नाहीत. एखाद्या भटक्याप्रमाणे पुलंनी नोकर्‍यांपाठोपाठ नोकर्‍या बदलल्या. याच काळात त्यांनी सादर केलेले एकपात्री व बहुपात्री कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, वार्‍यावरची वरात आणि वटवट हे सर्वच कार्यक्रम खूप गाजले. यात त्यांना बर्‍यापैकी पैसा मिळाला. पण या पैशाची चैन न करता त्यांनी त्या पैशाचा ट्रस्ट करून तो पैसा सार्वजनिक सेवाकार्यासाठी दिला. अनाथ विद्यार्थी गृह, अंधशाळा, बाबा आमटे यांचा कुष्ठाश्रम अशा अनेक संस्थांना त्यांनी मुक्तहस्ते मदत केली. पुलंनी पैशाचा हव्यास कधीच धरला नाही. तसेच एखाद्या संस्थेला अमुक मदत केली अशी टिमकीही वाजवली नाही. मध्यमवर्गीय माणसाला शोभेल अशीच जीवनशैली त्यांनी ठेवली.

 

दळवी म्हणतात की, पुलंना आजवर जो वाचकवर्ग, श्रोतृवर्ग, प्रेक्षकवर्ग लाभला आहे तसा तो अन्य कुठल्याही मराठी लेखकाला लाभला नाही. पुलंना जवळून पाहणारे म. वि. राजाध्यक्ष म्हणतात की, त्यांचा स्वभाव हा मुळातच भारून जाण्याचा आहे. बालगंधर्व कुठेही दिसले की पुलं भक्तिभावाने वाकून नमस्कार करीत. परदेशात असताना त्यांना एका थिएटरमधून दुरून चार्ली चॅपलीन दिसले. त्याच क्षणी पुलंच्या डोळ्यात एकदम पाणी आले व त्यांनी दुरूनच त्यांना हात जोडून नमस्कार केला. आधुनिक विचारांचे पुलं गं. बा. सरदारांच्या प्रभावाखाली वाढले. अर्थात त्यांच्या वृत्तीत मात्र थोडी धरसोड आहे असे राजाध्यक्षांचे म्हणणे आहे! 1942 मध्ये ते राष्ट्र सेवा दलात समाजवादी पक्षाच्या बाजूने होते. पुढे त्यांच्यात विसंगती दिसताच त्यांनी समाजवादी हा चेष्टेचा विषय बनवला!

 

फटाफट विनोद फोडून हशे घेणे यात पुलंचा हातखंडा होता. खरे म्हणजे त्यांनी असे तडकाफडकी केलेले विनोद जमवून त्याचे पुस्तक प्रसिद्ध व्हायला हवे होते. याच्या जोडीला अनेकदा लहान पोराला शोभेल असा व्रात्यपणाही ते वय विसरून करत. असे हे एकूण गमतीदार आणि तेवढेच विलोभनीय अस  रंगीबेरंगी व्यक्तिमत्त्व होते.

 

ग्लोबल पुलोत्सवाच्या निमित्ताने आज आपल्यात नसलेले व 40 वर्षांपूर्वी वयाच्या साठीतले पुलं आणि त्यांचे मराठी माणसाला वाटणारे कौतुक हे दोन्हीही आपल्या डोळ्यांपुढे यावे असे वाटले. सुदैवाने मला स्वत:ला पुलंची अनेक विषयांवरील भाषणे ऐकण्याचा योग शाळेत व पुढे महाविद्यालयीन जीवनात आला. 1975 मध्ये देशावर लादलेल्या आणिबाणीत शनिवारवाड्यासमोर जोरदार आवेशात भाषण करणारे पुलंही मला चांगले आठवतात. त्यांच्या प्रचार सभांना होत असणारी प्रचंड गर्दी पाहून सत्तेवरील काँग्रेस नेत्यांनी विदूषक म्हणाले.  पण पुलंनी विदूषकाची ती टोपी तितक्याच निर्लेपपणे निवडणुकीनंतर काढून टाकली!

 

पुलं आज वयाच्या शंभरीत असते तर त्यांना ग्लोबल पुलोत्सवाचे अप्रूप वाटले असते का नाही ते माहीत नाही. पण त्यांच्यावर प्रेम करणार्‍या मराठी माणसाला तो आनंद मिळत असेल तर तो त्यांना मिळायला हवा.

 

लेखक: विवेक सबनीस
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *