दोन्ही मार्गांनी कैलास-मानस (भाग १)
दोन्ही मार्गांनी कैलास-मानस आयुष्यात एकदा तरी जाऊन यावंच अशा काही ठिकाणांपैकी खूप वरच्या स्थानावर माझ्या यादीत कधीपासून होतं ‘कैलास-मानस’. आपल्याला ती यात्रा आणि त्यातलीही विशेषत: कैलास परिक्रमा जमेल का अशी एक भीतीही होती. या ठिकाणी खासगी दौरा तर करता येत नाही, त्यामुळे कोणत्या प्रवासी संस्थेबरोबर जावं असेही खूप पर्याय तपासले. भारत सरकार परराष्ट्र मंत्रालयातर्फे दरवर्षी ही यात्रा आयोजित करतं हे माहीत होतं. ओळखीच्या काही जणांनी ती केल्याचंही माहीत होतं. त्यांनी लिहिलेले अनुभव वाचलेले होते. आणि त्यामुळेच जास्त भीती होती ती दिल्लीत आधी घेतल्या जाणार्या वैद्यकीय चाचण्यांची. वयाच्या आता या टप्प्यावर मागे लागलेलं मधुमेहासारखं झेंगट नियंत्रणात असलं तरी टळण्यासारखं नव्हतं. त्यामुळे त्या चाचण्यांमध्ये आपण नाकारले जाऊ ही भीती होती.
खासगी प्रवासी संस्थेचा अनुभव :
म्हणून एका खासगी प्रवासी संस्थेचा पर्याय आधी निवडला 2016 साली. तिथे वैद्यकीय चाचण्या, त्यातून निवड असली काही नगड नसते असं कळल्यामुळे तो विचार केला होता. दिल्लीस्थित ही प्रवासी संस्था एका नेपाळी प्रवासी संस्थेबरोबर एकत्रितपणे ही यात्रा आयोजित करणार होती. या मार्गावर काही गिर्यारोहण नसतं, शिवाय ती यात्रा कमी दिवसांत पूर्ण करता येते… अशाही गोष्टी सोयीच्या वाटल्या होत्या. खर्च मात्र तिथे जरा जास्तच होता. त्यांच्याकडे आमची दोघांची नोंदणी केली, सर्व पैसेही भरून झाले. नोंदणी घेतानाच ते तुमच्याकडून एका वचनावर सही घेतात ज्यात म्हटलेलं असतं की ‘त्या वर्षी चिनी सरकारने जर यातली कोणतीही परवानगी नाकारली तर ते आम्हाला मान्य असेल.’ सर्वसाधारणपणे असे प्रकार हा एक नियमाचा भाग असतो म्हणून हीही स्वाक्षरी दिली होती. ऑगस्टमध्ये यात्रा निघणार होती तर त्यांच्याकडून खरंच जुलै महिन्यात निरोप आला की यंदा चिनी सरकारनं कैलास परिक्रमेला परवानगी नाकारलेली आहे. शिवाय नेपाळ-तिबेटला झांगमू-कोदारी या ठिकाणांना रस्त्याने जोडणारा ‘फ्रेंडशिप ब्रिज’ यंदा बंद असल्यानं तिबेटमध्ये प्रवेशासाठी आपण हेलिकॉप्टर वापरणार आहोत असंही त्यांनी कळवलं. थोडक्यात काय, यात्रा 5 दिवसांनी कमी होणार, तरीही एकूण खर्च कमी तर होणारच नाही उलट हेलिकॉप्टरच्या खर्चाचे दरडोई 50 हजार जास्तीचे भरावे लागणार आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे इतकं लांब जाऊन कैलास परिक्रमा करताच येणार नाही. खूपच हिरमोड झाला. पण एकदम लक्षात आलं आणि परराष्ट्र खात्याकडे कैलास परिक्रमेबद्दल चौकशी केली. तर कळलं की महिनाभरापूर्वीच सुरू झालेल्या त्यांच्या बॅचेसपैकी बहुतेक सर्वांनी कैलास परिक्रमा केलेली होती आणि चिन्यांनी असली काही बंधनं कोणावरच घातलेली नाहीत. एव्हाना गेल्या 22 वर्षांच्या कामात आता चाणक्य मंडल परिवारचे ‘कार्यकर्ता अधिकारी’ सगळीकडेच खूप महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्याकडून कळलं की खासगी प्रवासी संस्थांचे हेच लोकांना नाडण्याचे मार्ग असतात. त्यांना कोणत्याही कारणानी जे सोयीचं नाही ते खरी-खोटी वाट्टेल ती कारणं सांगून टाळायचं आणि तरीही पैसा उकळायचा. अर्थातच याला काही अपवाद असू शकतील. वेळेवरच हे कळल्यामुळे या प्रवासी संस्थेच्याच एका नियमाचा पटकन् फायदा घेतला आणि पुरेशी आधी आमची नोंदणी रद्द करून संपूर्ण रकमेचा परतावा घेतला.
दिल्लीतल्या वैद्यकीय चाचण्यांची भीती :
आता पर्याय उरला Delhi heart & Lung Institute इथे होणार्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होऊनच परराष्ट्र मंत्रालयातर्फे यात्रा करण्याचा. यंदाची परराष्ट्र मंत्रालयातली नोंदणीची मुदत तर संपून गेली होती. आता 2017 च्या जानेवारीत पुन्हा तिथली नोंदणी सुरू होणार होती. मग खाण्यापिण्याची सगळी पथ्यं कडकपणे पाळायला सुरुवात केली. मधुमेहावरचं एक वेगळं डाएट मी करत होते ते आम्ही दोघंही करायला लागलो, अगदी न चुकवता. कारण डोळ्यासमोर आता ध्येय होतं कैलास-मानस यात्रेचं. मध्यंतरी कोणत्या तरी निमित्तानं दिल्लीत जाणं झालं तर त्याच विशिष्ट इस्पितळात जाऊन त्याच वैद्यकीय चाचण्या आम्ही करून घेतल्या. त्यातली PFT (Pulmonary Functions Tests) नावाची चाचणीच सर्वांत महत्त्वाची असते. या चाचणीसाठी संगणकाला जोडलेल्या एका लांब पोकळ नळीतून तुम्ही तोंडानं प्राणवायू ओढायचा असतो आणि नंतर जोरात एकदम सोडायचा असतो. मग त्यातून संगणकावर त्याचा एक आलेख तयार होतो. हे तंत्र अनेकांना जमत नाही. तुमची ही चाचणी घेणारा माणूस त्यामुळे आधीच वैतागलेला असतो आणि जोरात ओरडून सूचना देत असतो, ‘खिंचो, खिंचो… छोडो…’ यानं आणखी ताणात भर पडून ज्याला जमत नाही त्याला अजिबातच जमत नाही. शिवाय आपल्याला हे जमलं नाही तर नाकारले जाऊ का ही भीती सुद्धा प्रत्येकाला असतेच. पण ही चाचणी जर जमली नाही तर तुम्ही आणखी अडीच हजार रुपये भरायचे असतात. मग तुमची थोडंसं पळण्याची आणखी एक ‘ट्रेडमिल टेस्ट’ घेतली जाते. त्यात पुढे बहुतेक सगळे जण पास होतात. दोन्ही वर्षी माझी PFT पहिल्याच फटक्याला जमली. पण दोन्ही वर्षी मी खूप लोकांची ही चाचणी न जमल्यानं झालेली गंमत बघितली.
7/8 महिने आधीच जाऊन या चाचण्या आम्ही करून घेतल्या त्यामुळे इस्पितळात डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. तिथल्या डॉक्टरीण बाई म्हणाल्या, पण आत्ता कुठे यात्रा जातेय? म्हटलं आत्ता जाणारच नाही, पण तेव्हा नापास होण्याची भीती वाटते म्हणून म्हटलं बघू तर खरं या चाचण्या काय असतात ते. आम्ही दोघंही, विशेषत: मी अगदी सहजच सर्व चाचण्या उत्तीर्ण झाले. आता आणखी हुरूप आला होता. डॉक्टरीण बाई म्हणाल्या, हं पण आत्ताचे रिपोर्टस् तेव्हासाठी चालणार नाहीत बरं! माझी मात्र काळजी कमी झाली होती. त्या डॉक्टरीण बाईंनाही बहुधा अशी केस नवीन होती. त्यामुळे त्यांनी माझं नाव अगदी लक्षात ठेवलं होतं. यंदाही मला चाचण्यांच्या वेळी त्यांनी ओळखलं. खरंतर डाएट कंट्रोल खेरीज वेगळा कोणताच सराव आम्ही केला नव्हता.
पहिल्या दौर्याला निघताना खरेदी केली अनेक वस्तूंची. ‘डेकॅथलॉन’ या एकाच दुकानात सगळी खरेदी पूर्ण झाली. पुढे यात्रेतही बघितलं, सगळ्यांच्या वस्तू याच दुकानातल्या होत्या. गिर्यारोहणाला लागणारं सगळं साहित्य इथं आपली गरज भागवतं. आमच्या खरेदीत मुख्यत: पिसाची जाकिटं, रेनकोट, ओले न होणारे बूट, बर्फातले चष्मे, पाठीवरच्या सॅक्स, डोक्याला लावण्याचे टॉर्च आणि घडीच्या काठ्या ह्या वस्तू होत्या. आता यंदाच्या दुसर्या दौर्याला काहीच वेगळी तयारी करावी लागली नाही.
आधीच्या तिबेट दौर्यातला ‘माउंटन सिकनेस’ :
वैद्यकीय चाचण्यांबद्दलच्या माझ्या काळजीला आणखी एक जुना इतिहासही होता. तो म्हणजे 2013 साली आम्ही दोघं आणि माझी बहीण- मेव्हणा असे चौघं जण एकदा तिबेट दर्शन करून आलो होतो. तेव्हा तर मी कोणतंही डाएट करत नव्हते आणि पूर्णपणानी डाएबिटिक होते. संपूर्ण तिबेटचं पठारच 11/12 हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे. तेव्हा आम्ही ल्हासा, ग्यांग्झे, शिगात्से आणि एव्हरेस्ट बेस कँप (17,056 फूट) असा सगळा दौरा केला होता. त्या दौर्यात एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या आधीच्या ठिकाणीच, म्हणजे सुमारे 15 हजार फुटांवरच मला ‘माउंटन सिकनेस’चा त्रास झाला होता. रात्रभर भयानक डोकं दुखलं आणि अखेर पहाटे तिथल्या इस्पितळात जाऊन अर्धा तास ऑक्सिजन घ्यावा लागला होता तेव्हा कुठे बरं वाटलं. तरीही डॉक्टरांचा सल्ला धुडकावून लावून पुढे आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत गेलो होतो तो भाग निराळा. सोबत प्राणवायूच्या नळकांड्या घेतल्या आणि त्या हुंगत हुंगत मी पुढे गेले होते. कारण मी तेवढी हट्टी आहेच. शिवाय एव्हरेस्ट शिखर बघण्यासाठी केलेला एवढा आटापिटा मी वाया जाऊ देणार नव्हते. पण आता कैलास-मानस दौर्यात काही होऊ नये म्हणून मी अधिक काळजी घेत होते.
(क्रमशः)