दोन्ही मार्गांनी कैलास-मानस (भाग २)

परराष्ट्र मंत्रालयातर्फे जाणार्‍या यात्रेच्या दोन वाटा :

गेल्या वर्षी 2017 मध्ये आम्ही दोघांनीही कैलास- मानसरोवर यात्रा पूर्ण केली ती लिपुलेख खिंडीतून, म्हणजे उत्तराखंडमधून जाणार्‍या रस्त्यानं. एकूणच हिमालयातल्या या सर्व ठिकाणांची मला एवढी ओढ आहे की एकदा जाऊन माझं समाधान कधीच होत नाही. हिमालयातली चारधाम यात्रा सुद्धा मी अशीच दोनदा केलेली आहे. गेल्या वर्षी जाऊनही वाटलं की या यात्रेची अजून एक संपूर्ण वेगळी वाट आहे तिथनंही गेलं पाहिजे. यंदाही मंत्रालयातर्फे आमची नावं प्रतीक्षा यादीत होती. आम्ही काहीच पाठपुरावा केला नव्हता. बॅचेस जाणं संपत आलं तेव्हा अचानक एक दिवशी दिल्लीहून फोन आला की जागा आहे, जायचंय का? तोपर्यंत अविनाश धर्माधिकारींचे इथले अनेक कार्यक्रम ठरलेले होते आणि ते बदलणं शक्य नव्हतं. माझी कामं इतर काही जणांनी करण्यासारखी होती. मग मी एकटीनंच जायचं असं ठरलं. कैलास- मानसची ही दुसरी वाट नथुला खिंडीतून जाणारी, म्हणजे सिक्किममधून जाणारी आहे. याच वाटेनं चौदावे दलाई लामा तिबेटमधून निसटून 1959 साली भारतात आलेले आहेत. या दोन्ही वाटांच्या मध्ये आख्खा नेपाळ येतो. एक वाट जाते नेपाळच्या डाव्या अंगानी आणि दुसरी उजव्या अंगानी. या दोन्ही मार्गांनी ही यात्रा पूर्ण करण्याचं भाग्य मला लाभलं. खासगी प्रवासी संस्था भारत आणि तिबेटच्या मध्ये नेपाळ या आणखी एका देशाला घेऊन तिथून ही यात्रा आयोजित करतात. पण भारतीय परराष्ट्र खात्यातर्फे आणखी कोणत्याही तिसर्‍या देशाला मध्ये न घेता जिथे भारत आणि तिबेट सीमा थेट भिडतात अशाच ठिकाणांहून ही यात्रा अयोजित केली जाते.

 

पूर्वापार चोखाळले गेलेले मार्ग :

तिबेटमधल्या या काही ठिकाणी यात्रा करणार्‍या भारतीयांच्या पूर्वापार चालत आलेल्या आणखीही काही वाटा आहेत. उदाहरणार्थ लडाखमधूनही कैलास-मानसला जाणारी एक वाट आहे. हा भव्य हिमालय भेदून पलिकडे तिबेटमध्ये जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या ऋषिमुनींनी, असंख्य यात्रेकरूंनी आणि व्यापार्‍यांनी सुद्धा फार पूर्वीपासून ते चोखाळलेले आहेत. पण याचा कशाचाच अभ्यास नव्हता म्हणून की काय, 1962 साली चिनी सैन्य हिमालय भेदून भारतात कसं काय घुसलं, याचा एवढा धक्का अनेकांना का बसला हे न कळे. आणि निदान 1950 साली चीननं तिबेट गिळंकृत केल्यानंतर सुद्धा आपण या वाटांचा बंदोबस्त करायला जागे कसे झालो नव्हतो हे एक कोडंच आहे. तिबेट दौर्‍याला गेल्यावर आपसूकच नेहरूंच्या या ‘‘हिमालयन ब्लंडर’’ला आपण नकळत पुन्हापुन्हा शिव्या घालतो. चीनला शिव्या घालणं यासाठी आपल्याला वेगळं काही करावंच लागत नाही.

 

सावधगिरीच्या सूचना :

हा अनुभव येत असल्यामुळेच बहुधा निघण्यापूर्वी Ministry of External Affairs (MEA) म्हणजे विदेश मंत्रालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाच्या दिल्लीतल्या ‘पॉश’’ हॉलमध्ये यात्रेकरूंच्या ज्या बैठकी होतात त्यात अशा प्रकारचं तिकडे जाऊन काहीही बोलू नका, ही सक्त ताकीद दिली जाते. दिल्लीतल्या या मीडिया ब्रीफिंग सेंटरमध्ये लावलेल्या दिमाखदार तिरंग्यांच्या ओळीसमोर आपला फोटो काढून घेण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. इथपासूनच सर्व अधिकारी आणि यात्रेकरू एकमेकांना ‘‘ॐ नम: शिवाय’’ असं अभिवादन करायला लागतात. Good morning, good night हॅलो, नमस्ते… सगळं काही म्हणजे ‘‘ॐ नम: शिवाय’’. तिबेटमध्ये भेटणार्‍या चिनी अधिकार्‍यांना आणि तिबेटी घोडेवाले- भारवाहकांनाही आता हे माहीत झालंय. त्यामुळे भाषा कळली नाही तरी ते आमच्यासमोरून जाताना म्हणतात ‘‘ॐ नम: शिवाय’’. पण दिल्लीत मंत्रालयातली गेल्या वर्षीची अशीच बैठक घेणारा केंद्र सरकारचा एक अधिकारी ख्रिश्‍चन होता. तो मात्र एकदाही हे शब्द बोलला नाही.

 

या बैठकीत सांगितलं जातं – तुच्या भोवती चिनी प्रतिनिधी पेरलेले असतील, ते आपल्याला तुमच्या बोलण्यातलं काही समजत नाही असं ढोंग करतील, पण खरंतर त्यांना सगळं समजत असतं… वगैरे वगैरे सूचना दिल्या जातात. चिनी सैनिकांचे फोटो काढू नका, ते तुचे कॅमेरे तपासतील, असं काही आढळलं तर कदाचित जप्तही करतील, त्यामुळे त्यांच्या हाती लागू नयेत म्हणून भारतीय सैनिकी तळांचेही फोटो घेऊ नका, दलाई लामांचं तर नाव सुद्धा काढू नका… अशा अनेक सूचना तिथे मिळतात. दलाई लामा एकच असतात आणि भारतात आहेत ते सध्याचे चौदावे दलाई लामा आहेत.

 

या यात्रेची जबाबदारी ITEP वर :

ही यात्रा सुरक्षितपणे पार पाडायची जबाबदारी दोन्ही मार्गांवर भारत सरकारनं ITBP (Indo- Tibetan Border Police) कडे दिलेली आहे. दिल्लीच्या इस्पितळानं जरी चाचण्या केलेल्या  असल्या तरी त्या यात्रेकरूला यात्रेला जाऊ द्यायचं की नाही हा निर्णय ITBP च्या डॉक्टरांच्या हातात असतो. त्यांचं ‘‘बेस हॉस्पिटल’’ दिल्लीत आहे. तिथे ते यात्रेकरूंची पहिली बैठक घेतात. त्याखेरीज लिपुलेख मार्गानं जाणार्‍यांना आधी धारचुलामध्ये, मग नंतर मिर्थी या ठिकाणी आणि नथुला मार्गानं जाणार्‍यांना गंगटोकमध्ये पुन्हा एकदा अति उंचीवरच्या धोक्यांच्या सूचना देतात. मिर्थीमध्ये ITBP च्या एका अधिकार्‍यानं आम्हाला अति उंचीवरच्या गिर्यारोहणाबद्दल एक काव्यात्मक युक्ती सांगितली –

पेट में रोटी, हाथ में सोटी

कदम छोटी छोटी, चढ जाओगे चोटी…’

लिपुलेखमार्गे जाणार्‍या यात्रेकरूंच्या बरोबर भारतीय हद्दीतल्या संपूर्ण वाटेवर NDRF (National Disaster Response Force)चे जवान असतात. खूप दमलेल्या यात्रेकरूचं सामान उचलून घेण्यापासून ते अवघड वाटेवरून त्यांचे हात पकडून पुढे नेण्यापर्यंत सर्व गोष्टीत ते मदत करतात. तसंच शासकीय गिर्यारोहण संस्थांचे प्रशिक्षित गिर्यारोहकही यात्रेकरूंच्या मदतीला असतात.

 

चिन्यांच्या बाबतीत घेण्याच्या सावधगिरीसाठी कॅमेरा असणारे बहुतेक सर्व यात्रेकरू त्यामुळे सीमा ओलांडण्याच्या आधीच्या मुक्कामावर कॅमेर्‍यातलं तिथपर्यंतचं वापरलेलं कार्ड काढून ITBP च्या अधिकार्‍यांकडे देतात आणि येताना परत घेतात. माझा मोठा कॅमेरा असल्यानं गेल्या वर्षी त्यांनी तकलाकोटमध्ये तो तपासला होता. तर नवीन टाकलेलं कार्ड रिकामं आढळलं. त्यांनी मला असं कसं म्हणून विचारलं सुद्धा. मी सांगितलं, इथपर्यंतचा देश आमचाच असल्यानं तो आमचा नेहमीचाच आहे, म्हणून मी आत्तापर्यंत काही फोटो काढलेच नाहीत. त्यांना संशयास्पद वाटलं असेल कदाचित, पण ते मला आधी फोटो का नाही काढले असं तर विचारू शकत नव्हते. यंदा माझ्या कॅमेर्‍याला त्यांनी हात सुद्धा लावला नाही. माझा धाक तिथपर्यंतही पोचला होता बहुधा! चाणक्य मंडल परिवारच्या पुण्यातल्या वारजे इथल्या वास्तूचं लोकार्पण दलाई लामांच्या हस्ते झालेलं असल्यानं आमचे त्यांच्याबरोबरचे काही फोटो अविनाश धर्माधिकारींच्या मोबाईलमध्ये गेल्या वर्षी होते. आणि काही तरी तांत्रिक अडचणीमुळे ते पुसले जात नव्हते. पण सुदैवानं चिन्यांनी त्यांचा मोबाईल तपासलाच नव्हता. इतर काही जणांचे मोबाईल मात्र त्यांनी दोन्ही वर्षी बघायला मागून तपासले. आणि त्यातले फोटो बघून ते परत दिले होते.

 

लेखक: सौ. पूर्णा धर्माधिकारी
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *