ट्रेन-18

भारतात 1988 साली शताब्दी एक्स्प्रेस सुरू झाली. आतापर्यंत भारतीय रेल्वेची शताब्दी एक्स्प्रेस सर्वात वेगवान गाडी समजली जाते. आता शताब्दीला वेग, सोयी, दर, सेवा ह्या सर्वच घटकांत मागे टाकणारी ‘‘ट्रेन-18’ इंजिनविरहित ट्रेन, चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीने निर्माण केली आहे. गेल्या 29 ऑक्टोबरला ही रेल्वे बरेली-मुरादाबाद ह्या मार्गावर धावली. ट्रेन-18 ला भारतीय रेल्वेचे पुढचे पाऊल म्हटले जात आहे. कारण बर्‍याच बाबतीत ही गाडी इतर रेल्वेगाड्यांपेक्षा वेगळी असणार आहे.  ट्रेन-18, ट्रेन-20 आणि भारतीय रेल्वेच्या काही महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती आपण प्रस्तुत लेखात करून घेणार आहोत.

 

काय आहे ट्रेन-18?

चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीने तयार केलेली इंजिनविरहित रेल्वेगाडी म्हणजे ट्रेन-18. निर्धारित वेळेपेक्षा निम्म्या वेळेत म्हणजे फक्त अठरा महिन्यांत ही रेल्वेगाडी इंटेग्रल कोच फॅक्टरीने तयार करून दाखवली, म्हणून ह्या गाडीला ट्रेन-18 नाव देण्यात आले. ह्या रेल्वेला इंजिनविरहित म्हटले जात असले तरी तिला इंजिन नाही असा त्याचा अर्थ होत नाही. ह्या गाडीचे इंजिन तिच्या चाकांजवळ बसवलेले असते, म्हणून इंजिन स्वतंत्र जागा घेत नाही आणि गाडीचे इंजिन असूनही दिसत नाही. ही पद्धत मेट्रोमध्ये देखील वापरली जाते. मात्र, भारतात मेट्रो महानगरांतर्गतच धावतात पण ही रेल्वेगाडी दिल्ली- भोपाळ, मुंबई-दिल्ली यांसारख्या लांब पल्ल्यांच्या मार्गांवर धावणार आहे. भविष्यात शताब्दी एक्स्प्रेसला पर्याय म्हणून ट्रेन-18 चा वापर होईल, असे समजते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेन-18 संपूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. ही ट्रेन भारताच्या मेक इन इंडिया प्रकल्पांतर्गत भारतीय कंपनीनेच बनवली आहे.

 

जुन्या रेल्वे गाड्यांपेक्षा वेगळे काय?

ट्रेन-18 ला सोळा डब्बे असणार आहेत. यातील एक्सअ‍ॅक्टिव्ह डब्यातले 52 आसने गाडीच्या धावण्याच्या दिशेने फिरवता येणार आहेत. ही गाडी इतर रेल्वेगाड्यांपेक्षा जास्त सुरक्षित असणार आहे. स्वयंचलित दारे आणि पट्टीच्या स्वरूपात पुढे-मागे सरकणार्‍या पायर्‍या असल्यामुळे ह्या गाडीतून पडण्याची किंवा पायरीवरून पाय घसरून तो फसण्याची शक्यता अतिशय कमी आहे. ह्या गाडीच्या दोन्ही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे सर्व प्रवासी गाडीत चढले की नाही ते चालकाला समजेल आणि त्यांनंतरच तो गाडी चालवायला सुरुवात करेल. ट्रेन-18 मध्ये टॉक बॅक युनिटची सुविधा देण्यात आली आहे. ह्या सुविधेचा वापर करून प्रवासी चालकाशी किंवा इतर रेल्वे कर्मचार्‍यांशी संपर्क साधू शकतील. तसेच प्रवाशांना थेट चालकाचा कक्ष दिसेल अशा पद्धतीने रेल्वेची रचना करण्यात आली आहे. सामान्यतः रेल्वेगाडीला वेग पकडायला आणि थांबायला देखील फार वेळ लागतो, असे आपल्याला दिसते. परंतु ट्रेन-18 मध्ये अतिशय लवकर वेग पकडण्यासाठीचे व तत्परतेने ब्रेक लावण्यासाठीचे तंत्रज्ञान वापरलेले आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे विविध स्थानकांवर रेल्वेगाडी थांबताना आणि निघतांना जाणारा वेळ वाचणार आहे. ही रेल्वे शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा प्रवासाचा वेळ 15% ने कमी करणार आहे. ट्रेन-18 ची लाईफसायकल कॉस्ट शताब्दी एक्स्प्रेसपेक्षा 20% ने कमी असणार आहे. तसेच T-18 ला धावण्यासाठी शताब्दीपेक्षा कमी ऊर्जा लागणार आहे. ह्या रेल्वेला दोन्ही बाजूस चालक-कक्ष असणार आहे. ह्यामुळे रेल्वे स्थानकावर आल्यानंतर जर तिला परत आलेल्या दिशेलाच जायचे असेल तर लगेचच जाता येईल. थोडक्यात रेल्वेचा Turn Around Time कमी होईल.

 

रेल्वे मंत्रालयाच्या काही महत्त्वाकांक्षी योजना

ट्रेन-18 नंतर तिच्यापेक्षा जास्त चांगली ‘ट्रेन-20’ रेल्वेगाडी इंटेग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई 2020 पर्यंत तयार करणार आहेत. तसेच ऑगस्ट 2020 पर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प जपानच्या मदतीने केंद्र सरकार पूर्ण करणार आहे. ही बुलेट ट्रेन सुरू झाल्यास मुंबई-अहमदाबाद प्रवासाला फक्त 3 तास लागतील, जो वेळ आज 7 तासांचा आहे. तसेच पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्प केंद्रसरकार आणि महाराष्ट्र शासन उभारणार आहे. हायपरलूप सुरू झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवास फक्त 14 मिनिटांत करता येणार आहे. भारतीय रेल्वेचा दररोज 2 कोटी लोक वापर करतात, रेल्वे खात्याच्या 11 हजार गाड्या भारताला रोज सेवा पुरवतात. असे असले तरी आपल्याला रेल्वेध्ये काळानुसार काही बदल करणे आवश्यक असते. रेल्वे मंत्रालयाने हे बदल करण्यास सुरुवात केली आहे. आता ह्या नवीन रेल्वे कितपत यशस्वी होतात याकडे सर्वांचीच नजर लागली आहे

 

लेखक: सौरभ तोरवणे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *