कॅलिफोर्नियातील अग्नितांडव

अमेरिकेच्या इतिहासात या शतकातील  “सर्वात भीषण वणवा’  असे कॅलिफोर्नियामधील वणव्याला संबोधले जात आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलामधील हा वणवा येथील नागरिकांसाठी काही नवीन गोष्ट नाही. दरवर्षी जंगलांमध्ये असे वणवे होत असतात. परंतु यावर्षी हा भीषण वणवा जंगलांमधून मानवी वसाहतींमध्ये दाखल होत प्रचंड जीवित हानी, वित्तहानी करत आहे. यामध्ये मृतांची संख्या सध्या 83 वर पोहोचली असून, 8 नोव्हेंबर रोजी पेटलेला वणवा अद्यापही आटोक्यात आला नसल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आपत्तीनंतर हजारो लोक बेपत्ता आहेत. अनेकांना सुरक्षित ठिकाणी विस्थापित करण्यात आले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा कॅलिफोर्नियातील जंगलांमध्ये वणवा पसरण्यासाठी अनुकूल काळ आहे. या दरम्यान जास्त तापमान, वातावरणामधील कमी आर्द्रता, कोरडी जमीन आणि वेगाने वाहणारे वारे या सर्व गोष्टी या जंगलातील आगीला भीषण वणव्याची स्वरूप देण्यास कारणीभूत ठरतात.

 

या लेखामध्ये आपण कॅलिफोर्नियामध्ये सतत होणऱ्या वणव्याची नैसर्गिक, कृत्रिम कारणे आणि उपाय पाहणार आहोत.

 

फायर ट्रँगल :

कोणत्याही प्रकारची आग लागण्यासाठी तीन गोष्टी गरजेच्या असतात त्या म्हणजे : ऑक्सिजन, इंधन आणि उष्णता. या तीन घटकांना शास्त्रीय भाषेमध्ये  ‘फायर ट्रँगल’ असे संबोधले जाते. या घटकांपैकी कोणताही एक घटक जिथे जास्त असेल त्या दिशेने आग वाढत जाते. जंगलामध्ये लागलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर होण्यासाठी ‘फायर ट्रँगल’  मधील ऑक्सिजन, इंधन हे घटक महत्त्वाचे ठरतात.

 

जंगलामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला झाडांचा पाला पाचोळा आणि लाकूडरूपी इंधन या आगीचे वणव्यात रूपांतर करण्यास मदत करते. कॅलिफोर्नियातील वणव्यामधेही जंगलांचा मोठा वाट आहे.

 

कॅलिफोर्नियातील हवामान :

कॅलिफोर्नियामध्ये भूमध्य समुद्रीय हवामान (Mediterranean Climate) आढळते. उबदार हवामान, माफक थंडी, माफक पाऊस हे या हवामानाचे वैशिष्ट्य आहे. जागतिक तापमान वाढ (Global warming) आणि बदलत्या हवामानामुळे वाढते तापमान, गरम हवा, पावसाचा अभाव ज्यामुळे जमीन आणि वृक्षांमधील कमी होत जाणारी आर्द्रता, वाऱ्याचा वेग 80 किमी / तास वेगाने वाहणारे वारे सध्या हे घटक कॅलिफोर्नियातील वणव्यांना मुख्यतः कारणीभूत ठरत आहेत.

 

नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणे :

जंगलातील आग मुख्यतः नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असते. अमेरिकेमध्ये होणाऱ्या 90% वणव्यांना मनुष्य कारणीभूत असतात. तर कॅलिफोर्नियामध्ये होणाऱ्या 95% वणव्यांना मनुष्य कारणीभूत ठरतात.

 

नैसर्गिक कारणांमध्ये हवामान, काही भौगोलिक प्रदेशांमध्ये होणारे ज्वालामुखी उद्रेक, वीज या गोष्टींमुळे नैसर्गिकरीत्या जंगलामध्ये आग लागण्याची शक्यता असते. तर मानवनिर्मित कारणांमध्ये कधी मनुष्य शेतीसाठी किंवा वसाहतीसाठी हेतुपुरस्सर जंगलामध्ये आग लावतो तर कधी अनाहूतपणे मानवाच्या निष्काळजीपणाने लागलेल्या आगीमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. फटाके, शेकोटी, विजेच्या तारा, बिडी किंवा सिगरेटचे न विझवलेले खोंड या गोष्टींमधील निष्काळजीपणामुळे जंगलात वणवा निर्माण होऊ शकतो. कॅलिफोर्नितील 2017 च्या वणव्याच्या अहवालानुसर जंगलाजवळून जाणारे विजेचे खांब आणि तारांमधून निघालेल्या ठिणग्यांतून निर्माण झालेल्या वणव्यात 44 लोकांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीच्या निष्काळजीपणा- मुळे अनेकांना जीवही गमवावे लागतात. चूक काही व्यक्तीची असली तरी त्याचे परिणाम मात्र सगळ्यांनाच भोगावे लागतात. वणव्यामुळे सर्वांत जास्त परिणाम होतो तो मानवी जीवनावर. त्याच्याशी संबंधित त्याच्या सर्व गोष्टींवर ज्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन स्थलांतर आरोग्य करावे लागते.

 

काही वर्षांपासून कॅलिफोर्नियातील रहिवासी शहरी भाग सोडून आगप्रवण क्षेत्रांमध्ये राहत आहेत. ज्यामुळे या क्षेत्रामध्ये माणसांचा वावर वाढला असून घरे, हॉटेल, ऑफिस, कार या गोष्टींची संख्या वाढत आहे. जंगलातून येणारी आग जेव्हा रहिवासी भागामध्ये पसरते, तेव्हा गॅस, कार, पेट्रोल व इतर गोष्टींमुळे आग जास्त वाढून मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी होण्याचे प्रमाण वाढते. 2018 च्या अहवालानुसार कॅलिफोर्नियातील 4 कोटी लोक आग प्रवणक्षेत्रामध्ये राहतात. कॅलिफोर्नियाचा नकाशा पाहिला तर हे लक्षात येते की, आग प्रवणक्षेत्रामध्ये लोकसंख्यावाढीचा प्रमाण वाढत आहे, या भागामध्ये लोकसंख्या जास्त असेल तर, त्यानुसार रहिवासी भागामध्ये प्रतिबंधात्मक योजना करणे, जंगलव्यवस्थापन सुधारणे या उपक्रमांमुळे वसाहती आणि तेथील रहिवासी सुरक्षित राहतील.

 

वणव्यापासून वाचण्यासाठी काही उपाय :

  1.  जंगलाजवळील आग प्रवण क्षेत्रातील विजेच्या तारा भूमिगत ठेवणे.
  2. आग प्रवण क्षेत्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी रहिवासी क्षेत्राबाहेर फूटबॉल ग्राउंड, सॉकर ग्राउंड, पाणवठा असे प्रतिबंधात्मक क्षेत्र बांधावे ज्यामुळे आग रहिवासी भागामध्ये घुसणार नाही.
  3. जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे म्हणजे तापमानवाढीमुळे निर्माण होणार वणवा व तत्सम इतर आपत्तींना दूर करता येईल.

 

लेखक: राजश्री काळुंके
संपर्क: swatantranagrik@gmail.com

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *