काशिनाथ घाणेकरांच्या मृत्यूची बातमी…

दिवंगत चतुरस्र अभिनेते, एकेकाळचे मराठीतले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर तयार करण्यात आलेल्या आणि सुबोध भावे या गुणी कलावंताची प्रमुख भूमिका असणार्‍या ‘‘बायोपिक’’चे  ट्रेलर्स सध्या दाखवले जाताहेत; हा चित्रपट मी बघेन किंवा नाही हे सांगता येणार नाही कारण अलिकडच्या अनेक वर्षात मी आवर्जून चित्रपट बघत नाही (तरी ‘‘काकस्पर्श’’, ‘कट्यार’…’ आणि ‘नटसम्राट’’ हे चित्रपट बघितले आहेत!) मात्र त्या ट्रेलर्सवरून काशिनाथ घाणेकर यांच्या आकस्मिक मृत्यूची घटना आठवली.

 

तो दिवस अजून आठवतो- वर्ष 1986, महिना मार्च आणि तारीख होती 2; वार रविवार आणि वेळ दुपारची साधारण 2  वाजताची; स्थळ होतंनागपूर श्रमिक पत्रकार संघाचं पंचशील चौकातलं कार्यालय. पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक संपल्यावर अन्य सर्व सदस्य पांगलेले होते पण, तेव्हा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेचा नागपूर ब्यूरोचा प्रमुख असलेला विजय सातोसकर आणि मी मात्र एका बातमीच्या निमित्तानं पत्रकार संघात रेंगाळलेलो होतो. आम्ही बोलत बसलेलो असतानाच अचानक फोन वाजला. तो कॉल बाहेरगावचा आहे, हे वाजलेल्या बेलच्या दीर्घ आवाजावरून लक्षात आलं. (तेव्हा सेलफोन नव्हते आणि बाहेर गावाहून आलेल्या फोनची घंटी दीर्घ वाजत असे.)

 

मी फोन घेतला. अमरावतीहून आलेला तो कॉल होता आणि माझ्यासाठीच होता. समोरच्या माणसानं सांगितलं, काल रात्री अमरावतीला झालेल्या नाटकाच्या प्रयोगातल्या कुणा अभिनेत्याचं झोपेतच निधन झालेलं होतं पण, शव विच्छेदन, पंचनामा आदी प्रक्रियेत पोलीस मुळीच सहकार्य करत नाहीयेत, उलट त्रास देताहेत. नेमकं कोण वारलंय हे त्याला समजलेलं नव्हतं पण, काहीतरी गडबड होत असल्याचं त्याच्या लक्षात आलेलं होतं. आता नेमके तपशील आठवत नाहीत पण, आदल्या रात्री अमरावतीला असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या नाटकाच्या प्रयोगाची जाहिरात वाचल्याचा आठवलं. काळीज लक्कन हललं.

 

पत्रकारितेतला माझा दीर्घकाळचा सहकारी आणि दोस्तयार प्रदीप देशपांडे हा अमरावतीचा होता आणि अमरावतीतच होता हे आठवलं. त्याला लगेच फोन केला. मिळालेली माहिती सांगून तपशील मिळवायला सांगितलं. मी आणि सातोकर पत्रकार संघातच थांबलो. अर्ध्या-पाऊण तासात प्रदीपचा फोन आला की, रात्रीचा प्रयोग संपल्यावर पहाटे केव्हा तरी झोपेतच डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं निधन झालंय. शव विच्छेदन, पंचनामा आणि पार्थिव मुंबईला नेण्यात जरा प्रॉब्ले येतो आहे कारण रविवार आहे. तरीही त्याचासह अनेकजण प्रयत्न करत आहेत…वगैरे वगैरे माहिती प्रदीपनं दिली. सुटीच्या दिवशी आणि संध्याकाळनंतर शव विच्छेदन टाळण्याचा शासकीय सेवेतील डॉक्टरांचा प्रयत्न असतो आणि रविवारी सुटी मारण्याचा पोलीस अधिकार्‍यांचा मूड असतो, म्हणून ही टाळाटाळ होत असणार हे मी ताडलं. मृत्यूच्या बातम्या सहसा खोट्या निघत नाहीत हे सिनियर्सचं सांगणं आठवलं. काशिनाथ घाणेकर यांच्या निधनानं आम्ही दोघंही हळवे झालो पण, फार काळ हळवं राहून चालणार नव्हतं.

 

काही तरी करावं असं वाटत होतं पण मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी फोन केला तर तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील बाहेर गेलेले होते. काय करावं त्या विचारात असतांना एकदम सुशिलकुमार शिंदे यांचं नाव आठवलं. त्यांच्याकडे बहुधा तेव्हा सांस्कृतिक कार्य या खात्याचाही कार्यभार होता. दरम्यान विजय सातोकरनं मृत्यूची बातमी रिलीज केलेली होती. मी सुशिलकुमार शिंदे यांना फोन लावला; ते लाईनवर आले. मी उत्तेजित स्वरात काय घडलं ते सांगितलं. मदतीची अपेक्षा व्यक्त केली. सुशिलकुमार यांच्या लक्षात सर्व काही यायला वेळ लागायचं कारण नव्हतं. ‘मी बघतो काय ते, लगेच’ असं सांगून त्यांनी फोन बंद केला. मग लोकसत्ता आणि सकाळ कार्यालयात फोन केले आणि माहिती दिली; तेव्हा या वृत्तपत्रांसाठी मी काम करत असे. थोड्या वेळानं प्रदीपचा फोन आला की, यंत्रणा वेगानं कामाला लागली आहे. ही सुशिलकुमार शिंदे यांच्या एका फोनची किमया होती.

 

नंतर सुशिलकुमार शिंदे नागपूरला आले तेव्हा मी आणि विजय सातोकर त्यांना भेटलो आणि केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘मरणाच्या वेळी मदत करायलाच हवी. तोच खरा धर्म आहे’ असं महंत सुशिलकुमार शिंदे काशिनाथ घाणेकर यांच्याविषयी भरभरून बोलले. धर्म म्हणजे माणुसकी, ही नवी व्याख्या आम्हाला सुशिलकुमार शिंदे यांच्यामुळे समजली!

 

लेखक: प्रविण बर्दापूरकर
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *