काय आहे झिका व्हायरस?

राजस्थानमध्ये झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या शंभरच्या वर पोहोचली आहे. या प्रसाराचे गांभीर्य लक्षात घेऊन झिका व्हायरसबद्दल काही मूलभूत माहिती जाणून घेऊया.

 

झिका व्हायरस म्हणजे काय?

झिका व्हायरस हा मच्छरांमार्फत होणारा संसर्ग आहे. गर्भवती महिलांना हा रोग झाल्यास अर्भकांना मायक्रोसेफली (microcephaly) हे जन्मजात व्यंग येऊ शकते. मायक्रोसेफली म्हणजे शरीराच्या तुलनेने डोक्याचा आकार लहान असणे आणि मेंदूमध्ये व्यंग असणे. याव्यतिरिक्त झिका व्हायरसमुळे नवजात बालकांमध्ये उपजत आंधळेपणा, बहिरेपणा इत्यादी दोषही दिसून येतात.

 

झिका व्हायरसमुळे प्रौढ व्यक्तींना गुलेन बॅरे (Guillain Barre syndrome) आजार होण्याची शक्यता बळावते. या आजारात रुग्णास अल्पकालीन पक्ष घात होतो. त्यामुळे त्याच्या मज्जातंतूंमध्ये इतर गुंतागुंती निर्माण होतात.

 

रोगाची लक्षणे –

झिका व्हायरसची लक्षणे डेंग्यूसारखीच आहेत. यामध्ये अस्वस्थता जाणवणे, ताप येणे (ताप सहसा 102 डिग्रीच्या वर जात नाही), लालभडक डोळे, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ येणे, स्नायू आणि सांधे दुखणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. सामान्यतः दोन ते सात दिवस ही लक्षणे दिसतात.

 

संसर्ग कसा होतो?

संसर्ग झालेली मादी मच्छर चावल्याने झिका व्हायरस आपल्या शरीरात प्रवेशतो. या संसर्गाच्या फैलावास प्रामुख्याने एडिस इजिप्ती जातीचे मच्छर  कारणीभूत आहेत. या मच्छरांमार्फत पीतज्वर, डेंग्यू व चिकुनगुनिया हे रोग देखील पसरतात. एडिस मच्छर माणसांना दिवसाढवळ्या, त्यातही बहुतांशी सकाळी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी चावतात.

 

लैंगिक संबंध ?

हो. प्राथमिक रीत्या झिका व्हायरसचा फैलाव मच्छरांमार्फत होत असला, तरी लैंगिक संबंधाद्वारे देखील या रोगाचा संसर्ग होऊ शकतो. योनीमार्गे व गुदद्वारे होणार्‍या लैंगिक संबंधांमुळे झिका व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.

 

झिका व्हायरसचा भारतामधील प्रसार –

भारतात झिका व्हायरसची साथ सर्वप्रथम 2017 साली जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांमध्ये अहमदाबाद येथे आली. त्यानंतर त्याच वर्षी जुलै महिन्यात ही साथ तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात पसरली. आता झिका व्हायरसची तिसरी साथ जयपूरमध्ये आली आहे.

 

उपचार –

झिकावर कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. झिका व्हायरसची लक्षणे जास्त तीव्र नसतात. त्यांच्यावर आराम करणे, आवश्यक तितके द्रवपदार्थ प्राशन करणे, ताप आणि दुखण्यांवरची नेहमीची औषधे असे सर्वसामान्य उपचारही परिणामकारक ठरतात. मात्र लक्षणे बळावल्यास रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घेणे निकडीचे ठरते.

 

झिकाची चाचणी घेणे इतके अवघड का आहे?

झिकाचा संसर्ग ओळखण्याची सर्वात उत्कृष्ट आणि सोपी पद्धत म्हणजे रुग्णाला लक्षणे दिसत असताना या व्हायरसची चाचणी घेणे. Polymerase chain reaction (PCR) सारख्या आण्विक चाचण्यांद्वारे हे केले जाते. यामध्ये व्हायरसमधून जनुकीय पदार्थाचा शोध घेतला जातो. मात्र या चाचण्या करता येऊ शकण्याचा कालावधी फारच कमी आहे. व्हायरस क्रियाशील असताना म्हणजेच सात ते चौदा दिवसांच्या दरम्यान या चाचण्या कराव्या लागतात.

 

झिकाची लक्षणे फार तीव्र नसतात. बर्‍याचदा ती जाणवतही नाहीत. त्यामुळे बहुतांश वेळा लोक सात ते चौदा दिवसांचा चाचण्यांचा कालावधी गमावून बसतात. यानंतर डॉक्टर Serology tests म्हणून ओळखल्या जाणार्‍या चाचण्या घेतात. या चाचण्या झिका व्हायरसच्या प्रतिकारासाठी शरीरात तयार झालेल्या प्रतिद्रव्यांचा antibodies अभ्यास करतात. मात्र झिका हा डेंग्यू आणि तत्सम इतर विषाणूंपेक्षा फारसा वेगळा नाही आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये अशा संसर्गजन्य रोगांचा फैलाव होतच असतो. या संसर्गांविरुद्ध आपल्या शरीरात तयार होणार्‍या प्रतिद्रव्यांमुळे Serology मधून दिशाभूल करणारे निष्कर्ष निघू शकतात. ही या चाचण्यांमधील मोठी त्रुटी आहे.

 

लेखक: मृण्यमी गावडे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *