आव्हानांमुळं ‘सुदृढ’ झालेलं नेतृत्व

आपल्यावर दैनंदिन जीवनात जितक्या अडचणी येतील, संकटं येतील. त्यांच्याशी ‘सामना’ करताकरता आपण प्रगतीच्या दिशेनं पुढं जाऊ शकतो. असा अनेक बुजुर्गांचा अनुभव आपण ऐकतो इतकंच काय, पण सर्वसामान्यांना जितक्या अडचणींना तोंड द्यावं लागतं तेवढं त्यांच्या पेक्षावरच्या वर्गातल्यांना द्यावं लागत नाही, अशीही अनेकांची(गैर) समजूत असते. सत्ता पदांवर असलेल्यांना तर अडचणींची सवयच झालेली असते. अशीही आपली धारणा असते. परंतु निसर्गनिर्मित दुष्काळापासून ते महापुरापर्यंत आणि मानवनिर्मित राजकीय कुरघोड्यांपासून ते अस्तित्वालाच नख लावणार्‍या विविध आंदोलनांपर्यंत अनेक संकटांशी एकाच कालखंडात सामना करावा लागला तर? एक तर अशा काळात संबंधित राजकीय नेतृत्व कोळपून जाईल किंवा कोलमडून जाईल पण काही जणांचं नेतृत्व अशा परिस्थितीतूनच तावूनसुलाखून निघते, उजळून निघतं. अधिक भक्कम आणि सुदृढ बनत जातं. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत उजळून निघालेल्या सुदृढ नेतृत्वाची प्रचीती राज्यातल्या अन् केंद्रातल्या नेत्यांना आणि नागरिकांना ही आली असल्याचं दिसून येते.

 

मतदानाचा हक्क प्राप्त झाल्याबरोबर लगेचच नगरसेवक आणि नागपूरसारख्या उपराजधानीचे महापौरपद यशस्वीपणे पेलणार्‍या देवेंद्रजींनी आमदार, विरोधीपक्षाचा अभ्यासू नेता आणि भाजपाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाची चुणूक केव्हाच दाखवली होती. त्यांच्या वडिलांनी म्हणजे जुन्या पिढीतील भाजपाचे आमदार गंगाधरराव फडणवीस यांनी नितीन गडकरी यांना राजकारणातपुढे आणले, लोकेच्छा लक्षात घेऊन आणि कार्यक्षमता हेरून गडकरी यांनी देवेंद्र यांचं नेतृत्वपुढं आणले. गडकरी यांनी आपल्या प्रचंड कार्यक्षमतेच्या आणि कोणत्या ही राजकारण्याशी सलगी करू शकण्याच्या क्षमतेच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर आघाडी घेतली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळले. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही राजकीयद़ृष्ट्या नागपूर, मुंबई नंतरच्या आता भविष्यात दिल्लीचा महामार्गही उपलब्ध होऊ शकतो असा विश्वास त्यांच्या चार वर्षांच्या कारकीर्दीवरून राजकीय जाणकारांना वाटू लागला आहे.

 

अगोदर स्वतंत्रपणे लढल्यानंतर राजकीय अपरिहार्यता म्हणून शिवसेनेची मनधरणी करण्याची वेळ निवडणूक निकालानंतर त्यांच्यावर आली. आपल्या विरोधकांची मग ते पक्षातले असोत की पक्षाबाहेरचे – सर्वाधिक गोची करण्याची प्रचंड अंगभूत क्षमता असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष, मुरब्बी आणि कसलेल्या नेत्यानं त्याचवेळी ‘राजकीय स्थैर्यासाठी म्हणजेच महाराष्ट्राच्या भल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा सरकारला पाठिंबा देईल’ असं जाहीर करून टाकले. परिणामी त्या गुदमरण्या जोग्या अवस्थेतच आपली राजकीय क्षमतापणाला लावून फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याऐवजी शिवसेनेचा विरोध सहन करण्यातच मुख्यमंत्री म्हणून स्थैर्य मिळण्याची शक्यता अधिक हे सूत्र मनाशी पक्के करून वाटचाल सुरू केली. त्यामुळे राजकीय पाठिंब्याची गळाभेट घेऊन मुख्यमंत्र्यांना सुरक्षित अंतरावरून जेरीस आणता येईल, खेरीज महाराष्ट्राच्या भल्याच्या काळजीपोटी टाकलेल्या डावास राजकीय प्रतिसाद मिळेल आणि सत्ता जाऊनही सत्तेच्या नाड्या आपल्याच हाती राहतील, हा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा होरा फडणवीस यांनी पहिल्या फटक्यातच धुळीस मिळवला. राजकीय विरोधकांच्या बाहेरच्या पाठिंब्यापेक्षा मित्रपक्षाचा अंतर्गत विरोध परवडला, अशी स्वतःची समजूत घालून त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली.

 

पण त्यानंतरच्या चार वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनाही पुरेसा अंदाज नसावा की, आपल्याला कल्पनेपेक्षाही भयंकर अशा विरोधी विद्वेषाचा उघडपणे सामना करावा लागणार आहे. एकाच वेळी सत्तेतही आणि विरोधकाची भूमिकाही करण्याची शिवसेनेची ‘डबल गेम’ ही त्यांच्या संयमीवृत्तीच्या वाढीस पोषक ठरली असावी. त्यातच निसर्गाने असहकाराचा लाल झेंडा दाखवला. शेतकर्‍यांचे प्रश्न ज्वालामुखीसारखे उसळून वर येऊ लागले. कर्जमाफी देण्याची वेळ आली, उपलब्ध पाण्याच्या वाटपाचा आणि पिकांच्या हमीभावाचा मुद्दा तापवण्यात येऊ लागला, दोन वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवणार्‍या नेत्याच्या गावात  रेल्वेने पिण्याचे पाणी देण्याची वेळ आली, धनगर आणि मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाने तर सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांचे अस्तित्वच पणालालागले, देशाच्या नेतृत्वाची आस लागून राहिलेल्याने त्यांनाही फडणवीसांबद्दलचा जातीसूचक उल्लेख वारंवार करण्याची वेळ आली, केंद्राच्या नोटाबंदीसारख्या निर्णयाचे राज्यभर संमिश्र पडसाद उमटू लागले… पण या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही मुख्यमंत्र्यांनी धीर आणि संयम कायम ठेवला. उलट या अशा अत्यंत विपरित परिस्थितीत देखील स्वतःमधले अभ्यासू, कार्यक्षम, स्वच्छ, संयमी आणि पारदर्शी नेतृत्व त्यांनी लोकहिताच्या कसोटीवर पारखून घेतलं.

 

सत्तेमधल्या शिवसेनेला चुचकारतचुचक भारत आणि विरोधातल्या काँग्रेसराष्ट्रवादीला गैरव्यवहाराच्या चौकशांचे इशारे देत, नुसतेच इशारे न देता स्वपक्षातील एकनाथ खडसे आणि विरोधी पक्षातील छगन भुजबळ यांच्या संदर्भात धाडसी कारवाई करून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाला गेल्या चार वर्षात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थापित केलं, हे लक्षात घ्यावं लागेल. अर्थात त्यासाठी त्यांना जनमानसातील ‘स्व-प्रतिमेचा’ त्याग ही काही वेळा करावा लागला. परिणामी दिल्लीत ज्याप्रमाणं पंतप्रधानांना कोणी आव्हान देऊन फारसा फरक पडत नाही असं जे चित्र दिसून आलं तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत देखील म्हणता येईल.

 

मंत्रिमंडळातील पदाचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या आणि थेट मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्रजींना सत्ताकाळाच्या पहिल्या वर्षी काहीसं चाचपडावं लागलं. प्रशासनातल्या अधिकार्‍यांनीही आपापल्या पातळीवर नव्या मुख्यमंत्र्यांची चाचपणी करून पाहिली. एकनाथराव खडसे यांच्या सह मंत्रिमंडळातीलच काही सहकारी मंत्र्यांनी आपल्या वयाला साजेशी वक्तव्यं सुरू केली. अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान झाल्यानंतर ही काही मंत्र्यांना आपणच लोकांमधले मुख्यमंत्री आहोत असा साक्षात्कार व्हायला लागला. त्याकाळात भाजपामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ‘विनोद’ होऊ लागले. पण पाहता-पाहता मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील औद्योगिक पट्ट्यामधील जमिनीच्या व्यवहाराचे निमित्त साधून सर्वात ज्येष्ठ म्हणून मुख्यमंत्रीपदाचा दावा करणार्‍या खडसे यांच्यावर असा काही नेम साधला की, त्यातून जबर घायाळ झालेल्या खडसेंना अजूनही पुरते सावरता आलेले नाही. अन्य महत्त्वाकांक्षी सहकारी मंत्र्यांना हा फार मोठा इशारा होता. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांचा वैदर्भीय झटका आपल्या वाटणीला येऊ नये म्हणून अनेक मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी काळजी घेऊ लागले.

 

त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्मस्ट्राँग नेते छगन भुजबळ यांना थेट तुरुंगाचा रस्ता दाखवून मुख्यमंत्री विरोधकांना जोरदार झटका दिला. पाहता पाहता महाराष्ट्राच्या राजकारणावर पक्षांतर्गत राजकारणावर आणि बदल्या-बढत्यांची आयुधे वापरून प्रशासनावर ही त्यांनी पकड मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पाठोपाठ स्वत:च्या स्वच्छ, कार्यक्षम, संयमी पण आक्रमक प्रतिमेच्या माध्यमातून भाजपाची एकहाती सूत्रे ठेवून त्यांनी महाराष्ट्रातल्या महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड मिळवली. भाजपाला  राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून त्यांनी आघाडी मिळवून दिली. पंतप्रधान आणि पक्षाध्यक्षांचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने मग मात्र फडणवीस यांनी मागे वळून पाहिलं नाही. शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षातल्या मंडळींनी मोर्चे, उपोषणे, आंदोलने, सोशल मीडियाचा वापर या सगळ्यातून फडणवीस यांना सळो की पळो करण्याचा प्रयत्न अथकपणे सुरू ठेवला. फार दूरदर्शी म्हणवणार्‍या नेतेमंडळींनी संधी घेऊन त्यांचा जातिवाचक उल्लेख सुरू केला. पण या सगळ्याला ते पुरून उरले. राजकीय आघाडीवरील त्यांचं हे यश आणि प्रशासकीय कारभारातला थोडासा बदल त्यांना पुढच्या वर्षीच्या निवडणुकांसाठी किती उपयोगी पडतो ते आता पहावे लागेल. ऑक्टोबरला त्यांच्या कार्यकाळाला तब्बल चार वर्ष पूर्ण झाली. पुढील वर्षी निवडणुकांचं वातावरण तापत जाईल तेव्हा महाराष्ट्राच्या भल्यासाठी, त्यांच्या हातून आणखी भरीव योगदान मिळण्यासाठी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.

 

लेखक: डॉ. सागर देशपांडे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *