आयएनएस अरिहंत

देशाची पहिली अण्वस्त्रवाहक पाणबुडी, अरिहंतने समुद्रात गस्त र्ण केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घोषित केले. सतत अणुयुद्धाची धमकी देणार्‍या शेजारी शत्रुराष्ट्रांना तो इशारा होता. अरिहंतच्या यशाबरोबरच भारताने ‘आण्विक त्रिकूट’ (Nuclear Triad) पूर्ण केले आहे. शत्रूंचा विनाश’ करू शकणार्‍या या ‘अरिहंत’’ बद्दल जाणून घेऊया.

 

कशी आहे आयएनएस अरिहंत?

आयएनएस अरिहंत ही भारतीय बनावटीची आण्विक पाणबुडी आहे. अरिहंत ही भारताची पहिली ’’SSBN’(Ship Submercible Ballistic Nuclear)’  प्रकारची पाणबुडी आहे. ही पाणबुडी ’ATV (Advanced Technology Vessel) या कार्यक्रमांतर्गत बनवली गेली. आयएनएस अरिहंतचे वजन सुारे 6000 टन असून लांबी 110 मीटर्सपेक्षा जास्त आहे. ही पाणबुडी भारतीय नौदलातील सर्वांत लांब पाणबुडी आहे. 750 किमी ते 3500 किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता या पाणबुडीकडे आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर पाणबुडीचा वेग ताशी 22 ते 25 किमी असेल. तर खोल समुद्रात हा वेग तब्बल 44 किमी प्रति तास इतका असेल. आयएनएस अरिहंतवर क्षेपणास्त्र प्रक्षेपके उभारण्यात आली आहेत. K-4 आणि K-15 अशी दुतर्फा मारा करण्याची ताकद असलेली दोन क्षेपणास्त्रे या पाणबुडीवर तैनात करण्यात आली आहेत.

 

आयएनएस अरिहंत कशी कार्यान्वित झाली?

आयएनएस अरिहंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात आली. आयएनएस अरिहंतची बांधणी पूर्ण झाल्यानंतर 2009 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विशाखापट्टणम् येथे अरिहंतच्या समुद्रातील चाचणीस हिरवा कंदील दाखवला.सर्व चाचण्यांसाठी अंदाजे दोन वर्षांचा काळ अपेक्षित होता. ऑगस्ट 2013 मध्ये 83 मेगावॉटची अणुभट्टी अरिहंतवर कार्यान्वित झाली. हे भारताचे फार मोठे यश होते. ऊर्जेची गरज  भागवण्यासाठी आता अरिहंतला सतत किनार्‍यावर येण्याची गरज नव्हती. इतर सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अरिहंत समुद्रात गस्त घालण्यासाठी रवाना झाली. नोव्हेंबर 2018 मध्ये अरिहंतने ‘सामुद्री गस्त’ यशस्वीरीत्या पूर्ण केली. जमीन, आकाश व पाणी या तिन्ही स्थळी भारत अण्वस्त्रसज्ज झाला. भारताचे ‘‘आण्विक त्रिकूट’’ पूर्ण झाले.

 

Secretive ATV (Advance Technology Vessel) कार्यक्रम म्हणजे काय?

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिकेने भारताविरुद्ध युद्धनौका पाठवली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या समर्थनार्थ रशियाने अण्वस्त्रसज्ज युद्धनौका पाठवली. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी अणुऊर्जेचा विकास, पाणबुडी व इतर युद्धनौका आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यातून अढत कार्यक्रमाची पायाभरणी झाली. अणुचाचणी यशस्वी झाल्यानंतर 80 च्या दशकात आण्विक पाणबुडी तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. परंतु हा कार्यक्रम पूर्णत्वास जाऊन पहिली पाणबुडी कार्यान्वित होण्यास तब्बल 25 वर्षांचा काळ जावा लागला. या कार्यक्रमांतर्गत एकूण तीन आण्विक पाणबुड्या बनवण्याचे नियोजन होते. यांना SSBN(Strategic Strike Nuclear Submarine) असे म्हणतात. त्यातील पहिली पाणबुडी म्हणजे अरिहंत. अरिहंत पाणबुडी ही रशियाने बनवलेल्या अकुला मालिकेतील पाणबुडीसारखीच आहे. याच कार्यक्रमाचा भाग असलेली दुसरी पाणबुडी म्हणजे आयएनएस अरिधमान. लवकरच ती देखील देशाच्यासेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. संपूर्ण कार्यक्रमात भारताला तांत्रिकदृष्ट्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यावेळी रशियाने भारताला भरभरून मदत केली आहे. पाणबुडीचा क्लिष्ट आराखडा, बांधणीसाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान व प्रशिक्षण रशियाने भारताला देऊ केले. भारताकडे सध्या असलेली आयएनएस ‘चक्र’’ ही पाणबुडी रशियानेच भारताला दिली आहे. भारताने 2012 पासून पुढील दहा वर्षांसाठी ती रशियाकडून भाडेतत्त्वावर घेतली आहे. यानंतर मात्र भारत स्वतःच पाणबुडी बनवू शकेल.

 

SSBN म्हणजे काय?

SSBN (Ship Submercible Ballistic Nuclear) ही एक मोठी अण्वस्त्रसज्ज पाणबुडी असते. खोल समुद्रात गस्त घालणे, शत्रूच्या समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवणे, गरज पडल्यास अण्वस्त्रे व इतर क्षेपणास्त्रे शत्रूवर सोडणे इत्यादी कार्ये SSBN पार पाडते. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला अणुशक्तीचा वापर पहिल्यांदा न करण्याचे वचन दिले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर SSBN कडे बचावात्मक रणनीतीचा भाग म्हणून बघितले जाते. याशिवाय SSN(Ship Submercible Nuclear) हा पाणबुडीचा वेगळा प्रकार आहे. या पाणबुड्या प्रामुख्याने आण्विक हल्ले करण्यासाठी बनवल्या जातात. या पाणबुड्या साधारणपणे युद्धनौकांच्या ताफ्यात वावरतात. SSN बनवण्याच्या आधी SSBN बनवणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. परंतु येणार्‍या काळात भारत SSN ची निर्मिती करणार आहे. 2015 मध्ये भारताने SSN कार्यक्रम सुरू केला असून आता SSBN आणि SSN यांचा संयुक्त कार्यक्रम राबवला जाईल. SSBN आणि SSN या दोन्ही आण्विक पाणबुड्याच आहेत. आण्विक पाणबुडी व पारंपरिक पाणबुडी यातील मुख्य फरक हा की पारंपरिक पाणबुडी इंधनासाठी काही काळाने समुद्रकिनारी येते. परंतु अणुभट्टी असल्याने आण्विक पाणबुडी स्वतःची ऊर्जा स्वतःच तयार करू शकते.

 

किती देशांकडे आण्विक पाणबुड्या आहेत?

भारत वगळता अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या पाचच देशांकडे अशी पाणबुडी आहे. आण्विक पाणबुडी असणार्‍या मोजक्या देशांच्या पंक्तीत आता भारत जाऊन बसला आहे. एकट्या अमेरिकेकडे 70 हून अधिक आण्विक पाणबुड्या आहेत तर रशियाकडे 30 हून अधिक, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याकडे अंदाजे 10-15 आण्विक पाणबुड्या आहेत. त्यामुळे भारताचे यश नगण्य वाटत असले तरी हिंदी महासागराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अरिहंतचे फार महत्त्व आहे. येत्या काळात भारत आणखी पाणबुड्या विकसित करणार आहे. त्यामुळे ही तूट भरून निघेल.

 

सुरुवातीला केवळ तीन SSBN ची घोषणा करण्यात आली असली तरी या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 2023 पर्यंत अशा सहा पाणबुड्या निर्माण करण्याचे लक्ष्य असल्याचे समजते. तसे झाल्यास देशाच्या सागरी सीमा अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

 

लेखक: शारंग देशपांडे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *