आढावा अमेरिकेतील निकालांचा

नुकत्याच अमेरिकेत संसदेच्या मध्यावधी निवडणुका पार पडल्या. राष्ट्राध्यक्षांच्या 4 वर्षांच्या कारकीर्दीच्या मध्यावर म्हणजेच दोन वर्षांनी ह्या निवडणुका पार पडत असल्यामुळे त्यांना ‘मध्यावधी निवडणूक’ असे म्हणतात. यातील संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजे ‘‘काँग्रेस’’ मध्ये 2010 पासून रिपब्लिकन पक्षाचे असलेले बहुत डेमोक्रॅटिक पक्षाने हिसकावून सभागृहाचा ताबा मिळवला पण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने वरिष्ठ सभागृह आणि शक्तिशाली असलेल्या ‘‘सिनेट’’वरील आपले नियंत्रण कायम राखले. माध्यमांतही ह्या निवडणुकांचे काहीसे असेच चित्र रंगवण्यात आले होते आणि ते प्रत्यक्षात उतरताना या निकालातून दिसले. ह्या निवडणुकीत ट्रम्प स्वतः जरी रिंगणात नसले तरी त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीची ही चाचणी परीक्षाच होती. ट्रम्प यांनी केलेला आक्रमक प्रचार, डेमोक्रॅटिक पक्षाची बहुचर्चित ‘‘ब्लू वेव्ह’’, वादग्रस्त विधाने आणि मुद्दे आणि वाढलेल्या तरुण मतदारांची वाढलेली संख्या या सर्वांच्या पार्श्‍वभूीवर ह्या निकालांचे एकूण निष्कर्ष काय? ट्रम्प यांच्या कारकीर्दीवर यामुळे काय परिणाम होतील? अमेरिकेतील अध्यक्षीय लोकशाहीत संसदेचे नेके महत्त्व काय? डेमोक्रॅटिक पक्षाला काँग्रेसमध्ये मिळालेल्या बहुताचा अन्वयार्थ काय? आणि या निकालात भारतीयांची कामगिरी आणि एकंदर भारतावर होणारा संभाव्य परिणाम कोणता? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा सविस्तर लेख.

 

  1. नक्की विजय कोणाचा?

डेमोक्रॅटिक पक्षाने जरी काँग्रेसमध्ये आपले बहुत परत मिळवले असले तरी सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने विरोधकांच्या 3 जागा खेचून आणत बहुत मिळवले आहे. सिनेटच्या अजून काही जागांचे निकाल लागायचे असून त्यात रिपब्लिकन पक्ष आपली आघाडी आणखी मजबूत करू शकतो. यामुळेच हा निकाल ट्रम्प यांच्यासाठी संमिश्रच म्हणावा लागेल. दोन्ही सभागृहात आतापर्यंत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचेच वर्चस्व राहिल्यामुळे ट्रम्प यांना निर्णय घेणे सोपे होते. पण आता काँग्रेसमध्ये ट्रम्प यांना अडथळा निर्माण होऊ शकतो. सिनेट ताब्यात असल्यामुळे महाभियोगाचा धोका ट्रम्प यांना नसला तरी आक्रमक आणि वादग्रस्त निर्णय डेमोक्रॅटिक पक्ष आता अडवू शकतो. अर्थात अध्यादेश काढून ट्रम्प आपले निर्णय घेऊ शकतात पण या निकालाुंळे एकंदर रिपब्लिकन पक्ष आणि ट्रम्प यांच्या वॉशिंग्टनमधील एकहाती सत्तेला तडा गेला आहे. ट्रम्प यांनी निकालानंतर डेमोक्रॅटिक पक्षाकडून सहकार्याची अपेक्षा केली असली तरी धमक्या देण्यास सुद्धा मागेपुढे पाहिले नसून जर रिपब्लिकन पक्षाच्या मागे काँग्रेसमार्फत चौकशीचा ससेमिरा लावला तर सिनेटमधील  बहुताचा वापर करून रिपब्लिकन पक्षही तशीच खेळी करेल आणि करदात्यांच्या पैशांचे नुकसान होईल अशी धमकीवजा सूचनाच त्यांनी दिली.

 

  1. गॅरीमेन्ड्रिंग’ म्हणजे काय?

ह्या निकालात जरी काँग्रेसवर डेमोक्रॅटिक पक्षाने ताबा मिळवला तरी निकालाचा अंतिम नकाशा पाहिल्यास सर्वत्र लाल रंगच (रिपब्लिकन) उठून दिसतो. याचे कारण म्हणजे रिपब्लिकन पक्षाने मतदारसंघाची केलेली पुनर्रचना. त्यामुळेच ग्रामीण भागातील मतदानाच्या जोरावर रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण अमेरिकेत आपले अस्तित्व कायम राखले. हेच गॅरीमेन्ड्रिंग.

 

  1. अध्यक्षीय लोकशाहीत संसदेचे महत्त्व काय?

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष आणि त्यांनी नेमणूक केलेले मंत्री जरी संसदेला उत्तरदायी नसले तरी निवडप्रक्रियेत संसद महत्त्वाची भूमिका बजावते. याचबरोबर महत्त्वाच्या निर्णयांना संसदेकडून संमती मिळवणे आवश्यक असते. त्याशिवाय निर्णयांचे रूपांतर कायद्यात होत नाही. अमेरिकेतील संसद व्यवस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही निर्णयाला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता असणे आवश्यक आहे. त्यातही जर राष्ट्राध्यक्षांच्या महाभियोगासारखा महत्त्वाचा प्रश्‍न असेल तर संसदेचे वरिष्ठ सभागृह सिनेटची दोन तृतीयांश मंजुरी मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे एकंदर राष्ट्राध्यक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये यासाठीच ही संवैधानिक तरतूद अमेरिकी राज्यघटनेत आहे. यात संसद काही महत्त्वाच्या समित्या, तसेच, तपास आणि चौकशी समितीही नेमू शकते त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष पदावरील व्यक्ती आपल्याच पक्षाला संसदेत बहुत मिळावे म्हणून प्रयत्नशील असते. ओबामांच्या कारकीर्दीत त्यांना दोन्ही सभागृहांतील बहुत गमवावे लागल्यामुळे आणि रिपब्लिकन पक्षाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे बर्‍याच अधिकारांवर पाणी सोडावे लागले होते. ‘‘ओबामा केअर’’ सारखी विधेयके त्यांना संसद मुत्सद्देगिरीनेच संमत करून घ्यावी लागली होती.

 

राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन यांच्या काळात सुद्धा सिनेटमध्ये दोन तृतीयांश बहुत न मिळाल्यामुळे त्यांच्यावरील महाभियोगाची नामुष्की टळली होती. यासोबतच 1920 साली वुड्रो विल्सन यांनी ‘लीग ऑफ नेशन्स’ची संकल्पना मांडली खरी, पण संसदेच्या विरोधामुळे अमेरिकाच त्यात सहभागी होऊ शकली नव्हती, अशी संसदेच्या अधिकारक्षेत्राची आणि राष्ट्राध्यक्षांवरील बंधनांची अनेक उदाहरणे देता येतील.

 

  1. या निवडणुकीत भारतीयांची कामगिरी कशी होती?

या मध्यावधी निवडणुकांध्ये डेमोक्रॅटिक  पक्षाकडून भारतीय वंशाचे बरेच उमेदवार निवडून आले आहेत. बाहेरून देशातून आलेले लोक हे साधारणपणे डेमोक्रॅटिक पक्षाला समर्थन देतात आणि तसेच या निवडणुकीत होताना दिसले आहे. काही ठिकाणी तर दोन्ही पक्षांनी भारतीय वंशाचे उमेदवार उभे करून चुरस वाढवली होती आणि त्यामुळेच ही निवडणूक अधिक रंगतदार होती. कॅलिफोर्निया राज्यात अधिकाधिक भारतीय वंशाचे उमेदवार निवडून येताना दिसले आहेत.

 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातून जरी काँग्रेस निसटली असली तरी अगदीच चिंतेचे कारण नाही. सिनेटच्या माध्यमातून ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्ष अजूनही आपली ताकद टिकवून आहेत. प्रत्येक राज्यात सिनेटच्या दोन जागा असून काँग्रेसमधील जागा ह्या प्रत्येक राज्यागणिक बदलतात. यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे कारकीर्द कितीही वादग्रस्त असली तरी ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीत पाठिंबा दिलेल्या अनेक राज्यांनी यावेळी सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या पारड्यातच मत टाकले आहे, ते अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांच्यावरील विश्‍वास कायम असल्याचे दाखवून देते. काही तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांच्या कारकीर्दीत आर्थिक वाढीचा वेग वाढल्यामुळे सुद्धा कदाचित रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा मिळाला असू शकतो. या निवडणुकांत आणखी विशेष बाब म्हणजे मध्यावधी निवडणुकांच्या मागील मतदानाच्या टक्केवारीच्या तुलनेत भरघोस मतदान झाले आणि त्यातही तरुण मतदारांची संख्या ही लक्षणीय होती. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाच्या बाबतीत हा निकाल संमिश्रच म्हणावा लागेल. याउलट डेमोक्रॅटिक पक्षाने जरी काँग्रेसमध्ये बाजी मारली असली तरी 2010 मध्ये रिपब्लिकन पक्षाने मिळवलेल्या बहुताच्या तुलनेत हा आकडा समाधानकारक नाही आणि त्यामुळे दोन्ही पक्षांनी आता 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत काय धोरणे स्वीकारायची याचे चित्र हा निकाल सर्वांसमोर आणतो. भारतासोबत संबंध सुधारणे हे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्ष या दोघांचे धोरण असल्यामुळे या निकालांचा काही विशेष फरक भारताला पडणार नाही. तरी जागतिक पातळीवरील ट्रम्प यांच्या आक्रमक आणि संकुचित धोरणांना कदाचित यामुळे चाप बसू शकतो. अर्थात ट्रम्प यांच्यातील ‘उद्योगपती’’ यातूनही मार्ग काढतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

 

लेखक: प्रसाद पवार
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *