आज सरे मम एकाकीपण

 

एवढंच ना? एकटे जगू. एवढंच ना? आमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू, एवढंच ना? रात्रीला कोण? दुपारला कोण? जन्माला अवघ्या या पुरलंय कोण? श्‍वासाला श्‍वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू! एवढंच ना?

अशी संदीप खरे यांची कविता आहे.

 

‘व्यक्ती एकटी असली म्हणजे हरवते’’, असे प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी त्यांच्या ‘पार्टनर’ पुस्तकात म्हटले आहे. मनाला शांती मिळावी म्हणून आपण एकांतात राहणे पसंत करतो. परंतु आपल्याला काही दिवसांतच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल. एका ताज्या  निरीक्षणात असे आढळून आले आहे की, एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवत असतो. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर इतक्या भयंकर प्रमाणात होतो की आपल्याला आयुष्यातून उठण्याची वेळ येते.

 

पण हा एकटेपणा येतो कशामुळे?

घरात आणि बाहेरही आपण क्षणोक्षणी असंख्य लोकांना भेटत असतो. मात्र मनातली किल्मिषे दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधता येत नाही. कारणे अनेक कधी ते लोक आपल्या बौद्धिक क्षमतेचे नाहीत असे आपल्याला वाटत असते. कधी पुरेसा वेळच हाताशी नसतो. कधी समोरच्याला तुची रामकहाणी ऐकण्यात मुळीच स्वारस्य नसते. कधी परिस्थिती सोयीस्कर नसते. अगदी ओठांवर आलेली गोष्ट बोलण्याच्या वेळेसच काही दुसरी महत्त्वाची घटना बोलणेच खुंटवते.

 

चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांची ‘‘असंवाद’’ नावाची एक चित्रमालिका आहे. ‘‘असंवाद’’ म्हणजे संवादाचा अभाव. या चित्रांत पुस्तक, टीव्ही आणि मोबाईल या माध्यमातून दोन माणसांध्ये होत गेलेला असंवाद दाखवलाय. असंवाद एकटेपण आणि एकाकीपण, कितीतरी गोष्टींना एखादे मन सामोरे जात असते. अगदी गर्दीत असतानाही, अगदी आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती या मानसिक व्याधींनी त्रस्त असू शकते.

 

मध्यंतरी,  ‘एकटेपणा घालवण्यासाठी आता मिनिस्टर ऑफ लोनलीनेस!’’ अशी एक बातमी चर्चेत होती.

 

इंग्लंडचे दिवंगत खासदार जो कॉक्स यांचा ‘‘मिनिस्टर ऑफ लोनलीनेस’’ हा प्रकल्प हाती घेण्याची ब्रिटन सरकारने घोषणा केली होती. खरच इतका हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे का, असे कोणालाही वाटेल पण 2017 मध्ये आलेल्या एका अहवालानुसार एकटेपणा 15 सिगारेट ओढण्याइतका धोकादायक आहे असे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

 

ग्रेसच्या पुस्तकांत,  ‘It would have been lonelier without loneliness’ असा उल्लेख आहे. ‘एकटेपणाशिवाय फार एकटे झालो असतो आपण’ एकटेपणा आहे की सोबतीला. प्रत्येकाचा एकटेपणा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.

 

मी जनात फिरलो तेव्हा, असंख्य मित्रही केले ।

जंगलात फिरलो तेव्हा, निर्झरही बोलत होते ॥

मी मनात फिरलो तेव्हा, स्मृतींची साथही होती ।

मी कशात मन रमवावे, मज भ्रांत मुळी ही नव्हती ॥

 

भरपूर पाठांतर असावे. असंख्य कविता, गाणी, वेचे मुखोद्गत असावेत. म्हणजे अगदी अंधारकोठडीतही मनुष्य आनंदी राहू शकतो. माणसाला कल्पनादारिद्र्य नसावे. कित्येक मोठ्या आणि जगप्रसिद्ध कलाकृतींची निर्मिती अशाच मिळालेल्या एकांतात झाली आहे. माणूस एकटा असला तरी तो एकटेपणा त्याला त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे मिळालेला असतो. एकटेपणाही अर्थपूर्ण असू शकतो.

 

कुणीही कधीही आपली मदत मागत असेल, न मागताही आपल्याला शक्य असेल तर प्रसंगी पदरमोड करूनही करावी. मानवी मनाला कृतज्ञता शिकविण्याची गरज नसते. अवघड प्रसंगी केलेल्या मदतीची जाण दुष्ट लोकही ठेवतात. म्हणून कुणी मदत मागत असणे ही आपल्या एकाकीपणावर मात करण्याची संधी मानावी. अर्थातच आपापल्या कार्यशक्तीच्या मर्यादेत राहून मदत करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण आणि सतत पाठलाग करणारे नैराश्य यातून आपणच मार्ग काढू शकतो. या दिवाळीच्या निमित्ताने आपण अशा सर्वांना मदत करून त्यांच्या अंधारात बुडालेल्या जगात थोडासा तरी का होईना प्रकाश आणू शकतो. एकटे असणार्‍यांना अशी मदत करावी.

 

– ज्येष्ठ नागरिकांना फोन करून त्यांची विचारपूस करणार्‍या तसेच त्यांना भेटी देणार्‍या स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करा. त्यांना मदत करा, बाजारत जाणे, एखादे पत्र पोस्ट करणे, औषधे आणणे, त्यांच्या कुत्र्याला फिरवणे.

– घराच्या बाहेर पडा. समोरासमोर बोला किंवा फोनवर बोला.

– थेट किंवा ऑनलाईन अशा कोणत्याही स्वरूपाचा संवाद साधण्यासाठी लोकांना उद्युक्त करा.

– त्यांच्याबरोबर कुठेतरी जा किंवा गटागटात एखादा उपक्रम करा.

– मानसिक विकाराने आजारी असलेल्या लोकांना त्यांच्या स्थानिक भागात उपचार घेण्यासाठी प्रोत्साहन द्या किंवा Elefriend सारख्या ऑनलाईन फोरमची मदत घ्या.

– आधी त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्या, पण कोणतेही मत बनवून घेऊ नका. एखादी व्यक्ती कामात व्यस्त किंवा आनंदी दिसत असली तरी ती एकटी असू शकते.

 

लेखक: ऐश्वर्या पाटील
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *