S400

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या नुकत्याच पार पडलेल्या भारतभेटीचे फलित म्हणजे भारताने रशियाकडून S400 संरक्षण प्रणाली विकत घेण्याचा करार केला आहे. अनेक अर्थांनी या कराराला आता महत्त्व आहे. अमेरिकेने भारताला हा करार केल्यास काउंटरिंग अमेरिकाज् अ‍ॅडव्हर्सरीज् थ्रू सँक्शन अ‍ॅक्ट (कॅटसा) अंतर्गत भारतावर निर्बंध लादण्याची धमकी देखील दिली होती. चीनने ही यंत्रणा रशियाकडून विकत घेतल्यामुळे अमेरिकेने आधीच चीनवर निर्बंध लादलेले आहेत. भारत आणि अमेरिकेत नुकत्याच झालेल्या 2+2 चर्चेत S400 कराराचा मुद्दा ऐरणीवर होता. भारत हा रशियाचा संरक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा ग्राहक आहे. त्यामुळे अमेरिकेसोबत संबंध सुधारत असताना पूर्वीपासून असलेले भारतरि शया संबंध देखील यातून टिकविण्याचा मानस दिसून येतो. चीनला तोडीस तोड म्हणून भारताची संरक्षण फळी मजबूत करण्यासाठी भारताला S400 प्रणालीची गरज आहे. आजच्या लेखात या प्रणाली बाबत अधिक सविस्तर जाणून घेऊया.

 

काय आहे S400 प्रणाली?

S400 ट्रायम्फ ही रशियाची अत्याधुनिक हवाई संरक्षणप्रणाली आहे. या प्रणालीचे नाटोमधील नाव S21 ग्रोवलर असे आहे. 2007 साली पूर्वी वापरात असलेल्या S300 आणि S200 संरक्षणप्रणालीची जागा या प्रणालीने घेतली. आतापर्यंत यात अनेक बदल करण्यात आले असून या प्रणालीला अंतर्जालाला देखील जोडता येते. जमिनीवरून हवेत मारा करणारी ही लांब पल्ल्याची प्रणाली आहे.

 

S400 ची थोडक्यात पार्श्वभूमी :

शीतयुद्धाच्या काळात क्षेपणास्त्रांपासून संरक्षणासाठी प्रणाली तयार निर्माण करण्याची गरज भासू लागली तेव्हा अमेरिका आणि रशिया क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण प्रणाली विकसित करू लागले. 1980 सालापासून S400 प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्न सुरू होते. 1991 साली सोव्हियत युनियनचा पाडाव झाल्याने काही काळ या प्रणालीचा विकास थांबला होता. टप्प्याटप्प्याने ही प्रणाली विकसित करण्यात आली आणि S400 ट्रायम्फ हे तिचे आद्ययावत स्वरूप आहे.

 

S400 प्रणालीचे वैशिष्ट्य :

ही जमिनीवरून हवेत मारा करणारी यंत्रणा असून 400 किमी पर्यंतच्या कक्षेत असणार्‍या टार्गेटला नष्ट करू शकते. या यंत्रणेत मल्टीफंक्शनल रडार, शत्रू विमानाला यांत्रिक पद्धतीने शोधून काढणे आणि लक्ष्य बनविणारे तंत्रज्ञान, लाँचर, कमांड आणि कंट्रोल सेंटर या सुविधा आहेत. या प्रणालीद्वारे तीन प्रकारची क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली जाऊ शकतात, ज्यामुळे तीन स्तरांवरील संरक्षण प्राप्त होते. विमान, स्वयंचलित हवाई वाहने, F16 आणि F22 सारखी लढाऊ विमाने, बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे अशा सगळ्या प्रकारच्या हवाई वाहनांना या प्रणालीद्वारे नष्ट करता येते. या यंत्रणेतील रडार 600 किमी दूर असलेल्या वाहनाचा शोध लावू शकतो आणि ते वाहन 400 किमीच्या कक्षेत आल्यावर त्याला नष्ट करण्यात येते. या प्रणालीत कमी अंतरावर असलेल्या विमानांना/क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यासाठी कमी पल्ल्याची यंत्रणा देखील आहे. या यंत्रणेतील कमांड पोस्टद्वारे लक्ष्याला शोधले जाते आणि मॅन्ड् अँटीएअरक्राफ्ट मिसाईलद्वारे त्यावर प्रतिहल्ला चढविला जातो.

 

भारत रशियामधील या कराराचे स्वरूप काय आहे?

भारत S400 हवाई संरक्षण प्रणालीच्या 5 स्क्वाड्रन विकत घेणार आहे. 39,000 करोड रुपये यासाठी भारताला मोजावे लागतील. ही यंत्रणा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे. पुढील दोन वर्षांत पहिली स्क्वाड्रन बसविण्यात येईल. येत्या पाच वर्षांत पाचही स्क्वाड्रन कार्यान्वित होतील. भारतीय वायुसेनेकडे या यंत्रणेची जबाबदारी असेल. भारतीय वायुसेना ही यंत्रणा तिच्या आय्एसीसी (इंटिग्रेटेडएअरकमांड अँड कंट्रोल सिस्टिम) यंत्रणेच्या सेन्सर आणि अस्त्रांच्या जाळ्यासोबत जोडणार आहे.

चीनने 2014 साली रशियासोबत करार करून सहा S400 यंत्रणा विकत घेतली आहे. 3 अब्ज डॉलर्सचा करार तेव्हा चीन आणि रशियामध्ये करण्यात आला. भारत याबाबत रशियासोबत 2015 सालापासून वाटाघाटी करीत आहे. F35 सारख्या अमेरिकी स्टील्थ फायटर प्लेनला नष्ट करू शकणार्‍या या ताकदीवर संरक्षण प्रणालीमुळे भारताचे दक्षिण आशियातील स्थान नक्कीच बळकट होईल आणि शेजारी असलेल्या चीनच्या संरक्षण सज्जतेला उत्तर देण्यास भारत मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल.

 

लेखक: वैभवी घरोटे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *