15 ऑक्टोबर : वाचन प्रेरणा दिन

अदम्य जिद्द

 

अदम्य जिद्द (Indomitable Spirit) या पुस्तकात डॉ. कलाम यांच्या विविध भाषणांतून व चर्चातून पुढे येणार्‍या कल्पना, विचार, मूल्य व तत्त्वज्ञानाचा समावेश केला आहे. या पुस्तकामधून आपल्यासमोर अब्दुल कलामांची माणूस, शास्त्रज्ञ, एक शिक्षक व देशाचे राष्ट्रपती अशी विविध रूपे उभी राहतात.

 

पुस्तकाची सुरुवातच कलामांच्या 57 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणातील पुढील ओळींनी होते. ते म्हणतात, ‘सर्व राजकीय व सामाजिक संस्थांचा पाया हा माणसातील चांगुलपणावर आधारलेला असतो. केवळ संसदेच्या कायद्यामुळेच कोणते राष्ट्र महान बनत नसते तर ते त्यातील माणसांच्या मोठेपणामुळे व कृत्यामुळे होत असते.’

 

मानवामध्ये असणार्‍या अजिंक्य क्षमतांवर प्रकाश टाकणारे व अशा आणि क्षमतांचा शोध येणारे हे पुस्तक आपल्याला फारच प्रेरणादायी ठरणारे आहे. अंगीभूत गुणकौशल्ये व मानवी जिद्द यांच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे ते आपल्याला या पुस्तकाद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न करतात.

 

शाळेत असताना आमच्या एका बाईंकडून या पुस्तकाबाबत ऐकले होते आणि तेव्हापासून आजपर्यंत या पुस्तकातील एक वाक्य मनात घर करून बसले आहे व ते म्हणजे, ‘माझ्याकडे सात वर्षांसाठी एक मूल द्या आणि त्यानंतर त्याला भलेही ईश्वर नेवो वा सैतान घेऊन जाओ, ते त्याला बदलू शकत नाहीत.’ या वाक्यात डॉ. कलाम माणसाच्या जीवनातले शिक्षकाचे स्थान आपल्याला सांगून जातात.

 

टार्गेट 3 बिलियन

शाश्वत विकास, पर्यावरणाचा समतोल, गरिबीचे उच्चाटन, भारतातील छोट्या गावांचा विकास अशा काही मूलभूत प्रश्नांवर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आपल्याला या पुस्तकात उपाय सुचवतात. स्रिजन पाल सिंग यांच्या सोबतीने त्यांनी लिहिलेले हे पुस्तक अनेक कारणांसाठी मैलाचा दगड ठरले आहे.

 

हे पुस्तक वाचत असताना डॉ. कलाम यांची कल्पकता, देशाप्रती व मानवी जीवनाच्या आदराप्रती त्यांची असणारी श्रद्धा आपल्याला नक्कीच जाणवते. सामान्यतः शास्त्रज्ञ हे चार भिंतींच्या आत स्वतःला ठेवून काम करतात, पण कलामांसारखी मंडळी ही समोर आलेल्या प्रत्येक समस्येवर उपाय करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. यामध्ये विशेषतः ग्रामीण भागात असणार्‍या समस्या व त्यांवरच्या उपायांवर डॉ. कलाम आपले लक्ष वेधतात.

 

या पुस्तकामध्येच त्यांनी अत्यंत अभिनव व महत्त्वाकांक्षी अशा ’ PURA’ (प्रोव्हायडिंग अर्बन अ‍ॅमिनिटीज् इन रूरल एरियाज्) प्रकल्पाचा सिद्धांत मांडला आहे. यानुसार शहरावर वाढणारा ग्रामीण जनतेचा बोजा कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर ग्रामीण भागातच जनतेला आवश्यक असणार्‍या सोयीसुविधा पुरवल्या जातील. त्यांच्या सहाय्याने या भागाचा विकास होण्यास मदत होईल.

 

या पुस्तकाद्वारे इतर मंडळींपेक्षा डॉ. कलामांचे असणारे वेगळेपण स्पष्टपणे जाणवते ते म्हणजे, ते केवळ आपल्यातील उणिवा दाखवून रहात नाहीत तर त्या उणिवांवर मात करण्यासाठी आवश्यक असे अनेक अभिनव व प्रतिभावान उपक्रम ही ते सुचवतात. म्हणून या पुस्तकातून आपण केवळ टीका करण्यापेक्षा अभिनव उत्तरांकडे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतो व तीच कलामांना खरी आदरांजली ठरेल.

 

संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *