विस्मृतीतले भारतीय योद्धे (भाग 2)

स्वा. सावरकरांच्या अभिनव भारत संघटनेच्या स्थापनेनंतर देशात क्रांतिकारी चळवळीने जोर धरला. 1904 पासून अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर स्थलांतर करणार्‍या पंजाब्यांची संख्या हळुहळू वाढत गेली. या स्थलांतरितांचे कॅनडा व अमेरिकेत अनपेक्षित स्वागत झाले. त्यांना गोरे कामगार व त्यांच्या संघटना यांचे प्रखर वैर सहन करावे लागले. 1913 मध्ये शीख धर्मगुरू भगवानसिंह यांनी व्हॅकुव्हरला भेट दिली. ब्रिटिश राजवटीविरुद्ध शस्त्र उपसून ती उलथवून टाकण्याच्या विचाराचा त्यांनी धर्मसत्याप्रमाणे प्रचार केला. लवकरच क्रांतिकारी कारवायांचे केंद्र अमेरिकेत हलवले गेले. भारतातून हद्दपार करण्यात आलेले लाल हरदयाळ तेथे महत्त्वाची भूमिका पार पाडत होते. सचिंद्रनाथ सन्याल व विष्णु गणेश पिंगळे यांच्यामार्फत त्यांनी सुप्रसिद्ध बंगाली क्रांतिकारक रासबिहारी बोस यांच्याशी संपर्क साधला. हार्डींग्जवरील हल्ल्यामुळे त्यांना सर्वत्र प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनी उठावाची तयारी केली. नंतर हा उठाव दडपण्यात आला.

 

1915 साली वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, अविनाश भट्टाचार्य, एम.पी.टी. आचार्य, चंपकरामण पिल्ल्या, अशा अनेकांनी जर्मनीत संघटित होऊन बर्लिन कमिटीची स्थापना केली. या कमिटीने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याला जर्मन सरकारचा पाठिंबा मिळवला. तसेच परदेशात अनेक प्रतिनिधी मंडळे ही बर्लिन कमिटीने पाठवली. पर्शियन कमिटी ही त्यापैकीच एक होय. या कमिटीचा खर्च दोन कोटी मार्क्स होता. वृंदावनच्या राजा महेंद्रप्रताप यांचे बर्लिन कमिटीला सहकार्य लाभले.

 

याच काळात  ‘कोमागाटा मारू 1914’ प्रकरण घडले. यावेळी सोहनलाल पाठक, हुसेन रहीम, बळवंतसिंह यांनी किनारा समिती स्थापन करून निषेध सभा आयोजित केल्या. भवानसिंह, बरकतुल्ला, रामचंद्र, सोहनसिंग भाकना यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी मोहीम उभी राहिली. लवकरच देशात क्रांतिकारी चळवळीचे  युग अवतरले. सर्वत्र क्रांतिकारकांच्या गुप्त संघटना स्थापन झाल्या. ‘इंडिया हाऊस’, ‘अनुशीलन समिती’, ‘युगंतर’ या त्यापैकी प्रसिद्ध होत्या. मदनलाल धिंग्रा यांनी लंडन येथे कर्झन वायली याचे केलेला वध त्या काळातील सनसनाटी क्रांतिकारी कृती होती. 1908 ते 1918 या काळात एकशे शहाऐंशी क्रांतीकारकांना शिक्षा दिल्या गेल्या किंवा त्यांना ठार करण्यात आले. क्रांतिकारकांनी परदेशातही काही केंद्रे स्थापन केली. लंडनमधील श्यामजी कृष्ण वर्मा, विनायक सावरकर व युरोपातील मादाम कामा व अजितसिंग यांनी स्थापन केलेली केंद्रे प्रसिद्ध होती. त्यांची अल्प संख्या व नंतरचे अपयश लक्षात घेऊनही त्यांनी भारतीय राष्ट्रवादाच्या विकासामध्ये मोलाची कामगिरी पार पाडली, असे मानावे लागेल. ‘त्यांनी आम्हाला मनुष्यत्वाचा अभिमान प्राप्त करून दिला, असे एका इतिहाकाराने यथार्थतेने म्हटले आहे.

 

युद्धाचा खर्च आणि वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी सरकारने भारतीयांवर मोठी करवाढ लादली. यामुळे अर्थव्यवस्थेचे आणि पर्यायाने व्यापाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या सर्वांबरोबरच देशात पसरलेल्या भयानक प्लेगच्या महामारीने अनेक जीवांचा बळी घेतला. ब्रिटिशांनी युद्ध विजयानंतर भारतीयांना दिलेल्या आश्वासनांना केराची टोपली दाखविली. स्वराज्य देण्याऐवजी ब्रिटिशांनी दमनकारी रोलेट कायदा भारतीयांवर लादला. या कायद्यान्वये साम्राज्यविरोधी ‘राजद्रोह’ करणार्‍यांना जेरबंद करणे, प्रेसचे सीलिंग करणे, राजकीय कार्यकर्त्यांचा छळ करणे, आणि कोणत्याही वॉरंटशिवाय संशयितला अटक करणे, असे अधिकार वॉइसरॉयच्या सरकारला दिले. या कठोर कायद्याच्या विरोधातील सार्वजनिक निषेध कठोरपणे चिरडण्यात आला.

 

यादरम्यानची सर्वात भयंकर घटना म्हणजे 1919 चे जालियनवाला बाग हत्याकांड. जनरल रेजिनाल्ड डायरने आपल्या सैनिकांना अमृतसरच्या सगळ्या बाजूने बंद केलेल्या जालियनवाला बागेत सैफुद्दीन किचलू आणि डॉ. सत्येंद्र पाल यांच्या अटकेचा शांततेने निषेध करणार्‍या 15000 निःशस्त्र आणि अहिंसक पुरुष, स्त्रिया आणि मुले यांच्यावर बेछूट गोळीबार करण्याचा आदेश दिला. यात सरकारी आकडेवारी नुसार 1499 लोक मरण पावले तर 1337 गंभीर जखमी झाले. या कुकर्मासाठी ब्रिटिशांनी डायरला योग्य ठरवत त्याच्यासाठी मोठी बक्षिसी रक्कम उभी केली. रवींद्रनाथ टागोर यांनी याविरोधात इंग्रजाना नाईटहूड परत केला.

 

ब्रिटिशांकरिता युद्धात भारताने सर्व काही दिले होते. त्या उपकारांच्या अशा विश्वासघातकी परतफेडीने भारतीयांची मने पायाखाली तुडविली गेली. देशाकडे आपल्या सैनिकांचे आभार मानण्यासारखे काही नाही, अशी राष्ट्रवाद्यांना भेदक जाणीव झाली. ते केवळ परदेशी मालकांना सेवा देण्यासाठी परदेशात गेले होते. आपल्या वसाहतवादी मालकांसाठी विदेशी जमिनीवर आपला जीव किंवा अवयव गमावणे ही व्यावसायिक बाब होती. राष्ट्रीय सेवेच्या स्वरूपात त्यांची प्रशंसा करण्यास हे योद्धे पात्र नव्हते. किंबहुना असा विचार भारतीय राष्ट्रवाद्यांनी केला आणि आपल्या सहकार्‍यांच्या नायकत्वाचा स्वतःला विसर पडू दिला. 1964 सालात प्रथम विश्वयुद्धाचा 50 वा वर्धापनदिन साजरा केला गेला त्यावेळी या अज्ञात भारतीय लढवय्यांचा कुठेही उल्लेख झाला नाही. अगदी भारतातही नाही.

 

दिल्लीच्या राजपथावरचं ‘इंडिया गेट’ माहीत आहे? ते नुसतंच पर्यटनस्थळ नाही तर भारतीय सैनिकांच्या शौर्याचं, बलिदानाचं स्मरणस्थळ आहे. अगदी काटेकोरपणे पाहिलं, तर हे बलिदान केलेले सैनिक भारतीय असले तरी भारतासाठी लढले नव्हते. ते ब्रिटिश धन्यासाठी, ब्रिटिशांच्या शत्रूंविरुद्ध लढत होते. म्हणजे समजा, औरंगजेबाने त्याच्या बाजूने काबूल कंदाहारच्या बंडखोर पठाणांविरुद्ध लढणार्‍या नि ठार झालेल्या राजपूत सैनिकांसाठी असं एखादं स्मारक-बिरक उभारलं असतं तर कसं वाटलं असतं? अगदी तसंच हे मुळात आहे. आता औरंगजेबाने कधीच इतकी कृतज्ञता दाखवली नाही, हा भाग वेगळा पण इंग्रजांनी दाखवली. जुलै 1914 ते नोव्हेंबर 1918 असं चाललेलं हे पहिलं महायुद्ध संपतंय न संपतंय तोच इकडे भारत-अफगाणिस्तान सीमेवर युद्ध भडकलं. 3 मे 1919 रोजी अफगाण सैनिकांनी भारतीय सरहद्दीत घुसून ‘बाग’ हे मोक्याचं ठाणं जिंकलं. यातून जे युद्ध भडकलं ते ऑगस्ट 1919 पर्यंत चाललं. त्याला ‘तिसरं इंग्रज-अफगाण युद्ध’ असं म्हटलं जातं. यात हजार-दीड हजार भारतीय सैनिक ठार वा निकामी झाले, म्हणजेच हे सैनिकही आपल्या मातृभूमीसाठी लढत नव्हते. काटेकोरपणे पाहता ते भाडोत्री, पोटार्थी सैनिक होते. पोटाला घालणार्‍या धन्यासाठी लढत होते. इंग्रजीत त्यांना ‘मर्सिनरी’ असा शब्द आहे. तो शिवीप्रमाणेच वापरला जातो. त्यांना निष्ठा बिष्ठा नसते. जो धनी जास्त पगार देईल, त्याच्यासाठी तलवार गाजवायची एवढंच त्यांना माहिती असतं. त्यांचं एकंदर वागणंही तसंच म्हणजे लुटारूसारखं असतं.

 

आणि इथेच नेमका युरोपियन मर्सिनरींमध्ये आणि इंग्रजांच्या भारतीय सैन्यामध्ये फरक होता. युरोपच्या अपरिचित हवामानात गोठवून टाकणार्‍या थंडीत अपुरे कपडे अपुरी युद्धसामुग्री यांसह लढणार्‍या भारतीय सैनिकांनी अपूर्व हिंमत, अपार सोशिकता सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करण्याची प्रचंड जिगर यांचं असं काही दर्शन घडवलं की, इंग्रज सेनापतीही थक्क होऊन गेले. भारावून गेले. युद्धानंतर सैनिकांसमोर भाषण देताना अँग्लो फ्रेंच सेनेचा सर्वोच्च सेनानी जनरल फर्डिनांड फॉक भारतीय सैन्याकडे वळला आणि म्हणाला, जेव्हा तुम्ही स्वच्छ सूर्यप्रकाशाने आच्छादलेल्या तुमच्या पूर्वेकडच्या मायभूमीत परत जाल, तेव्हा तुमच्या देशबांधवांना सांगा की आपल्या लोकांनी उत्तर युरोपमधल्या फ्रान्स आणि फ्लँडर्सची थंडगार भूमी आपल्या रक्ताने चिंब भिजवली. अत्यंत पराक्रमी आणि दृढनिश्चयी शत्रूला त्यांनी आपल्या तितक्याच दृढ पराक्रमाने मागे लोटलं. आम्ही पराभवाच्या गर्तेत जात असताना  त्यांनी आम्हाला अंतिम विजयाचा मार्ग दाखवला. जा, सगळ्या भारतीयांना आमचा निरोप सांगा की, आमच्या भूमीवर सांडलेल्या त्यांच्या रक्ताची स्मृती आम्ही आमच्या मृत वीरांइतक्याच भक्तीने आणि आदराने जतन करू.

 

या भावनेतूनच इंग्रज सरकारने ठरवले की, पहिल्या महायुद्धात आणि लगेच झालेल्या अफगाण युद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मृतींचं एक स्मारक उभारायचं. नवी दिल्ली हे नवं शहर ज्या वास्तुरचनाकार एड्विन ल्युटेन्सने उभारले, त्यानेच तत्कालीन किंग्ज वे या रस्त्यावर ‘ऑल इंडिया वॉर मेमोरियल’ या नावाने ही लाल दगडाची भव्या कमान उभारली. 1921 ते 1931 अशी दहा वर्षं ते काम चाललं. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ‘किंग्ज वे’ चं नामकरण ‘राजपथ’ असं झालं आणि ‘वॉर मेमोरियलचं’ ‘इंडिया गेट’ झालं. 1971 साली भारत सरकारने एक फार महत्त्वाचं काम केलं. ‘इंडिया गेट’च्या भव्य कमानीखाली, सुंदर काळ्या संगमरवराची एक मेघडंबरी उभारण्यात आली. त्या मेघडंबरीत एक उलटी बंदूक आणि तिच्या दस्त्यावर एक लष्करी शिरस्त्राण लटकवलेलं आहे. मेघडंबरीच्या चारी बाजूंना चार मशाली कायम पेटलेल्या असतात. स्वतंत्र भारतासाठी रणांगणावर बलिदान केलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांचं हे स्मारक ‘अमर जवान ज्योति’ या नावाने ओळखले जाते. या अगदी साध्या परंतु भावनिकदृष्ट्या मौल्यवान स्मारक उभारणीमुळे ‘इंडिया गेट’चा सगळा संदर्भच बदलून गेला. इत:पर ‘इंडिया गेट’ हे गुलाम भारतीयांसाठी इंग्रज धन्याने उभारलेले स्मारक ही ओळख बाजूला पडली आणि भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे, धगधगत्या क्षात्रतेजाचे स्मारक ही नवी ओळख निर्माण झाली.

 

युरोप आणि मध्य पूर्वेतील लढायांतील भारतीय सैनिकांची उल्लेखनीय छायाचित्रे अनेक संशोधक सध्या ऑनलाइन स्वरूपात प्रसिद्ध करीत आहेत. परकीय भूमीशी कसलाही परिचय नसलेले तरुण पुरुष, काही लढायला निघाले तर काही भयंकर जखमांत विव्हळत पडलेले पाहून हृदय हेलावल्याशिवाय राहत नाही. यातील माझे आवडते चित्र 1918 मध्ये मेसोपोटेमिया येथे घोड्यावर बसलेला, दाढीवाला आणि पगडी परिधान केलेला भारतीय सैनिक आपल्या घोड्यावरून वाकून एका भुकेलेल्या स्थानिक शेतकरी मुलीला आपला शिधा देताना दिसतोय. भारतीयांचा हाच गुण भारतीय बटालियनच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये लेबनानी नागरिकांना मदत करण्यापासून ते सोमाली भटक्या जमातीच्या उंटांवर उपचार करण्यासाठी मदत करतांना संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेच्या मोहिमेदरम्यान अनेकदा दिसून आला आहे. भारतीय सैनिकांतील नैतिकतेचे हे प्रतीक आहे, मग ते घरच्या असो किंवा परदेशी भूमीवर.

 

बर्‍याच भारतीय लोकांत वसाहतवादी युगादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या शोषणाचा विलक्षण राग आजही आहे. परंतु आता आम्ही आपल्या देशाचा अभिमान पहिल्या महायुद्धात परदेशी रणभूमीवर गाजवलेल्या सैनिकांना माणूस म्हणून पाहत आहोत. दिल्लीमध्ये सशस्त्र सेना ऐतिहासिक संशोधन केंद्र परिश्रमपूर्वक त्या काळातील स्मृतिचिन्हे प्राप्त करून पहिल्या महायुद्धात शौर्याने लढलेल्या 1.3 दशलक्ष भारतीय सैनिकांच्या विस्मृतीत गेलेल्या कार्याची पुनर्रचना करण्यासाठी काम करीत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारतीय सैन्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्या जवळजवळ जाणारी कोणतीही कलाकृती आजवर उदयास आलेली नाही. मुल्क राज आनंद यांचे ‘काला पानी’ याला अपवाद आहे. यात स्वतःच्या देशातून हुसकावून लावलेला शिपाई लालूप्रसादची गोष्ट आहे. आपल्या गावी परत जाण्यासाठी, आपलं सर्वस्व गमावल्याच्या विवंचनेत असलेला लालूप्रसाद समजू शकत नसलेली लढाई का लढतोय याचे चित्रण आहे. मी भारतीयांच्या युद्धसहभागाबद्दल आजवर जॉन मास्टर्सची ‘द रावी लांसर्स’, रोबर्ट ग्रेवजची ‘गुड्बाय टू ऑल दॅट’, वेरा ब्रिटेनची ‘टेस्टामेंट ऑफ यूथ, या कादंबर्‍या वाचल्या आहेत. त्याही पाश्चात्य विचारसरणीच्या. त्या मानाने भारतीय साहित्यात फारच अत्यल्प प्रमाणात लिहिले गेले आहे.

 

पहिल्या महायुद्धात सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन, न्यूझीलंडर्स, कॅनेडियन आणि दक्षिण आफ्रिकन सैनिकांची भूमिका आणि त्यांच्या त्यागांची कौतुके अनेक पुस्तक, कादंबरींमध्ये अनेकदा केली गेलेली दिसतात. गॅलिपोलीसारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटांमधून या देशांतल्या सैनिकांच्या शौर्याचे थाटात प्रस्तुतीकरणही केले गेले आहे. परंतु याच युद्धात भाग घेतलेल्या 13 लाख भारतीय सैन्यांबद्दल साधे उल्लेखही आपल्याला सापडत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या युद्धादरम्यान 74,187 भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले आणि तुलनेने मोठ्या संख्येने जखमी झाले. त्यांच्या कथा, त्यांचे नायकत्व या युद्धाच्या लोकप्रिय इतिहासापासून कोसो दूर दुर्लक्षित पडले आहेत किंवा त्यांचे संदर्भ केवळ तळटीपांत सापडतात. इतिहासातील अनेक विषयांवर द्वेष मुलक राजकारण करण्यापेक्षा आपल्या पराक्रमाचा वास्तववादी इतिहास आपल्या पुढच्या पिढीसमोर मांडून त्यांना स्फूर्ती देण्याचे पुण्यकर्म आपण करणार आहोत का? आपण एक तर आपल्या इतिहासाविषयी, उज्ज्वल भूतकाळाविषयी कमालीचे उदासीन असतो किंवा त्या बाबतीत कमालीचा आंधळा अभिनिवेश बाळगून असतो. पण या दोन्ही टोकांपेक्षा एखादा संतुलित मध्यम मार्ग आपण चोखाळू शकत नाही का? त्या करिता वास्तववादी इतिहास लेखनाची वाट चोखाळावी लागेल. सरकारदप्तरी सगळ्या नोंदी मिळतीलच असे नाही. काही नोंदी पदके, प्रमाणपत्रे. सैनिकांनी पाठवलेली पत्रे या व अशा अनेक स्वरूपात गावोगाव पसरलेली असतील. त्यांची जंत्री मांडावी लागेल.

 

पहिल्या महायुद्धाची शंभरी भरत असताना त्या महायुद्धातील भारताचा इतिहास ओघवत्या भाषेत लिहिण्याची व तो जनसामान्यांपर्यंत नेण्याची विनंतीच मी  इतिहासकारांना करू शकतो. तो इतिहास जोपर्यंत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत नाही तोवर त्या अनेक ज्ञात-अज्ञात वीरांना साष्टांग नमस्कार!

 

लेखक: साजन उचाडे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *