भूले बिसरे गीत

लागा चुनरी में दाग़

 

लागा चुनरी में दाग़ छूपाउं कैसे घर जाउं कैसे? लागा चुनरी में दाग़ ॥

हो गई मैली मोरी चुनरीयाँ कोरे बदन सी कोरी चुनरीयाँ

जा के बाबुल से नजरें मिलाउ कैसे, घर जाउं कैसे?

लागा चुनरी में दाग़ ॥1 ॥

भूल गयी सब वचन बिदा के, खो गई मैं ससुराल में आ के

जा के बाबुल से नजरें मिलाउ कैसे, घर जाउं कैसे?

लागा चुनरी में दाग़ ॥ 2 ॥

कोरी चुनरीयाँ आतमा मोरी, मैल है माया जाल,

वो दुनिया मोरे बाबुल का घर ये दुनिया ससुराल

जा के बाबुल से नजरें मिलाउ कैसे, घर जाउं कैसे?

लागा चुनरी में दाग़ ॥ 3 ॥

 

सगळी दुनिया जरी तलत, किशोर आणि माझी गाणी ऐकत असली, तरी मी मन्नादांची गाणी ऐकण्यात आनंद मानतो!… असे गौरवोद्गार दस्तुरखुद्द महंमद रफी साहेबांनी काढले होते, ते हे मन्ना डे!

मन्नादांना समृद्ध असा सांगीतिक वारसा लाभला होता, ज्याच्यामुळेच हिंदी आणि अनेक प्रादेशिक चित्रपटांना सोन्याहून सुंदर, त्यांच्या स्वरातील गीतांचे साज मिळाले!

-एका फार मोठ्या उस्तादांच्या गायनाचा कार्यक्रम ऐन वेळी रद्द करावा लागणार असतो कारण ते गायक त्या कार्यक्रमाला हजर राहू शकत नसतात आणि हा निरोप सर्व श्रोते प्रेक्षकगृहात आलेले असताना आयोजकांना मिळतो.

तिकडे प्रेक्षकांचा गोंधळ/अस्वस्थता वाढू लागते आणि कार्यक्रम सुरू व्हावा म्हणून दबाव वाढू लागतो. अशा संकटसमयी, नायक चाँद, तिथे आलेला पाहताच क्षणी आयोजक, जो त्याचा मित्रही असतो त्याला आग्रह करतात की तूच मला वाचव. नायक हा एक लोकप्रिय गायकही असतो; नाही हो करता करता, नायक खाँ साहेबांचे सोंग घेऊन मंचावर अवतरतो आणि काय? चमत्कारच घडतो म्हणा ना-

रागदारीवर आधारलेले गीत, जोडीला भरतनाट्यम्चे जल्लोषपूर्ण पदन्यास, अजोड संगीत आणि विलक्षण गायकी यांचा स्वर्गीय संगम होतो. प्रेक्षक मंत्रमुग्ध आणि तृप्त होतात!

या गीताच्या नायिकेला एक वेगळाच आयाम कवी शाहिरजींनी दिला आहे, – ती व्याकुळ होऊन आपली व्यथा मांडत म्हणते, अशी कशी मी भरकटले बाई? माझ्या अनाघ्रात, कोर्‍या शरीरासारखीच ही माझी चुनरी निष्कलंक, स्वच्छ होती जेव्हा मी माझ्या पित्याचे घर सोडले तेव्हा, पण आता ही डागाळली; माझ्या गलथान पणामुळे की या मोहमयी दुनियेमुळे?! हे परमात्म्याला वाचव, मी माझ्या जन्मदात्याला कशी सामोरी जाऊ सांग, हे लांच्छन लपता लपत नाही. माझी लाज राख.

खरं पाहता, मला बिदाईच्या वेळी माझ्या ज्येष्ठांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली होती, पण स्वत:ला सावरण्याचे सगळे धडे मी सासरी येऊन विसरून कशी गेले? स्वत:ला कोसत असतानाच तिच्या लक्षात येते आता काय उपयोग? वेळ तर हातातून निसटली आहे मग म्हणून ती पुन्हा स्वत:ची समजूत काढते, सफाई देते-हो तर माझी कोरी करकरीत चुनरी ही माझ्या कोर्‍या, अभंग आत्म्यासारखीच आहे. हे सगळे मायाजाल आहे राग/लोभ, गरीब/श्रीमंत, चांगले-वाईट, हे सगळे या नश्‍वर जगाचे विभ्रम आहेत.

त्या परमपित्याचे घर हे माझे माहेर आहे, मी, हा आत्मा त्याचा अंश म्हणजे तो सुद्धा अविनाशी! कारण आत्मा-नैनं छिन्दन्ति शस्त्राणि। नैनं दहति पावक:’.. तर, ही नवरसांनी, षड्रिपूंनी गजबजलेली दुनिया माझे सासर! म्हणजे इथे एकदा का जन्म घेतला की फसलाच आत्मा मायाजालामधे!

शेवटी, परमात्मा आणि आत्मा एकरूप होतात जेव्हा ती नृत्यांना गाण्याच्या शेवटच्या तराण्यावर बेभान होऊन नृत्य करू लागते तेव्हा. ठरवलेले प्रमुख पाहुणे आयत्या वेळी न येणे आणि त्यांच्या जागी आपल्याच माणसाला आग्रह करून बसवणे, असे प्रकार नेहमीच घडत असतात, कारण शो मस्ट गो ऑन!

पण, आयत्या वेळच्या पाहुण्यांनी, मूळ कलाकारापेक्षा सरस ठरावे आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडावे, तसे या गीताने अचानक धनलाभ श्रोत्यांच्या पदरी टाकला आहे.

गायक मन्नादांनी चार चाँद लावले आहेत, त्यांचा शेवटचा तराणा तर अवर्णनीय आहे. गीतकार शाहिरजींनी अजबच शब्दांची जादू, उंची, वजन आणि लय बहाल केली आहे. शाहिरचे बोल जेव्हा रोशनजींच्या संगीतसाजाने नखशिखांत नटतात तेव्हा बहार येते ती इथे आहेच.

जो नायक, गीत पेश करतो ते गीत आणि नृत्यांगनेचे नृत्य यांचे अद्वैत लाजबाब वाटते! इथे नायिका आपल्या वैवाहिक सौख्याचे निराकरण करते आहे पण ते अटळही आहे असेही सांगते आहे.

‘कोरे बदन सी कोरी चुनरिया आणि ‘वो दुनिया मोरे बाबुल का घर ये दुनिया ससुराल’’- या शब्दांनी तर सबंध गीताचा बाज आणि पोत अति सुंदर, समृद्ध, विलक्षण गूढ करून टाकला आहे.!

ही गाणी इतकी वर्षे जनमानसावर आधिराज्य गाजवतात यातच त्यांची वैशिष्ट्ये सामावली आहेत. कारण काल ऐकलेले गाणे आज ऐकावेसे वाटतेच असे नाही.

या गीतामधली ‘‘चुनरी’’ ही स्त्रीची अस्मिता आहे, गरिमा आहे तिची आब्रू आहे. त्यामुळे ही डागाळलेली चुनरी कशी ‘कोरे बदनसी कोरी’ आहे हे सिद्ध केले आहे. कारण आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे तर तो कसा या मायाजालाच्या कचाट्यात सापडून मैला होईल बरे?

शेवटी, जेव्हा गायकाचा तराणा सुरू होतो तेव्हा तिच्यासमोर मोठे आव्हान असते पण ती सुद्धा  मोठ्या जिद्दीने त्या आव्हानाला सामोरी जाते.

शाहिरजींची शैलीच विलक्षण असते, तिला गूढगंभीर डूब मिळाली की ती अधिकच देखणे रूप घेऊन अवतरते! हे रूप असेच आगळेवेगळे आहे, देखणे सुंदर!

‘कोरी चुनरिया आतमा मोरी, मैल है माया जाल’, हे या गाण्याचे मर्म आहे ते समजून घेण्यासाठी थोडी आध्यात्मिक बैठक लागते, म्हणजे त्या गूढतेची नज़ाकत भावते!’

कभी कभी दाग़ भी अच्छे लगते है।

 

चित्रपट : दिल ही तों हैं-1963

दिग्दर्शक : सी. एल्. रावल

गीत : साहिर लुधियानवी

संगीत : रोशन

गायिका : मन्ना डे

कलाकार : राज कपूर, नूतन, प्राण, नाझीर हुसैन, आगा, लीला चिटणीस, मुमताज बेग़म

 

लेखक: रंजना पाटील
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *