ब्राह्मोसची हेरगिरी : देशगद्दारांना हवे कठोर शासन

निशांत अगरवालला सैन्य दलाच्या गुप्तचर यंत्रणेने केली अटक

ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसंबंधीची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय्एस्आय्ला पुरवत असल्याच्या संशयावरून निशांत अगरवाल नामक हेराला उत्तर प्रदेश एटीएस् व सैन्य दलाच्या गुप्तचर यंत्रणेने पकडण्याची कारवाई केली. ब्राह्मोस एअरोस्पेस सेंटरजवळूनच त्याला अटक केली. या सेंटरमध्येच तो काम करतो. शासकीय गुपिते अधिनियमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत येथून तांत्रिक गुप्त माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेच्या एजन्सींना पाठवायचा असा त्याच्यावर आरोप आहे. एटीएस्चे पथक अनेक दिवस त्याच्या मागावर होते. ब्राह्मोस एरोस्पेस सेंटर नागपूरात आहे. निशांत तिथे चार वर्षांपासून काम करत होता. हे केंद्र भारत आणि रशियामार्फत संयुक्तपणे चालवले जाते.  गेल्या वर्षी येथे अत्याधुनिक ब्राह्मोस शस्त्रास्त्रांच्या प्रक्रियेचे परीक्षण करण्यात आले होते.

 

देशाच्या संरक्षणाविषयीची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी शत्रुराष्ट्रांकडून सातत्याने छुप्या मार्गाने प्रयत्न सुरू असतात. यासाठी संरक्षण, संशोधन आदी क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या जवानांना, अधिकार्‍यांना, शास्त्रज्ञांना विविध प्रकारची आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढले जाते. सध्या उघडकीस आलेले निशांत अग्रवाल याचे प्रकरण याच मालिकेतील आहे. ही घटना चिंताजनक आहे. सुरक्षा व्यवस्थेला अशी खिंडारे पडू द्यायची नसतील, तर या सर्वांचे सुरक्षासंबंधी आणि सतर्कतेसंबंधी प्रशिक्षण सातत्याने करत राहणे आवश्यक आहे.

 

जगातील दुसर्‍या क्रमांकाचा पुरातन व्यवसायहेरगिरी

जगातील दुसर्‍या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय म्हणजे ‘हेरगिरी’. जवळपास सर्वच देशांकडे आज त्यांच्या गुप्तचर संघटना अथवा संस्था आहेत. अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असणार्‍या आहेत. या हेरांचा आर्य चाणक्यांच्या ‘अर्थशास्त्र’मध्ये सुद्धा उल्लेख सापडतो. याबाबत विस्तृत विवेचन चाणक्यांनी करून ठेवलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘गनिमी कावा’ यशस्वी होण्यामागे ‘बहिर्जी नाईक’ यांच्यासारख्या हुशार हेरांचा सहभाग मोठा आहे.

 

गेल्या महिन्यात बीएस्एफ् जवान अच्युतानंद अग्रवालला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीदरम्यान निशांत अग्रवाल यांचे नाव समोर आले. मिश्राला पाकिस्तानातील पत्रकाराने हनी ट्रॅपमध्ये फसवले असावे. महिलांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या फेक फेसबुक अकाउंटवरून निशांत यांच्याशी झालेल्या चॅटचे पुरावे मिळाले आहेत. निशांत अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून ब्राह्मोस मिसाईल युनिट या प्रकल्पात काम करत होता. 2017-18 मध्ये त्याला तरुण वैज्ञानिक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून IIT रुरकीत रिसर्च इंटर्न म्हणून काम केले आहे. या प्रकरणात कानपूरमधल्या Defence Materials and Stores Research and Development या संस्थेच्या आणखी दोन वैज्ञानिकांची चौकशी सुरू आहे.

 

वैचारिक भ्रम निर्माण करून पाकिस्तानसाठी काम करायला लावणे

आपण ज्यावेळी देशाच्या सुरक्षिततेविषयी बोलतो त्यावेळी सामान्य माणसाच्या डोळ्यांसमोर सीमेवर लढणारे सैनिक येतात. मात्र राष्ट्रीय सुरक्षेचा अर्थ जास्त व्यापक आहे. राष्ट्राची सुरक्षा ही तीन भागांमध्ये विभागता येते. एक तर राष्ट्राविषयी महत्त्वाची माहिती जी शत्रुराष्ट्रांपर्यंत पोहोचता कामा नये, दुसरे शत्रुराष्ट्रांनी बॉम्बस्फोट किंवा घातपात करायला नको आणि तिसरे म्हणजे देशाच्या नागरिकांमध्ये वैचारिक भ्रम निर्माण करून त्यांना भारताऐवजी शत्रुराष्ट्रासाठी(पाकिस्तानसाठी) काम करायला लावणे. ह्या तीन प्रकाराने पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आय्एस्आय् सदैव भारताचे नुकसान करण्याचा प्रयत्न करते. या सध्याच्या प्रसंगांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा जरुरी आहे. अशा प्रकारची माहिती शत्रुराष्ट्र कशा प्रकारे गोळा करते? माहिती मिळवण्यासाठी आय्एस्आय् माहिती देणार्‍या व्यक्तींना कसे फसवते? आपल्याच पाकिस्तानसाठी काम करणार्‍या नागरिकांना पकडण्यासाठी आपण नेमके काय करायला पाहिजे? जी माहिती पाकिस्तानने आपल्याकडून चोरली असेल त्याचे रक्षण करण्यासाठी आपण अजून काय करायला हवे?

 

ब्राह्मोस उत्कृष्ट क्षेपणास्त्र

ब्राह्मोस कमी अंतराचे सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तयार झाले आहे. रडारच्या नजरा चूकवून दहा मीटर उंचीवरून तसेच सर्व भूभांगावरून हे क्षेपणास्त्र सोडले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र जमीन, विमान, जहाज आणि पाणबुडीत वापरले जाते. हवेतच मार्ग बदलणे आणि चालत्या लक्ष्यालाही उद्ध्वस्त करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.

 

लष्कर, वायुदल आणि नौदल या तिन्ही सुरक्षा यंत्रणांसाठी ब्राह्मोस उपयुक्त आहे. या निर्मितीसाठी संरक्षण मंत्रालयाने ब्राह्मोस अरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गठित केली असून तिचे कामकाज नागपूर नजीकच्या बोरखेडी येथे सुरू आहे. त्यांची अनेक परीक्षणे करण्यात आली आहेत. ते अतिशय उत्कृष्ट क्षेपणास्त्र म्हणून समोर आले आहे. आता ब्राह्मोसच्या संशोधनाचे काम संपले आहे आणि शस्त्र म्हणून भारतीय सैन्यदलांमध्ये पुढील काही वर्षांत दाखल होऊ शकते. ब्राह्मोस विषयीची मूलभूत माहिती रशियाकडे असल्याने ही माहिती इतरांना कळणे दुसर्‍यांना समजणे काही अवघड नाही. पण ज्या वेळी भारतासाठी त्याचा वापर केला जातो त्यावेळी थोडा वेगळेपणा आहे कारण आपली गरज वेगळी आहे. या शस्त्रांमध्ये आपल्या गरजेनुसार काही बदल केले जातात. ते बदल नेमके काय आहेत ते समजण्याची गरज आय्एस्आय् किंवा पाकिस्तानला आहे जेणेकरून या क्षेपणास्त्राला शह देणारे अस्त्र ते निर्माण करू शकतील.

 

भारतीयांना कसे तयार केले जाते?

माहिती चोरून आय्एस्आयला देण्यासाठी किंवा ती माहिती चोरण्यासाठी भारतीयांना कसे तयार केले जाते? गुप्तहेर संस्था व्यक्तींना फोडण्याचे काम नेहमीच करत असतात. आपल्या देशाच्या कँटोन्मेंट किंवा शस्त्रास्त्र कारखाने आणि इतर महत्त्वाच्या जागांची हेर पाठवून माहिती काढण्याचा प्रयत्न शत्रुदेश पाकिस्तान करत असतो. कँटोन्मेंटमध्ये असलेल्या सैनिकांशी, त्यांच्या नातेवाईकांशी परदेशी हेर मैत्री करतात. म्हणूनच पहिले कँटोन्मेंट शहरी भागापासून वेगळे ठेवले जायचे. पाकिस्तान अशांनाच शोधतो जे मानसिकरीत्या कमजोर आहेत. त्यांना कुठलेतरी आमिष दाखवले जाते. पैशाचे, स्त्री उपभोगाचे किंवा इतर कुठलेही असू शकते. अशा प्रकारच्या आमिषाला बळी पडलेल्या लोकांचे चित्रण करून त्याद्वारे त्यांना ब्लॅकमेल केले जाते. त्यामुळे तो माणूस घाबरून पाकिस्तानला माहिती देण्यासाठी राजी होतो. यापैकी नेमके या प्रकरणात काय झाले हे येणारा काळच सांगेल. याआधीही पाकिस्तानने लोकांना फोडण्याचे कारस्थान केले आहे. पाकिस्तानने बनवलेला अणुबॉम्ब हा माहिती चोरूनच बनवलेला आहे. डॉ. ए. क्यू. खान यांनी पाकिस्तानसाठी अणुबॉम्बची निर्मिती केली आणि त्यांनी पाकिस्तानसाठी अशा प्रकारची चोरी अनेक वर्षे युरोपातील विविध राष्ट्रांमध्ये केली होती.

 

हेरगिरीचे काम सुरू करतो तेव्हा त्याला कसे ओळखावे?

एखादी व्यक्ती जेंव्हा पाकिस्तान करता चोरीचे किंवा हेरगिरीचे काम सुरू करतो तेव्हा त्याला कसे ओळखावे? ज्यावेळी एखादी व्यक्ती शत्रुराष्ट्राकरिता काम करते तेव्हा ती घाबरलेली असते. त्याची वर्तणूक बदलते. तो आपल्यावर कोणी लक्ष ठेवत नाही ना यासाठी सतत आजूबाजूला लक्ष ठेवतो. काही वेळा त्या व्यक्तीकडे खूप जास्त पैसा येतो. पल्या सैन्यातील किंवा सैनिकी कारखान्यातील माणसे अशा प्रकारचे वर्तन करतात त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना पकडणे गरजेचे असते. जरुरी माहिती मेसेज, इमेल, फोटो काढून शत्रुराष्ट्राला पाठवली जाते. त्यावर लक्ष ठेवले पाहिजे.

 

देशगद्दारांविरुद्ध कठोर पावले उचलल्याखेरीज–

सद्यस्थितीत सरकारी गोपनीय माहिती उघड केली जात असेल अथवा दुसर्‍याला विकली जात असेल, तर ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई केली जाते. जर अशी माहिती दहशतवाद्यांना दिली जात असेल, तर अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटीज् प्रिव्हेंशन अ‍ॅक्टनुसार कारवाई केली जाते. याखेरीज भारतीय दंड विधानातील तरतुदींनुसारही कारवाई करता येते; पण या परंपरागत कायद्यांनी आणि मार्गांनी होणार्‍या कायदेशीर प्रक्रियेला बराच वेळ लागू शकतो. त्यातून शिक्षेचा हेतू साध्य होत नाही.

 

हेरगिरी हादेखील युद्धनीतीचाच एक भाग आहे. त्यामुळे देशाशी गद्दारी करणार्‍या अशा बदमाशांवरील खटले भारतीय दंड विधानांतर्गत चालवण्याऐवजी आर्मी अ‍ॅक्टअंतर्गत चालवले गेले पाहिजेत. कारण, देशाची संरक्षण व्यवस्था अभेद्य असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याला सुरुंग लावून केवळ पैशाच्या अथवा शरीरसुखाच्या मोहात अडकून संवेदनशील आणि गोपनीय माहिती लीक करत असेल, तर तो अक्षम्य गुन्हा आहे.

 

आपल्याच दूतावासातील एक महिला पाकिस्तानात असताना तिथल्या आय्एस्आय् अधिकार्‍याच्या प्रेमात पडली होती. तिला किरकोळ शिक्षा झाली होती. असे घडता कामा नये. यासाठी आपल्याला कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. विशेष लष्करी न्यायालये स्थापन करून अशा गुन्ह्यांत कठोर शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. तरच ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या तत्त्वानुसार भविष्यात देशाशी अशा प्रकारची गद्दारी करण्याची हिंमत करण्यास कुणीही धजावणार नाही. अलिकडेच इंटरपोल प्रमुखाला चीनने डांबून ठेवल्याची घटना समोर आली. हा प्रमुख एकेकाळी चिनी पोलिस दलात होता. त्याने भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून चीनने त्याला शिक्षा करणार असल्याचे जगाला सांगितले. देशगद्दारांविरुद्ध अशा प्रकारची कठोर पावले उचलल्याखेरीज या घटनांना आळा बसणार नाही.

 

सदैव सतर्क राहा

प्रत्येक वर्षी 10-15 हस्तक जे पाकिस्तानसाठी काम करतात त्यांना पकडण्यात यश मिळते. पाकिस्तानने बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या इतर यांच्या मदतीने भारतामध्ये अनेक सेल उभारले आहेत. आशा करूया की आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवून त्यांना भारताची काही महत्त्वाची माहिती देण्याआधी पकडण्यात यश मिळो. ही लढाई सुरू राहणार आहे. आपल्या सुरक्षा दलांना आणि इतर संस्थांना सतत सतर्क राहाण्याशिवाय पर्याय नाही. देश सुरक्षेला प्राधान्य देत सतर्कतेशिवाय पर्याय नाही. सैन्याच्या गुप्तहेर संस्थांचे ब्रीदवाक्य आहे ‘सदैव सतर्क राहा’. ह्या ब्रीदवाक्याचे पालन करू. यापुढे होणार्‍या देशांच्या नुकसानाला आपण लवकरात लवकर थांबवण्याचा प्रयत्न करून शत्रुचे डावपेच उधळून लावण्यास सक्षम होऊ.

 

आपले गुप्तहेर खाते आणि संरक्षण दले चांगली कामगिरी करून अशा लोकांना पकडण्यामध्ये यशस्वी होतात. मात्र ही लढाई कायमच चालू राहाणार आहे. म्हणून वाढत्या सुरक्षा एजन्सीला, गुप्तहेर खात्यांना, सैनिकी कारखाने, खासगी कारखाने जिथे सैनिकी संशोधन होते त्यांनी सदैव सतर्क राहण्याची गरज आहे. आजकालच्या माहिती युद्धामध्ये शत्रूच्या शस्त्रास्त्रांविषयी आगाऊ माहिती मिळाली तर त्यांना आपण योग्य प्रत्युत्तर देऊ शकतो. म्हणून आपली माहिती शत्रुराष्ट्रांपासून वाचवणे गरजेचे आहे.

 

लेखक: हेमंत महाजन
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *