जीडीपीच्या निकषांचे नूतनीकरण आवश्यक

 

‘भारताचा जीडीपी म्हणजेच स्थूल एतद्देशीय उत्पादन मोजण्याच्या पद्धतीचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे. जीडीपी मोजण्याच्या सध्याच्या  निकषांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही’, असे संसदेच्या अंदाज समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. आपला जीडीपी खर्‍या वास्तविकतेचे दर्शन घडवत नाही, असे अंदाज समितीचे म्हणणे आहे.

भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने हा अहवाल तयार केला आहे. मात्र गुरुवारी भाजपच्या इतर सदस्यांनी विरोध केल्यामुळे अंदाज समितीचा अहवाल संसदेत स्वीकारण्यात आला नाही. याव्यतिरिक्त आपले स्थूल एतद्देशीय उत्पादन आणि एकूण उत्पादित मूल्य यांच्या निकषांबद्दल विरोधक आणि अर्थतज्ज्ञांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

जीडीपीच्या मोजमापांमध्ये दिवसेंदिवसे कमी होत असलेल्या नैसर्गिक स्रोतांची गणना केली जात नाही, असे अंदाज समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. याआधी भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुबह्मण्यम आणि अनेक अर्थतज्ज्ञांनी देखील हा मुद्दा उचलून धरला होता.

‘सर्वसामान्यपणे अर्थव्यवस्थेची वाढ मोजण्याचा निकष म्हणून जीडीपीकडे पाहिले जाते; मात्र या निकषामध्ये अनेक कमतरता आहेत आणि जीडीपीला अवास्तव महत्त्व दिले गेले आहे’, असे अरविंद सुबह्मण्यम यांनी अंदाज समितीसमोर सांगितले.

‘अंदाज समितीने केलेल्या विस्तृत अभ्यासातून दिसून येते की जीडीपी मोजण्याच्या यंत्रणेमध्ये अनेक उणिवा आहेत आणि सर्वात महत्त्वाची उणीव म्हणजे जीडीपी काढताना घटणार्‍या नैसर्गिक स्रोतांचा समावेश न करणे. स्थूल एतद्देशीय उत्पादन वाढविण्यासाठी ज्या नैसर्गिक स्रोतांचा उपयोग केला जातो, तेच स्रोत किती वापरले गेले आहेत आणि किती कमी झाले आहेत याची गणना स्थूल एतद्देशीय उत्पादन मोजताना ग्राह्य धरली जात नाही’, असे अहवालात म्हटले आहे.

‘स्थूल एतद्देशीय उत्पादनातील वाढ आणि शाश्वत विकास एकत्रितपणे साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे निति आयोगाने सांगितले होते; मात्र हे साध्य करण्यासाठी निति आयोगाने आतापर्यंत कोणतेही मार्ग सुचवलेले नाहीत’, असे देखील संसदेच्या अंदाज समितीने नमूद केले आहे. परिणामी पर्यावरणीय स्रोतांमध्ये होणारी घट आणि ही तूट भरून काढण्यासाठी केले जाणारे उपाय यांचे मोजमाप करणारे नवे मापदंड विकसित करावेत; तसेच जीडीपी आणि अर्थव्यवस्थेची वाढ मोजणार्‍या इतर निकषांमध्ये या मापदंडांचा समावेश करावा, अशा सूचना अंदाज समितीने आपल्या अहवालात दिल्या आहेत.

बदल का आवश्यक ?

सध्याचा आपला जीडीपी –

  1. नैसर्गिक स्रोतांची घट मोजत नाही.
  2. घरकाम करणार्‍या स्त्रियांचे अर्थव्यवस्थेतील योगदान गृहीत धरत नाही.
  3. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादित वस्तूंच्या दर्जा होणारा फरक मोजमापात दिसून येत नाही.
  4. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) रोजगारावर होणारा परिणाम मोजत नाही.
  5. स्थूल एतद्देशीय उत्पादनातील वाढीमुळे भारतीयांचा आनंद वाढतो का, याचे मोजमाप करत नाही.

 

लेखक: मृण्मयी गावडे
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *