औद्योगिक क्रांती 4.0

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने मुंबईत ‘औद्योगिक क्रांती केंद्र’ उभे करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आले. 2016 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेत हे केंद्र स्थापन करण्यासंदर्भात करार करण्यात आला होता. हे केंद्र ‘औद्योगिक क्रांती 4.0’ च्या आधारावर स्थापन करण्यात येणार आहे. त्याची इतर केंद्रे यूएस्ए, जपान आणि चीनमध्ये आहेत.

 

आपल्या सर्वांना ‘वाफेच्या इंजिनाने औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली’ हे माहिती आहे. मग यानंतर हे जग चौथ्या औद्योगिक क्रांतीपर्यंत कधी आणि कसे पोहोचले?

18 व्या शतकाच्या शेवटी ब्रिटनमध्ये पहिल्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. तीमध्ये वस्त्र उद्योग, वाफेच्या इंजिनवर चालणारी मशीन्स, कारखान्यांचा जन्म यांसारख्या सुधारणा घडून आल्या. त्यामुळे मानवाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनामध्ये प्रचंड बदल घडून आले. दुसरी औद्योगिक क्रांती सुमारे एक शतकानंतर सुरू झाली आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला दुसर्‍या औद्योगिक क्रांतीने शिखर गाठले. असेम्ब्ली लाइनच्या आविष्काराने कारखान्यांमध्ये असंख्य एकसारख्या वस्तूंचे जलद आणि स्वस्त उत्पादन होऊ शकले. त्यामुळे वस्तूंचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढले आणि दुसरी औद्योगिक क्रांती यशस्वी झाली. तिसर्‍या औद्योगिक क्रांतीची सुरुवात 1970 मध्ये झाली. ती डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या गोष्टींवर आधारित होती. सामान्य माणसाकडून त्याचा उपयोग सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

 

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), रोबॉटिक्स, त्रिमित छपाई (3-डी प्रिंटिंग), नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, स्वयंचलित मोटारगाड्या इंटरनेट ऑफ थिंग्ज यांसारख्या असंख्य तंत्रज्ञानांच्या अभिसरणाला आणि त्यातून निर्माण होणार्‍या शक्यतांना सध्या चौथी औद्योगिक क्रांती असे म्हटले जाते.

 

क्लॉस श्वाब हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांच्या ‘फोर्थ इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन’ या पुस्तकात चौथ्या औद्योगिक क्रांतीचे सखोल वर्णन केलेले आहे. समाजातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि शैक्षणिक नेतृत्वाच्या सहभागाने जगाची परिस्थिती सुधारण्यासाठी ही संस्था काम करते. क्लॉस श्वाब यांच्या मते ‘चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे होणारे बदल एवढे सखोल आणि मूलभूत आहेत, की आतापर्यंतच्या इतिहासात मानवजातीने एवढ्या प्रचंड संधीचा किंवा संभाव्य धोक्यांचा सामना केलेला नाही.’

 

औद्योगिक क्रांती केंद्र म्हणून भारताची निवड आणि भारताचे यामध्ये योगदान :

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), रोबॉटिक्स, त्रिमित छपाई (3-डी प्रिंटिंग ), इंटरनेट ऑफ थिंग्ज, बिग डेटा, मशीन लर्निंग, ब्लॉक चैन, ड्रोन्स मुख्यतः या तंत्रज्ञानाचा उपयोग करून चौथी औद्योगिक क्रांती यशस्वी करण्याचा विचार पंतप्रधान मोदींनी मांडला. भारताच्या विकासामध्ये भर टाकण्याची, नवीन रोजगार निर्मिती करण्याची आणि सामान्य माणसाच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. तसेच, यासाठी लागणारी अनुकूल संसाधने आणि मनुष्यबळ भारतामध्ये उपलब्ध आहे. ते विकसित करण्यासाठी मागच्या चार वर्षांमध्ये सरकारने अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये डिजिटल इंडिया, आधार यासारख्या अनेक उपक्रमांचा सहभाग आहे. तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या या औद्योगिक क्रांतीमध्ये तंत्रज्ञान गावागावापर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने मागच्या 4 वर्षांमध्ये टेलिकॉम संबंधित पायाभूत सुविधांवर नेहमीपेक्षा सहा पट खर्च केला आहे. सध्या भारतामध्ये 120 कोटी लोकांकडे आधार आहे, म्हणजेच त्यांची डिजिटल ओळख आहे. भारताने आपली टेली डेन्सिटी 75% वरून 95% पर्यंत नेली आहे. तसेच देशाला इंटरनेटने जोडण्यासाठी भारतामध्ये 3 लाख किलोमीटर्स ऑप्टिकल फायबरचे जाळे देशभर पसरविण्यात आले आहे. 2014 मध्ये भारतातील 59 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या होत्या. आता 2018 मध्ये 1 लाख ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्या आहेत. भारताने 83 हजार सर्व्हिस सेंटर्सवरून 3 लाख सर्व्हिस सेंटर असा पल्ला गाठला आहे. भारतात सर्वात स्वस्त डेटा उपलब्ध असून, पूर्वी वापरल्या जाणार्‍या डेटापेक्षा भारतात आता 30 पट अधिक डेटा वापरला जातो. अशा प्रकारे भारताने विकासाच्या दिशेने पावले उचलली आहेत. अशी यशोगाथा जगातल्या कोणत्याही देशात पाहायला मिळणार नाही असे पंतप्रधान म्हणाले. म्हणून औद्योगिक क्रांती केंद्र म्हणून ओळखले जाण्याची क्षमता भारतामध्ये आहे. भारत या गोष्टीकडे औद्योगिक परिवर्तन म्हणूनच नाही तर सामाजिक परिवर्तन घडवून आणणारी सुवर्णसंधी म्हणून पाहतो. तिचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकाला होईल.

 

औद्योगिक क्रांती 4.0 चे परिणाम :

  • डिजिटल नेटवर्क्स 4 मुळे आज जगातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीलाही जागतिक व्यवहारात सामील होण्याच्या प्राप्त झालेल्या संधी.
  • आरोग्य क्षेत्रात कृत्रिम अवयव आणि व्यक्तिगत औषधांमुळे घडणारे क्रांतिकारी बदल.
  • उद्योगांमध्ये प्रचंड वाढलेली कार्यक्षमता आणि उत्पादकता.
  • ऊर्जा आणि कृषी क्षेत्रात घडणारी प्रगती आणि त्यामुळे पर्यावरण समस्यांवर उपाय सापडण्याच्या शक्यता.

औद्योगिक क्रांती 4.0 समोर असणारी आव्हाने :

  • अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी लागणार्‍या पायाभूत सुविधा विकसित करणे.
  • हे तंत्रज्ञान उपयोगात आणण्यासाठी विविध धोरणे आखणे.
  • या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे.
  • या नवीन तंत्रज्ञानामुळे होणार्‍या आमूलाग्र बदलांसाठी सामान्य नागरिकांना तयार करणे.

 

लेखक: राजश्री काळुंके
संपर्क: swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *