अमली पदार्थांच्या जाळ्यात पंजाब

अमली पदार्थांच्या जाळ्यात पंजाब सध्या पंजाबमधला अमली पदार्थांचा विषय परत चर्चेत येण्याचे कारण म्हणजे नुकतीच पार पडलेली पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची ह्या विषयावरील बैठक व पंचकुला येथे अमली पदार्थ विरोधी दलाचे संयुक्त कार्यालय स्थापण्याचा निर्णय. पंजाबमधल्या अमली पदार्थांच्या प्रश्‍नांचे नेमके स्वरूप काय आहे? भारतातील इतर राज्यांमध्ये ही समस्या किती गंभीर आहे? अमली पदार्थांच्या पुरवठ्याची साखळी कशी चालते? पंजाब सरकारने आतापर्यंत कोणते उपाय केले आहेत व अजून काय करता येऊ शकते?

अमली पदार्थांची समस्या नेमके स्वरूप :

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अहवालानुसार पंजाबमध्ये सध्या 8 लाख 60 हजाराच्या आसपास अमली पदार्थांचे सेवन करणारे लोक आहेत. त्यापैकी 2 लाख 30 हजार लोक साध्या दैनंदिन क्रिया सुरळीतपणे करण्यासाठी अमली पदार्थांच्या सेवनावर अवलंबून आहेत. यालाच व्यसन अवलंबित्व असेही म्हणतात.  पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण मुख्यतः (99%) पुरुषवर्गातच आढळते. यातील 76% व्यसनी 18-35 वयोगटातील आहेत. ही समस्या फक्त पंजाबापुरतीच मर्यादित नसून भारतासाठी देखील चिंतेचा विषय आहे. पूर्वी भारतात अमली पदार्थांचे सेवन करणार्‍यांची संख्या 0.94/1000 नागरिक होती पण सध्या हीच संख्या 350/1000 नागरिक आहे. पंजाब सकट हरियाणा, हिमाचल प्रदेश ते मणिपूर ह्या सर्व राज्यांमध्ये ड्रग्सचा व्यापार व सेवन ही चिंतेची बाब आहे. हैदराबाद, मुंबई, पुणे यांसारखी आणखी 12 शहरे अमली पदार्थांच्या समस्येला तोंड देत आहेत. महिला सक्षमीकरणात उत्तम कामगिरी करणार्‍या मणिपूरमध्ये महिलांचे अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण संपूर्ण ईशान्य भारतात सर्वाधिक (28.2%) आहे.

अमली पदार्थांचा व्यापार आणि व्यसनाची कारणे :

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण हा भाग आशिया खंडातील अमली पदार्थांच्या व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. यालाच आशिया खंडाचा गोल्डन क्रिसेंट म्हणतात. ह्या भागाशी सीमावर्ती पंजाब राज्याच्या भौगोलिक कारणाने संपर्क येतो. त्यामुळे गोल्डन क्रिसेंटमधून पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी केली जाते. पाकिस्तान ह्या सर्व तस्करीच्या प्रकाराला पूर्णपणे पाठिंबा देतो. पंजाबी तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पाडणे हे पाकिस्तानचे भारतविरोधी सुरू असलेल्या छुप्या युद्धाचे एक उद्दिष्ट आहे. तसेच हिमाचल प्रदेशमध्येही रासायनिक अमली पदार्थ बनवण्याचे छोटे छोटे कारखाने उभे राहिले आहेत.

ह्या कारखान्यांमधील अमली पदार्थ पंजाबमध्ये तस्करी करून पाठवण्यात येतात. पंजाबमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 16.6% आहे. भारताच्या बेरोजगारीच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण तब्बल साडेसहा टक्के जास्त आहे. म्हणून बरेच बेरोजगार तरुण अमल पदार्थांच्या व्यापारात सर्व जोखीम पत्करून सामील होतात.

अमली पदार्थांचा व्यापार करताना मुख्यतः किशोरवयीन मुलांना लक्ष्य केले जाते. पहिल्या काही वेळा ह्या मुलांना अमली पदार्थ फुकट देण्यात येतात. एकदा व्यसन जडल्यावर मात्र व्यसनी मुलगा अमली पदार्थांसाठी काहीही करून पैसे जमवतोच. हेरोईनचे व्यसन करण्यासाठी दिवसाला 1400 रु. खर्च आहे. एवढे पैसे तरुण मुलांकडे नसल्यामुळे ते पैसे कमावण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात.

पंजाब सरकारने केलेल्या उपाययोजना :

सत्तेत आल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातील एक म्हणजे अमली पदार्थांचा बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी त्यांनी विशेष कृती दल (STF) ची स्थापना केली. ह्या दलाने आत्तापर्यंत 15 हजार तस्करांना अटक केली आहे. राज्यसरकार अंतर्गत 2 लाख तरुण उपचाराच्या प्रक्रियेत आहेत. अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणामाबद्दल जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी राज्यसरकार द्वारा Drug Abuse Prevention Officer Project(DAPO)  सुरू करण्यात आलेला आहे. ह्या कार्यक्रमांतर्गत सरकारी नोकर पंचायतींचे सदस्य आणि प्रतिनिधी जनजागृती करत आहेत. तसेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे NDPC (National Drugs and PSYchotropic Substances Act) कायद्यात सुधारणा करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. अमली पदार्थांच्या व्यापारात दोषी आढळल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद असावी, असा बदल राज्यसरकारला ह्या कायद्यात अपेक्षित आहे.

पुढचे पाऊल :

सीमेपलीकडून होणारी अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने (BSF) त्यांची कामगिरी चोखपणे बजावणे गरजेचे आहे. BSF आणि पंजाब पोलिस यांच्यात समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या ह्या दोन दलांध्ये अपेक्षित समन्वय दिसून येत नाही. राज्यात रोजगार निर्मितीला महत्त्व देऊन बेरोजगारीचा दर खाली आणण्यासाठी राज्यसरकारने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. विविध राज्यांना सोबत घेऊन पंजाब सरकारने उपाययोजना आखायला हव्यात. हिमाचल प्रदेश व हरियाणा ह्या दोन्ही राज्यांतून पंजाबमध्ये होणारी तस्करी थांबवण्यासाठी ह्या राज्यांशी पंजाब सरकारने उत्तम संबंध प्रस्थापित करावे. तसेच गोल्डन क्रिसेंटमधल्या व्यापाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा.

लेखक :  सौरभ तोरवणे 

संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *