मिशन गगनयान

देशाच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना ‘मिशन गगनयान’ची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. गगनयान मोहिमेद्वारे भारत पहिल्यांदा स्वबळावर आपले अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे. 2022 पर्यंत किंवा त्याआधी ही मोहीम यशस्वी करण्याचे लक्ष्य मोदींनी इस्रो समोर ठेवले आहे.

भारताची ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीन नंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल.  या मानवी अवकाश मोहिमेुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार असून, यामुळे देशभरात जवळपास 15 हजार नोकर्‍यांची निर्मिती होणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान-1, मंगळयान या यशस्वी मोहिमांनंतर भारतीय अंतराळवीराला अवकाशात घेऊन जाण्याची महत्त्वकांक्षी मोहीम हाती घेतलीआहे. या मोहिमेसाठी 9000 कोटी रुपये खर्च येईल असे इस्रोचे अध्यक्ष के. शिवान यांनी सांगितले. गगनयान मोहिमेुळे देशाचे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र उच्चत्तम पातळीला पोहोचेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उपक्रमाच्या तांत्रिक आवश्यकता आणि आव्हाने :

जीएस्एल्व्ही मार्क 3 : आत्तापर्यंत इस्रोने चांद्रयान-1, मंगळयान या यशस्वी मोहिमा PSLV (Polar Satellite Launch Vehical) या प्रक्षेपण वाहनाच्या मदतीने पूर्ण केले. जे जास्तीत जास्त 2 टन वजन वाहू शकते. गगनयान ही मानवी अंतराळ मोहीम असल्याने या मोहीमेंतर्गत पाठविण्यात येणारे अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल, ज्यासाठी GSLV MK-III हे प्रक्षेपण वाहन विकसित करण्यात आले आहे. ‘इस्रोच्या जीएस्एल्व्ही मार्क 3’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचे 5 जून रोजी श्रीहरीकोट्यातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. जीएस्एल्व्ही मार्क 3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आता भारताला 2.3 टनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी स्वदेशी प्रक्षेपण वाहनाचा उपयोग होईल.

ECLSS : (Environment Control and Life System) गगनयान ही मानवी अंतराळ मोहीम असल्याने यामध्ये सहभागी होणार्‍या अंतराळवीरांना मोहीम यशस्विरीत्या पूर्ण करून सुखरूप परत आणणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे; यासाठी बनविण्यात येणारे यान हे ‘मॅन रेटेड’ म्हणजे मनुष्यास राहण्यायोग्य असायला हवे. आणि त्यासाठी पर्यावरण नियंत्रण आणि जीवन आधार प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे.

मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना तोंड द्यावी लागणारी आव्हाने :

गुरुत्वाकर्षण क्षेत्र : एका गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून दुसर्‍या गुरुत्वाकर्षण क्षेत्रामध्ये संक्रमण करणे अवघड आहे, यामुळे मानवाच्या हात-डोळा, डोके- डोळा यांच्या समन्वयावर परिणाम होतो. नासाच्या म्हणण्यानुसार अशा अंतराळवीरांच्या हाडांमधून खनिजांचे प्रमाण कमी होते व एखाद्या अंतरिक्ष मोहिमेतून परत आल्यानंतरही त्यांना ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार होण्याची शक्यता असते. बर्‍याच वेळा खूप चांगले प्रशिक्षित असले तरी, काही अंतराळवीर एकाकीपणामुळे, उदासीनता, थकवा, झोपेचे विकार आणि मानसिक विकार या गोष्टींना बळी पडतात. अंतराळवीरांना पृथ्वीवरील लोकांपेक्षा दहापट अधिक रेडिएशन सहन करावे लागतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो, तसेच मळमळ, उलट्या असे त्रास होऊ शकतात.

गुरुत्वाकर्षणाचा अभाव आणि किरणोत्सर्गाच्या धोक्याव्यतिरिक्त, अवकाशामध्ये कसलेही वातावरण व दाब नसल्याने मानवी रक्त उकळण्यास सुरुवात होते; म्हणून मानवासाठी गगनयानामध्ये पृथ्वीसारखे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, तसेच संपूर्ण मिशनमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा, कार्बन डाय ऑक्साईड काढणे आणि तापमान आणि आर्द्रतेची योग्य पातळी कायम राखणे आवश्यक आहे.

रॉकेट्स् : रॉकेटमध्ये प्रवास करणे म्हणजे विस्फोटक बॉम्बवर बसणे, जे 30 मिनिटांपेक्षा कमी वेळेमध्ये 0 किलोमीटर प्रति तास ते 29,000 किलोमीटर्स प्रति तास वेग प्राप्त करतात. लाँचिंग टप्प्यात अनेक गोष्टी चुकीच्या असू शकतात, यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता; मानवी अंतराळ मोहिमेची तयारी करताना इस्रोला या सर्व अडचणी दूर करण्यासाठी अंतराळवीरांना योग्य प्रशिक्षण देणे तसेच या मोहिमेसाठी लागणार्‍या तंत्रज्ञानामध्ये प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे. यासाठी गगनयान मोहिमेपूर्वी जीएस्एल्व्ही-3 च्या आधारे दोन मानवविरहित मोहिमा हाती घेणार असल्याची माहिती इस्रोकडून मिळाली आहे.

अवकाशयानाला अपघात झाल्यास किंवा काही कारणाने ते कोसळल्यास अंतराळवीरांचा जीव वाचविण्यासाठी इस्त्रोने क्रू एस्केप सिस्टिमची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली.

क्रू एस्केप सिस्टिम :

मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीचा एक भाग असलेल्या क्रू एस्केप सिस्टिमची म्हणजेच आणीबाणीच्या क्षणी अंतराळवीरांना जमिनीवर सुखरूप आणण्याची चाचणी. मानवी अवकाश मोहिमेध्ये प्रक्षेपणानंतर काही बिघाड निर्माण झाल्यास ही मुक्तता यंत्रणा कार्यान्वित होते आणि अवकाशयानाचा एक भाग अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून दूर जातो. त्यानंतर हे क्रू मोड्यूल अंतराळवीरांसह जमिनीवर आणण्यात येतो. या चाचणीमुळे अवकाशयानाला अपघात झाल्यास किंवा काही कारणाने ते कोसळल्यास अंतराळवीरांचा जीव वाचविता येणे शक्य होते. क्रू मोड्यूल आणि अन्य तांत्रिक बाबींचे काम इस्रोने पूर्ण केले असून, या मोहिमेसाठी मोठे रॉकेट आणि अंतराळवीराचे प्रशिक्षण ही दोन मुख्य आव्हाने अद्यापही इस्रोसमोर आहेत.

मोहिमेचे पुढचे पाऊल :

या मोहिमेसाठी अंतराळवीराचे प्रशिक्षण बंगलोर येथे होणार असून, वेळेअभावी कदाचित हे प्रशिक्षण रशिया किंवा अमेरिकेच्या साहाय्याने पूर्ण होईल असे सांगण्यात येते. इस्रोच्या या प्रकल्पाचे नेतृत्त्व डॉ. व्ही. आर ललिथांबिका करणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. डॉ. ललिथांबिका या कंट्रोल रॉकेट इंजिनिअर असून त्या मागील 30 वर्षांपासून इस्रोध्ये कार्यरत आहेत. डॉ. ललिथांबिका लवकरच आपल्यासोबत काम करणार्‍या टीमची निवड करतील. तसेच लवकरच मोहिमेच्या कामाची आखणी करणार आहेत. दोन महिन्यांच्या आत पहिला प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल असे सांगण्यात येत आहे.

2022 ची मुदत कठिण असली तरी इस्रोध्ये ही मोहीम यशस्वी करण्याची क्षमता आहे आणि, या मोहिमेुळे इस्रोला विविध तंत्रज्ञानावर काम करण्याचे आव्हान पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली आहे तरी या संधीचे सोने करून इस्रो आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा नक्कीच खोवेल तसेच, या मोहिमेुळे भारत एक ग्लोबल प्लेअर म्हणून ओळखला जाईल हे निश्‍चित!

लेखिका : राजश्री काळुंके

संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *