कोफी अन्नान (1938-2018)

संयुक्त राष्ट्रसंघाचे पहिले आफ्रिकन महासचिव आणि नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध कोफी अन्नान यांचे18 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले. अन्नान यांनी त्यांच्या कारकीर्दीत संयुक्त राष्ट्रसंघात बरेच बदल घडवून आणण्याचे प्रयत्न केले. त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक राजकारणातील मध्यस्थ म्हणून असणारी भूमिका अधिक दृढ झाली. अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिवपद स्वीकारण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. किंबहुना संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशासकीय रचनेत असून महासचिवपदी निवड होणारे ते आतापर्यंतची एकमेव व्यक्ती आहेत. अन्नान यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवपदाच्या कारकिर्दीचा धावता आढावा या लेखात आपण घेणार आहोत.

घाना देशातील कुमासी येथे कोफी अन्नान यांचा जन्म झाला. त्यांनी महासचिव होण्याआधी संयुक्त राष्ट्रसंघ शांती मोहिमांध्ये उपसचिव या पदावर काम केले होते. 1997 ते 2006 हा त्यांचा महासचिव पदाचा कार्यकाळ होता. दोनदा त्यांनी हे पद भूषविले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उल्लेखनीय गोष्टी केल्या, परंतु याबरोबरच त्यांच्या काही भूमिकांना अपयश आल्याने त्यांच्यावर भरपूर टीका देखील झाली. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स ही संकल्पना त्यांनी पुढे आणली. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या अनेक धोरणामुळे संयुक्त राष्ट्रसंघ लोकाभिमुख होण्यास मदत झाली. महासचिवपद स्वीकारण्याआधी शांतिसेनेचे काम पाहत असताना 1994 साली रवांडा आणि 1995 साली बोस्निया येथील वांशिक हिंसाचार थांबविण्यास ते असमर्थ ठरले, असा त्यांच्यावर आरोप होत असला तरी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर वांशिक हिंसाचार, मानवतेविरोधी गुन्ह्यांपासून जगातील लोकांच्या ‘संरक्षणाची जबाबदारी’ responsibility to protect सर्व देशांची आणि संयुक्त राष्ट्रसंघाची आहे, हा ठराव सर्व सदस्य देशांनी मान्य केला. हे एक मोठे पाऊल होते.

सहकारी सामाजिक जबाबदारीला  प्रोत्साहन देण्यासाठी 1999 साली त्यांनी ‘ग्लोबल कॉम्पॅक्ट’ या कार्यक्रमाच्या रूपाने सुरू केला. हे त्यांचे प्रसिद्ध कार्य होय. त्याआधी 1998 साली नायजेरियातील राज्यव्यवस्थेला लोकशाहीकडे वळविण्यात त्यांनी मोठी मदत केली होती. अन्नान यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मुत्सद्देगिरीची कामे केली. इराकमधील अस्वस्थतेच्या काळात इराकला भेट देऊन अमेरिका आणि इराकमधील वाद मिटविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु यात त्यांना यश आले नाही. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या विरोधात जाऊन इराकमध्ये सैन्य घुसविले. यावेळी अमेरिकेला थांबविण्यात अपयश आल्याने त्यांच्यावर खूप टीका देखील झाली. तिमोर लेस्ते या लहानशा देशाला इंडोनेशियापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची मोठी भूमिका होती. 2000 साली अरब इस्रायल वादात त्यांनी इस्रायलला लेबेनॉनमधून सैन्य मागे घ्यायला लावले. कारकिर्दीच्या शेवटच्या काळात 2006 साली त्यांनी बकासी द्वीपकल्पावरून कॅमेरून आणि नायजेरिया यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये लक्ष घालून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाप्रमाणे दोन्ही देशांध्ये समेट घडवून आणला.

निवृत्तीनंतर देखील अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामात मोठे योगदान दिले होते. 2013 सालच्या एका मुलाखतीत त्यांनी इराक युद्ध थांबविण्यास असमर्थ ठरणे हे त्यांचे सर्वात मोठे अपयश असल्याचे सांगितले होते. त्यांच्या कार्यासाठी त्यांना संयुक्त राष्ट्रसंघासमवेत 2001 साली नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या योगदानामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने नवी उंची गाठली हे निश्‍चित!

लेखिका : वैभवी घरोटे

संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *