सहजच सांगतो की…

॥ 1 ॥
सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा आहेतच.
या शुभेच्छा बिनशर्त आणि शाश्वत आहेत.
त्या ठेवूनच काही गोष्टी, जरा जास्तच स्पष्टपणे सांगतो,
त्या लक्षात घ्या, त्यावर विचार करा, माझ्यासकट माझ्या सहकाऱ्यांना त्यावर सर्व प्रकारचे प्रश्न विचारा. स्वतंत्रपणे विचार करून मन-बुद्धीला पटल्यावरच चाणक्य मंडलमध्ये परिवारमध्ये प्रवेश घ्या.
प्रवेश घेतला तरी शुभेच्छा आहेत.
नाही घेतलात तरी शुभेच्छा आहेत.
सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा आहेतच.
॥ 2 ॥
चाणक्य मंडल परिवार कोणत्याही अर्थानं, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ‘कोचिंग क्लास’ नाही. फी भरा, ठरल्या वेळी तासांना बसा (किंवा नका बसू, पण फी भरा!) ठरीव गायडं वाचा, सांगितल्या तेवढ्या नोट्स् घ्या, रट्टेबाजी करा, घरी जाऊन घोका, परीक्षेच्या दिवशी पेपरवर ओका, आणि मग अधिकार पदांवर बसल्यावर मस्ती करा, यासाठी चाणक्य मंडल परिवार नाही. म्हणजे, अभ्यासासाठी, हे सर्व आणि आवश्यक ते सर्व करायचंच. पण केवळ ‘रट्टेबाजी’ करून नाही, तर मुळातून अभ्यास करून. तुम्ही मार्कांचे गुलाम होणारे ‘मार्क्सवादी’ नको, तर मार्कं तुमचे गुलाम झाले पाहिजेत, तशी अभ्यासावर, ज्ञानावर तुमची पकड हवी. त्यासाठी ‘स्वाध्याय’ पद्धत शिकून घ्यायला हवी. समोर आलेल्या कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा हेच शिकून घ्यायचं (म्हणजे स्वाध्याय -‘learning how to learn’) हा चाणक्य मंडल परिवारचा
‘जीवना’सहित ‘स्पर्धा परीक्षा तयारी’चा ‘अॅप्रोच’ आहे.
॥ 3 ॥
ही स्पर्धा परीक्षा तयारी सुद्धा केवळ कोणतीतरी नोकरी (आणि ‘लाल दिव्याची गाडी’ – ती तर आता गेलीच) मिळवण्यासाठी नाही. तर (स्पर्धापरीक्षा तयारी सुरू करण्याच्या पहिल्या दिवसापूर्वीच) स्वच्छ आणि कार्यक्षम असा ‘कार्यकर्ता अधिकारी’ होऊन देशाची, म्हणजेच लोकांची सेवा करण्यासाठी. पगार, स्थैर्य, स्टेटस्, अधिकार हे केवळ ‘बाय प्रॉडक्ट्स्’ आहेत. ते न मागता मिळणारच आहेत, त्यासाठी लसलस करण्याची गरज नाही. स्पर्धापरीक्षेची (जीवनासहित) तयारी – अभ्यास करतानाच स्वच्छ आणि कार्यक्षम असा ‘कार्यकर्ता अधिकारी’ म्हणून स्वतःच स्वतःला घडवण्यासाठी मात्र ‘लसलस’ करायला हवी.
॥ 4 ॥
भारताचा वैश्विक आणि विज्ञाननिष्ठ असा अध्यात्म विचार आणि आधुनिक भारताचं आधुनिक अखंड एकात्म राष्ट्रीयत्व हा चाणक्य मंडल परिवारच्या कामाचा – शिक्षणाचा – कोर्सेसचा गाभा आहे. तशी कोर्सेसची, चाणक्य मंडल परिवारच्या कार्यपद्धतीची रचना आहे.
जीवनासहित – स्पर्धापरीक्षांची तयारी करणारे – आणि त्यात यश मिळवून
प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश करणारे – (आणि मुख्य म्हणजे सर्व ‘भारतीय’
नागरिक) यांच्यासाठी भारताची राज्यघटना ही ‘भगवद्गीता’ आहे.
॥ 5 ॥
म्हणून चाणक्य मंडल परिवारातले तास (आणि सार्वजनिक कार्यक्रमसुद्धा)
उपासनेनं (ध्यान) सुरू होतात. प्रार्थनेनं संपतात. शैक्षणिक वर्ष सुरू होतं तेव्हा सर्व विद्यार्थ्यांशी व्यक्तिमत्त्व – करिअर घडवण्याबाबत मी पाच-सहा व्याख्यानांद्वारा बोलतो आणि त्यातील मुद्द्यांची माझ्या तासांना चर्चा करतो. त्याचं नाव ‘अधिष्ठान मालिका’ – त्यातल्या मुद्द्यांवर
स्वतंत्रपणे विचार करून पटलं तर आपलं जीवन आणि करिअर घडवण्याचं
‘अधिष्ठान’ ठेवायचं असतं – तो अधिष्ठान दिवस. पुढे कोर्सची सर्व शिस्त व गुणवत्ता सांभाळून किमान सहा महिने सरकल्यानंतर आपल्या करिअर आणि जीवनाचाही ‘संकल्प’ सोडायचा असतो – तो ही मन-बुद्धीला पटलं तर.
असा चाणक्य मंडल परिवार – हे ‘गुरुकूल’ आहे – (कोचिंग क्लास नाही).
(सर्व सविस्तर, नीट, मुळातून प्रॉस्पेक्टसमध्ये वाचा.)
॥ 6 ॥
त्या प्रॉस्पेक्टसमध्ये माझा समाजाला लेखी, छापील – म्हणजे पारदर्शकपणे शब्द आहे की, फी भरण्याची क्षमता नाही म्हणून चाणक्य मंडल परिवारमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही. त्यासाठी आम्ही काही पद्धती, पर्याय आखलेले आहेत. ते मात्र संबंधिताने स्वतः संपर्क करून समजून घ्यायला हवेत.
काम चालवण्यासाठी त्या कामातूनच निधी उभा रहायला हवा, म्हणून शुल्क आहे. सक्तीचं नाही. तरी भरणारा समाज शुल्क भरतोच. म्हणून तर काम चालू आहे. पुण्यात दोन भव्य वास्तू उभ्या राहिल्या आहेत. त्याचं ‘स्वाध्याय’ परिवारचे ‘दादा’ – पांडुरंगशास्त्री आठवले आणि दलाई लामा – यांच्या हस्ते लोकार्पण झालं आहे. ‘ध्येय निश्चित करून पुढे जा, साधनसंपत्ती पाठोपाठ येईल’ आणि भोवती दिसणारी लोकं – म्हणजेच, ‘समाज हा ईश्वर आहे’ असं विवेकानंद म्हणतात, त्याचा हा असा अर्थ चाणक्य मंडल परिवारच्या कामात प्रकटलाय.
॥ 7 ॥
अशा कामाची 22 वर्षे पूर्ण करून 23 वे वर्ष सुरू करताना माझा असा अजिबात दावा नाही की, मी किंवा चाणक्य मंडल परिवार म्हणजे अगदी बिनचूक परिपूर्ण प्रकार आहेत. विचार आणि कार्यपद्धती स्पष्ट, पारदर्शक आणि समाजाला उत्तरदायी आहे. आणि 22 वर्षांचं (अल्पसं) यश पाठीशी आहे. चाणक्य मंडल परिवारातले ‘कार्यकर्ता अधिकारी’ महाराष्ट्रात, देशात आणि जगातसुद्धा काम करतायत. स्पर्धापरीक्षांद्वारे प्रशासकीय सेवांमध्ये न शिरलेले अनेकजण जीवनाच्या विविध क्षेत्रांत आनंददायक कामगिरी करतायत.
ते सर्वच समजावून घ्या. स्वतंत्रपणे विचार करा. माझ्यासहित, माझ्या सहकाऱ्यांना प्रश्न विचारा. किंवा स्वतः उत्तरं शोधा.
त्यानंतर चाणक्य मंडल परिवारात येण्याविषयी निर्णय करा – आलात तर आनंद आहे. स्वागत आहे.
नाही आलात तर दुःख नाही.
दोनों सूरतों में,
सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा आहेतच.
– श्री. अविनाश धर्माधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *