भूले बिसरे गीत : गम की अंधेरी रात में…

गम की अंधेरी रात में दिल को ना बेकरार कर

सुबहा जरूर आएगी, सुबहा का इंतजार कर॥

दर्द है सारी जिंदगी, जिस का कोई सिला नहीं

दिल को फरेब दि जिये और ये होसला नहीं,

खुद से तो बदगुमा न हो खुद पे तो एतबार कर ॥ 1 ॥

खुद ही तडप के रह गये दिल की सदा से क्या मिला

आग से खेलते रहे, हमको वफा से क्या मिला?

दिल की लगी बुझा न दे, दिल की लगी से प्यार कर ॥ 2 ॥

जिस के ना दिल बहल सके ऐसी खबर से फांसला

रात अभी ढली कहा, ख्वाबे सहर से फासला

फसले बहार आयेगी दौरे फिजा गुजार कर॥ 3 ॥

चित्रपट : सुशीला (1963)

दिग्दर्शक : के. एस्. सेतुमाधवन्

गीत : जां निसार अख्तर

संगीत : सी. अर्जुन

गायक : महम्मद रफी, तलत महमूद

कलाकार : नंदा, सुनील दत्त

माणूस एकाकी पडतो कारण तो स्वत: भोवती या हृदयाला, त्या हृदयाशी जोडणारे पूल बांधण्याऐवजी दुराव्याच्या भिंती उभ्या करतो!

संवाद संपतो, जगणे असहाय होते. माणसांच्या आयुष्यातले संवाद शेवटपर्यंत जपले गेले पाहिजेत त्यातूनच जीवन जगण्याची ऊर्जा मिळत राहणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या लाईक्समधून ती मिळेल याची खात्री नाही आणि ती जीवनदायी ठरेलच असेही नाही! अपवाद वगळता.

म्हणूनच मला, कवी नवाब आरजू  यांचे ‘‘बाजिगर’’मधले हे बोल फार मोलाचे वाटतात- ‘‘किताबे बहुत सी पढ़ी होंगी तुमने, मगर कोई चेहरा भी तुमने पढ़ा है?’ आपल्या जवळच्या माणसांचे चेहरे वाचता आले तर अनेकांचे प्रिय जन आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतील असा विश्‍वास आहे.

‘गम की अंधेरी रात’’ या गीताची पार्श्‍वभूमी आणि त्यातून ध्वनित होणारा संदेश फार महत्त्वाचा वाटतो. आजच्या तणावग्रस्त, विफलतेवर काही उतारा मिळवण्यासाठी एक आशेचा किरण वाटावा तस्सा!

असं म्हणतात की संकट सुंदर चेहरा घेऊन माणसाला धोका देते तसेच अनेक वेळेस श्रीमंतींचे लेणे लेऊन जन्मलेली मुले शापित प्राक्तन घेऊन येतात, म्हणेल ती गोष्ट त्यांना म्हणेल तेव्हा आणि म्हणेल तेवढी मिळते पण जन्मजातच काही व्यंग घेऊन आयुष्य लुळपांगळ जगावं लागतं त्यांना, अशा दुर्दैवी जीवांना कणखरपणे आणि विपरित परिस्थितीवर मात करत जगण्याचे धैर्य देता आले पाहिजे आजच्या शिक्षण आणि मूल्य व्यवस्थेमधून.

या गीताची नायिका, एक सुंदर, श्रीमंत घरची सुशीला-नंदा-अपघाताने अपंग झालेली असते, बालपण सरते पण तारुण्यात आल्यानंतर आपल्या अपंगत्वाच्या वैफल्याने ग्रासून डिप्रेशनमध्ये जाते. तिच्यावर उपचार करण्यासाठी एका तरूण, देखण्या आणि सुसंस्कृत डॉक्टरची नेमणूक केली जाते, त्याच्या सहवासात ती रमू लागते, तिच्या मनामधे त्याच्या प्रती हळुवार अशा तारुण्यसुलभ प्रीतीचे रंग खुलायला लागतात. पण त्याचबरोबर तिला आपल्या असहाय वास्तवाची जाणीव होते आणि पुन्हा उदास होते, निराशेने हतबल होते. अशा वेळी तिला जगण्याची  उमेद मिळावी, नवे जीवन मिळावे म्हणून हे विराणे किंवा  स्फूर्तीगीत म्हणाना!

प्रत्येक व्यक्तीला बालपणापासूनच शारीरिक आणि मानसिक दोन्हीही बाजूंनी सक्षम घडवणं अत्यंत गरजेचे आहे. यशापयश स्वीकारणे खंबीरपणे जमले पाहिजे. हे या गीताच्या निमित्ताने पुनश्‍च नमूद करावे वाटले कारण, आजकाल किरकोळ कारणावरून जगणेच संपवून टाकणार्‍यांमधे, तरुणांची संख्या भयावह वाटते आहे. विशेषत: 12/14 वशांची मुलं या मार्गाने गेली की जीव कळवळतो. अडचणी, दु:खं, मनस्ताप आणि अपेक्षाभंग करणार्‍या सगळ्या अप्रिय घटना प्रत्येकाच्या आयुष्यात घडतच असतात, म्हणुनच समर्थांनीच वचन-‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाही!, महत्त्वाचे आहे. हे सूत्र प्रत्येक सुजाण व्यक्तिने क्षणभरही विसता कामा नये. आपल्याच दु:खाला कुरवाळत बसून आपणच आणखी दु:खी होण्यापेक्षा, ते पचवण्याची ताकद कमावणे अधिक महत्त्वाचे आहे. दुसरा दृष्टीकोन असा की, आपल्या पेक्षा अनंत पटीने भयावह, दु:खी, कष्टी जीव या जगात जगत असतात, आनंदाने जगण्यासाठी धडपडताना दिसतात, भेटतात, याचाही विचार करावा. माणसाचा जन्म हा एकदाच मिळण्याची संधी असते, त्या संधीचे सोन करावे, माती नाही!

या गीताचे दोन गायक आहेत, त्यांचे दोन दृष्टिकोन, एक निराशा आणि दुसरा आशावादी! तलतजींचा स्वर काळजाला भिडतो तर रफीसाहेबांचा स्वर हृदयावर कोरला जातो. तलतजींचा स्वर गहिरा आणि भेदक, जीवाला हुरहूर लावणारा तर रफींजींचा खर्जातला भरदार स्वरही शांत, गहिरा, अस्वस्थ करणारा, ऊर्जा देणारा! संगीतकार अगदी अनोळखी वाटले तरी या एका गीताने अढळपद मिळवलेले असे. त्यांच्या निवडीतून दिग्दर्शकाचे धाडस कामी आले. निराशेने व्याकुळ होणारे मन म्हणते-दर्द है सारी ज़िंदगी, जिस का कोई सिला नहीं…सतत आपणच आपल्याला का फसवत रहावे, ‘एक ना एक दिवस, आनंदाचे क्षण मिळतील, वाट पहा’,’ अशी खोटी समजूत काढत, कुढत रहावं, का? काय फायदा? पण लगेच दुसरे मन म्हणते अरे एवढा खचून जाऊ नकोस.

रे मित्रा; स्वत:च्या क्षमतेवर भरोसा ठेव, सगळेच दिवस सारखे नसतात, एक क्षण येईल आणि जगण्याचे सोने करेल, पण त्या क्षणाची वाट पाहिली तरच तो भेटेल ना, तो क्षण पकडण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल, पडेल ते कष्ट, यातना सोसाव्याच लागतील, मात्र याचा शेवट गोड असणार, तुला हवे ते मिळणार!

आजपर्यंत किती सोसलं अजुनं मी सोसतच राहू का? प्रे्रमाने नुसते चटकेच दिले, काही मिळाले का मला? जीवनात काही गोडीच उरली नाही. स्वत:ला धोक्यावर धोके देत चाललो आहे काही उपयोगच नाही. ना प्रेम सफल होते, ना जीवाला चैन पडते, सुखाचा रस्ता पूर्णच हरवालासा दिसतो, ओळखच मिटली आहे त्याची आणि माझी! सुखाने संपूर्ण असहकार माझ्याशीच का पुकारला असावा? मला जगण्यासाठी भरवसा कसा मिळत नाही?

कोणीही वाईट मार्गाला लागतो, तेव्हा सर्वस्वी दोष नशीबाला देऊन आपली जबाबदारी संपत नाही. जो दुर्दैवी जीव या जगामधे आहे त्याचे जगणे सुकर कसे होईल याचा विचार व व्यवस्थापन व्हायला हवे. दृढ निश्‍चयाने!

जीव वेडापिसा होतो रे जे हवे ते प्राप्त करण्यासाठी, पण नुसता आगीशी खेळ होतो, जीव जळत राहतो, आत्मा तळमळतो. जगण्याचे ओझे वाटू लागते, फेकून द्यावे वाटते.

असा निराश का होतोस वेड्या, अरे फक्त प्रेमच जीवनात सर्वस्व आहे का? आणि ते मिळवणे एवढीच आयुष्याची इतिकर्तव्यता वाटत असेल तर तू चुकतो आहेस. मित्रा, धीर धर, शांत चित्त ठेव, स्वत:वर विश्‍वास ठेव, तुला जे मिळवायचे आहे त्याचा ध्यास घे. अखंड प्रयत्न करत रहा. तुझे ईप्सित तुला लाभेल हे नक्की! आणि नाही मिळाल्या सगळ्या गोष्टी हव्या तशा आणि हव्या तेव्हा, तर ‘मै ज़िंदगी का साथ निभाता चला गया, असा दृष्टिकोन ठेवावा. अरे बाबा, नवीन कोणताही समाचार ऐका, त्यामधून आपल्याला आनंद देणार्‍या बातमीची पुसटही चाहुल नाही. दूरदूरपर्यंत अंधारच अंधार!. रात्र संपत नाही, दिव्याबरोबर झोपही जळते, तर मग कुठुन सुंदर स्वप्न बघणार?

ती सुद्धा बापडी कोमेजून नाहीशी होतात. मनाला सुकुन मिळेल असे काही आहे या जगात? नसेल तर मी कशाला अशा फसव्या गोष्टीमधे स्वत:ला कैद करू? बस् झाले आता स्वत:ला फसवणे!

मित्रा, हे बघ, जसा, दुष्काळानंतर सुकाळ, ग्रीष्मानंतर वर्षा, चढानंतर उतार, अंधार्‍या रात्री नंतर प्रकाश हा येतोच, तसे दु:खानंतर सुखाचे क्षण येतातच. काळजी करू नको. सारे काही ठीक होईल हा, पण हे सुखाचे क्षण वेळीच वेचून जपले पाहिजेत. ती आपल्या जगण्याची संजीवनी ठरली पाहिजे. निराशेने खचून जाणे, हा काही त्यावरचा उपाय नाही. उलट अशा प्रसंगांना जिगरबाजपणे सामोरे जाऊन त्यांना पचवणे आणि नव्या उमेदीने जीवनाकडे पाहणे यातच खरा पुरुषार्थ आहे. मग तयार हो तर या नव्या पहाटेचे स्वागत हसत मुखाने करण्यासाठी! बरोबर ना?

या साठीच पाहिजेत जिवाला जीव देणारे मित्र/मैत्रिणी, ज्यांच्या बरोबर सुख/दु:खाचे क्षण वाटून घेता आले पाहिजेत. जीवनात संवाद सतत साधला पाहिजे. मनातली घुसमट हद्दपार केली पाहिजे, चांगल्या, सुंदर स्वप्नांची आराधना केली पाहिजे. जरा मनाविरुद्ध झाले की आपण उदास, हिरमुसले, पराजित जीवनाचा अंगरखा घालून मिरवत राहतो, तसेच आनंद साजरा करायला प्रयत्नपूर्वक शिकले पाहिजे, मुखवट्यावर मुखवटे चढवून कृत्रिम जीवन जगण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी माणसं जोडायला हवीत! -याला जीवन ऐसे नाव आहे राजा!

अ‍ॅरिस्टॉटलच्या कॅथॉर्सिसच्या संकल्पनेचा पुरेपूर वापर, व्यक्ती आणि समाजाच्या निरामय स्वास्थ्यासाठी अत्यंत; गरजेचा आहे. त्यावरचे भांडण जेवढे आवश्यक; (अर्थात, ते भांडण करण्याची वेळ कोणावरच येऊ नये.) तेवढेच महत्त्वाचे ज़ाझ आणि विठ्ठल नामाचा गजर आहे.

एकमेकांच्या भेटीगाठी, विचारांची देवाण घेवाण अशी साधली पाहिजे, जसे, दुधात साखरेने विरघळावे, फुलांनी वार्‍याला सुगंध द्यावा, दिवसाने रात्रीला चंद्र/चांदण्या द्याव्यात आणि रात्रीने दिवसाला केशरी सडे शिंपडून सूर्य प्रदान करावा, रोज! रोज! तसे!

लेखक : सौ. रंजना पाटील  

संपर्क : swatantranagrik@gmail.com  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *