प्रवास पुणे मनपा मुख्य इमारतींचा…160 वर्षांचा!

पुणे महापालिका आणि 160 वर्षे, असा प्रश्‍नावरील शीर्षक वाचल्यानंतर कुणालाही पडेल; पण तसे नाही. ही 160 वर्षे महापालिकेपूर्वी असणार्‍या पुणे नगरपालिकेपासूनची म्हणजे 1858 पासूनची आहेत! त्यावेळी पुणे नगरपालिकेची इमारत कोणती होती व नगरपालिकेचे कामकाज कुठे चालायचे याबद्दलचा व तेवढ्यापुरताच हा इतिहास आहे. योगायोगाने आताच्या 2018 सालात या गोष्टीलाही 160 वर्षे पूर्ण होत आहेत! विशेष म्हणजे याच वर्षी पुणे महापालिकेच्या नवीन मुख्य विस्तारित इमारतीचे उद्घाटनही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. इमारतीच्या छतातून पाणी गळाल्याच्या बातम्याही छापून आल्या. पण मनपा इमारतींच्या या सोळा दशकांध्ये पुणे महापालिकेच्या इमारतींची पाच स्थित्यंतरे झाली. मनपा व त्यापूर्वीच्या नगरपालिकेच्या या वास्तू ज्या कारणांसाठी उभारलेल्या होत्या त्याचे त्या केवळ प्रतिनिधित्व करत नाहीत, तर त्या एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था या व्यापक संकल्पनेचे जिवंत प्रतीक बनतात!

याचा एक अर्थ असा की, पुणे नगरपालिका काय किंवा महापालिका काय या बदलत गेलेल्या अव्यक्त गोष्टी या वास्तूंधूनच प्रकट होतात. कारण अशाच ठिकाणी पुण्याचे निवडून आलेले आयुक्त, महापौर या घटनात्मक आधिकार मिळालेल्या पदांधिकार्‍यांचे वास्तव्य असते. ते जे काही करतात, निर्णय घेतात तोच पुढे इतिहास ठरतो! या सार्‍या भल्याबुर्‍या इतिहासाच्या साक्षीदार म्हणून या वास्तूंना असणारे महत्त्व खूप मोठे आहे. माझ्या मते तर या वास्तू म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वत:ची अशी स्वतंत्र ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वच आहेत! आता हेच पाहा ना, पुणे महापालिकेची 1958 मध्ये बांधलेल्या शिवाजीनगरमधील मुख्य वास्तूला एक स्वत:चा डौल आहे. ज्या दिमाखात ती उभी आहे ते पाहाताना तिचा रुबाब आणि रंग मोहून टाकतो. जणू ती वास्तू माणूस बनून आपल्याशी काही संवाद साधू इच्छिते आहे, असेच वाटते!

पुणे नगरपालिकेची पहिली मुख्य इमारत, रास्ता पेठेतील, १८५७ मधील!

या इमारती आपल्याशी संवाद साधतात म्हणजे काय? तर त्यांना त्यांचा इतिहास सांगायचा असतो. पुण्यासारखीच सोलापूर महापालिकेची इमारतही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती तर ब्रिटिश काळातील खास पॅलेशियल पद्धतीची बकिंगहॅ पॅलेससारखी अत्यंत देखणी आहे! तीच गोष्ट बृहन्मुंबई महापलिकेच्या सर्वांगसुंदर वास्तूची. खास ब्रिटिश युरोपियन शैलीच्या या वास्तू तितक्याच प्रेक्षणीय आहेत. त्या वास्तू जेव्हा बांधल्या गेल्या तेव्हा तिथे वावरणारी माणसे कशी दिसत होती? त्यांचे पेहराव काय होते? त्यावेळच्या कचेरीची रचना कशी होती. दौत, टाक व नंतर आलेले टाईपरायटर हे सारेच डोळ्यांपुढे येते. कोणते तंत्रज्ञान त्या काळात कार्यालयीन कामासाठी वापरले जात. टेलिफोनचा आकार कसा होता. तेव्हाचे टेबल-खुर्चा व वीज आल्यानंतरची सर्व उपकरणे कशी होती, हा साराच माझ्या कुतूहलाचा विषय आहे.

ही चर्चा करत असताना एक गोष्ट अचानक लक्षात आली ती ही की, इमारत बांधणे हेही एक तंत्रज्ञानच आहे! त्या काळातील बांधकाम तंत्रज्ञानाची ती एक दृश्य अभिव्यक्ती आहे! त्याचा अभ्यास करण्यासाठी मी आर्किटेक्टच असायला हवे असेही नाही. एक प्रकारे बांधकाम हे जसे शास्त्र किंवा विज्ञान आहे तशी ती एक कला आहे किंवा तो काळ अभिव्यक्त करणारी एक शैली आहे. उदाहरणार्थ 18 व्या शतकात 1731 मध्ये पहिल्या बाजीरावाने शनिवारवाडा बांधला. पेशवे राजघराण्याचे राज्य करण्याचे ते महत्त्वाचे ठिकाण होते. त्यानंतर पुण्याचा विकास झपाट्याने झाला असे सांगतात. पुढे 19व्या  शतकात नगरपालिका आली आणि नव्या पद्धतीच्या वास्तू बांधल्या जाऊ लागल्या. 20व्या शतकात बांधकाम करण्याची शैली बदलली आणि आता 21व्या शतकात तर तिचे आणखीनच रूप पालटले. या प्रत्येक टप्प्यात आधी नगरपालिका व नंतर महापालिका व तिचा विस्तार हा तिच्यातील बदल अनेक कारणांनी होत गेला.

पुणे नगरपालिकेची दुसरी इमारत विश्रामबाग वाडा.

पण या एकेका वास्तूमागे व तिच्या उभारणीमागे अनेक विचार दडलेले असतात. ज्या पुण्यात आधी नगरपालिका झाली व पुढे महापालिकेत रुपांतरित झाली, तिचा भूगोल त्यात येतो. या भागात सापडणारा बेसाल्ट दगड या बांधकामाच्या कामातला एक अविभाज्य भाग बनतो. हाच डेक्कन बेसाल्ट दगड पुणे महापालिकेच्या 1958 मध्ये बांधलेल्या मुख्य इमारतीच्या बांधकामात अत्यंत कलात्मकतेने वापरलेला दिसतो. आधीच्या बांधकामात सिमेंटपेक्षा चुन्याचा, चपट्या विटांचा वापर व सागवानी लाकडांपासून बनवेले भक्कम दिंडी दरवाजे, सुबक आकाराच्या वजनदार कड्या, दिंड्या साखळ्या असे सारेच आपल्यापुढे साकार होते. ती त्या काळातील बांधकाम संस्कृती तत्कालीन सामाजिक संस्कृतीत एकजीव होत गेली आणि तिला स्वत:चे व्यक्तिमत्त्व प्राप्त होत गेले!

1858 मध्ये नगरपालिका झाली तेव्हा पुण्याची लोकसंख्या अवघी एक लाख 62 हजार होती. तर शहरात बांधकामाच्या स्वरूपात 9,862 वाडे, 1,745 बखळी, 220 देवालये, 25 मठ व अस्तने, 17 धर्मशाळा, 65 मशिदी, 33 चावड्या व गेटे होत्या.

पुणे नगरपालिका ते महापालिका

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कलमानुसार पुणे महापालिकेची स्थापना 18 नोव्हेंबर 1858 मध्ये झाली. ब्रिटिशांविरोधात सुरू झालेल्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यानंतर एक वर्षानी ती झाली. वास्तविक ती एक वर्ष आधीच होणार होती, पण पुण्यात तेव्हा स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे सेनानी नानासाहेब पेशवे गुप्त पोषाखात आले अशी खबर पसरल्याने सर्वत्र खळबळ उडाली आणि नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश शासनाला एक वर्षे पुढे ढकलावी लागली! पुढे 18 नोव्हेंबर 1858 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या पुणे महापालिकेने शताब्दी महोत्सवही साजरा केला. योगायोगाने त्याच वर्षात पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तत्त्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यंदा या घटनेलाही 60 वर्षे पूर्ण होतील!

उपलब्ध इतिहासानुसार पुणे महापालिकेची पहिली इमारत 496 रास्ता पेठ येथे होती. ती वास्तू आता आहे का नाही याची कल्पना नाही. पण त्या ठिकाणी 1858 पासून नगरपालिकेचे कार्यालय सुरू झाले. वर वर्णन केल्याप्रमाणे या काहीशा छोट्या टुमदार वाटेल अशा वास्तूची रचना त्या काळातील वास्तूकलेनुसारच होती. एकमजली बैठी वास्तू असणारी ही इमारत दगड व खापरी विटा, चुना आणि मोठ्या प्रमाणावर लाकूडकाम केलेली होती. अभ्यासकांच्या मते, अनेक बांधकाम शैलींचा त्यावर प्रभाव होता. तरी मूळ महाराष्ट्र किंवा मराठा शैलीतील ही वास्तू मोठी 12 फूट उंच जाड सीमाभिंत असणारी होती. त्याच्या खाली बेसॉल्ट दगडांचा भक्कम पाया, वर चुना व विटांची भिंत व त्यावर दोन्ही बाजूंना छपरासारखे उतार असणारे विटांचा आकृतीबंध. भिंतीच्या मानाने प्रवेशद्वार उंच व त्यावरही विटांच्या बांधकामाची दाराला लागून असणारी कलात्मक कमान. खाली मोठा दिंडी दरवाजा व त्याला लागून असणार्‍या दगडी पायर्‍या.

सीमाभिंत आणि मुख्य इमारत यांच्यामध्ये दगडी व मातीचे अंगण भिंतीलगत फुलांची झाडे, मुख्य वास्तूत शिरायला पुन्हा दगडी पायर्‍या व ओसरीसारखा मोकळा परिसर आतमध्ये खोल्या, वर जाण्यास दगडी तसेच लाकडी जिना. वरच्या खोल्यांनाही उंच पण रुंद अशा लाकडी दरवाज्यांच्या देखण्या खिडक्या, त्यावर उभे गज. हवा येण्यासाठी मुद्दाम तयार केलेले लाकडी महिरपीचे झरोके. दुसर्‍या मजल्याला लागून छत म्हणून दोन्ही बाजूला उतार असणारे पत्रे. ही इमारत पेशवेकालीन आहे. कदाचित त्यावरील छताच्या पत्र्यांवर विटा किंवा कौलेही घातली असतील. या वास्तूच्या आतमध्येही लाकडाचा वापर केला असेल. आतमधील लाकडी खुंट्या हे तर त्या काळाचे खास वैशिष्ट्यच! कारण त्यावर पागोटे, मुंडासे, उपरणे आणि काही कपडेही अडकवता येत असत. इतकं विस्ताराने या वास्तूचं वर्णन करण्याचे कारण म्हणजे त्या तो काळ आणि त्यावेळची सामजिक परिस्थिती कशी होती याचं काही प्रमाणात दर्शन घडताना दिसतात. त्यानंतर 100 वर्षांनी बांधली गेलेली पुणे महापालिकेची इमारत खूप वेगळी भव्य आणि आकाशाला गवसणी घालणारी वाटते!

अर्थात त्यापूर्वी म्हणजे या नवीन इमारतीत स्थलांतरित होण्यापूर्वी नगरपालिकेची कार्यालये काही काळ महात्मा फुले मंडईच्या इमारतीत उर्फ रे मार्केटमध्ये भरत असे. त्यानंतर 1933च्या सुमारास काही काळ ही नगरपालिका व पुढे महापालिका विश्रामबाग वाड्यात भरू लागली. मूळ संस्कृत पाठशाळा असणारी ही वास्तू स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक कारणांसाठी वापरली जात असे. या वास्तूच्या बाजीराव रस्त्यावरील देखणे प्रवेशद्वार म्हणजे अजोड वास्तुकला व कलाकुसरीचा अजोड नमुनाच म्हणावा लागेल. प्रवेशद्वाराशी दोन्ही बाजूंना पहिल्या मजल्याच्या गॅलरीला झेपावणारे दोन ड्रॅगनसदृश प्राणी वाटणारे लाकडी कलाकुसरीचे काम हे अजोड आहे! वर लाकडी सज्जा व त्यावरील घुट व त्याभोवती केली जाणारी कलाकुसरही अजोड आहे.

आतील महाल व छतांवरील काचेच्या हंड्या दिवे लावण्यासाठी असत. तेथील सागवानी लाकूड आणि त्यावरील कलाकुसर त्याहूनही नयनरम्य आहे. विश्रामबाग वाड्यात तेव्हा असणारी सुबक दगडांच्या हौदातील कारंजी ही आता पुन्हा नव्याने सुरू केली आहेत! कारंज्यांच्या व नळांच्या माध्यमातून शहरात पाणी फिरवण्याचे कसब पेशवेकालापासून होते. त्यासाठी कात्रजवरून जमिनीखालून खापरी नळांमधून व शहरात ठीकठिकाणी हौद बांधून हे पाणी शहरभर फिरवले जात असे. जेव्हा नगरपालिकेचे कार्यालय विश्रामबाग वाड्यात आले तेव्हा या इमारतीच्या बाजीराव रस्त्याच्या बाजूला असणार्‍या भागात दोन्ही बाजूंना दिसेल असे एक मोठे घड्याळ बसवण्यात आले. कदाचित या घड्याळाचे मोठ्या आवाजातील दर तासाला पडणारे ठोकेही तेथून जाणार्‍या प्रत्येकाला ऐकू येत असतील! घड्याळ बसवण्याचा मुख्य हेतू हा असावा की कार्यालयीन वेळा कर्मचार्‍यांनी पाळाव्यात. याच वास्तूत बहुधा याच सुारास मोठे पोस्ट ऑफिसही सुरू झाले. ते अजूनही चालू आहे! तसेच शेजारी जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयही उभारण्यात आले. ज्या काळात नगरपालिका व महापालिका येथे भरत असे. त्याच काळात 1946 मध्ये महाराष्ट्र शासन  शासकीय विभागीय ग्रंथालय सुरू झाले. थोडक्यात, विश्रामबाग वाड्याच्या या वास्तूने येथे खूप स्थित्यंतरे पाहिली!

1958ची नवी इमारत!

पुणे महापालिकेची 1958 मध्ये बांधलेली शिवाजीनगर येथील मुख्य इमारत.

तत्त्कालीन कागदपत्रांच्या आधारे असे समजते की, टाऊन प्लॅनिंग स्कीमनुसार शिवाजीनगर येथील हा खालचा प्लॉट नं एल मनपा मुख्य इमारतीसाठी निवडण्यात आला. चिंचवडी व बदामी रंगांच्या दगडांध्ये पुणे महापालिका भवनाचे बांधकाम करण्यात आले. उलट्या झेड आकारात  या इमारतीची रचना करण्यात आली. त्यापूर्वी 14 ऑगस्ट 1955 मध्ये या इमारतीच्या बांधकामाची कोनशीला तत्कालीन काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बसवण्यात आली. याचेच उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी तत्कालीन सनदी आधिकारी चिंतामणराव देशमुख, राज्यपाल श्रीप्रकाश, रँग्लर परांजपे, मनपा आयुक्त श्री. वि. भावे, महापौर भाऊसाहेब शिरोळे, उपमहापौर बाबूराव आगरवाल तसेच बाबूराव सणसही उपस्थित होते. ही इमारत तीन टप्प्यांध्ये पूर्ण करण्यात आली. मुख्य इमारत, त्याचा प्रशस्त पोर्च. या इमारतीचे काम पाहायला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूही आले होते. त्यांनी यातील मुख्य सभेत भाषणही केले, असा इतिहास सांगतो! बाबूराव सणस हे नव्या महापालिकेचे पहिले महापौर तर दूरदृष्टी व नियोजनात मोठे योगदान दिलेले स. गो. बर्वे हे पहिले आयुक्त म्हणून गाजले. त्यांनी आधुनिक पुण्याची मुहूर्तेढ रोवली!

मुख्य इमारतीवरील उद्घाटनाच्या शिलेवरील महिती पाहता ती 27 नोव्हेंबर 1958 रोजी पूर्ण झाली तर त्याला जोडून पुढचा विस्तारित भाग 24 एप्रिल 1987 मध्ये बांधण्यात आला. 1958 मध्ये ही मुख्य इमारत बांधायला सुमारे 40 लाख रुपये खर्च आला होता. या इमारतीच्या अभ्यासकांच्या मते नव्या पुलाजवळची चार एकराची जागा या इमारतीसाठी निवडण्यात आली. शिवाजीनगरच्या या गावठाण भागात तेव्हा जनावरांचा बाजार भरत असे. या भागात एक जुना पोहोण्याचा तलावही होता असे सांगतात. मनपाच्या या इमारतीचे क्षेत्रफळ 1.47 लाख चौरस फूट असून त्यात 400 खोल्या होत्या. संत धोटिंग, डोंगरे आणि कंपनी यांनी या भवनाचा आराखडा तयार केला, तर बांधकाम भरूचा आणि कंपनीतर्फे करण्यात आले. बांधल्यानंतर या इमारतीला तडा गेल्याची बातमी स्थानिक वृत्तपत्रातून छापून आली होती; पण आज ही इमारत उत्तम स्थितीत आहे. पुढे ही इमारत अपुरी पडल्यामुळे त्यातील कार्यालये इतरत्र हालवण्यात आली. असे असले तरी मुख्य इमारतीत सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या बैठका होत असतात. महापालिकेची आार्थिक धोरणे व अंदाजपत्रकाची कामे याच मुख्य इमारतीतून होत आले आहे. याच इमारातीत पुढे अनेक अंतर्गत बदल झाले. यातील लिप्टचे आकार वाढले. अनेक पदाधिकार्‍यांच्या कार्यालयात वातानुकूलित यंत्रणा बसवली गेली. ज्या 1950 व 60च्या दशकातील सरकारी इमारती ज्या शैलीत बांधल्या जात असत, त्याच पद्धतीने पुणे महापालिकेची मुख्य इमारतही बांधली गेली. दिल्ली व मुंबईतही अशाच प्रकारच्या इमारती बांधण्यात आल्याचे प्रसिद्ध वास्तूरचनाकार किरण कलमदानी यांनी सांगितले. ते म्हणाले की, पुणे महापालिकेच्या इमारतीच्या वरच्या बाजूस बसवण्यात आलेल्या लाकडी राजस्थानी पद्धतीच्या छत्र्या हे अशा बांधकामांचे एक वैशिष्ट्य बनले होते. नव्या विस्तारित इमारतीचा आराखडा बनवलेले दुसरे प्रसिद्ध वास्तुरचनाकार शिरीष केंभावी यांच्या एनव्हीरॉन या संस्थेस ते काम दिले गेले. ते म्हणाले की, मूळ इमारतीवरील हा दगड सहा दशके लोटल्यामुळे व तितके पावसाळे, उन्हाळे व हिवाळे झेलल्यामुळे खराब झाला होता. त्याला पुन्हा नवी झळाळी मिळाली ती त्यावर सॅण्ड ब्लास्टिंगसारखी प्रक्रिया केल्यानंतर यामुळे मुख्य इमारतीवरील हा दगड स्वच्छ झाला आणि जुनी इमारतही लखलखीत नवी दिसू लागली!

1958 मध्ये पूर्ण झालेल्या या इमारतीसंबंधीची माहिती आज महापालिकेकडून सहज उपलब्ध होत नाहीत. आपल्याकडे मुळात जुनी कागदपत्रे व माहिती सांभाळून ठेवण्याची व तो इतिहास अभिमानाने जतन करण्याची सवय नाही. नवी विस्तारित प्रशासकीय इमारत वर उल्लेख केल्याप्रमाणे एनव्हीरॉन संस्थेने या नवीन विस्तारित इमारतीच्या आराखड्याचे काम केले ते या कामात उत्कृष्ट डिझाईन करूनच.

आर्किटेक्ट शिरीष केंभावी, त्यांचे भागीदार या सार्‍यांचे योगदान या इमारतीच्या बांधकामात आहे. त्यामध्ये सुबोध सापटणेकर, आर्थर कुटिनो, रवी संत आणि विवेक गलांडे हे इतर वास्तूरचनाकार यांचा समावेश आहे. केभावी म्हणाले की, 5 एप्रिल 2015 मध्ये नव्या विस्तारित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राष्ट्रवादी काँगे्रसचे महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते. त्या आधी एक वर्ष या नवीन विस्तारित इमारतीच्या आराखड्याचे काम सुरू झाले होते. आमचा आराखडा आधी स्थायी समितीत व नंतर सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. या दोन्ही सभांध्ये आलेल्या सूचना अंतीम आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या. मनपाच्या या विस्तारित इमारतीचे बांधकाम के. आर. ट्रेडर्सच्या श्री. नाथ यांच्या कंपनीने केले; तर दुसरे काँन्ट्रेक्टर द रायकॉन श्री. दरेकर यांनी केले आहे.

केंभावी म्हणाले की, नवी विस्तारित प्रशासकीय इमारतीमध्ये आधुनिक काळासाठी लागणार्‍या अनेक प्रकारच्या सोयी सुविधांनी बांधण्यात आली आहे. मूळ मुख्य इमारतीतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सभा, महापालिका सचिव यांची कार्यालये तिसर्‍या मजल्यावरील कॉरिडॉरमध्ये तयार केली असून तिथे ती आता लवकरच हालवली जातील. याशिवाय या इमारतीच्या तळ मजल्यावर नागरी सुविधा केंद्रही उभारण्यात आले आहे. याठिकाणी एक खिडकी योजनेनुसार तिथे जन्म-मृत्यू दाखल्यापासून ते कर भरण्यापर्यंत अनेक गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय सर्वसाधारण सभेसाठी असणारे सभागृह तर या इमारतीची खरी शान आहे.

नवीन इमारतीचा एकंदर बांधकाम केलेला भाग हा 14000 चौरस मीटर इतका मोठा आहे. याशिवाय जमिनीखाली दोन मजले दोन वाहनतळ असून तिथे एकावेळी 110 मोटारी व 250 दुचाकी वाहने लावता येतील इतकी प्रशस्त जागा आहे. केंभावी म्हणाले की, तळ मजल्यासह वर चार मजले असे या इमारतीचे बाह्य स्वरूप असून चौथ्या मजल्यावरील सर्वसाधारण सभेसाठी नागरिकांसाठी व प्रसिद्धी माध्यमांसाठी स्वतंत्र गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. मूळ इमारतीतही तशीच सोय होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही या सभागृहाला देण्यात आले आहे. हे सभागृह तिसर्‍या मजल्यावर असून त्याच्या जवळच महापौर कक्ष आहे. दुसर्‍या मजल्यावर बाकीच्या पदाधिकार्‍यांचे कक्ष असून पहिल्या मजल्यावर महापालिका सचिवांचे कार्यालय आहे. तळ मजल्यावर पोस्ट ऑफिस तसेच पैसे काढण्यासाठी एटीएम सुविधा उभारण्यात आली आहे. विविध पक्षांची कार्यालयेही याच इमारतीत आता स्थलांतरित होतील. या इमारतीसाठी सुमारे 50 कोटी खर्च आला असून या इमारतीमधील इतर बारीकसारीक कामे पूर्ण करणे चालू आहे. अनेक ठिकाणी वातानूकुलित यंत्रणा उभारलेल्या या नवीन विस्तारित इमारतीत उत्तम इंटिरियर असून तिथे पाणी, वीज व ड्रेनेज याला पूरक असणार्‍या सर्व सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. आधुनिक उपकरणांमध्ये या इमारतीत लागणारी वीज बीएमएस या उपकरणातून मोजता येईल, त्यावर सातत्याने लक्ष ठेवता येईल. सर्वसाधारण सभेच्या मुख्य सभागृहात आधुनिक ध्वनियंत्रणा उभारण्यात आली असून आवाज घुणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. याशिवाय बर्‍याच काळानंतर घुट असणारी इमारत पुण्यात या इमारतीच्या निमित्ताने पाहायला मिळते आहे. केंभावी म्हणाले की, हा घुाट 22 मीटर व्यासाचा असून त्याची उंची 11 मीटर आहे. जीआरसी तंत्रज्ञानाने हा घुट लांबूनही सुंदर दिसतो व डोळ्यांध्ये भरतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने हा घुट बरोबर आहे की नाही हे तपासण्याचे काम पुण्यातील इंजिनियरिंग कॉलेजम धील तज्ज्ञांनी केले आहे. याशिवाय या इमारतीचे स्ट्रक्चरल ग्लेझिंग बाळ कुलकर्णी तर बिल्डिंगचे प्रूफ चेकिंग हे प्रसिद्ध जे. डब्ल्यू. कन्सल्टंट यांनी केले आहे. सभागृहातील ध्वनियंत्रणेसाठी सल्लागार म्हणून विजय पुरंदरे, इमारतीतील वातानुकूलित यंत्रणा सल्लागार म्हणून शिरीष खर्शीकर यांची नेमणूक केली आहे. केंभावी म्हणाले की, ज्या दिवशी या इमारतीचे उधघटन झाले त्यादिवशी अचानक आलेल्या धूवाधार पावसाने सभागृहात पाणी गळाले हा केवळ दैवदुर्विलास होता. छतावर एका ठिकाणी साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा होताना ते थेट खाली आले. या इमारतीचे बांधकाम सर्व प्रकारच्या तज्ज्ञ सल्लागारांच्या तपासणीनेच पूर्ण झाले आहे.

महापालिकेच्या इमारतींसारखे मोठे टर्न की प्रोजेक्ट्स् हे नेहमीच एक जोखमीचे काम असते. तसेच त्यात अनेकांचे कष्ट व योगदान महत्त्वाचे असते. दुदैवाने आपल्याकडे मात्र अशा गोष्टींकडे साफ दुर्लक्ष केले जाते. कोणत्याही इमारतीचे उद्घाटन ज्या राजकीय नेत्यांनी केले हे जसे महत्त्वाचे असते, तितकेच त्याचा आराखडा, डिझाईन कोणी केला, ती इमारत कोणी बांधली याचा उल्लेखही या इमारतीच्या कोनशिलांवर होणे आवश्यक आहे. अभ्यासकांना अशी माहिती नेहमीच उपयोगी ठरते. याशिवाय ही इमारत बांधताना तयार असणारी कागदपत्रेही अभ्यासकांसाठी महापालिकेने उपलब्ध करून द्यायला हवीत. तरच हा इतिहासही पारदर्शक  पद्धतीने आपल्यापुढे साकार व्हायला मदत होईल!

लेखक : श्री. विवेक सबनीस
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *