टोकाची भूमिका?

शेतकर्‍यांच्या मान्य केलेल्या मागण्या व दिलेली आश्‍वासने सरकार पूर्ण करत नसेल, तर शेतकर्‍यांनी टोकाची भूमिका घ्यावी; असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. अर्थात टोकाची भूमिका घेण्याचे आवाहन करताना आपण शेतकरी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितलेले आहे. त्याविषयी चकित होण्याचे कारण नाही. विविध सल्ले देताना पवार त्या त्या भूमिकेत टोकाला जात असतात. मागल्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि नरेंद्र मोदी हेच भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे आले, तेव्हाही पवारांनी अशी क्रीडापटूची भूमिका धारण केली व मोदींना सल्ला दिलेला होता. क्रीडाक्षेत्रात काम केलेले असल्याने त्यांनी मोदींना सबुरीचा सल्ला दिलेला होता. मॅराथॉन स्पर्धेत उतरलेला धावपटू तात्काळ वेगाने धावत नाही, तर अखेरच्या टप्प्यासाठी आपली उर्जा राखून ठेवतो, असे त्यांनी मोदींना समजावले होते. पण मोदींनी तिकडे बघितले नाही, की पवारांचा सल्ला जुानला नाही. अनेकजण तेच करतात. पण म्हणून पवार कोणाला सल्ले देण्याचे थांबलेले नाहीत. सल्ले देण्याच्या बाबतीत त्यांनी कायम टोकाची भूमिका घेतलेली आहे. म्हणूनच कृषिमंत्री असताना कधी त्यांनी टोकाची भूमिका घेतली नव्हती पण आता शेतकर्‍यांना तशी टोकाची भूमिका घेण्याचा सल्ला दिलेला आहे. कारण दिर्घकाळ शेतकर्‍यांचा प्रश्‍न कडेलोटावर येऊन उभा रहाण्यापर्यंत पवारांनी प्रतीक्षा केली आणि मगच अशी टोकाची भूमिका जाहीर केली आहे. त्याला शेतकर्‍यांचा कसा प्रतिसाद मिळतो, ते लवकरच दिसेल. पण शेतकरी नसूनही सत्ताधारी युती असलेल्या शिवसेना भाजपाने पवारांचा सल्ला मनावर घेतलेला दिसतो. एकत्र सरकार चालवताना त्यांनी आता टोकाच्या राजकीय भूमिका घेतलेल्या आहेत आणि पुढे ‘एकला चलो रे’ असेच होणार असल्याची चाहूल लागलेली आहे.

खरेतर मागल्या साडेतीन वर्षांत एकत्र सरकार चालवताना दोन्ही पक्ष एकमेकांवर दुगाण्या झाडत राहिले आहेत आणि तशा संधी सतत शोधत राहिले आहेत. एकमेकांवर आरोप करताना किंवा टीकाटिप्पणी करतानाही टोकाला जात राहिलेले आहेत. पण त्यातल्या त्यात भाजपा मात्र सेनेला चुचकारून सोबत ठेवण्याचे निदान नाटक करीत राहिला आहे. म्हणून तर पालघरला दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात तावातावाने लढले असल्याने निकालानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख टोकाची भूमिका घेऊन, सत्तेतून बाहेर पडतील अशीच अपेक्षा होती. पण टोकापर्यंत जाऊन त्यांनी मागे येण्यात धन्यता मानली आणि अजून देवेंद्र सरकार टिकून आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. अजून युती मोडलेली नाही आणि भविष्यात युती होऊ शकेल, असा आशावादच व्यक्त केलेला होता. पण आठवडाभर उलटत असताना मात्र मुख्यमंत्रीच टोकाला गेलेले आहेत. त्यांनी आपल्या फौजेला वा सहकार्‍यांना शिवसेनेशिवायच निवडणुकांना सामोरे जायच्या तयारीला लागा, असा टोकाचा आदेशच देऊन टाकला आहे. युती होईल किंवा नाही होणार, आपल्याला सर्व निवडणूका लढवायच्या आहेत. त्यामुळेच युतीच्या आशेवर राहून प्रतिक्षा करता येणार नाही. त्यापेक्षा स्वबळावरच लढायच्या तयारीला लागा, असे फडणवीसांनी सांगून टाकलेले आहे. ही त्यांच्या आजवरच्या वक्तव्याच्या तुलनेत टोकाची भूमिकाच म्हणावी लागेल. ती त्यांनी हुलकावणी देण्यासाठी घेतलेली टोकाची भूमिका आहे, की खरोखरच भाजपा स्वबळावर लोकसभेला सामोरे जायला सज्ज होणार आहे? निदान या संदर्भातील फडणवीसांचे वक्तव्य बोलके आहे. त्यांनी असे टोकाचे आवाहन करताना पालघरचा दिलेला संदर्भ स्पष्ट आहे.

त्यामुळेच आता सेना कुठल्या टोकाला जाऊ शकते, ते बघणे लक्षणीय ठरेल. पालघरला हे दोन्ही मित्रपक्ष परस्परांच्या विरोधात लढले आणि त्यांनी एकमेकांवर जबरदस्त प्रहार केले, ही बाब लोकांनी बघितली. त्यामुळे त्याच्या निकालाचे फडणवीस यांनी वेगळे विश्‍लेषण देण्याची गरज नाही.

पण तोच धागा पकडून त्यांनी केलेले विधान सेनेला डिवचणारे आहे. सेनेशिवाय आपण पालघरची जागा जिंकली, म्हणूनच लोकसभेच्या निवडणुका सेनेची सोबत नसतानाही आपण जिंकू शकतो, असे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले विधान आहे. ते शिवसेना सोबत नसताना असे असले तरी त्याचा अर्थ अगदी भिन्न आहे. शिवसेनेशिवाय नव्हे तर सेनेने विरोध केला तरी आपण पालघर जिंकून दाखवले, असेच मुख्यमंत्र्यांना म्हणायचे आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुका शिवसेना विरोधात उभी ठाकली, तरी आपण जिंकू व जिंकायचीच आहे, असा त्यांच्या विधानातला आशय आहे. अर्थात तो आवेश एकतर्फी बिलकुल नाही. पालघरच्या निकालानंतर सेनेच्या नेत्यांनीही केलेली विधाने अशीच टोकाची होती आणि पुढल्या काळात एकट्याच्या बळावर लढण्याची नांदीच होती. पालघरचा पराभव आपल्याला मान्य नाही आणि तिथूनच आता भाजपाच्या घसरणीला आरंभ झाला आहे, असे सेनेने सांगितले होते. म्हणजेच आपल्याला स्वबळावर भाजपाला हरवायचे असल्याची डरकाळीच सेनेच्या वाघानं फोडलेली आहे. त्या डरकाळीने भाजपाची मनिमाऊ घाबरली असे वाटत होते. कारण मुख्यमंत्र्यांनी युती होईल, पण एकाच हाताने टाळी वाजत नसल्याचे’ बोलून दाखवले होते. त्या बचावाच्या पवित्र्यातून बहुधा मुख्यमंत्री बाहेर पडलेले असावेत. शेतकर्‍यांना पवारांनी दिलेला सल्ला आपल्यालाच आहे अशी फडणवीसांनी समजूत करून घेतली की काय, अशी शंका येते. कारण पवारांचे आवाहन व मुख्यमंत्र्यांची टोकाची भूमिका एकाचवेळी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे यापुढले महाराष्ट्रातील राजकारण टोकाचेच असेल, अशी खात्री बाळगायल हरकत नाही.

त्याचेही कारण स्वच्छ आहे. निकालानंतर झटपट प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सावध भूमिका घेतली होती. गोंदियाची जागा भाजपाने गमावली आहे आणि पालघर जिंकलेली आहे. म्हणजेच तिरंगी लढतीत आपण जिंकलो आणि थेट सरळ सामन्यात आपला 40 हजारांनी पराभव झाला, याचे चिंतन विश्‍लेषण पक्षात झालेले असावे. त्यानंतरच टोकाची भूमिका जाहीर करण्यात आलेली असावी. कैराना व गोंदिया हे दोन निकाल बघितले तर त्यात विरोधी पक्षांनी एकजूट करून जीव ओतला होता. तरीही एकत्रित मते फक्त 40 हजाराच्या फरकाने भाजपाला पराभूत करू शकलेली आहेत.त्यामुळे विविध पक्ष एकवटले व एकजुटीने समोर आल्यास, एकत्रित मतांची बेरीज किती होऊ शकते, त्याचा दाखला समोर आलेला आहे.

भाजपाला जशी 2014 इतकी मते मिळालेली नाहीत, तशीच बेरीज करूनही विरोधकांची एकत्रित मते लक्षात आलेली आहेत. या बेरजेनंतरही आपण विजय संपादन करू शकतो, असा आत्मविश्‍वास त्या टोकाच्या भूमिकेमागे दडलेला आहे. त्याच पोटनिवडणुकांचे निकाल समोर आल्यावर अमित शहांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशीच टोकाची भूमिका जाहीर केली. विरोधक त्यांचे लक्ष्य ठरवतील. आमचे लक्ष पन्नास टक्के मतांचे आहे, असे सांगून अमित शहांनी आपण विरोधकांच्या एकजुटीला स्वबळावर सामोरे जाण्याची तयारी करीत असल्याचा इशारा दिला आहे. त्याच्याशी फडणवीस यांची टोकाची भूमिका जोडली, तर नव्या गर्जनेचा काहीसा उलगडा होतो. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच एकट्याने लढण्याची घोषणा केलेली आहे. भाजपा आजपर्यंत ती हिंमत दाखवत नव्हता. आता फडणवीसांनी त्याचा उच्चार केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण कुठल्याही टोकाला जाईल, याची खात्री बाळगण्यास हरकत नाही. कारण सत्ताधीशांपासून आंदोलकांपर्यंत सगळेच टोकाच्या भूमिका घ्यायला निघाले आहेत.

श्री. भाऊ तोरसेकर
संपर्क : swatantranagrik @gmail.com        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *