जग एक खेडं!

जग एक खेडं; आणि त्यात सुरू असलेली भांडणं म्हणजे त्या गावचं राजकारणच की! गावातसावकाराचं एक घर. सावकाराचं नाव अमेरिका. त्याच्यावर कर्ज बरंच असलं तरी सुखात जगणारा. बिचारा मोठ्या मनानं गावातल्या इतरांना मदत करतो. हां, घेणारे त्याची जाण ठेवत नाहीत, ही गोष्ट वेगळी.

सावकाराच्या खालोखाल ज्याच्या शब्दाला वजन आहे असं दुसरं एक घर. अहो रशिया! सावकाराबद्दल याच्या मनात लई राग. म्हणजे ते मराठी चित्रपटात नसतं का पाटलाचं न देशमुखाचं हाडवैर, तस्संच! सावकार पाटील, अन् हे देशमुख. काही वर्षांपूर्वी देशमुखाचं घर पण जोरात होतं. पण ते घरच इतकं मोठं होतं की, घरातल्या मोठ्यानंच बाकीच्यांना वेगळं राहू दिलं. संसार मोडला न् देशमुखी पार लयाला गेली. मग सावकाराला तर अजूनच बळ मिळालं. ‘आमच्यासारखे आम्हीच’ म्हणणं चालू केलं त्यानं. अन म्हणून देशमुखाचा हा राग. पण त्यांच्या पुढच्या पिढीनं गेलेलं वैभव परत मिळवून आपल्या शब्दाला ‘वजन’ आणण्याचं ठरवलंय. म्हणून सावकार एक म्हणाला तर हे दुसरंच म्हणणार! असो, चला पुढं!

गावात एक मोठा वाडा आहे. 28 घरांचा. कुणी त्याला युरोपियन युनियन म्हणतं. यांची अजबच तर्‍हा! यांच्यातलं कुणीही कुणाच्याही घरात न विचारता घुसू शकतं. म्हणे असं केलं तर सगळेच सुखी होतील. पण उतू आलेलं हे प्रेम फार काळ टिकणार नाही असं म्हणत्यात. या भिकारड्या शेजार्‍यांपासून आपल्याला काही मिळणार नाही; उलट आपल्याच डोक्याला ताप असं म्हणत या वाड्यातलं ब्रिटन नावाचं घर वाडा सोडून दूर कुठंतरी राहायला जायचा विचार करतंय. घरमालकानं घरातल्या सगळ्यांशी यावर चर्चा करायचं ठरवलंय. बघू काय होतंय ते!

वर्षानुवर्षे ‘‘शांतीत क्रांती’’ करून एक दिवस सावकारालाच भिडण्याचा विचार एक चीन नावाचं घर करतंय. घर काय, अहो ‘लाल’ महालच तो. मस्त मोठाल्या भिंतीचं कुंपण. गावात कुणाच्याच घरी नसतील इतकी खाणारी तोंडं याच्या घरी. तरी पण घराचं भागवून अख्ख्या गावाला पुरवतंय. या घराला एकच सवय.

आपल्या शेताला लागून असलेल्या दुसर्‍याच्या शेताचा बांध फोडायचा. मग शेजारचेही नाराज. सावकारही या घराला बिचकूनच. म्हणून तर याच्या शेजार्‍यांशी नातं वाढवतोय. मग कधी भांड्याला भांडं लागलं की होतात फुटकळ वाद. पण हा वाद अजूनतरी हाणामारीपर्यंत गेला नाहीये. अन तो जाऊ नये अशी ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना!

काय म्हणालात? ग्रामदेवता बघायचीये? जाऊ आपण तिकडं, पण रस्ता काटेरी आहे. काट्यांकडं नजर ठेवून ते चुकवत असताना कोण तुमच्या डोक्यात दगड घालेल सांगता येणार नाही. त्याचं काय आहे, या देवतेभोवतीच्या वॉर्डाचं नाव मध्य पूर्व आशिया! या वार्डात राहणारे सगळे एकमेकांचे भाऊच! पण ते म्हणतात ना ‘सख्खा भाऊ, पक्का वैरी’, तसंच काहीसं चाललंय यांच्यात. जो तो आपल्या घरचा मालक. यांच्या बायकांना आवाज काढण्याची सोय नाही. धरणीमातेच्या पोटात सोनं अन त्याच्यावरच यांची घरं हेच यांचं काय ते नशीब. त्याच्या जीवावर मारतायत उड्या. भावाभावातल्या लई कारस्थानामागं पाटील-देशमुखच! तरी पण यांना भावांपेक्षा तेच जवळचे. खा, प्या, अन भांडणं करा. सावकार आहेच काठ्या न सुर्‍या पुरवायला!

अशा भांडणातच एक बिर्‍हाड येऊन शांतपणे त्या वॉर्डात बसलं. कुणाला काहीच कल्पना नव्हती. पण एका दिवशी या बिर्‍हाडानं ग्रामदेवतेच्या जागेवरच आपली मालकी सांगितली. म्हणे कोणे एके काळी आमची ग्रामदेवता इथंच होती. इस्रायल नावाचं हे बिर्‍हाड तसं भावभावांच्या नात्यातलंच. पण ऐकतो कोण? आता ग्रामदेवतेचा प्रश्‍न आला तर भाऊभाऊ एकत्र येतील का? नाहीच! म्हणून तर ते इवलंसं बिर्‍हाड सगळ्यांना पुरून उरतंय. पण सावकार कित्ती हुशार! त्यानं तर या बिर्‍हाडाशी पण जुळवून घेतलंय!

बोलू नये पण आजही बर्‍याच गावांत ठराविक लोक ‘वेगळे’ राहतात हे जे जळजळीत वास्तव आहे ते याही गावात आहे. गरिबी त्यांच्या पाचवीला पुजलेली. या समाजाचं नाव आफ्रिका! साला गावात येणारे पहिले लोक हेच! हे सावकारालाबी मान्य! पण आज यांच्या खाण्याचीही भ्रांत. तसं गावातल्या लोकांचं यांच्याशी फार काही देणंघेणं नसतं. यांच्यावर ज्यांची मालकी होती त्यांनी अक्षरशः लुबाडलं. इतरांचं लक्ष नाही कारण बदल्यात यांच्याकडं देण्यासारखं काहीही नाही. रोगराईनं ग्रासलेलं. इतरांनी केलेल्या उपकारांवर जगणारं. लाज वाटावी गावाला (अन् सावकाराला!)

लेखक : पंकज येलपले 

संपर्क : swatantranagrik@gmail.com  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *