22 एप्रिल, 1970 – प्रथम वसुंधरा दिवस

जगाचा इतिहास अनेक विस्मयकारक घटनांनी भरलेला आहे. साहित्यातील नवरसांचे त्याला वावडे नाही. इतिहास अनेक अपवादात्मक गोष्टींनी भरलेला आहे, किंबहुना अपवाद म्हणजेच इतिहास आहे. प्रत्येक तारखेला इतिहासाने आपल्या कथांनी अजरामर करून ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्यातील जागतिक इतिहासातील एखादी महत्त्वाची घटना आपण या सदरात वाचणार आहोत.

पर्यावरणासंबंधी प्रश्‍नांबाबत जगाला तसे पाहता उशिराच जाग आली. औद्योगिक क्रांतीनंतर विज्ञानाच्या प्रगतीच्या झपाट्यात माणसाने प्रकृतीचे अतोनात शोषण सुरूच ठेवले आणि त्याचे प्रतिकूल परिणाम दिसायला सुरुवात झाली. परंतु तरीही पर्यावरणाचा र्‍हास ही पृथ्वीवरील एक मोठी समस्या आहे आणि त्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे, हे जगाला पटवून देण्यासाठी पर्यावरणाविषयी आस्था असणार्‍या तज्ज्ञांना बराच संघर्ष करावा लागला. त्या संघर्षाला फळ येण्याची सुरुवात म्हणजे 1970 मध्ये 22 एप्रिल हा दिवस अमेरिकेने प्रथमच वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला. लोकांमध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस अमेरिकेतील महाविद्यालय तसेच विद्यापीठांधून शैक्षणिक कार्यक्रम तसेच मोर्चे या माध्यमातून साजरा करण्यात आला.

‘वसुंधरा दिवस’’ साजरा करण्याची कल्पना होती अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्याचे सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांची. गव्हर्नर व सिनेटर नेल्सन हे पर्यावरणवादी होते व पर्यावरणविषयक चळवळ सुरू करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. रेचल कार्सन या लेखिकेच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकाने पर्यावरण प्रश्‍नाला वाचा फोडली, परंतु स्वतः रेचल यांना त्यांच्या हयातीत टीकेचे धनी व्हावे लागले होते. कार्सन यांच्या पुस्तकाने नंतर मात्र जागृती होण्यास सुरुवात झाली.

‘सायलेंट स्प्रिंग’’ या पुस्तकात ddt या रसायनामुळे पर्यावरणाची होणारी हानी याविषयी लिहिण्यात आले होते. 1962 साली आलेल्या या पुस्तकानंतर पर्यावरण प्रश्‍नाकडे लक्ष्य वेधले ते गव्हर्नर गेलार्ड नेल्सन यांनी. हे पुस्तक उचलून धरले. पर्यावरणविषयक चळवळ सुरू केली. त्यांच्या प्रयत्नांधून अमेरिकेत पर्यावरण संरक्षणाचा कायदा संत करण्यात आला. तसेच 22 एप्रिल हा ‘वसुंधरा दिवस’ म्हणून पाळण्याचे निश्‍चित करण्यात आले.

या आधी 1969 मध्ये सान फ्रान्सिस्को येथील युनेस्कोच्या परिषदेत शांततेसाठी कार्य करणारे जॉन मॅककोनेल यांनी पृथ्वीच्या सन्मानासाठी एक विशिष्ट दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली होती. 21 मार्च हा उत्तर गोलार्धाध्ये वसंताचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी 1970 पासून संयुक्त राष्ट्रसंघाने वसुंधरा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले. यानंतर महिनाभरात सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांच्या पुढाकाराने अमेरिकेत 22 एप्रिल 1970 रोजी प्रथम वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला. नेल्सन यांना त्यांच्या या कार्यासाठी स्वातंत्र्यासाठीचा राष्ट्राध्यक्ष पुरस्कार देण्यात आला. प्रथमतः 22 एप्रिलचा वसुंधरा दिवस हा अमेरिकेपर्यंतच मर्यादित होता. परंतु डेनिस हेस यांच्या संघटनेने 1990 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर वसुंधरादिनानिमित्त 141 देशांध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

पहिला वसुंधरा दिन हा अमेरिकेतील दोन हजारांपेक्षा अधिक विद्यापीठ व महाविद्यालयांध्ये साजरा करण्यात आला होता. तसेच दहा हजारांहून अधिक शाळा व इतर संस्थांनी यात सहभाग घेतला होता. आज हा वसुंधरा दिवस जगातील 192 देशांध्ये साजरा केला जातो.

वसुंधरा दिवस साजरा करण्याने पर्यावरणविषयक परिषदांना गती आली. तेव्हापासून सुरू झालेली चळवळ आज पॅरिस येथील महत्त्वाच्या हवामान बदल करारापर्यंत येऊन ठेपली आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस कारारातून अमेरिकेला वगळले आहे, असे असले तरी हवामान बदल हे मोठे संकट आहे आणि त्याला सर्वांनी मिळून सामोरे जावे लागेल याविषयी जग निश्‍चितच गंभीर झाले आहे.

लेखिका : वैभवी घरोटे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *