सुवर्णहोत्सवी ‘श्रीमान योगी’!

‘स्वामी’, श्रीमान योगी’, ‘पावनखिंड’, राधेय’, राजा रविवर्मा’ या आणि अशा अनेक ऐतिहासिक कादंबर्‍यांचेलेखक रणजित देसाई यांची 90 वी जयंती येत्या 8 एप्रिल रोजी साजरी होत आहे. तसेच\ ‘श्रीमान योगी’ या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृतीला यंदा 50 वर्षे होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कोवाड (जि. कोल्हापूर) येथे युवक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्रीमान योगी’च्या सुवर्णहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हा विशेष लेख

तब्बल 12 कादंबर्‍या, 17 कथासंग्रह, 14 नाटकं आणि 4 चित्रपट अशी साहित्यसंपदा असलेले मराठीतील अव्वल दर्जाचे लेखक म्हणून रणजित देसाई यांचं आवर्जून नाव घेतलं जातं. त्यांच्या वयाच्या 34 व्या वर्षी प्रकाशित झालेल्या माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील ‘स्वामी’ कादंबरीला तर साहित्य अकादमीचा सन्मान लाभला. या ‘स्वामी’ची निर्मिती कथा वेगळी आहे. ‘जीवनासाठी कला’’ हे ब्रीद समोर ठेवून लेखणीचं व्रत घेतेलेले मराठीतील पहिले ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर हे सुरुवातीला माधवराव पेशवे यांच्यावर कादंबरी लिहिणार होते. त्यांना तो विषय आधी सुचला होता आणि ‘अजिंक्य’ या नावानं त्यांनी ती कादंबरी जाहीरही केली होती. त्याचवेळी रणजित देसाई त्यांना जाऊन भेटले. याबाबत स्वत: देसाई यांनीच लिहून ठेवलंय –

‘मला जेव्हा त्या विषयावर कादंबरी लिहावी असं वाटलं तेव्हा मी भाऊना बोलून दाखवलं. क्षणाचाही विलंब न करता भाऊ म्हणाले,  जरूर लिही….’’

आपला विषय दुसर्‍याला देणं हे केवढं कठीण असतं. हे जे लेखक असतील त्यांनाच कळू शकेल. मी माधवरावांच्या जीवनावर ‘स्वामी’ कादंबरी लिहिली. त्या कादंबरीचं खूप कौतुक झालं.  स्वामी’ ला जेव्हा ‘साहित्य अकादमी’चं पारितोषिक मिळालं, तेव्हा मी भाऊंना भेटायला गेलो.

भाऊंच्या घरच्या पायर्‍या चढताना मिळालेल्या यशाच्या आनंदानं मन धुंदावलं होतं. आकाशाला हात लागलेला गर्व मनात दडला होता. भाऊ भेटताच त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. भाऊ ‘स्वामी’च्या यशानं खूप आनंदित झाले होते. मी आशीर्वाद मागितला आणि भाऊंनी सहजपणे आशीर्वाद दिला.

तुझं ‘राधेय’ प्रसिद्ध होईल, तेव्हा ‘ययाती’ची कुणाला आठवण न राहावी. असं यश तुला मिळो!’’ भाऊंचा आशीर्वाद ऐकला आणि यशाचा अहंकार कुठच्या कुठं निघून गेला. हिमालयाची शिखरं खूप उंच आहेत, हे प्रथमच जाणवलं. असं उदंड देणारा दाता, गुरु मिळणं कठीण!

(संदर्भ : स्नेहधारा : संपादन पांडुरंग कुंभार, मेहता पब्लिशिंग हाऊस, पान 142/143)

स्वामी’ नंतर रणजितदादांनी ‘राधेय’ ही कर्णकथा लिहायचं मनावर घेतलं होतं. त्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी, टिप्पणं तयार करून झाली होती. जवळजवळ निम्मं लेखनही झालं होतं. पण महाराष्ट्राचे तेव्हाचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्याशी बोलत असताना त्यांनी रणजितदादांकडे वाजी महाराजांवर लेखन करण्याचा आग्रह धरला.

अनवधानाने दादांनी त्यांना होकारही देऊन टाकला आणि ‘स्वामी’ नंतर सुारे सात वर्षांनी 1968 मध्ये ‘श्रीमान योगी’ ही 1192 पानांची महाकादंबरी साकारली. मुळातच शिवचरित्राचा असलेला प्रचंड आवाका, छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची सार्वत्रिक आदराची भावना, तमाम मराठी माणसांचं एक जाज्ज्वल्य प्रेरणास्थान म्हणून असलेलं महाराजांचं शाश्‍वत अधिष्ठान या सगळ्या पार्श्‍वभूीवर रणजित देसाई यांनी या साहित्यकृतीचे शिवधनुष्य उचलले होते. सेतु माधवराव पगडी, दत्तो वामन पोतदार, ज्यांच्या वाणीने आणि लेखणीने राष्ट्रीय स्वाभिमानाची ज्योत पेटवली असे बाळशास्त्री हरदास, चित्रतपस्वी शिवभक्त भालजी पेंढारकर, पांडुरंग पिसुर्लेकर, प्रा. अ. रा. कुलकर्णी, सुंदरभाई बुटाला, पन्हाळा येथील इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अनेक अभ्यासक-संशोधकांशी चर्चा करून, देशी-विदेशी अनेक ग्रंथ पालथे घालून रणजितदादांनी ही साहित्यकृती सिद्ध केली. ‘मनसुबा’ या नावाने लिहिलेल्या प्रारंभीच्या मनोगतात त्यांनी या सर्वांचा आवर्जून उल्लेख केला आहे. भाऊसाहेब खांडेकर आणि आचार्य अत्रे यांनीही दिलेल्या आशीर्वादाचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.

या कादंबरीबाबतची आपली भूमिका मांडताना ते लिहितात की, शिवचरित्राबाबत इतिहासकारांचे जेवढे दुत आहे तेवढे दुत असलेले चरित्र मिळणे कठीण. त्यातील अनेक घटनांबाबत असलेले इतिहासकारांचे वेगवेगळे दृष्टीकोन आणि रणजितदादांसारख्या प्रतिभावंत लेखकाचे त्याबाबतचे आकलन यातून या कादंबरीसाठी पुढं वाटा शोधणे हे महाकठीण काम असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

तर अनेक ग्रंथ अभ्यासल्यानंतर शिवचरित्राबाबतच्या भावना व्यक्त करताना रणजितदादा याच मनोगतात लिहून ठेवतात,  इतिहास वाचीत असता त्यात दिसणारे शिवाजीचे रूप पाहून थक्क व्हायला होते. इतका अष्टपैलू, अष्टावधानी, संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे कठीण. मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांनीदेखील घडणारे या महापुरुषाचे दर्शन मन भारून टाकते. शिवाजी धार्मिक होता, पण धर्मभोळा नव्हता, व्यवहारी होता, पण धेयशून्य नव्हता. श्रींच्या राज्याचे स्वप्न पाहणारा स्वप्नाळू आणि तेस्वप्न वास्तवात उतरविणारा कठोर वास्तववादी हे त्याचे स्वरूप आहे. विजयनगरसारखी हिंदू साम्राज्य वैभवाच्या ऐन शिखरावर असता मुसलमानी आक्रमणाच्या सामान्य धक्क्याने नामशेष झाली. त्यांचे पुनरुत्थान झाले नाही, ही इतिहासाची नोंद आहे.

पण पुरंदरच्या तहाने धुळीस मिळालेली राज्ये त्याच धुळीतून परत उठवून त्याला सुवर्णय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषाला साधले, हीही इतिहासाचीच नोंद आहे. हे राज्य उभे करीत असता जनतेच्या ऐहिक कल्याणाची जबाबदारी राजाची आहे हे तो कधी विसरला नाही. अनेक लढाया तो लढला, पण त्यासाठी प्रजेवर त्याने कधी नवे कर लादले नाहीत. मी शत्रूशी शत्रू म्हणून वागलो, मित्रांना दगा दिल्याचे दाखवा, असे त्याचे आव्हान होते. त्या आव्हानाला उत्तर नाही. कौल देऊन गावे वसविणे, शेतसारा निश्‍चित करणे, वतनदारीला आवर घालणे, किल्ल्याची कोठारे भरून ठेवणे, शेतकर्‍यांना बी-बियाणे, नांगर-अवजारे यासाठी कर्जाची सोय करणे, भाषा सुधारण्यासाठी राज्यव्यवहारकोष, पंचांग सुधारण्यासाठी करणकौस्तुभ, धर्म सुधारण्यासाठी प्रायश्‍चित्त देऊन हिंदू करून घेणे, नवे किल्ले बांधणे, वीरांचे कौतुक आणि पंडितांचा सन्मान या सर्व बाबतीत सदैव दक्ष असणारा शिवाजी इतिहासात ठायी ठायी आपणास दिसतो. आणि एवढे करूनही त्याचे रूप एकाकीच भासते. असामान्य गोष्टी साध्य करूनही त्यांची सुखदु:खे सामान्य माणसाचीच राहिली. ती त्यांला एकट्यालाच भोगावी लागली.’

पण या सार्‍यांबरोबर ‘‘श्रीमान योगी’’ची आणखी एक श्रीमंती नमूद केली पाहिजे, ती म्हणजे या कादंबरीला लाभलेली साक्षेपी समीक्षक नरहर कुरुंदकर यांची प्रस्तावना. 1966 मध्ये त्यांनी रणजित देसाईंना लिहिलेले 24 पानी पत्र म्हणजेच ही प्रस्तावना.

महाराष्ट्रीय संशोधकांना अजूनही शिवाजी महाराजांबाबत निर्विकारपणे विचार करणे जमत नाही, असे स्पष्टपणे सांगून खास कुरुंदकरी पद्धतीने शिवचरित्रातील अनेक घटना/ प्रसंगांची परखडपणे केलेली चिकित्सा इथे आपल्याला वाचायला मिळते. परिणामी अनेक प्रचलित कल्पना आणि समजुतींना धक्का बसतो. ऐन शिवचरित्रातील ख्यातनाम प्रसंग आणि महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाशी तब्बल 27 वर्षे लढणारे मराठे याबाबतचं कुरुंदकरांनी केलेलं विश्‍लेषणही जाणत्या अभ्यासकांचं कुतूहल वाढवणारं आहे. कोवाडसारख्या निसर्गरम्य पण आडवळणी गावात राहून, मी आधी शेतकरी आहे या भूमिकेतून स्वत:ची शेती नंदनवनासारखी फुलवणार्‍या रणजितदादांनी आपली चित्र-संगीताविषयीची रसिकताही मन:पूर्वक जपली होती. वसंतराव देशपांडे, सी. रामचंद्रांपासून अनेक दिग्गजांच्या त्यांच्या वाड्यात ‘प्रभु-छाया’ मध्ये रंगलेल्या मैफिली याची साक्ष द्यायच्या. आज त्यांच्या कुटुंबियांनी, स्नेह्यांनी याच वाड्यामध्ये त्यांच्या ग्रंथालयाला सार्वजनिक ग्रंथालयाचे स्वरूप देऊन ते समर्थपणे चालवले आहे. स्वत: रणजित देसाई यांच्या हयातीत कोवाड-चंदगड परिसरात पाच ग्रामीण साहित्य संमेलने झाली होती. मध्यंतरी काही काळ या संमेलनाच्या आयोजनात खंड पडला होता.

आता त्यांची कन्या सौ. पारुताई नाईक आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रणजित देसाई सार्वजनिक ग्रंथालयामार्फत यावर्षीपासून पुन्हा हे संमेलन सुरू केले आहे. तरुण पिढीला या कार्यात अधिकाधिक प्रमाणात सामावून घेण्यासाठी यंदा हे संमेलन ‘युवक साहित्य संमेलना’च्या स्वरूपात साजरे होत आहे. रणजित देसाई यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली.

(डॉ. सागर देशपांडे हे कोवाड येथे होत असलेल्या युवक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.)

लेखक : डॉ. सागर देशपांडे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *