संपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

तसं ही घटना घडून काही काळ होऊन गेलाय. घटना घडल्यानंतर एक-दोन दिवस काही थोड्या लाटा, क्रिया-प्रतिक्रिया उमटल्या. पण तिची पुरेशी दखल घेऊन व्यवस्थेचं आवश्यक ते परिवर्तन करण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलली गेली की नाही याची मला माहिती नाही. त्याबद्दल मला खात्री नाही.

महाराष्ट्राच्या एका ग्रामीण भागात पोस्टिंगवर असलेल्या एक वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी. सुट्टी घेऊन त्या त्यांच्या मुंबईतल्या घरी आल्या होत्या. खासगी, वैयक्तिक व्यक्ती, देशाची एक नागरिक या नात्यानं. ड्यूटीवर नव्हत्या. एकट्या मध्यमवयीन महिला, त्यांच्या मुलाबाळांसोबत, त्यातला एक मुलगा आजारी होता; खूप सामान घेऊन खाली उतरत आहेत. त्यांना रिक्षा हवीये. तर रिक्षावाल्यांची प्रचंड मग्रुरी. कोणती गिऱ्हाइकं घ्यायची, कोणती नाही. मीटर चालवायचा की नाही. की समोरच्या व्यक्तीची अडचण पाहून तोंडाला येईल ते भाडं सांगायचं. हा सगळा प्रकार बघत तिथं काही पोलीस निवांत गप्पा मारत उभे होते. म्हणून या महिला अधिकाऱ्यानं त्या तिथल्या पोलिसांकडे रिक्षावाल्याची तक्रार केली आणि म्हणाल्या – ‘तुम्ही नुसतेच बघत काय बसलात?’ बहुधा आधीतर ते पोलिस तिच्या तोंडावर हसले. त्यावर आपण कोण हे आधी न सांगता त्या म्हणतात – ‘हसताय काय!’ यावर ते पोलिस – ‘अरे! हिला घे रे आतमध्ये,’ ‘हिला फार माज आलाय का?’ असं म्हणतात. म्हणजे एकदम एकेरीवरच.

मला हा सगळा प्रकार कळला तेव्हा कायमच वाटत असलेली काळजी आणखी जास्त गडद झाली. दुर्दैवानं ही गोष्ट नवी नाही. पूर्वी, आता त्याला 25 पेक्षा जास्त वर्षं होऊन गेली, आपल्या पोलिस खात्यात जे. एफ्. रूबेरो, डी. एस्. सोमण, सूर्यकांत जोग आणि अरविंद इनामदार यांच्यासारखे एकाहून एक देदीप्यमान दिग्गज अधिकारी होऊन गेले. यातले इनामदारसाहेब मी उल्लेख केलेल्या बाकीच्या नावांप्रमाणेच जेव्हा महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक बनले, तेव्हा आणि आधीपासूनच सहकाऱ्यांना सांगायचे – एकदा वर्दी उतरवून, तुम्ही पोलिस आहात हे न सांगता चौकीवर जा आणि तुम्हाला कशी वागणूक मिळते ते बघा! इनामदार साहेब सांगायचे की पोलिस अधिकाऱ्याची पत्नी आहे हे न सांगता तुमच्या बायकोला चौकीवर पाठवा. तिला पोलिस चौकीवर कशी वागणूक मिळते ते बघा! ही केवढी प्रचंड काळजीची बाब आहे.

पोलिस खात्याचं ब्रीदवाक्य आहे, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांचा निःपात करण्यासाठी. कुठंतरी या मूळ ब्रीदवाक्याचाच विसर पडलाय. ती वर्दी, ती पोलिस चौकी आणि खात्यात दुर्दैवानं जसजसं वरिष्ठ पद प्राप्त होत जाईल तेवढे तिच्याबरोबर येणारे अधिकार आणि त्याची मस्ती वाढत गेल्यासारखी आहे. आता या एक महिला, पोलिसांत आहेत की नाही याचा काय संबंध आहे? भारतीय नागरिक म्हणून त्यांना मदत मिळायला नको का? आज आमच्या देशाचा माणूसपणा एवढा हरवलाय की त्या बाईंना मदत करण्याऐवजी रिक्षावाल्याला वाटतं की ही वेळ त्यांना लुटण्याची आणि मग्रुरी करण्याची आहे. अशा वेळी खलनिग्रहण – त्या दुष्टाला धडा शिकवणं आणि या भारतीय नागरिक असलेल्या महिलेची सन्मानपूर्वक सोय करणं तिथं समोर बसलेल्या पोलिसांना वाटतच नाही.
वर त्या त्यांना विचारायला गेल्यावर ‘ए, हिला घेरे आत!’.

मला ही गोष्ट नवी नाही. सगळं पाहताना प्रश्न पडतो की पोलिस खात्याचं कॉन्स्टेबलपासून पोलिस महासंचालकांपर्यंतचं प्रशिक्षण, त्यातलं चरित्रघडण आणि पोलिसच काय सगळी सरकारी यंत्रणा ही लोकांची सेवक आहे; लोक सार्वभौम आहेत हा विचार प्रशिक्षणात कुठं आहे? प्रशिक्षणात, एखाद्या अधिकार्याच्या कामाचं मूल्यांकन केलं जात असताना, त्यासंबंधीचे गोपनीय अहवाल (ज्यावरून त्यांना पदोन्नती द्यायची की नाही हे ठरवलं जातं) तयार केले जात असताना कुठं आहे?

एकीकडे याचं दुःख होत असताना मला आठवत असतात दुष्काळात तेरावा महिना म्हणाव्या तशा घटना. काही लोकांच्यातली मग्रुरी एवढी वाढत चालली आहे की आता ते पोलिसांच्याच अंगावर गाडी घालतात. महिला पोलिसांवर हात उचलतात. त्यांना वाटतं कायदा आपण खिशात घालू शकू. त्यात त्यांना कधीकधी राजकीय संरक्षणदेखील असतं. याउलट पोलिस खात्याचं, खातं म्हणून नीतिधैर्य खूप खाली गेलं आहे.

कॉन्स्टेबलपासून ते फौजदारमार्गे पोलिसांच्या राहण्याच्या व्यवस्था किंवा त्यांच्या कामाच्या वेळा त्यांना मिळणाऱ्या सुट्ट्या यामुळे पोलिसांचा फिटनेस नीट राहावा यासाठी योग आणि व्यायाम तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था याकडे सरकार आणि पोलिस संघटनांनी लक्ष देण्याची गरज आहे.

मला एक वेळ लक्षात आहे की पोलिसाची वर्दी घालणाऱ्याला तिचा अभिमान असायचा. समोर हजारो जणांना त्या वर्दीचा धाक असायचा. वर्दीबद्दलचा तो योग्य, सार्थ अभिमान; अहंकार नव्हे. कारण त्या अभिमानासोबत जबाबदारी येते. ती कितपत उरली आहे याबद्दल खरोखरच आज शंका आहे. तरीसुद्धा या सगळ्या चित्रामध्ये आपलं काम उत्तम करणारे कॉन्स्टेबल ते पोलिस महासंचालकांपर्यंत अनेक व्यक्ती आणि अधिकारी आहेत. त्यांच्यावर कसंबसं चाललंय. पोलिस खातंच काय, एकूणच प्रशासकीय यंत्रणा अशीच चाललीय.

या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या निमित्तानं कायमचाच असलेला प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तो म्हणजे एकाच वेळी व्यवस्था परिवर्तन आणि चरित्रनिर्माण याकडं लक्ष देणं. आपल्याला माहीत आहे की चाणक्य मंडलचा आपल्या परीनं या दोन्ही रुळांवरून गाडी पुढं नेण्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्याच्यानं जेवढं जमतं तिथं यश मिळताना दिसतं. राज्यभर-देशभर माझे प्रवास होत राहतात. ठीकठिकाणी लोकं आवर्जून सांगतात की तिथला तहसीलदार, बीडीओ, जिल्हाधिकारी, एस्पी खूपच उत्तम काम करतोय बरं का! अशा वेळी मला भरून येतं. तेव्हा व्यवस्था परिवर्तन आणि चरित्रनिर्माण या दोन्ही बाबींवर एकाच वेळी काम करत स्वच्छ आणि कार्यक्षम कार्यकर्ता अधिकारी तयार होण्यासाठी काम करत राहणं एवढंच आपल्या हातात आहे.
आपण ते करत राहू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *