माफ करा, बाबासाहेब

कुठल्याही महापुरुषाचे अनुयायीचे त्याचे सर्वात मोठे शत्रू असतात असे म्हटले जाते. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच जिग्नेश मेवानी या आधुनिक आंवेडकरवादी तरुण नेत्याने त्याची साक्ष दिलेली आहे. अर्थात त्यात नवे काहीच नाही. हैदराबादच्या विद्यापीठात त्याचा एक व्हिडिओही प्रसिद्ध आहे. आपण सगळेच बाबासाहेब मानत नसल्याचे त्याने आधीच सांगून टाकलेले आहे. त्यामुळे जयंतीच्या दिवशी त्याने त्या महामानवाची अवज्ञा केली तर नवल वाटण्याचे कारण नाही. कारण आता बाबासाहेब कुठल्या विषयात काय म्हणाले होते आणि त्यांची तत्त्वे काय होती, हा विषय दुय्यम झालेला आहे. बाबासाहेबांच्या आंबेडकरी चळवळीचा कब्जा ज्यांनी घेतला आहे, त्यांना वाटेल तेच बाबासाहेब म्हणालेले असणार हे गृहीत आहे. ‘‘लगे रहो मुन्नाभाई’’ या चित्रपटात त्याचे प्रात्यक्षिक आलेले आहे. मुन्नाभाईचा कोणी उजवा-डावा हात कुणा गांधीवादी प्राध्यापकाला कॉलर पकडून दरडावतो, ‘भाईने बोला मतलब बापूनेभी वोहीच बोला है.’’ आजकाल जिग्नेश मेवानी वा तत्सम आधुनिक आंबेडकरवादी नेते बोलतात , त्यांच्या शब्दाबाहेर खुद्द बाबासाहेबही जाऊ शकत नाहीत. अन्यथा गुजरातच्या कुठल्या शहरात त्याच महामानवाच्या पुतळ्याला स्पर्श करण्यास प्रतिबंध घालण्याची मेवानीची हिंमत कशाला झाली असती? जयंतीच्या निमित्ताने 14 एप्रिल रोजी देशात अनेक समारंभ झाले, तेव्हा त्या शहरातील लोकप्रतिनिधी पुतळ्याला अभिवादन करायला येणार होते. तर त्यांना तिथे जवळपासही फिरकू देता नये, असा फतवा जिग्नेशने काढला होता आणि त्याचे यथायोग्य पालन त्याच्या अनुयायांनी केले. हे बाबासाहेबांना मान्य झाले असते काय? असते तर त्यांनी चवदार तळे वा काळाराम मंदिराचे सत्याग्रह कशाला केले असते? अस्पृश्यता संपवण्याचे आंदोलन कशाला चालवले असते? जातीअंताची लढाई कशाला आरंभली असती?

जातीअंताची लढाई वा अस्पृश्यतेचे निर्मूलन म्हणजे आपण तिचे पालन करणे, असा कधीपासून होऊ लागला? हिंदू समाजात असलेली अस्पृश्यतेची घृणास्पद प्रथा संपावी म्हणून बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले. त्यापैकी चवदार तळे असो वा मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम असो, त्यांच्या सोबत ब्राह्मणही होते. विशेष म्हणजे मनुस्मृतीचे दहन त्यांनी एका जन्माने ब्राह्मण असलेल्या व्यक्तीकडून करवून घेतले. तिथे मेवानी असता, तर याने काय केले असते? बाबासाहेब वा त्यांच्या आंदोलनाला रोखले असते काय? कारण मेवानीचा आंबेडकरवाद इतर जातीजमातींचा भेदभाव करणारा आहे. अस्पृश्यतेची नवी सुरुवात करणारा आहे. त्याने भाजपाला अस्पृष्य ठरवलेले आहे आणि ती बाबासाहेबांची भूमिका कधीच नव्हती. कुठल्याही स्वरुपाची अस्पृश्यता त्यांनी नाकारली होती आणि अठरापगड जातीतल्या लोकांना अस्पृश्य मानसिकतेतून बाहेर काढण्याचा लढा उभारला होता. उलट त्यांचे जे सनातनी विरोधक होते, त्यांनी अस्पृश्यतेचा आग्रह धरुन ठेवला होता. मेवानी आज त्या सनातन्यांचे अनुकरण आंबेडकरवादी चळवळीता आणतो आहे. तात्कालीन ब्रह्मवृंदाने दलितांना देवदेवतांच्या मूर्तीला स्पर्श करण्यास वा मंदिरात प्रवेशाला नकार दिला होता. आज मेवानी त्यांच्या भूमिकेत गेला आहे. त्याला दलित चळवळ वा उद्धाराशी कर्तव्य उरलेले नाही. त्याला ब्राह्मण व्हायचे आहे आणि तेही सनातनी वर्णवादी ब्राम्हण म्हणून अधिकार हवे आहेत. त्याला आंबेडकर वा त्यांच्या विचारांशी कर्तव्य नाही. तर ब्राह्मणी वर्चस्वाचे अनुकरण करायचे आहे. तसे नसले तर त्याने कुणा शास्त्रीबोवांच्या थाटात भाजपाच्या नेत्यांना बाबासाहेबांच्या मूर्तीपाशी येण्यास वा त्यांचे पूजन करण्यास आडकाठी कशाला केली असती? त्यातून आपण भाजपाला अपमानित करण्यापेक्षा आंबेडकरवाद पायदळी तुडवत असल्याचेही भान मेवानीला नाही.

अर्थात मेवानीला कशाला दोष द्यायचा? खुद्द बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकरांना तरी कुठे बाबासाहेब होण्याची इच्छा आहे? त्यांनाही मेवानी होण्याचे डोहाळे लागले आहेत. मध्यंतरी भीमा कोरेगावच्या घटनेनंतर आपल्या नेतृत्वाच्या कल्पित यशाची झिंग चढलेले प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, आता मी बाळासाहेब ठाकरे झालो आहे. आपण मुंबई वा महाराष्ट्र एका हाकेने बंद करु शकतो, असा त्यातला गर्भितार्थ आहे. याचाच अर्थ प्रकाशजींना आपल्या आजोबाचे अनुकरण करण्यापेक्षा शिवसेनाप्रमुखांचे अनुकरण करण्याची वा तितका पल्ला गाठण्याची इच्छाआकांक्षा आहे. शिवसेनाप्रमुख व बाबासाहेब यांच्यात अनेक बाबतीत जमीन अस्मानाचा फरक आहे, विचारापासून भूमिकांपर्यंत भिन्नता आहे. शिवसेनेचे अनेक मार्ग बाबासाहेबांच्या भूमिकेला छेद देणारे आहेत. पण त्याची प्रकाशजींना कुठे फिकीर आहे? नातवालाच आजोबाच्या थोरवीची पर्वा नसेल, तर आमदारकीने फुशारलेल्या मेवानीने बाबासाहेबांच्या भूमिका वा विचारांची पायमल्ली केल्यास काय आश्‍चर्य? पण त्यातच महामानवांचा अवमान होत असतो आणि जनसामान्यात असलेली त्यांची प्रतिमा विटाळली जात असते. कारण महामानव पुतळे वा स्मारकात नसतात, तर त्यांच्या विचारामध्येच सामावलेले असतात. त्यांच्या विचाराला हरताळ फासला गेला, मग त्यांची खरी विटंबना होत असते. मेवानीने जयंतीदिनी बाबासाहेबांच्या विचारसरणीची आंबेडकरवादाची विटंबना केली आणि ती ही आंबेडकरी दलित अनुयायांकडून करुन घेतली. ज्यांना बाबासाहेब संपवायला निघालेले होते, त्या सनातनवादी रूढींचा जीर्णोद्धार मेवानीने त्याच मुहूर्तावर करुन घेतला. ज्या संविधानाने समानतेचा उद्घोष केला आहे, त्याची निर्मिती करणार्‍या महामानवाच्या त्याच महान विचारांना त्यांचाच जयजयकार करीत हरताळ फासला गेला आहे. बोलायचे कोणी व सांगायचे कोणी? त्यासाठी पुन्हा नवा महामानव जन्माला यावा लागतो.

पण यातून आंबेडकरवाद म्हणून चालवली जाणारी चळवळ आज कुठल्या दिशेने वाटचाल करते आहे, त्याचेही स्पष्टीकरण मिळू शकते. आज जे कोणी आंबेडकरी चळवळीचे म्होरके झाले आहेत किंवा ज्यांनी त्या चळवळीचा कब्जा घेतलेला आहे, त्यांना आपले ब्राम्हणी वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. जातिप्रथेमधले ब्राह्मणाचे निर्विवाद अधिकार या म्होरक्यांना हवे आहेत. आम्ही सांगू ते धोरण, आम्ही बांधू ते तोरण आणि आम्ही सांगू ते वेद व त्याचा आम्ही लावू तसाच अर्थ. ही प्रवृत्ती यातून डोके वर काढते आहे. त्याचा बाबासाहेबांच्या समतावादी चळवळीशी संबंध काय? बाबासाहेब समतावादी होते आणि त्यात कुठल्याही उच्चनीच भेदभावाला जागा नव्हती. पण मेवानी किंवा प्रकाश आंबेडकर उलट्या दिशेने निघालेले आहेत. त्यांना समता नको आहे तर वर्चस्व हवे आहे. त्यांना अस्पृश्यता हवी आहे. त्यातला फरक वा भेद अनेकांना कळत असेल. पण बोलायची हिंमत कोणापाशी आहे? आजचा पुरोगामी ब्रह्मवृंद अशा गद्दारांना प्रायश्‍चित्त घ्यायला लावेल ना? जो कोणी मेवानी वा तत्सम आंबेडकरवादी म्होरक्यांचा दोष सांगेल वा दाखवण्याची हिंमत करील, त्याला पुरोगामी वर्तुळातून बहिष्कृत केले जाईल ना? शंभरदोनशे वर्षांपूर्वीच्या सनातन्यांची समाजमनावर असलेली दहशत आणि आजच्या पुरोगाम्यांची सेक्युलर दहशत सारखीच आहे. म्हणून मेवानी इतकी हिंमत करु धजला. जेव्हा अशी मंदिरे अतिरेकाच्या आहारी जातात, तेव्हा त्यांचे देवत्व संपुष्टात येते. हेच सिद्ध करणार्‍या महामानव बाबासाहेबांची आज मंदिरे व मूर्ती तेवढ्यासाठी बनवण्यात आल्या आहेत. त्यातून नवी अस्पृश्यता समाजात रुजवली जाते आहे. त्यासाठी बाबासाहेबांचीच मूर्ती व पुतळे वापरले जावेत, याचे दु:ख होते. पण त्यालाही पर्याय नसतो. कुठल्याही श्रद्धा निष्ठेला लोकमान्यता मिळू लागली, मग तिथे पुरोहितवर्ग उदयास येतच असतो ना?

लेखक : श्री. भाऊ तोरसेकर
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *