मला भावलेले आंबेडकर

जो समाज न्यायासाठी वर्षानुवर्षांपासून आसुसलेला होता तो समाज आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी जस्टिस बालकृष्णन् यांच्या रूपाने जाऊन पोहोचला आहे. ज्या समाजाला कधी बाराखडीचा पायपोस नव्हता त्या समाजातील लिखाण आज राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक पातळीवर दलित साहित्य हे बिरुद अभिमानाने मिरवीत आहे. अशा. अनेक स्तरांवर आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे मूलभूत परिवर्तन घडून आलेले आहे. हीच ती अभूतपूर्व क्रांती!

तुम्हां-आम्हां भारतीयांच्या आयुष्यात अनेक लोकोत्तर तपस्वींचे एक आगळे-वेगळे स्थान असते. दुर्दैवाने कुसुाग्रजांच्या ‘अखेर कमाई’ या कवितेप्रमाणे प्रत्येक जातीने ते तपस्वी वाटून घेतलेले आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्या बद्दल काही ठराविक ठोकताळे बांधले गेले आहेत, जे इतके रूढ झाले आहेत की ती ठराविक घटना हीच त्या तपस्वींची ओळख झाली आहे. व त्यापलीकडे जाऊन त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करतही नाही. हेच पाहा ना, तथाकथित ब्राह्मणांचे सावरकर त्यांच्या समुद्रउडी साठी प्रसिद्ध, टिळक त्यांच्या सिंहगर्जनेसाठी प्रसिद्ध, सत्य, अहिंसा या गुणांचे हक्क तर जणु गांधीजींकडेच आहेत. या चौकटीतून कुणीही सुटलेले नाही अगदी आंबेडकर सुद्धा!

आंबेडकरांचे नाव घेतले की काही सामान्यांचे डोळे चमकतात, काहींचे पाणावतात. काहींचे डोळेमोठे होतात, काहींचे डोळे छद्मीपणे हसतात, तर काही डोळे मिळून घेतात. अशा अनेक आविर्भावातून आंबेडकरांचे अवलोकन होत असते. प्रशंसा आणि विपर्यासाच्या द्वंद्वात अडकलेला हा महापुरुष खरा कसा होता? त्यांची ओळख महाडचा सत्याग्रह, धर्मांतर, संविधान इतक्या प्रसंगांतून होणे शक्य आहे का? खचितच नाही, सूर्याची किरणे सर्वदूर पसरून जसे संपूर्ण जग व्यापतात तशी त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची मेहनत यांचा प्रकाश अनुभवण्यासाठी तुम्हां-आम्हांला दलित समाजातील असण्याची गरज भासत नाही.

आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. त्यांच्या शैक्षणिक पदव्यांची रांग बघता उच्चविद्याविभूषित असणे म्हणजे काय? ह्याची जाणीव होते. बाबासाहेबांना आयुष्यभर विद्यार्थी राहणेच पसंत होते व हीच त्यांची प्रेरणा होती. या प्रेरणेतून त्यांनी अनेकांच्या मनात शिक्षणाच्या, विद्वान, विचारी होण्याच्या आशा पल्लवित केल्या. मात्र ज्याप्रमाणे सूर्याची सर्व किरणे एकाच वेळी आपल्यापर्यंत न येता एखादाच किरण आपल्याला स्पर्श करतो, जसे खिडकीतून सर्व आकाश न दिसता एखादाच तुकडा आपल्याला दिसत असतो, त्याप्रमाणे आंबेडकरांच्या अष्टपैलूत्वातील माझ्या मनाच्या खिडकीतून आत पोहोचलेला पैलू म्हणजे मला भावलेले आंबेडकर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे कळणे सोपे नाही. आपली झेप असेल तितकेच आपण त्यांना समजू शकतो. त्यांच्या असंख्य गुणांधील, कार्यांधील मला कळलेले, भावलेले कार्य म्हणजे त्यांचे राष्ट्रीय योगदान, त्यांची क्रांतिकारक वृत्ती आणि त्यांचा नि:शंक राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती असावी. ती कशी याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व.

यासोबत मला आकर्षित करते ती प्रत्येक ज्योत जी बाबासाहेबांनी करोडोंच्या मनात पेटवली. निळ्या रंगापासून सुरू होऊन अवघं आकाश निळं करणारी त्यांची आंबेडकरी चळवळ! या चळवळीशी जोडली गेलेली कित्येक माणसं मनातल्या ज्योतीची ऊब घेऊन आपलं आयुष्य उजळवतात. बेंबीच्या देठापासून ‘जय भीम!’ अशी गर्जना करतांना त्यांच्या प्रती असलेले आपले प्रे व्यक्त करतात. म्हणूनच, बाबासाहेबांशिवाय भारत असूच शकत नाही. त्यांच्या सोबतचा भारत मला जितका कळला तितका मांडते!

जगातील अनेक देशांध्ये क्रांती घडून आली. रशियातील साम्यवादी क्रांती, अमेरिकेतील अब्राहम लिंकनपासून मार्टिन ल्युथर किंगपर्यंत चालत आलेली वर्णभेदविरोधी क्रांती, ऑस्टे्रलियातील नेल्सन मंडेला या महान नेत्याने घडवून आणलेली वर्णद्वेषाविरोधीची क्रांती. अन्य देशांध्येही सामाजिक, राजकीय, आर्थिक क्रांती झाली.

या क्रांतीमध्ये एक मूलभूत फरक आपल्या लक्षात येतो, तो असा, अन्यदेशांध्ये जो समाज विषमतेमध्य पिचत पडलेला होता, जो माणूस गुलामगिरीत होता त्याच्या गुलामगिरीला, त्याच्यावरच्या अन्यायाला त्याचा धर्म कारणीभूत नव्हता. एक ख्रिश्‍चन माणूस दुसर्‍या ख्रिश्‍चनावर अन्याय करत असे परंतु असा उल्लेख बायबल मध्ये आढळणार नाही. एक मुसलमान दुसर्‍या मुसलमानावर अत्याचार करेल.

पण त्याचे मूळ कुराणात नाही. आपल्या भारतामध्ये मात्र मागासवर्गीयांवर जे अन्याय होत असे, त्याचा उगम इथल्या धर्मग्रंथात होता. आणि ज्यांच्यावर अन्याय होत होते त्यांनी त्या अन्यायाविरोधात आवाज उठवू नये याची तजवीज याच धर्मग्रंथामार्फत करण्यात आली होती. त्या तरतुदीतील महत्त्वाचा घटक होता कर्मविपाकाचा सिद्धांत. हा सिद्धांत सांगत होता, की ‘माणूस आज जसे जीवन जगतो, ज्या सुख-दु:खाच्या घटना त्याच्या वाट्याला येतात, त्यांचे मूळ त्याच्या मागच्या जन्मात असते.

मागील जन्मी केलेल्या पाप-पुण्याची फळे त्याला या जन्मात भोगावी लागतात. हे दु:ख त्याने सहन केल्यास पुढील जन्मी त्याला उच्चवर्णीयाचा जन्म मिळून सुखासमाधानाने आयुष्य जगता येईल.’ हा सिद्धांत अन्याय होणार्‍याच्या मनावर इतका ठसविला होता, की त्यामुळे तो माणूस याच भूमिकेतून जगत होता. याचा अर्थ त्या माणसाने पर्यायाने समाजाने स्वत:च्या गुलामगिरीला मान्यता दिली होती. जो समाज स्वत:च्या गुलामगिरीला मान्यता देतो त्याला त्याच्या परिस्थितीतून बाहेर काढणे ही साधी बाब नसते. पण आंबेडकरांनी ह्या समाजाला गुलामगिरीतून यशस्वीपणे बाहेर काढले व इतरांनाही आव्हान दिले, ‘”It may be your intrest to be our masters, but how can it be ours to be your slaves.’‘आमचे राज्यकर्ते म्हणून जगण्याची तुची इच्छा असेलही, पण तुचे गुलाम म्हणून जगण्याची आमची इच्छा कशी असू शकेल! आम्ही सुद्धा माणूस आहोत. माणसाप्रमाणे जगण्याचा आमचा जन्मजात अधिकार आहे, आणि आम्ही तो मिळवायला हवा.’

ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी एक मोठी अभूतपूर्व क्रांती भारतामध्ये घडवून आणली. ज्या कनिष्ठ म्हणवल्या गेलेल्या समाजाला वर्णव्यवस्थेने शिक्षणाचा हक्क नाकारून माणूस म्हणून जगण्यापासून वंचित ठेवले होते, त्या समाजातील व्यक्ती आज विद्यापीठ अनुदान आयोग ह्या भारताच्या सर्वोच्च म्हणून नावाजल्या गेलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंत जाऊन पोहोचला आहे.

डॉ. सुखदेव थोरात हे याचे जिवंत उदाहरण आहे. जो समाज न्यायासाठी वर्षानुवर्षांपासून आसुसलेला होता तो समाज आज भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी जस्टिस बालकृष्णन् यांच्या रूपाने जाऊन पोहोचला आहे. ज्या समाजाला कधी बाराखडीचा पायपोस नव्हता त्या समाजातील लिखाण आज राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक पातळीवर दलित साहित्य हे बिरुद अभिमानाने मिरवीत आहे. अशा. अनेक स्तरांवर आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे मूलभूत परिवर्तन घडून आलेले आहे. हीच ती अभूतपूर्व क्रांती!

बाबासाहेबांनी त्यांची क्रांती केवळ सामाजिक समतेपुरतीच मर्यादित ठेवली असती तरी ती मोठी देशसेवा झाली असती पण ‘माझे स्वहित व देशहित यांमध्ये संघर्ष झाल्यास मी देशहितालाच प्राधान्य देईन’ असे सांगणार्‍या बाबासाहेबांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय मानवजातीच्या खांद्यांना बळ दिले होते. राष्ट्रभक्त कोणाला म्हणावे? तर इंग्रज राजवटीत जो कोणी राष्ट्रीय लढाईत उतरला व तुरुंगात गेला तो राष्ट्रभक्त, असा निकष आपण ठरवलेला असतो. मग बाबासाहेब कधी तुरूंगात गेले? हा प्रश्‍न विचारला जातो. पण हा प्रश्‍न विचारण्यापूर्वी राजकीय आंदोलनात सक्रिय असणार्‍या नेत्यांचा सामाजिक सुधारणेत काय हातभार होता हे आपण तपासून घ्यायला हवे. 1918 ला विठ्ठल रा. शिंदे यांनी मुंबईत अस्पृश्यता निवारण परिषद घेतली होती. त्या परिषदेस आज आपल्या सर्वांच्या मनात आदराचे स्थान असणार्‍या थोर राजकीय नेत्यांनी सहभाग नोंदवला होता. या परिषदेत ‘आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही.’ असा ठराव झाला. त्या ठरावावर उपस्थित सर्वांनी सह्या केल्या मात्र ज्या थोर नेत्याला आज आपण दैवतासमान मानतो त्याने मात्र सही केली नाही.

1975 च्या समाजप्रबोधन पत्रिकेत याच नेत्यावर लेख छापून आला होता. या लेखात म्हटले होते, या थोर नेत्याची तब्येत खालावत चालली असल्याने काही बंगाली नेते त्यांना भेटावयास गेले. या बंगाली नेत्यांना थोर नेते म्हटले ‘आता मला वाटत नाही की देश स्वतंत्र झालेला मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकेन.’ यावर बंगाली नेते सांत्वनपर म्हणाले, ‘तुम्ही लवकर बरे व्हाल व देशाचे स्वातंत्र्य पहाल,  यावर थोर नेते उत्तरले,  ‘पण पुन्हा पेशवाई येईल काय?’  या उदाहरणातील नेत्याबद्दल त्याच्या एका मतामुळे समाजमन कलुषित होऊ नये यासाठी त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. मात्र सत्य हेच आहे की आज आपण ज्या नेत्याला ‘लोकमान्य’ मानतो त्यांना तेव्हा स्वातंत्र्यानंतर मागासवर्गीयांच्या कमरेला झाडे, गळ्यात मडके व हाताला काळा दोरा बांधणारी ‘पेशवाई’ हवी होती. 1923 ला काँग्रेसचे अधिवेशन कोकोनाडा येथे झाले होते.

या भागात वर्चस्व असणारे एक मुस्लिम गृहस्थ या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ते महात्मा गांधीसमोर म्हणतात, ‘भारतातील अर्धे अस्पृश्य मुसलमांध्ये व अर्धे हिंदूंध्ये वाटून टाकले की अस्पृश्यांचा प्रश्‍न सुटला.’’ ही या नेत्याची अस्पृश्यांबद्दलची आस्था. मग बाबासाहेबांनी कशासाठी या देशाच्या राजकीय आंदोलनात सहभागी व्हायला हवे होते? स्वातंत्र्यानंतर देशात पेशवाई आणण्यासाठी की स्वत:ची जहागिरी असल्यासारखी अस्पृश्यांची हिंदू-मुस्लिमांध्ये वाटणी करण्यासाठी? असे प्रश्‍न बाबासाहेबांना देशभक्त न मानणार्‍यांना विचारावेसे वाटतात.

जेव्हा देशहित व वैयक्तिक हित यांच्यात कलह झाला तेव्हा बाबासाहेब देशहितासाठीच उभे राहिले पण जेव्हा जेव्हा त्यांचे समाजहित व देशहित यांच्यात संघर्ष झाला तेव्हा बाबासाहेबांनी नि:शंकपणे देशहिताला प्राधान्य दिले. 1930 ला नागपूर येथे डिप्रेस्ड क्लास सभेत आपल्या समाज बांधवांसमोर बोलतांना ते म्हणाले,  ‘या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात ‘‘पेशवाई’’ येईल असे तुम्हाला वाटत असेल, तर त्या पेशवाईला घाबरण्याचे कारण नाही. आणि पेशवाईला घाबरून तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करता कामा नये. तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या मागणीचाच पाठपुरावा केला पाहिजे.’’ त्या काळातही स्वत:च्या लोकांची मानसिकता स्वातंत्र्याच्या दृष्टीने कशी परिवर्तित करता येईल याचाच विचार त्यांनी केला.

बाबासाहेबांचे सर्वात मोठे राष्ट्रीय योगदान म्हणजे,  ‘स्वतंत्र भारताचे संविधान.’’ ज्यावेळी घटनानिर्मितीसाठी घटनासमितीची निवड करण्याचे ठरले त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत घटनासमि तीवर डॉ. आंबेडकरांची निवड होऊ नये असा निर्धार काँग्रेसने केला होता. हे लक्षात येता, बाबासाहेबांनी ही निवडणूक बॉम्बे प्रॉव्हिन्समधून न लढवता बंगाल प्रांतातून लढवली व जिंकली. घटनासमितीचे कामकाज सुरू झाल्यानंतर 13 डिसेंबरला पं. नेहरूंनी भारतीय संविधानाचे ध्येय व उद्दिष्ट’ सांगणारा ठराव मांडला. या दिवशी मुस्लिम लीगच्या 89 सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला होता. ठरावावर चर्चा सुरू झाली, आणि काँग्रेसमधून निवडून गेलेले डॉ. जयकर आपल्या भाषणात समितीतील एक तृतीयांश सदस्य गैरहजर असतांना असा महत्त्वाचा ठराव पारित करणे पुढे ढकलावे असे म्हटले. काँग्रेस सदस्यांचे आधिक्य असलेल्या घटनासमितीत नेहरूंसारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याच्या ठरावावर आक्षेप घेणे काँगे्रसजनांना सहन झाले नाही. डॉ. जयकरांनी त्यांचा रोष ओढवून घेतला. यामुळे निराश झालेल्या जयकरांनी राजीनामा दिला.

त्यांचे पहिलेच भाषण शेवटचे ठरले. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आंबेडकरांचे भाषण झाले. भाषणाआधी समितीसदस्यांना वाटत होते, की आता यांचेही जयकरांप्रमाणे होणार. भाषणात आंबेडकर म्हणाले, ‘देशातील नेत्यांच्या तुलनेत देशाची प्रतिमा मोठी असते. देशापेक्षा कोणीही मोठा होऊ शकत नाही. मीही एका छावणीचा नेता आहे पण मला विश्‍वास आहे, जर अनुकूल काळ, परिस्थिती आपण निर्माण करू शकत नाही. सत्ता सोपवता येते मात्र शहाणपण सोपवता येत नाही. जे सार्वभौत्व या घटनासमितीला प्राप्त झालेले आहे ते पेलण्याचे शहाणपण या समितीतील सदस्यांध्ये आहे, हे आपण सिद्ध करूया.’’ आणि अशा या पहिल्याच भाषणाचा इतका जबरदस्त परिणाम झाला की नेहरूंचा ठराव काही काळाकरिता पुढे ढकलण्यात आला.

बाबासाहेब बंगाल प्रांतातून निवडून आल्यामुळे फाळणीनंतर त्यांचे घटनासमितीतील सदस्यत्व संपुष्टात आले परंतु ‘‘काळ सूड उगवतो’’ असे म्हणतात. ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना घटनासमितीवर येऊ न देण्याचा चंग बांधला होता त्याच काँग्रेसला आता संविधाननिर्मितीसाठी त्यांची निकड भासू लागली. डॉ. प्रसादांनी बॉम्बे प्रोव्हिन्सच्या Prime Minister डॉ. बी. जी. खेरांना पत्र लिहिले,  ‘डॉ. आंबेडकरांचे घटनासमितीतील आजवरचे काम खूप उपयुक्ततेचे झाले आहे. आम्ही त्यांच्या कार्यापासून वंचित राहू इच्छित नाही. पंधरा दिवसांनी समितीचे दुसरे सत्र सुरू होत आहे, व त्यात बाबासाहेबांनी उपस्थित राहावे अशी आमची इच्छा आहे.’’  आंबेडकरांची इतकी घाई, इतकी गरज घटनासमितीला होती, हे यावरून कळते. त्याप्रमाणे जुलै 1947 ला ते पुन्हा समितीवर निवडून गेले. पुढे मसुदा समितीचे ते अध्यक्ष बनले. व यानंतर संविधान पारित होईपर्यंत आंबेडकरांनी अथक परिश्रम घेतले.

आज स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊनदेखील देशाची भौगोलिक एकता टिकविणे व देशात भावनिक एकता निर्माण करणे यासारखे दोन गंभीर प्रश्‍न आपल्यासमोर आहेत. यासंदर्भात देशाचे भौगोलिक ऐक्य टिकविण्यासाठी केंद्र सरकार मजबूत असायला हवे, ही बाबासाहेबांची भुमिका होती. यात त्यांना राष्ट्रीयतेची बीजे दिसत होती. त्याकाळी आपल्या देशात जवळपास 600 संस्थाने होती. घटनासमितीने मसुदा समितीला जे अधिकार दिले होते त्यात म्हटले होते, संरक्षण, परराष्ट्र धोरण व दळणवळण ह्या गोष्टी सोडता बाकीच्या सर्व बाबतीत संस्थानांना मुक्त अधिकार देण्यात आले आहेत. परंतु संस्थानांना इतके अधिकार देणे खुद्द आंबेडकरांना मान्य नव्हते.

संस्थानांनी एकतर शेजारच्या राज्यात विलीन व्हावे अथवा भारतात सामील व्हावे किंवा स्वत:ला प्रांताचे रूप द्यावे पण मग मात्र केंद्र सरकारच्या स्वतंत्र सवलती त्यांना मिळणार नाही अशी भूमिका बाबासाहेबांनी मांडली. याचा संस्थानांवर विलक्षण परिणाम झाला व जवळपास सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. याचे श्रेय गृहमंत्री या नात्याने सरदार पटेलांना दिले जाते. त्यांचे कार्य मोठे होतेच मात्र त्यामागे विचार बाबासाहेबांचा होता.

घटनेतील पहिलेच कलम असे सांगते, की भारत एक संघराज्य आहे. त्याला Federation असेही म्हटले जाते. या कलमावर जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा काही लोकांनी दुरूस्ती सुचवली, की भारताचे नाव अमेरिकेप्रमाणे United States of India असे ठेवण्यात यावे. काहींनी Union या शब्दाला Federation of State अशी दुरुस्ती सुचवली. या सर्व दुरुस्त्यांना बाबासाहेबांनी कडाडून विरोध केला. त्यांच्या मते, ‘Federation हे करारातून निर्माण होते. पुढे जर करार करणार्‍या राज्यांना करारमुक्त व्हावेसे वाटले तर ते राज्य देशातून बाहेर पडू शकले असते. Union हे नैसर्गिक रीत्या तयार होते. त्यामुळे भारतातील कोणत्याही राज्याला देशातून बाहेर पडता येणार नाही. हे  Union या शब्दांत अंतर्भूत आहे.’’ आणि कोणीही याचा आव्हान देऊ नये म्हणून बाबासाहेबांनी भौगोलिक ऐक्यासाठी ही भूमिका घेतली.

भारताला राष्ट्र म्हणून निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. अमेरिकेत दुहेरी नागरिकत्वाची पद्धत आहे. त्या संदर्भात बाबासाहेबांची भूमिका अशी,  ‘तुम्ही-आम्ही महाराष्ट्र किंवा इतर कुठल्या राज्याचे नागरिक नाही, तर आपण फक्त भारताचे नागरिक आहोत. खरा I am Indian First and Indian Last.’

इंग्रजांच्या काळात धर्माधर्मांत, जातीजातींत संघर्ष झाले पण त्याचे दोषारोप इंग्रजांच्या ‘‘फोडा आणि राज्य करा’’ या नीतिवर केले जात. वास्तव हे असते तर 15 ऑगस्ट 1947 नंतर या देशात धार्मिक, जातीय दंगली व्हायला नको होत्या पण ब्रिटिशकाळापेक्षा कित्येक पटीने जास्त दंगली स्वातंत्र्योत्तर काळात आजवर घडता आहेत. या अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकांच्या प्रश्‍नाला उत्तर देण्यासाठी आंबेडकरांनी आरक्षणाचा तोडगा काढला. आरक्षण आजही देशातील नाजूक विषय आहे. आरक्षणाच्या चर्चेच्या वेळी घटनासमितीतील काही सदस्यांनी,  ‘एकीकडे संविधानाच्या सरनाम्यात देशातील सर्व लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन आहे व दुसरीकडे मागासवर्गीयांसाठी आरक्षण देऊन समान संधीच्या तत्त्वाला छेद दिला जात आहे.’’ असा आरोप बाबासाहेबांवर केला. यावर बाबासाहेब म्हणालेहोते, ‘‘काही ऐतिहासिक कारणामुळे या देशातील प्रशासन उच्चवर्गीयांच्या हाती केंद्रित झालेले होते. जर आज ही आरक्षणाची तरतूद झाली तर भविष्यात सुद्धा या देशाच्या सत्तेच्या दोर्‍या उच्चवर्गीयांकडे एकवटलेल्या असतील. प्रशासनात काम करण्याची संधी मागासवर्गीयांना कधीही मिळणार नाही. याचाच अर्थ समान संधीचे तत्त्व कधीच अमलात येणार नाही. म्हणून आरक्षणाची तरतूद करणे महत्त्वाचे आहे.’’’’

अशा समतेसाठीच्या विषमतेतून बाबासाहेबांना अल्पसंख्याकांसाठी राजकीय बहुसंख्याकता हवी होती. व ती त्यांनी समाजाला मिळवून दिली. बाबासाहेबांनी आपल्या समाजातील लोकांच्या कर्तृत्वाला वाव दिला. यामुळेच भारतात आजवर अनेक महापुरुष होऊन गेले परंतु त्यांच्या जयंती वा पुण्यतिथीच्या दिवशी शासकीय कार्यालयांत होणार्‍या कार्यक्रमांव्यतिरिक्त सामान्य माणसाला त्याचे किती कौतुक असते हा प्रश्‍न आपण सर्वांनीच स्वत:ला विचारला पाहिजे. पण बाबासाहेबांच्या जयंती अथवा महापरिनिर्वाणदिनी किंवा त्यांच्या धर्मांतराच्या दिवशी त्यांना आपला मुक्तिदाता मानणारा समाज करोडोंच्या संख्येने स्वत:हून पुढे येतो. शासकीय कार्यक्रमांवर त्यांना कधीही विसंबून राहावे लागत नाही. बाबासाहेबांनी जितके प्रे या समाजाला दिले तितके प्रेम हा करोडोंचा जमाव बाबासाहेबांवर करतो यात संदेह नाही.

भारतात केवळ दलितांच्या उद्धारासाठीच बाबासाहेब झटले नाहीत. देशात एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी Uniform Civil Code चे प्रयोजन घटनेच्या कलम 44 मध्ये केले. आपल्या देशातील Penal Code सर्वांना लागू होते मात्र समान नागरी कायदा धर्म वेगळे असल्याकारणाने लागू होत नाही. हा समान नागरी कायदा अस्तित्वात आणण्यासाठी बाबासाहेबांनी उचललेले ऐतिहासिक पाऊल म्हणजे हिंदू कोड बिल. धार्मिक मूलतत्त्ववाद्यांनी त्यावेळी बालविवाहाला विरोध करणार्‍या, आंतरजातीय विवाहांना मान्यता देणार्‍या, वडिलोपार्जित संपत्तीत मुलासोबत मुलीला समान वाटा देणार्‍या, एकपत्नीत्व किंवा पतीत्वाचे बंधन घालणार्‍या, हिंदू विधवेला पुनर्विवाहाचा व हिंदू स्त्रीला घटस्फोट घेण्याचा अधिकार देणार्‍या हिंदू कोड बिलाला कडाडून विरोध केला होता. खरं पाहता, कोणत्याही बुद्धिवाद्याला पटणार्‍या या सर्व तरतुदी होत्या. परंतु या तरतुदींविरोधात त्यावेळी प्रचंड गदारोळ माजला. या बिलाचे नाव जरी हिंदू कोड बिल असले तरी प्रत्यक्षात बौद्ध, जैन, शीख या धर्मांनाही हे बिल लागू होते. या धर्माप्रमाणेच इतर धर्मांनाही हा कायदा लागू व्हावा अशी बाबासाहेबांची भूमिका होती. हे बील सर्वधर्मांना लागू झाल्यास, धर्माधर्मांतील लोक सहानुभूतीने एकमेकांच्या जवळ येतील व खर्‍या अर्थाने राष्ट्र निर्माण होईल, हा आंबेडकरांचा विचार होता.

आज आपण देश आहोत. परंतु राष्ट्र म्हणून आपण कुठेतरी अपूर्ण आहोत. देशाच्या निर्मितीसाठी विशिष्ट भूभाग, त्यात राहाणारे लोक, त्यांच्यावर राज्य करणारे सरकार ह्या घटकांची पूर्तता आपण केली आहे. पण राष्ट्रासाठी आवश्यक असणारे भावनिक ऐक्य मात्र आपल्याजवळ पुरेशा प्रमाणात नाही. आपल्या मनात भावनिक ऐक्याच्या जाणिवेचा अभाव असण्याचे प्रमूळ कारण जातिव्यवस्था हे आहे. जाती-जातींच्या भिंतीमुळे एकाच धर्मांतील, समाजातील लोक एकमेकांचा द्वेष करतात. त्यामुळे संविधानाच्या राज्यात जे काही बरे-वाईट होते त्याचे कारण संविधान नाही तर त्या काळातील माणसे असतात. संविधानाचे पर्यायाने भारताचे शिल्पकार असणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीला दिसत होते की स्वातंत्र्यानंतरही या देशात खैरलांजी घडणार आहे; हा समाज रोहित वेुलाला आत्महत्या करण्यास भाग पाडणार आहे, आणि या देशातील गावागावांत आजही ‘‘सैराट’’ घडणार आहे. तरीसुद्धा डॉ. आंबेडकर घटना समितीतील आपल्या शेवटच्या भाषणात म्हणतात, ‘‘या देशातील प्रत्येक नागरिकाने ही प्रतिज्ञा केली पाहिजे, की शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी देशाच्या स्वातंत्र्याचे प्राणपणाने संरक्षण करीन.’’’’ म्हूणनच आंबेडकर हे राष्ट्रभक्तीचे दीपस्तंभ ठरतात. या देशाला खर्‍या अर्थाने महासत्ता बनवायचे असल्यास आपण सर्वांनाच या दीपस्तंभाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल, हेच सत्य.

“The Element So Mixed In Him That Nature Might Stand Up and Say To All World,”

“This Was A Man!” ‘

लेखिका : प्राजक्ता नागपुरे
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *