चीन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि त्यास भारताचे प्रत्युत्तर

पाकिस्तान जन्मापासूनच भारताला शत्रू समजतो. भारताशी आर्थिक किंवा सामरिक बरोबरी करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे. काश्मीर ताब्यात आल्यास पाकिस्तानचे आकारमान वाढेल आणि आपण भारताशी बरोबरी करू शकू अशी त्यांची भूमिका आहे. याच काश्मीर प्रश्‍नामुळे भारताबरोबर पाकिस्तानचे चार वेळा युद्ध झाले. चारीवेळा पराभव पत्करावा लागल्यानंतर 1980 च्या दशकापासून पाकिस्तानने भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया सुरू केल्या.  पण त्यावरही नियंत्रण ठेवण्यात भारताला यश आले आहे. आज विविध दहशतवादी कृत्यांमध्ये 600 ते 800 जण प्रत्येक वर्षी मारले जातात. त्यात 100 ते 150 सामान्य नागरिक, 150 ते 200 सैनिक व अधिकारी आणि 250 -350 दहशतवादी असतात. मात्र पाकिस्तान ज्याची लोकसंख्या भारताच्या 15 टक्के आहे, त्यात दहशतवादी कृत्यांमुळे प्रत्येक वर्षी 5-6 हजार पाकिस्तानी मारले जातात.

आज पाकव्याप्त काश्मिरमधील जनता पाकिस्तानवर नाराज आहे. बलुचिस्तानमध्ये स्वतंत्र राष्ट्राची मागणी होत आहे. सिंध प्रांतात ‘जयो सिंध’ किंवा ‘स्वतंत्र सिंध’ ही चळवळ सुरू आहे. अफगाणिस्तानला लागून असलेला नॉर्थ वेस्ट फ्रंटिअर प्रॉव्हिन्स – फ़ाटाह या भागामध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या दहशतवादाच्या विरोधात चालवल्या जाणार्‍या अभियानासाठी 50 टक्क्यांहून जास्त पाकिस्तानी सैन्य वापरले जाते. सुरुवातीला 85 टक्के पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमांवर असायचे आता मात्र ते आता निम्म्याहून कमी करण्यात आले आहे.

आण्विक बॉम्बमुळे पारंपरिक युद्ध हा पर्याय नाही???

भूदल हा पाकिस्तानी सैन्यामधला सर्वात  महत्त्वाचा, ताकदवान घटक आहे. पाकिस्तानचे रक्षण हेच त्यांचे काम आहे. पाकिस्तानला भारताकडूनच भीती आहे, असे सांगून पाकिस्तानी सैन्य हे आपली ताकद वाढवत असते. 1947, 1965, 1971 आणि 1999 यामध्ये पाकिस्तानचे भूदलच भारताशी लढले. त्यानंतर भारतात त्यांनी दहशतवादी कारवायांना सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सैन्याच्या वापर करून पारंपरिक युद्ध सुरू करू नये यासाठी पाकिस्तानने आण्विक शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे बनवली आहेत. एवढेच नव्हे तर टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे छोटे आण्विक बॉम्ब बनवले आहेत. यांचा वापर भारतीय सैन्याच्या विरोधात केला जाऊ शकतो, अशी धमकी पाकिस्तान सातत्याने देत असतो. थोडक्यात भारताने पाकिस्तानला दबून रहावे आम्ही वाटेल तसे दहशतवादी हल्ले करून भारताला त्रास देऊ. मात्र भारताकडे असलेल्या आण्विक बॉम्बला घाबरुन पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी तयार नाही. मात्र भारत पाकिस्तानकडे असलेल्या आण्विक बॉम्बला घाबरुन दहशतवादास प्रत्युत्तर म्हणून पारंपरिक युद्ध करू शकणार नाही. मात्र हे खरे नाही.

पाकिस्तान लष्करप्रमुखांचे सामरिक धोरण

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे सामरिक धोरण ज्याला ‘बाजवा डॉक्ट्रीन’ म्हणतात, सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानला आपल्या शेजारी देशांशी शांततापूर्ण संबंध ठेवायचे आहेत आणि भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध होणे अशक्य आहे, असे या धोरणात म्हटले आहे. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे असल्यामुळे युद्ध होणार नाही, काहीही झाले तरी पाकिस्तान आपले काश्मीर धोरण बदलणार नाही, तसेच त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढत राहणार. पुढे कधी न कधी भारताला पाकिस्तानशी चर्चा करावी लागेल. ज्याच्यात पाकिस्तानचे महत्त्व डावलता येणार नाही. लष्करप्रमुखांनी स्वतःच्या सैनिकांना उद्देशून खुलासा केला आहे की सध्या भारतात नरेंद्र मोदी सरकार असल्यामुळे पाकिस्तानला भारताच्या आक्रमक धोरणाला त्याच पद्धतीने उत्तर द्यावे लागेल. परंतु, मोदी सरकार बदलल्यानंतर शांततेचा मार्ग उघडला जाईल.

सध्या तरी अस्थिरता कायम राहणार  पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे सामरिक धोरण भारताला आव्हान देणारे आहे. त्याला योग्य प्रत्युत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्याची विचारपूर्वक मीमांसा करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम म्हणजे पाक लष्करप्रमुखांना धोरणाची घोषणा करण्याचा आत्मविश्‍वास कशामुळे आला? याला पाकिस्तानची अंतर्गत राजकीय स्थिती आणि चीनबरोबर वाढते संबंध कारणीभूत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या कथित लोकशाही असली, तरी नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागल्याने राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. मैत्री दर्शवणार्‍या चीनवर पाकिस्तानला अवलंबून राहावे लागणार आहे. चीन-पाक आर्थिक संबंध ज्याप्रकारे वाढत आहेत त्याचे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर काय परिणाम होतील याची तेथील समंजस विचारवंतांना काळजी वाटते. काही दिवसांपूर्वी पाक-व्याप्त काश्मीरमध्ये ताबारेषेजवळ राहणार्‍या गावकर्‍यांनी निदर्शने केली. सध्यातरी अस्थिरता कायम राहणार आहे.

येत्या काळात भारत-पाकिस्तान संबंधाचे स्वरूप पाकिस्तान दहशतवादाचा वापर करून भारताला काश्मीरप्रश्‍नी पाकिस्तानशी वाटाघाटी करण्यास भाग पाडायचे. दहशतवादाचा वापर करून काश्मीर भारतापासून कधीही वेगळे करू शकणार आही हे त्यांना माहीत आहे. मात्र त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेला पाकिस्तानी सैन्य भारताचे कसे नुकसान करते आहे हे दाखवून देण्याकरता दहशतवादाचा वापर करायचा.

येत्या पाच ते दहा वर्षांच्या काळात भारत-पाकिस्तान संबंधाचे स्वरुप कसे राहिल याचा अंदाज करावा. पाकिस्तान काश्मिरमधील छुपे युद्ध दहशतवादाच्या माध्यमातून सुरूच ठेवेल. भारताच्या इतर भागात दहशतवादी कारवाया करण्याकरता प्रयत्न केले जातील. भारतातील दहशतवादी संघटनांनी अल् कायदा आणि आयसिस यांच्याशी संगनमत केले आहेच. त्याशिवाय लष्करे तैयबा, जैश ए मोहम्मद सारखे इतर दहशतवादी गट काश्मिमध्ये हिंसाचार करतील. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांची भारतातील घुसखोरी सुरूच राहील. एवढेच नव्हे तर पाकिस्तान नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसवण्याचाही प्रयत्न करेल. भारत पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा भारतीय सैन्याने सील केल्यामुळे पाकिस्तानी सैन्य येत्या काळात जम्मूपासून गुजरातपर्यंतच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेचा वापर दहशतवादी घुसवण्याकरिता करेल.  त्याशिवाय बांगलादेश सीमेवरून दहशतवाद्यांची घुसखोरी केली जाईल. समुद्री सीमांचा वापर भारताचे अंतर्गत संतुलन बिघडवण्यासाठी केला जाईल. तिथून तस्करी, बेकायदेशीर व्यापार, बांगलादेशी घुसखोरी इत्यादींकरता वापर होईल. यासाठी त्याला चीनची प्रचंड मदत मिळेल. अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणला असला तरीही त्याचा पाकिस्तानवर जास्त प्रभाव पडला नाही. कारण अमेरिकेकडून थांबलेली मदत आता त्यांना चीनकडून मिळत आहे. भारताला अशांत केल्यामुळे भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग कमी होईल. त्यामुळे चीनला आशिया खंडात प्रतिस्पर्धी राहणार नाही. हे सर्व करण्यासाठी येत्या काळात पाकिस्तान दहशतवादी कृत्य सातत्याने करत राहाणार.

भारताकडून प्रत्युत्तर

भारताने याला कसे प्रत्युत्तर दिले पाहिजे? 2018 मध्ये पाकिस्तानात निवडणुका होत आहेत. 2019 मध्ये आपल्याकडे निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानात कुठलाही पक्ष जरी जिंकला तरीही पाकिस्तानी सैन्याची भूमिका सर्वात प्रमुख राहणार आहे. पाकिस्तान आणि चीनची इच्छा आहे की येत्या निवडणुकीआधी भारतास काश्मिरबाबत वाटाघाटी करण्यास भाग पाडावे, म्हणून पुढच्या 1-2 वर्षांत दहशतवादी घटना, हिंसाचार सुरूच राहातील. या काळामध्ये भारत काय करू शकतो? नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य पाकिस्तान सैन्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारतीय सैन्यापेक्षा पाकिस्तानचे तिप्पट नुकसान झाले आहे तरीही पाकिस्तान थांबणार नाही. यापुढची आपली पायरी काय असू शकते? नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यासाठी मोठी शस्त्रे आणि तोफखान्याचा वापर करावा लागू शकतो. आपल्याकडील क्षेपणास्त्र पृथ्वी, अग्नी वापरून पाकिस्तानच्या अंतर्गत 50 ते 200 किलोमीटर पर्यंत मारा करावा लागेल. तर अजून सर्जिकल स्ट्राईक्स सुरू ठेवण्याची गरज आहे. त्यामुळेसुद्धा  दहशतवादी कारवायांमध्ये कमतरता आली नाही तर हवाई दलाचा वापर करावा लागेल. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले जाऊ शकते. त्यासाठी आपल्याला तयार रहावे लागेल.

त्याशिवाय भारत अनेक पावले उचलू शकतो. भारत पाकिस्तानमधील बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मिरमधील जनतेवर जो अन्याय होत आहे त्याचा वापर करून पाकिस्तानचे सरकार जनतेवर कसे अन्याय करतेय आणि मानवधिकाराचे उल्लंघन करते आहे हे माहिती युध्द आपण सुरू केले पाहिजे. आपण पाकिस्तानवर आर्थिक युद्ध लादू शकतो. चीन-पाकिस्तान आर्थिक परिक्षेत्र विकास हा पांढरा हत्ती ठरतोय. या क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी जवळजवळ 20 हजार एवढे सैन्य गुंतले आहे. चीनच्या 1-2 डिव्हीजन्स हे या रस्त्याचे रक्षण  करण्यामध्ये गुंतलेल्या आहेत. प्रत्येक वर्षी अनेक चीनी नागरिक तरीही पाकिस्तानात मारले जात आहेत. त्यामुळे चीन चिंतित असतो. चीन पाकिस्तान आर्थिक परिक्षेत्र हे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक प्रकल्प आहेत. यामध्ये पाकिस्तानला आर्थिक अपयश आले तर त्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठाच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जशास तसे उत्तर देण्यासाठी पाकिस्तानातील नाराज घटकांची मदत घेऊन भारतात दहशतवादी हल्ले केल्यास पाकिस्तानच्या चीनी आर्थिक परिक्षेत्रावर हल्ले केले जाऊ शकतात. पाकिस्तानला शांत बसवण्यासाठी अपारंपरिक युद्ध हे एक प्रभावी हत्यार असू शकते.

मुत्सद्देगिरीचा वापर करून अमेरिका आणि इतर राष्ट्रांची मदत घेऊन पाकिस्तानला दहशतवादाला मदत करणारे राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजे. सगळ्या जगाने ज्याप्रमाणे इराण आणि उत्तर कोरिया यांच्यावर आर्थिक निर्बंध घातले होते तसाच बहिष्कार पाकिस्तानवर टाकण्यास भाग पाडावे. पुढच्या दोन वर्षांत आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून पाकिस्तानवर दबाव टाकू शकतो. मात्र हे करून पाकिस्तान ऐकेल की नाही हे सांगता येणे कठीण आहे.

शेवटचा पर्याय म्हणून पारंपरिक युद्ध

शेवटचा पर्याय म्हणून पारंपरिक युद्ध करून पाकिस्तानी सैन्याचा युद्धात पराभव करून पाकिस्तानच्या जीवनातील त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. आपण पारंपरिक युद्धासाठी तयार आहोत का हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. अशा युद्धासाठी तयारी करण्यास दोन किंवा त्याहून अधिक वर्षे लागतील. ती तयारी आपण सुरू करायला पाहिजे. मेक इन इंडिया अंतर्गत सर्वच शस्त्रे पुढच्या पाच वर्षांत निर्माण करण्याचा प्रयत्न करून सैन्याला शस्त्रसिद्ध करणे आणि काही वर्षांनंतर युद्धाला तयार राहणे ही तयारी करावी लागेल. सरकार या सर्व पर्यायांचा वापर करून अशा प्रकारे पुढच्या काही वर्षांमध्ये पारंपरिक युद्ध करण्यासाठी तयार राहावे. पाकिस्तानी सैन्याचे कायमस्वरूपी खच्चीकरण करण्याचा हा कायमस्वरूपी एकच उपाय आहे.

लेखक : ब्रि. हेमंत महाजन
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *